पक्ष्यांच्या जैवविविधतेत वेगाने होतेय घट

अमेरिकेतील पक्ष्यांच्या जैवविविधतेमध्ये वेगाने घट होत असल्याचे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.घट होण्यामागील कारणांमध्ये निओनिकोडीनॉईड गटातील कीटकनाशकांचा वापर हे प्रमुख कारण असल्याचा स्पष्ट निर्देश या अभ्यासात दिला आहे.
 पक्ष्यांच्या जैवविविधतेत वेगाने होतेय घट
पक्ष्यांच्या जैवविविधतेत वेगाने होतेय घट

अमेरिकेतील पक्ष्यांच्या जैवविविधतेमध्ये वेगाने घट होत असल्याचे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. १९७० पासून एकूण पक्ष्यांच्या संख्येमध्ये २९ टक्क्याने घट झाली असून, गवताळ कुरणांतील पक्ष्यांमध्ये ५३ टक्के घट झाली आहे. घट होण्यामागील कारणांमध्ये निओनिकोडीनॉईड गटातील कीटकनाशकांचा वापर हे प्रमुख कारण असल्याचा स्पष्ट निर्देश या अभ्यासात दिला आहे. एकूण पर्यावरणामध्ये आणि शेती उत्पादनासाठी पक्ष्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा पक्ष्यांची संख्या कमी होते, त्यावेळी किडींच्या संख्येमध्ये वाढ होते. त्याच प्रमाणे अन्य झाडांच्या परागीकरणामध्येही पक्षी महत्त्वाची भूमिका निभावतात. पक्ष्यांच्या संख्या घटल्यामुळे अन्न उत्पादन आणि मानवी आरोग्य या दोहोंवर विपरीत परिणाम होऊ शकतो. गेल्या शतकामध्ये एकत्रित कृषी क्षेत्राचे वाढते प्रमाण, कीडनाशकांचा वाढता वापर, गवताळ कुरणांचे शेतीमध्ये होणारे रूपांतर आणि हवामान बदल असे अनेक तीव्र बदल घडून आले आहेत. इल्लिनॉईस विद्यापीठातील कृषी आणि ग्राहक अर्थशास्त्राचे प्रो. मधू खन्ना यांनी केलेल्या अभ्यासामध्ये पक्ष्यांची संख्या कमी होण्यामध्ये निओनिकोटिनॉईड कीडनाशकांचा वापर हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘नेचर सस्टेनिबिलिटी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. प्रो. खन्ना यांनी पॉडकास्टवरून माहिती देताना सांगितले, की या आधी झालेल्या अनेक अभ्यासातून निओनिकोटिनॉईड - निकोटीन आधारीत कीटकनाशकांचे जंगली मधमाश्या, मधमाश्या, फुलपाखरे यांच्यावरील विपरीत परिणाम समोर आले होते. मात्र. पक्ष्यावरील कीटकनाशकांच्या परिणामाविषयी विस्तृत अभ्यास मर्यादित झालेले आहेत. या राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अभ्यासासाठी सात वर्षाचा काळ लागला. त्यामध्ये पक्ष्याच्या गवताळ भागातील, गवताळ भागाशिवाय अन्य पक्षी, कीटकभक्षी आणि कीटकभक्षी नसलेले अशा चार प्रकारातील शेकडो पक्ष्यांची माहिती गोळा करण्यात आली. त्यातून विशेषतः गवताळ भागातील पक्ष्यांवर निओनिकोटीनॉईड कीटकनाशकांचे अत्यंत विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काही प्रमाणात जमीन वापरामध्ये झालेल्या बदलांचे कीटकभक्षी पक्ष्यांवर विपरीत परिणाम दिसून येतात. प्रो. मधू खन्ना आणि ऑबर्न विद्यापीठातील साहाय्यक प्रा. रोईक्विंग मियावो व विद्यार्थिनी इजिया ली यांनी २००८ ते २०१४ या काळामध्ये पक्ष्यांच्या संख्येवर कीटकनाशकांचा वापर आणि कृषी क्षेत्रातील वाढीमुळे झालेल्या बदलाचे परिणाम तपासले.

  • प्रांतामध्ये निओनिकोटीनॉईड कीटकनाशकांची १०० किलोने वाढ झाल्यानंतर एकूण वापराच्या सरासरी १२ टक्के वाढीमुळे गवताळ पक्ष्यांच्या संख्येत २.२ टक्के आणि कीटकभक्षी पक्ष्यामध्ये १.६ टक्के घट होते. तुलनात्मक माहितीसाठी अन्य कीटकनाशकांच्या १०० किलो वापरामागे गवताळ पक्ष्यांच्या संख्येमध्ये ०.०५ टक्के, तर अन्य कीटकभक्षी आणि कीटकभक्षी नसलेल्या पक्ष्यामध्ये ०.०३ टक्के घट होते.
  • एकत्रित परिणामांची तीव्रताही वाढते. उदा. २००८ मध्ये प्रति प्रांत निओनिकोटीनॉईडच्या १०० किलो वापरामुळे २०१४ पर्यंत गवताळ पक्ष्यांची संख्या ९.७ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले. थोडक्यात, काळानुसार कीटकनाशकांच्या वापरांचे परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर तीव्रतेने होत जातात.
  • या अभ्यासानुसार पक्ष्यांच्या संख्येवर झालेले विपरीत परिणाम हे मध्यपश्चिम, दक्षिण कॅलिफोर्निया आणि उत्तर पठारी प्रदेशांमध्ये एकवटलेले दिसतात.
  • निओनिकोटीनॉईड कीटकनाशकांचे परिणाम हे सरळ बीजप्रक्रिया केलेल्या बियाणांचा खाद्यामध्ये वापरामुळे सरळ होतात. कीटकनाशकांच्या वापरामुळे कीटकांचे प्रमाण कमी झाल्याने होणारा अप्रत्यक्ष परिणाम मानले जातात.
  • या अभ्यासामध्ये उत्तर अमेरिकेतील पक्षी पैदास सर्वेक्षणातून उपलब्ध झालेली पक्ष्यांची संख्या आणि प्रजातींची विविधता यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे एकत्रित माहितीसाठ्यामध्ये अमेरिकेतील सुमारे ३ हजार पक्ष्यांचे मार्गही समाविष्ट करण्यात आले आहे. या साऱ्या माहितीचा कीटकनाशकांच्या वापराशी संबंध जोडण्यात आला. त्याला उपग्रहाच्या माध्यमातून कृषी पिकाखालील क्षेत्र आणि वेगवेगळ्या कारणांसाठी होणारा जमिनीचा वापर यांचीही जोड देण्यात आली आहे.
  • कृषी क्षेत्राचे एकत्रीकरण आणि गवताळ पट्ट्याचे कृषी क्षेत्रामध्ये होणारे रूपांतर हेही पक्षी संख्या कमी होण्यातील एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.
  • ज्यावेळी अन्य कीटकनाशकांचे प्रमाण स्थिर अथवा घटत असताना निओनिकोटीनॉईड कीटकनाशकांच्या वापरामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. हे कीटकनाशक कीटकांसाठी अधिक विषारी ठरते, त्याच प्रमाणे पर्यावरणामध्येही ते दीर्घकाळ राहत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
  • अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण संस्थेद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध धोरणांचे पुन्हा विश्लेषण होण्याची गरज आहे. त्यामध्ये पक्ष्यांवर होणाऱ्या परिणामांचाही विचार झाला पाहिजे, असे मत संशोधकांनी व्यक्त केले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com