agriculture stories in Marathi Dr. Satilal patil lekh 2 | Agrowon

चंद्रावरील माती अन्‌ प्रोटिनची शेती

डॉ. सतीलाल पाटील
शनिवार, 9 जानेवारी 2021

जागतिक आश्चर्यांपैकी एक असलेल्या लोणार सरोवरामध्ये स्पीरुलिना शेवाळ वाढतं. हे हिरवं लोणी प्रोटिन, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेले आहे.

धा डऽ धाडऽ धाडऽ धाडऽऽ असा आवाज  करत पाचही बुलेटी धूळ उडवत निघाल्या. पाच बुलेटींच्या एकत्र होणाऱ्या भारदस्त आवाजामुळे रस्त्यावरील वाहनं आम्हाला आदरानं वाट करून देत होती. काल १८ ऑक्‍टोबरचा मुहूर्त साधून आम्ही पुण्याहून सिंगापूरच्या प्रवासाला निघालो. औरंगाबादला पहिला मुक्काम करून आता सिंदखेड राजाला पोचलो होतो. आठही बायकर्सने राजमाता जिजाऊंचं दर्शन घेतलं. पुढं निघाल्यावर रस्त्यावरच्या मैलाच्या दगडाने ‘‘ओ भाऊ, लोणार हितं जवळच हाय!’’ असं म्हणत इशारा केला आणि त्याच्या विनंतीला मान देऊन बाइकचं तोंड तिकडं वळवलं. ‘‘अरे, इकडं कुठं निघालायेस?’’ पाठीशी बसलेल्या मावळ्याने विचारलं. ‘‘मित्रा, जगातलं भारी आश्‍चर्य इथं लपलंय! त्याला भेटून जाऊयात की!’’ मी उत्तरलो. हे आश्‍चर्य म्हणजे लोणारचं तळं. 

त्याचं झालं असं, की हजारो वर्षांपूर्वी आकाशातून एक महाकाय अशनी लोणारच्या शिवारात पडली. शेणात खडा मारावा आणि त्यात खड्डा व्हावा तसाच भलामोठा खड्डा या अवकाशातून मारलेल्या दगडानं झाला. भलामोठ्ठा म्हणजे किती? तर तब्बल १.८ किलोमीटर व्यासाचा. कालांतराने पाणी साचून त्यात तळं तयार झालं. तळ्याच्या काठाकाठानं चक्कर मारायचं ठरवलं तर तब्बल आठ किलोमीटरची प्रदक्षिणा होईल. या तळ्याचा आकारही किती रेखीव! एखाद्या चिकित्सक शेतकऱ्यानं आखूनरेखून बांगडी विहीर बांधावी तसा गोल-गोल. 

या खड्ड्याला इंग्रजीत ‘क्रेटर’ म्हणतात. बेसॉल्ट दगडात अशनीघातानं बनलेलं हे भारतातलं एकमेव आणि जगातलं चौथं क्रेटर. बाकीच्या तीन क्रेटर. बाकीच्या तीन क्रेटरची नोंद ब्राझीलच्या सातबारावर आहे. पण या चारही भावंडांत आपला तलाव सर्वांत तरुण आहे. या लोणारी महापुरुषाच्या जन्मतारखेचा घोळ आहेच. काही शास्त्रज्ञांच्या मते, हे तळं ५२ हजार वर्षं जुनं आहे, तर काहींच्या मते ते पावणेसहा लाख वर्षांचं आहे. मुलाच्या शाळेत नाव घालताना मास्तरांनी अंदाजे टाकलेली एक आणि ओरिजनल दुसरी अशा दोन जन्मतारखांसह वावरणाऱ्या माणसागत लोणारचा हा लेक दोन वयांत अडकलाय. वयाच्या गोंधळापर्यंत ठीक होतं; पण काही शास्त्रज्ञांनी त्याच्या जन्मदात्यावरच शंका उपस्थित केलीय. त्यांच्या मते याचा जन्म अशनीमुळं झाला नसून, ज्वालामुखीच्या स्फोटानं झालाय. टीव्ही सीरियलसारखं डीएनएवरून जन्मदाता शोधायची सोय असती, तर या पठ्ठ्यानं बापही दाखवला असता अन्‌ श्राद्धही केलं असतं. असो. पतन झालेली अशनी म्हणजे मिठाचा मोठ्ठा दगड होता. त्यामुळे तळ्याचं पाणी खारट झालंय. या क्षारांमुळेच इथं फिफडी, कुप्पल आणि काळं मीठ सापडतं. पूर्वी उन्हाळ्यात पाणी कमी झालं, की किनाऱ्यावरील वाळलेला क्षारांचा थर गोळा करून त्यापासून मीठ काढलं जायचं. समुद्रकिनाऱ्यापासून शेकडो किलोमीटर दूर होणारी ही मिठाची शेती ‘‘जानी आपने हमारा नमक खाया है!’’ असं बजावत नमक हलालीची अपेक्षा करतंय. आपल्या दुर्लक्षित भग्नावस्थेकडे जगाचं लक्ष वेधतोय. 

