शेतीला दिली डेअरी व्यवसायाची जोड

पुसद (जि. यवतमाळ) येथील देशमुख कुटुंबीयांनी डेअरी व्यवसायात उडी घेतली. परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध घेत दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थांच्या निर्मिती व विक्री ‘सई’ या ब्रॅण्डखाली करत आहेत.
शेतीला दिली डेअरी व्यवसायाची जोड
शेतीला दिली डेअरी व्यवसायाची जोड

केवळ शेतीतून उत्कर्षाचे दिवस आता मागे पडत असल्याचे ओळखत पुसद (जि. यवतमाळ) येथील देशमुख कुटुंबीयांनी डेअरी व्यवसायात उडी घेतली. परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध घेत दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थांच्या निर्मिती व विक्री ‘सई’ या ब्रॅण्डखाली करत आहेत. वैभवचे शिक्षण, नोकरीतील अनुभव याचा व्यवसायामध्ये चांगलाच फायदा होत आहे. 

पुसदच्या मोतीनगर भागात राहणारे संतोषराव देशमुख यांची कोंढई शिवारात ३५ एकर शेती. मात्र, पूर्वी सिंचनाची समस्या असल्यामुळे वणी धरणाच्या बॅक वॉटरपासून शेतापर्यंत संतोष देशमुख यांनी पाच किलोमीटर पाइपलाइन टाकली. संपूर्ण शिवार ओलीताखाली आल्याने ऊस, हळद यासारखी व्यावसायिक पिके घेणे शक्य झाले. डेअरी व्यवसायात रोवले पाय शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याच्या उद्देशाने विविध उद्योगाची चाचपणी केली. त्यातून दुग्ध व्यवसायावर कुटुंबीयांचे एकमत झाल्यानंतर प्रथम एक गाय, त्यानंतर दोन म्हशी यासह सुरवात केली. संतोष देशमुख यांचा मुलगा वैभव याने उद्गीर येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी मधून बी. टेक पदवी घेतली आहे. डेअरी व्यवसायात पाय रोवण्याचे ठरवल्यामुळे त्या क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी वैभवने श्रीरामपूर (नगर) येथील मोठ्या डेअरीमध्ये काही महिने नोकरी केली. तिथे त्याला दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतील अनेक बारकावे, तांत्रिक माहिती मिळाली. त्याचा फायदा आता आता व्यवसायातील दैनंदिन व्यवस्थापनात होत असल्याचे असे वैभवने सांगितले. असा झाली प्रक्रियेला सुरवात डेअरीतील नोकरी सोडून गावी परतल्यानंतर वैभवने सुरवातीला घरातील वीस लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सुरवात केली. प्रायोगिक तत्त्वावर उत्पादित पदार्थांची विक्री परिसरात सुरू केली. त्यांच्याकडून दर्जा चांगला असल्याबद्दल प्रतिक्रिया मिळू लागल्या. त्यातून हुरुप वाढला. मग व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे वैभवने सांगितले.

