agriculture stories in Marathi decomposition of glyphosate herbicides in nature | Agrowon

असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात विघटन

प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

एखाद्या तणनाशकाचा शास्त्रीय पातळीवर कशा प्रकारे अभ्यास केला जातो, त्याचे विघटन निसर्गामध्ये कसे होते, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. तणशास्त्राची मूलतत्त्वे ( प्रिन्सिपल ऑफ वीड सायन्स) या व्ही. एस. राव यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन ग्लायफोसेट या तणनाशकांविषयीची शास्त्रीय माहिती देण्याचा हा प्रयत्न.

केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द झाल्यानुसार ग्लायफोसेट वापरावर बंधने घालण्याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. अशा वेळी एखाद्या तणनाशकाचा शास्त्रीय पातळीवर कशा प्रकारे अभ्यास केला जातो, त्याचे विघटन निसर्गामध्ये कसे होते, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. तणशास्त्राची मूलतत्त्वे ( प्रिन्सिपल ऑफ वीड सायन्स) या व्ही. एस. राव यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन ग्लायफोसेट या तणनाशकांविषयीची शास्त्रीय माहिती देण्याचा हा प्रयत्न.

सध्या ग्लायफोसेटच्या वापरावर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून मसुदा आदेश प्रसिध्द झाला आहे. अशा वेळी ग्लायफोसेटच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांची मांदियाळी आहे. मात्र, त्यातील शास्त्र नेमके काय आहे, याचा विचार आपण तणशास्त्राची मूलतत्त्वे ( प्रिन्सिपल ऑफ वीड सायन्स) या व्ही. एस. राव यांच्या पुस्तकाच्या आधारे करणार आहोत. राव यांनी आपले शिक्षण भारतात व त्यानंतर अमेरिकेत पूर्ण केले. हे पुस्तक १९८३ मध्ये प्रकाशित झाले असून, त्यातील संदर्भ घेतलेली संशोधने १९७०- ८० या दशकात झाली असावीत. हे आधी स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे त्या काळी तणनाशकाच्या दुष्परिणामाबाबत जगभरात कोठेही चर्चा होत नव्हती. हा अभ्यास पूर्वग्रहदूषित नाही, अगर ग्लायफोसेटला अभय देण्याच्या उद्देशाने केलेला नाही. या पूर्ण पुस्तकात केवळ रासायनिक तण नियंत्रण केंद्रस्थानी असून, ग्लायफोसेट बरोबर त्या काळात उपलब्ध असणाऱ्या अनेक तणनाशकांचा अभ्यास मांडला आहे.

तणनाशकाचा अभ्यास ग्लायफोसेट- सर्व सामान्य माहिती, तणनाशकाचे शोषण, रासायनिक विघटन, तणांवर होणारा परिणाम, तणे नियंत्रण करण्याची कार्यपद्धती, जैविक विघटन, सूर्यप्रकाशामुळे होणारे विघटन, रसायनाचे तणात शोषणानंतर होणारे परिवर्तन आणि तणांमध्ये रसायनाचे होणारे चलनवलन अशा विविध प्रकरणातून करण्यात आला आहे.

१) सर्वसामान्य माहिती ः
ग्लायफोसेट हे एक अनिवडक गटातील तणे उगविल्यानंतर वापरण्याचे तणनाशक आहे. अनेक प्रकारची तणे मियंत्रित करू शकते. प्रामुख्याने वार्षिक, बहुवार्षिक व ज्या तणांचे कंद अगर काशा जमिनीत खोलवर पसरल्या आहेत, अशा तणांसाठी ते एकमेव आहे. विना नांगरणीच्या शेतीत पिकाचे जमिनीखालचे अवशेष मारण्यासाठी सर्वांत उपयुक्त आहे.
आज बहुतांश शेतकऱ्यांना ग्लायफोसेट ज्ञात असून, त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे फार हानिकारक असल्याचे सांगण्यासाठी पर्यावरणाचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे या लेखात आपण ग्लायफोसेटचे विघटन नैसर्गिकरीत्या कशा प्रकारे होते व अवशेष संपून कसे जातात, यावर भर देणार आहोत.

२) रासायनिक विघटन ः
ग्लायफोसेटची फवारणी ही तणाच्या पानांवर केली जाते. हे जमिनीवर फवारले जात नाही. पानांवर फवारणी करीत असताना जमिनीवर उडालेले तुषार व मृत तण तेथेच जमिनीमध्ये विलीन झाल्यास त्यातून जमिनीत राहणाऱ्या अवशेषांचा विषारीपणा किती दिवस टिकून राहतो, हे पाहिले जाते. या गुणधर्माला इंग्रजीत तणनाशकाची ‘पर्सिस्टंसी’ म्हणतात. एखाद्या तणनाशकाच्या व्यापाराला परवानगी देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्सेक्टसाईड बोर्डाकडून (सीआयबीआरसी) अनेक गुणधर्मांपाकी या गुणधर्माचाही प्रामुख्याने अभ्यास केला जातो.
चिंग (१९७६) यांच्या अभ्यासानुसार, ग्लायफोसेटच्या अवशेषांचे रासायनिक विघटन होऊन ॲमिनो मिथाईल फॉस्फोनिक आम्लात रूपांतर झाल्यानंतर पुढे त्याचे विघटन होऊन अमोनिया व कर्बवायूत रूपांतर होते. वेगवेगळ्या जमिनीची तणनाशकाचे स्थिरीकरण करून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. सामान्यतः स्फुरदाचे स्थिरीकरण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या, कमी वायू, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीत ते जास्त काळ टिकून राहते. सेंद्रिय कर्ब जास्त असणाऱ्या जमिनीत विघटनाचा वेग जास्त असतो. अवशेष १५ ते ३० दिवसांत संपून जातात. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगातील निष्कर्षामध्ये थोडाफार फरक असला तरीही अवशेष फार काळ टिकून राहत नाहीत, यावर मात्र शिक्कामोर्तब होते.