  या तळ्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथात आढळतो. ‘स्कंधपुराणे, रेवाखंडे’ असं सत्यनारायणाच्या कथेत ऐकलेल्या स्कंधपुराणात आणि पद्मपुराणात याचा उल्लेख आहे. तळ्याच्या काठावर चालुक्‍य आणि यादवांच्या काळात बांधलेली आठ मंदिरं आहेत. खजुराहोच्या मंदिराशी मिळत्याजुळत्या शैलीतील या मंदिरांपैकी फक्त कमळजादेवी मंदिर सुस्थितीत आहे. बाकी आहेत फक्त भग्नावशेष! मोगलांच्या काळात येथील मिठाचा व्यापार पार उत्तरेपर्यंत केला जायचा, याचे दाखले लोक देतात; पण महाराष्ट्राच्या खाल्ल्या मिठाला न जागता मोगलांनी मंदिर पाडण्याचा छंद तसाच सुरू ठेवल्यानं सर्व मंदिरे मातीत गाडून ठेवली गेली. पुढे शेकडो वर्षांनी ही मंदिरं उकरून जगासमोर आणली गेली. 

लोणारच्या आश्‍चर्यांची यादी इथंच संपत नाही. अमेरिकेतील नासाच्या संशोधनानुसार, लोणारवर आपटलेला दगड मंगळावरचा होता; पण आयआयटीच्या म्हणण्यानुसार, तळ्यातल्या मातीचे गुणधर्म अमेरिकेच्या ‘अपोलो मिशन’द्वारे चंद्रावरून आणलेल्या मातीशी जुळताहेत. एखाद्यानं सुतावरून स्वर्ग गाठावा तसा मातीवरून चंद्र गाठला होता. तळ्याच्या बांधावर जंगल वाढलंय. शेजारी बांध कोऱ्या भाऊबंद नसल्यानं तळ्याचा बांध शाबूत आहे. या जंगलात शेकडो मोर वास्तव्याला आहेत. फार पूर्वी एका प्रोजेक्‍टच्या कामासाठी मी इथं मुक्कामी होतो. भल्या सकाळी वयोवृद्ध आजोबा गुडघ्याच्या गंजलेल्या कुलाप्याला वंगण लावून कठडा चढून वर येत होते. ‘‘रामराम आजोबा’’ असं मी म्हटल्यावर ‘‘पोरा मोरांची जत्रा पाहिलीस का?’’ असं म्हणत समोर बोट दाखवू लागले. समोर पाहिलं तर मी आश्‍चर्याने उडालोच. शंभर-दीडशे मोर मजेत चरत होते. स्थानिक लोक धान्य पसरवून ठेवतात. त्यावर सकाळी मोरांच्या पंगती उठतात. धान्याबरोबर किडेही यावं त्याप्रमाणं मोरांना मारून खाणारे मोरावरचे चोरही इथं आहेत. जोपर्यंत ‘‘ये दिल मांगे मोर’’ ही त्यांची वासना शमत नाही, तोपर्यंत हे मोरचोर आटोक्‍यात येणार नाहीत. 

