रेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण

वर्षभर रेशीम कीटक संगोपन चालू ठेवल्याने रोगजंतू व किडींना जीवनक्रम चालू ठेवणे शक्य होते. परिणामी, रोगजंतू व किडींची संख्यात्मक वाढ होऊन अधिकाधिक प्रसार होतो. शेतकऱ्याकडील कोषांचे उत्पादन व दर्जात घट होते.
रेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण
रेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण

रेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग ः  १)  ग्रासरी       २) फ्लॅचरी      ३) मस्कार्डीन

ग्रासरी रोग   रेशीम कीटकांना होणाऱ्ऱ्या विविध रोगांपैकी जवळपास ३३ ते ५५ टक्के वाटा ग्रासरी रोगाचा आहे. हा रोग सर्वच रेशीम उत्पादक देशांमध्ये आढळून येतो. त्याचा प्रादुर्भाव वर्षभर होत असला तरी अधिक प्रादुर्भाव उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतुंमध्ये जाणवतो.  रोगग्रस्त अळ्ऱ्यांची त्वचा फाटून दुधासारखा द्रव बाहेर येत असल्याने ग्रासरी रोगास दुध्या रोग असेही म्हणतात. किंवा रोगग्रस्त अळ्या रॅकवर अथवा चंद्रिकेवर डोके खाली करून उलटे लटकलेल्या आढळतात, त्यामुळे ग्रासरी रोगाला लटक्या रोग असे म्हणतात.

रोग होण्याची कारणे 

  • हा रोग विषाणूपासून होतो.
  • ग्रासरी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रेशीम अळ्यांची त्वचा फाटून त्यातून पांढऱ्या रंगाचा द्राव बाहेर येतो.
  •  तो रॅक, तुती पाने, कीटक संगोपन साहित्य आणि जमिनीवर सांडतो. या पांढऱ्या द्रवामध्ये असंख्य विषाणू असतात. अशा रोगजंतूचा प्रादुर्भाव झालेली तुतीची पाने निरोगी रेशीम अळ्यांच्या खाण्यात आल्यास अळ्या ग्रासरी रोगास बळी पडतात.
  • एकमेकांचे कीटक संगोपन साहित्य (उदा. चॉकी ट्रे, चंद्रीका, इत्यादी) वापरल्यामुळेही रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. 
  • रोगाची लक्षणे :

  •  रोगजंतूंचा रेशीम अळ्याच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर पाचव्या ते सातव्या दिवशी रोगाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. 
  •  रेशीम अळ्यांच्या त्वचेचा रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. रोगाचा जोर वाढत जाताना अळीच्या सर्व वलयांवर सूज पसरते.
  •  सुजेमुळे शरिराची त्वचा ताणली जाऊन त्वचा फाटते. दुधासारखा पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येतो.
  • अळ्या कातीवर बसण्यापूर्वी अळ्याच्या त्वचेला चकाकी येते. अळ्या कातीवर बसत नाहीत. 
  •  अळ्यांची भूक व हालचाल मंदावते.
  • फ्लॅचरी रोग     

    रेशीम अळ्यांना हा रोग प्रामुख्याने जिवाणूमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या ठिकाणानुसार या रोगाचे तीन प्रकार पडतात.  १) सेप्टिसेमिया २) पचनसंस्थेचा रोग  ३) टॉक्झिकॉसीस कारणे ः   कीटक संगोपनगृहात जास्त तापमान, आर्द्रता असणे.  निकृष्ट तुती पाला अळ्यांना खाद्य म्हणून देणे, तो प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात असणे.   वेळेवर स्पेसिंग न देणे, बेडमध्ये रेशीम अळ्यांची प्रमाणाबाहेर गर्दी असणे.

    सेप्टिसेमिया : हा रोग प्रामुख्याने रेशीम अळ्यांच्या रक्तात होतो. 

  •     रेशीम अळ्यांच्या रक्तामध्ये स्ट्रेप्टोकोकाय बॅसीलाय या जिवाणूच्या वाढीमुळे हा रोग होतो. 
  •  हे जिवाणू जमिनीत, हवेत, तुती पाल्यावर, कीटक संगोपनगृहात कीटकसंगोपन साहित्यावर मुक्त संचार करीत असतात. त्यांना योग्य तापमान मिळाल्यास ते क्रियाशील बनून आपली कामगिरी बजावतात. रेशीम अळ्यांचा नाश करतात. 
  •  तुती पाल्याला चिकटलेले जिवाणू अळ्यांना झालेल्या जखमेतून अळीच्या शरिरात प्रवेश मिळवतात. रोगाचा प्रसार होतो.
  • रोगाची लक्षणे ः  

  •  रेशीम अळ्यांची हालचाल, भूक मंदावते.  
  •  शरीर ताठ होऊन त्वचा मऊ पडते. पोटाकडील वलये आंकुचन पावतात. तसेच, डोक्यामागील वलयांना सूज येते.
  •  रोगीष्ट अळ्या ओकारी करतात. त्यांची विष्ठा हिरवट मण्यासारखी दिसते.
  • पचनसंस्थेचा फ्लॅचरी  रोगाची कारणे : 