३) जैविक विघटन ः
जैविक विघटनाचा वेग, सामू, आर्द्रता, तापमान, सेंद्रिय कर्ब व अन्नद्रव्यांची उपलब्धता यावर कमी जास्त होऊ शकतो. एका शास्त्रीय संदर्भानुसार, ९० टक्के अवशेष पहिल्या १२ आठवड्यात संपून जातात. जमिनीत प्रवेश झाल्यावर लगेच त्याच्या विघटनाला सुरुवात होते. पुढे त्याचा वेग कमी जास्त राहतो.

४) सूर्यप्रकाशामुळे होणारे विघटन ः
सूर्यप्रकाशामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील ग्लायफोसेटच्या विघटनाचा वेग कमी असतो. तरीही हा वेग समशीतोष्ण व शीत कटिबंधाच्या तुलनेत उष्ण कटिबंधात जास्त असतो.

माझे अनुभव ः
१९७५ ते ८० च्या दरम्यान ग्लायफोसेट बाजारात आल्यापासून मी त्याचा वापर करत आहे. त्याकाळी डोकेदुखी ठरलेल्या लव्हाळा या तणांच्या नियंत्रणासाठी आणि पुढे काटेकोर शेतीत उसाची खोडकी नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होऊ लागला. २०११ पासून पिकात तणांची वाढ करून जुनी करून नियंत्रित करण्यासाठी उपयोग केला. पुढे माणसांद्वारे निंदणी पूर्णपणे बंद करून १०० टक्के निंदणी ही वेगवेगळ्या तणनाशकाद्वारे पार पाडली जाते. मी ३० ते ३५ वर्षे तण व पीक उगविण्यापूर्वीची तणनाशके मोठ्या प्रमाणात वापरत होतो. पुढे तण व पीक उगविल्यानंतर वापरण्याची तणनाशके बाजारात आली. तणे मोठी व जुनी करून नियंत्रित केल्यानंतर त्याच्या जमिनीवरील भागांचे आच्छादन होते. जमिनीत खोलवर गेलेल्या मुळ्यांच्या जाळ्याचे जमिनीतच खत होते. या पद्धतीने जमिनीत सेंद्रिय कर्बांचे प्रमाण वाढत गेले तसे माझ्या उत्पादन पातळीत वाढ होत गेली. त्याअर्थी या तणनाशकांचा जमिनीतील सूक्ष्मजिवावर कोणता प्रतिकूल परिणाम झालेला मला जाणवला नाही. याचाच अर्थ असा तणनाशक फवारणी केल्यानंतर तणांचे अवशेष कुजताना तणनाशकाचे अवशेषही नष्ट होत जातात. या व्यतिरिक्त जमिनीतील अन्य विषारी घटकही कालांतराने नष्ट होत जमिनीचे शुद्धीकरण होते. तणांतून सेंद्रिय कर्ब मिळवण्याच्या पद्धतीमुळे अन्य सर्व निविष्ठा कमी लागतात. खर्चात बचत होते. उत्पादनात व दर्जात वाढ होते. हे माझे अनुभव आहेत. याच तंत्राने कोरडवाहू शेतकऱ्याला एक पीक हमखास मिळवून देणे शक्य आहे. असे काही प्रयोग या हंगामात काही शेतकरी घेत आहेत. ग्लायफोसेट बंदीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात प्रचंड वाढ होईल, असे मला वाटते. तणनाशकांचा वापर करतानाच त्याचे दुष्परिणाम कमी करणारी तंत्रेही वापरली पाहिजेत. दुर्दैवाने याची माहिती अथवा प्रशिक्षण कोणी देत नाही.

ग्लायफोसेट हे कर्करोगकारक असल्याचे सांगितले जाते. मात्र, कर्करोगाचे प्रमाण ग्रामीण भागाच्या (त्यातही शेतकऱ्यांच्या) तुलनेत शहरी पांढरपेशा समाजात जास्त आहे. त्यातही तणनाशकाशी कोणताही संबंध नसलेल्या लोकात ते जास्त आहे. म्हणूनच ग्लायफोसेट बंदीने प्रश्‍न सुटण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे, यात शंका नाही.

प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी आहेत. )

(संदर्भ ग्रंथ - प्रिन्सिपल ऑफ वीड सायन्स, लेखक - व्ही.एस.राव, १९८

महाराष्ट्र


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...