या तळ्याचं अजून एक वेगळेपण म्हणजे इथलं पाणी खारट असून, त्याचा सामू म्हणजे पीएच फारच जास्त आहे. जास्त म्हणजे किती तर शान्या पाण्यागत सातच्या घरातला सामू उनाड मुलागत दहापर्यंत हुंदाडतो. समुद्राच्या पाण्याचा सामू आठ-सव्वाआठ असतो. म्हणजे इथला सामू समुद्रापेक्षाही बिघडलाय. या क्षारीय पाण्याचा फायदा मात्र एकानं उचललाय, तो म्हणजे स्पीरूलीना शेवाळ. आपल्या वाढीसाठीच्या या योग्य वातावरणाचा लाभ उठवत या शेवाळाचा हिरवा थर संपूर्ण तळ्याच्या पाण्यावर पसरलाय. 

लोणारचं हे हिरवं लोणी मात्र फारच पौष्टिक आहे. प्रोटिन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स स्पीरूलीनामध्ये बक्कळ आहेत. आधी कोंबडी की अंडं या यक्षप्रश्‍नाभोवती फिरणाऱ्या कोंबडीच्या अंड्यात साडेबारा टक्के प्रोटीन आहे; पण लोणारच्या या एकपेशीय पक्वान्नात सत्तावन्न टक्क्यांपेक्षाही जास्त टक्के प्रोटीन ठासून भरलंय. स्पीरूलीनातील एकूण पोषणमूल्ये ९० टक्‍क्‍यांहूनही जास्त भरतात. त्यामुळे त्याला ‘‘सुपर फूड’’ म्हणतात. पण आजपर्यंत कोणताही सुपरहिरो हे सुपर फूड खाताना दिसला नाही. ‘‘घरकी मुर्गी दाल बराबर’’ या उक्तीनुसार या सुपर फूडला डावलत परदेशी मुर्गीचे अंडे मात्र ‘‘संडे हो या मंडे’’ या तालावर चापणारे हिरो मात्र भरपूर आहेत. स्पीरूलीनाचा अन्न म्हणून उपयोग जुन्या काळापासून होतोय. मेक्‍सिकोतील लोक सोळाव्या शतकात त्याचा जेवणात उपयोग करायचे. आफ्रिकेतील चाड या देशातील आदिवासी जमाती या शेवाळाचा थर वाळवून त्यापासून भाकरीसारखा पदार्थ बनवतात. त्याला ‘दिहे’ म्हणतात. 

आजही कुपोषणाची जागतिक समस्या सोडवण्यासाठी स्पीरूलीनाकडे आशेनं पाहिलं जातंय. कमी जागेत जास्त प्रोटिनचं उत्पादन स्पीरूलीना पिकात शक्‍य आहे. त्याचमुळे मंगळापर्यंतच्या लांबच्या अवकाशप्रवासात स्पीरूलीनाच्या वापराच्या शक्‍यता चाचपून पाहिल्या जाताहेत. जिममध्ये पैसे देऊन दुसऱ्याची वजनं उचलल्यावर खावं लागणाऱ्या परदेशी प्रोटिनला स्पीरूलीना हा देशी पर्याय ठरू शकतो. म्हणजे भारताचा पैसा देशातच राहील आणि गड्याची शारीरिक आणि देशाची आर्थिक ताकद बरकरार राहील. 

माणूस प्राणी आणि माशाचं खाद्य म्हणून स्पीरूलीनाचा वापर जगभर वाढतोय. भोपळ्यातल्या म्हातारीसारखं कॅप्सूलमध्ये बसून हे शेवाळ मेडिकलच्या दुकानातही पोचलंय. भारतातही बऱ्याच ठिकाणी ही शेवाळशेती केली जाते. प्रोटीन आणि प्राणवायू पिकवणाऱ्या या तरंगणाऱ्या पर्यावरणपूरक शेतीचा प्रचार आणि प्रसार अजून मोठ्या प्रमाणात व्हायला हवा. पाण्यावरच्या या शेतीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायची गरज नाहीये, याचं जितं जागतं प्रात्यक्षिक लोणारच्या तळ्यात निसर्गाने उभारलंय. निसर्गाची ही प्रयोगशाळा वाट पाहतेय, पाय जमिनीवर आणि डोळे उघडे ठेवणाऱ्या जिज्ञासू विद्यार्थ्याची. 