  •  हा रोग स्ट्रोप्टोकोकाय बॅसीलाय नावाच्या जिवाणूमुळे होतो.
  •  या रोगाचे जंतू रेशीम अळीच्या पचनसंस्थेवर हल्ला करून पचनसंस्थेतील पाचक रसातील रोगप्रतिकारक क्षमता कमी करून उतींचा नायनाट करतात.
  • रोगाची लक्षणे ः

  •  अळीची विष्ठा हिरवट, मऊ व मण्यांच्या माळेप्रमाणे असते.
  •  अळीची भूक व हालचाल मंदावून वाढीचा वेग कमी होतो.
  •  रोगग्रस्त अळ्यांची तुती पाल्याखाली जाऊन बसण्याची प्रवृत्ती दिसून येते.
  •  शेवटच्या अवस्थेतील रेशीम अळ्यांना या रोगाची बाधा झाल्यास कीटक कोष न बांधता चंद्रिकेवर फिरत राहतात. चंद्रिकेवरच मरतात.
  • टॉक्सिकॉसिस : जिवाणूद्वारे तयार होणाऱ्या विषाच्या सान्निध्यात रेशीम अळी आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो.   रोगाची कारणे:

  •  हे जिवाणू हवेत असतात. 
  •     बॅसिलस थुरिंजीएन्सीस या जिवाणूचा काही पिकांमध्ये जैविक कीडनाशक म्हणून वापर केला जातो. पिकावर फवारणी करतेवळी बाजूला तुतीची बाग असल्यास तुती पानांवर नकळत हवेमुळे फवारणी होऊ शकते. अशी तुती पाने अळ्यांच्या खाण्यात आल्यास रेशीम अळ्यांना या रोगाची बाधा होते. 
  •  हे जिवाणू रेशीम अळ्यांच्या जखमेतून प्रवेश मिळवून विषारी द्रव शरीरात सोडतात, ज्यामुळे अळ्यांची चेतासंस्था निकामी होऊन अळ्यांना लकवा होतो.
  •  रोगग्रस्त अळी अचानकपणे तुती पाला खाणे कमी करतात.
  •     डोके लुळे पडून शरीरास लकवा होऊन अळी रॅकवरून खाली पडून मरते.
  •     मृत रेशीम अळीचे शरीर काळे पडते, त्वचा नाजूक होऊन फाटते. त्यातून गडद तपकिरी रंगाचा दुर्गंधीयुक्त द्रव बाहेर पडतो.
  •     रेशीम अळ्यास जिवाणू, तसेच विषाणूमुळे देखील फ्लॅचरी रोग होतो. 
  • मस्कार्डीन रोग   हा रोग परजीवी बुरशीमुळे होत असून, रोगाचा प्रादुर्भाव हिवाळ्यात तसेच पावसाळ्यात दिसून येतो.  

    पांढरा मस्कार्डीन   या रोगात रेशीम अळीच्या मृत शरिराचा रंग पांढरा होतो. आपल्या देशात पांढरा मस्कार्डीनचे प्रमाण अधिक आहे. 

    रोगाची कारणे :

  •  हा रोग प्रामुख्याने बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीमुळे होतो.
  •  कीटक संगोपनगृहातील कमी तापमान व जास्त आर्द्रता या बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते. 
  • रोगाची लक्षणे   अळ्यांची भूक कमी होऊन हालचाल मंदावते.  रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या अळ्याचे मृत शरीर कडक होऊन पांढऱ्या खडूसारखे दिसते. 

    रोगांचे व्यवस्थापन : 

  •  रोगग्रस्त अळ्या दिसताच गोळा करून लगेच जमिनीत पुरणे.
  •  कीटक संगोपनगृहाचे व साहित्याचे निर्जंतकीकरण करावे.
  •  कीटक संगोपनगृहातील तापमान व आर्द्रता संतुलित ठेवावे.
  • रेशीम कीटकावरील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य तापमान व आर्द्रता खालीलप्रमाणे असावी . 
    अळीची अवस्था तापमान (अंश सें.) आर्द्रता (टक्के)
    पहिली २७-२८    ८५-९०
    दुसरी  २६-२७ ८०-८५
    तिसरी    २५-२६ ७५-८०
    चौथी २४-२५ ७०-७५
    पाचवी  २४-२५  ६५-७०

    निर्जंतुकीकरणाच्या वेळा व प्रमाण

    रेशीम कीटक निर्जंतुक वापरण्याच्या वेळा  १०० अंडी पुंजासाठी प्रमाण
    पहिल्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा  ६० ग्रॅम
    दुसऱ्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा  १२० ग्रॅम
    तिसऱ्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा ५८० ग्रॅम
    चौथ्या वेळी कात टाकल्यानंतर एकदा ९६० ग्रॅम
    पाचव्या अवस्थेत चौथ्या दिवशी १५४० ग्रॅम

       अशाप्रकारे योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास रोगाचा प्रसार कमी होतो.

  •  ः डॉ. बी. बी. गायकवाड, ९४२०४५९८०८    ः डॉ. डी. बी. कच्छवे, ९४२३७००७३०     (कृषी विज्ञान केंद्र, खामगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com