परिसरातील शेतकऱ्यांचाही फायदा 

  • घरचे दूध केवळ ३५ ते ४० लिटर होते. दुग्धजन्य पदार्थांची मागणी तर वाढू लागली होती. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात अडचणी येऊ लागल्या. व्यवसाय वाढीसाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता वर्तमानपत्रात जाहिरात दिली.  त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. टप्प्याटप्प्याने दूध संकलन वाढत आज १००० लिटरवर पोचले आहे.
  •   शेतकऱ्यांकडून पुरवठा होणाऱ्या गाईच्या दुधाला सर्वाधिक पावणे सात रुपये प्रती फॅट असा दर दिला जातो. त्यासाठी ३.५ फॅट व ८.५ इतका एसएनएफ असलेल्या दुधाची खरेदी केली जाते. २८ रुपये लिटर गाईच्या दुधाचा खरेदी दर आहे.  
  •   म्हशीच्या दुधासाठी फॕट ६.०, एसएनएफ ९.० असा आहे. म्हशीच्या दुधाचा खरेदी दर सरासरी ४१ रुपये लिटर आहे.  
  •   शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या एकूण सरासरी १००० लिटरपैकी दररोज सरासरी ५०० लिटर दुधाची विक्री होते. ५० ते ६० रुपये लिटर प्रमाणे दुधाची विक्री केली जाते. 
  •   उर्वरित ५०० ते ५५० लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते.
  • कंपनीची नोंदणी, सई ब्रॅण्डने विक्री दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या व्यवसायाकडे वळणाऱ्या वैभवने आपल्या उद्योगाला वडिलांचे नाव दिले आहे. ‘संतोष अ‍ॅग्रो इंडस्ट्री’ नावाने कंपनी नोंदणी केली असून, कंपनीअंतर्गत ‘सई’ हा ब्रॅण्ड नोंदवलेला आहे. या ब्रॅण्डखाली पनीर, दही, खवा, तूप, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, ताक असे दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री केली जाते. प्रति दिन १०० किलो दह्याची विक्री होते. लग्नसराईत तुपाला अधिक मागणी राहते. सद्यःस्थितीत १०० ते १५० किलोपेक्षा अधिक तूप आठवड्याला विकले जाते. तर प्रति महिना पनीर एक टनापर्यंत विकले जात आहे.   स्वच्छ दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण  दूध हा खाद्यपदार्थ आहे. आपल्याकडे स्वच्छ दूध उपलब्धतेची मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी दुधाचा रतीब घालणाऱ्या शेतकऱ्यांचा गोठा व परिसर आणि दुधाळ जनावरे ही स्वच्छ असणे गरजेचे आहे. याकरिता वैभवने आपल्या ज्ञानाचा उपयोग केला. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतः जाऊन स्वच्छ दुधाचे महत्त्व, गरज या संदर्भात मार्गदर्शन केले. परिणामी शेतकऱ्यांमध्येही तंत्रशुद्ध दुग्धोत्पादनाविषयीचा आत्मविश्‍वास वाढीस लागला. संकलित होणाऱ्या दुधाचा दर्जाही सुधारण्यास मदत झाली. 

    दर्जा टिकवण्यासाठी  करावी लागते अधिक मेहनत

  • दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. दरवेळी त्याच चवीचा, स्वादाचा पदार्थ ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे. हे धोरण कायम ठेवल्याने उत्पादनांना ग्राहकांचा अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत गेल्याचे वैभवने आत्मविश्‍वासाने सांगितले. 
  •   त्याचा लहान भाऊ गौरव हा मार्केटिंगची जबाबदारी सांभाळतो. 
  •   डेअरी उद्योगामध्ये सध्या २० मजूर काम करतात. त्यांना आठवड्याला मजुरीचे पैसे दिले जातात. 
  •   दुधाचा रतीब घालणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील आठवड्यालाच पैसे देण्याचे धोरण ठेवले आहे. 
  •    पुसद परिसरामध्ये ‘सई’ ब्रॅण्ड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी ५ दुकाने उघडली होती. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यातील दोन बंद करावी लागली. सद्यःस्थितीत पुसदमधील चौबारा,  इटावा, देशमुख नगर या भागात एकूण ३ आउटलेट सुरू असल्याची माहिती वैभवने दिली. या सर्व केंद्रावरून केवळ सई ब्रॅण्डचेच दुग्धजन्य पदार्थ विकले जातात. व्यवसाय विस्तारीकरणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  •   दिग्रस, मंगरूळ पीर आणि अरणी या तीन तालुक्यातील दुकानदारांना कमिशनवर माल दिला जातो.  
  • असे आहेत दर आणि पॅकिंग

  •   तूप, पनीर १२५ ग्रॅम ते १ किलो पर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. 
  •   दही ग्राहकांच्या गरजेनुसार पॅकिंग व खुले देखील उपलब्ध केले आहे. दह्याची विक्री ६० ते ८० रुपये प्रति किलो या फॅटच्या प्रमाणात  होते. 
  •   देशी गाईचे तूप ७४० रुपये, म्हशीचे ६४० रुपये किलो उपलब्ध केले आहे. 
  •   अन्य महत्त्वाच्या दुग्धजन्य पदार्थामध्ये प्रति किलो दर पुढील प्रमाणे - पनीर ३६० रुपये, श्रीखंड २०० रुपये, आम्रखंड २२० रुपये किलो, ताक ३० रुपये लिटर, खवा ३२० रुपये, तर बासुंदी २२० रुपये. 
  •   मोठ्या प्रमाणात विक्रीचे होलसेल दर वेगळे आहेत. 
  •   या सर्व व्यवसायातून दोन लाखापर्यंतचे उत्पन्न कुटुंबीयांच्या हाती येत असल्याचे वैभवने सांगितले. 
  • ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’...अशा आत्मविश्‍वासाने नवे प्रयोग करण्यासाठी वैभव आजही उत्सुक आहे. व्यवसायाच्या वाढीसाठी विविध कल्पना राबवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये त्याला कुटुंबीयांची मोठी मदत होते.
  •   वैभव देशमुख, ८८०५०१२३०३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com