पण या तळ्यातील नैसर्गिक शेतीला आव्हान देत लोकांनी तळ्यातच रासायनिक शेती करायला सुरुवात केली होती. एखाद्या गावरान सेंद्रिय दुधावर पोसलेल्या शेतकऱ्याच्या गुटगुटीत पोराला, फॅट काढलेल्या पिशवीच्या ढंढातल्या पावडर छाप शहरी पोट्ट्याने हिणवावं, तसं रासायनिक खतं आणि कीटकनाशकांवर पोसलेला भाजीपाला आणि केळी या प्रोटिनच्या नैसर्गिक शेतीला वाकुल्या दावू लागली होती. कीटकनाशक आणि खतांचे अंश पाण्यात मिसळून प्रदूषणात भर पडत होती. तळ्यातल्या देवळात होणारे सण, उत्सव, न खात्या देवासाठी कोंबडं बकरं कापणारे आणि अतिहौशी पर्यटक त्यामुळे प्रदूषणात अजून भर पडत होती.

बापाच्या सातबारावरही नाव नसलेले महाभाग आपलं नाव मंदिराच्या भिंतीवर कोरत होते. वैचारिक बद्धकोष्ठता असलेला, खिशात छदामही नसलेला मजनू भिंतीवर बदाम कोरत होता. पूर्वी यवनांपासून वाचावी म्हणून ही मंदिर पुरून ठेवली होती. पण या मॉडर्न यवनांपासून वाचण्यासाठी काय करावं लागेल, हा यक्षप्रश्‍न आहे. ‘‘कुठं नेऊन ठेवलंय लोणार माझं?’’ असा प्रश्‍न विचारावासा वाटत होता. पण काही वर्षांपूर्वी वनखात्याने सक्रिय होत बऱ्यापैकी या गोष्टी नियंत्रित केल्या आहेत. हा नैसर्गिक ठेवा जपला जावा, हीच अपेक्षा. 

पाऊस दाटून आलाय, मनातही आणि आभाळातही. ‘सिंगापूर अभी दूर है मेरे दोस्त.’ होय, अजून साडेनऊ हजार किलोमीटर बाइक चालवायचीय. लोणारच्या या हिरव्या वैभवाला सलाम करत, हिरव्या प्रोटिनचे हिरवेगार विचार मनात घोळवत बुलेटला किक मारली.

  : contact@drsatilalpatil.com
(लेखक ग्रीन व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे डायरेक्‍टर  आहेत.)
 


इतर संपादकीय
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
‘तारीख पे तारीख’ किती दिवस?देशाचे पंतप्रधान दमदार भाषणात जनतेला आश्‍वासन...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
छोटे मन से कोई बडा नहीं होता !कविमनाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
दुधाच्या अभ्यासातून दूर व्हावेत सर्व...जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या...
कृषी विकासातील मैलाचा दगडशेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे...
शेतीमालाला हमीभाव हा शेतकऱ्यांचा हक्कच!धान्यदराचे नियमन करण्याकरिता तत्कालीन...
आसामच्या चहाचे चाहते!भर्रर्रऽऽ असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या...
उपलब्ध पाणी शेतापर्यंत पोहोचवामराठवाड्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे...
पुनर्भरणावर भर अन् उपशावर हवे नियंत्रण मागील पावसाळ्यात महाराष्ट्राच्या बहुतांश...
‘बर्ड फ्लू’चा बागुलबुवा नकोमागील आठ-दहा दिवसांपासून देशात बर्ड फ्लू हा रोग...
चंद्रावरील माती अन्‌ प्रोटिनची शेतीधा डऽ धाडऽ धाडऽ धाडऽऽ असा आवाज  करत पाचही...
करारी कर्तृत्व  आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक...
नवे कृषी कायदे सकारात्मकतेने स्वीकारा योगेंद्र यादव हे डाव्या विचारसरणीचे नामवंत...