आसामच्या चहाचे चाहते!

प्रवासात पुढचा टप्पा होता, भारताच्या पूर्वेकडील राज्य आसाम. दूरपर्यंत पसरलेल्या चहाच्या मळ्यांनी स्वागत केलं. चहाभोवती गुंफलेलं जनजीवन उलगडलं.
 आसामच्या चहाचे चाहते!
आसामच्या चहाचे चाहते!

भर्रर्रऽऽ असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या काचेवर आदळत होता. आजूबाजूला जिकडे नजर जाईल तिकडे जंगलच जंगल होतं. काळ्याशार चकचकीत मख्खन रस्त्यावर आमच्या बुलेट माधुरीसारख्या ‘‘धक धक’’ गाणं गात आसाममधून धावत होत्या. सिंगापूरच्या ओढीने निघालेले बायकर्स लवकरच भारताची सीमा ओलांडणार होते. जंगल संपलं आणि समोर मानवनिर्मित हिरवं जंगल दिसू लागलं. हो, नजर जाईल तिथवर चहाचे मळे. कडक थंडीत एखाद्याने हिरव्यागार नक्षीची गोधडी पांघरावी तशी ही हिरवी पानगोधडी ओढून धरतीमाता पहुडली होती. एखाद्या मुलाचा न्हाव्याने बारीक कट मारावा तसे काटेकोर मोजमापातले चहाचे मळे दुतर्फा पसरले होते. रस्त्याच्या कडेला चहाची टपरी दिसली. पीऽऽ  पीऽ  असा हॉर्न वाजवत बाकीच्या बायकर्संना ‘‘चहा पिऊ या रे! असा इशारा केला आणि पाचही धडधडणाऱ्या माधुरी रस्त्याच्या कडेला थंडावल्या. व्वा! काय योग आहे? चहाच्या मळ्याच्या बांधावर आठ मराठी असामी या आसामी चहाचा अस्मानी आनंद घेऊ लागले. एकदम ईशान्य भारतातली चहाची स्टोरी डोळ्यासमोर तरळून  गेली.

चहापानाच्या उगमाच्या बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. ४७३७ वर्षांपूर्वी शेनॉन हा चिनी राजा गरम पाणी पीत होता. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीने जवळच्या झाडाची काही पाने त्याच्या पेल्यात येऊन पडली, त्यामुळे पाण्याचा रंग बदलला. त्याची चव घेऊन पाहिल्यावर तो त्याच्या प्रेमातच पडला. दुसऱ्या आख्यायिकेनुसार राजा औषधी गुणधर्माच्या शोधात वेगवेगळ्या झाडाझुडपांची चव घ्यायचा. त्यात चुकून विषारी वनस्पती चावल्या जायच्या. मग त्यावर उतारा म्हणून तो चहाची पाने चघळायचा. यासारख्या अजूनही काही कथा प्रसिद्ध आहेत. 

कथा काहीही असोत, पण चहाला खरी रंगत आली ती गोऱ्या साहेबांच्या घाऱ्या डोळ्याची नजर चहावर पडली तेव्हा. प्राचीन काळी जपान आणि चीनमधून चहाची ब्रिटन आणि पोर्तुगीजमध्ये निर्यात केली जायची.  नंतर मात्र जपानने चहाची निर्यात बंद केली आणि चीनच्या ताब्यात हे मार्केट आलं. चहाच्या निर्यातीतून मलिदा खाणारा चीन मात्र चहा पिकाचं गुपित काही बाहेर पडू देत नव्हता. जगभरातून चोरीमारी करून, लुटीचा माल गोळा करण्यात पटाईत गोऱ्या साहेबाने, हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी जंग जंग पछाडलं. व्यापाऱ्याचं सोंग घेऊन स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ चीनमध्ये घुसला आणि चहाची रोपं पळवली. ही रोपं भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. दार्जिलिंगचं वातावरण त्यांना मानवलं आणि ती इथं बहरली. चीनच्या चहापेक्षाही भारी चव आणि सुगंध त्याला आला. आंतरराष्ट्रीय बाजारात तिला ‘‘शॅम्पेन ऑफ टी’’ असा बहुमान मिळाला.    

याच काळात ब्रिटिशांद्वारे आसाममध्ये हे पीक घेण्याचे प्रयोग सुरू होते. चीनचा नाजूक वाण आसामच्या गरम वातावरणात तग धरत नव्हता. शेवटी इथल्या जंगलात आढळणाऱ्या स्थानिक जंगली जातींपासून बेणं तयार करून चहा पीक वाढवायचा प्रयोग यशस्वी झाला. आसामच्या भूमिपुत्रागत ती इथं फुलली-फळली. १८२३ मध्ये आसमाधील चहा पहिल्यांदा लंडनच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला गेला. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी पिऊन तरारलेलं चहाचं पीक देशाच्या इतर भागात पसरू लागलं. अगदी दक्षिण भारतात तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकापर्यंत त्याचा प्रसार झाला. 

भारतात चहापानाचे संदर्भ १२ व्या शतकापासून सापडतात. डच प्रवाशी ‘जान हुगेन वॅन लिशोन’ च्या नोंदीनुसार आसामी चहाची पाने भाजीपाला म्हणून, लसूण आणि तेलाबरोबर खाण्यासाठी आणि पेय म्हणून वापरली जायची. इंग्रज आणि डच रेकॉर्डनुसार भारतात चहाचा वापर पोट शुद्धीसाठी आणि पाचक म्हणून केला जायचा.  १९४७ मध्ये भारतमातेच्या मानगुटीवर बसलेलं गोरं भूत उतरलं आणि चहाच्या या इस्टेटी कायद्याने भारतात आल्या. साहेबाच्या या शाही पिकाला सामान्य शेतीचा दर्जा देऊन कृषी खात्यात समावेश न करता त्यासाठी ‘‘टी अँड कॉफी बोर्ड’’ची स्थापना करून वेगळं बिऱ्हाड मांडलं गेलं. स्वातंत्र्यानंतर बरीच दशकं चहा पीक हे नैसर्गिकरीत्याच वाढतं आणि त्याची शेती करणं सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात नाही, असा समज होता. पण भारतीय शेतकऱ्यानं ही साहेबी शेती  यशस्वीरीत्या विकसित करून दाखवली. आसाममध्ये लाखो लहान लहान चहामळे आहेत. येथील ‘‘स्मॉल टी ग्रोवर असोसिएशन’’ मोठमोठ्या चहा इस्टेटींच्या खांद्याला खांदा लाऊन चहा पिकवताहेत. हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. एकट्या आसाममध्ये ६५ लाख मजूर चहाच्या मळ्यात  राबताहेत.    काळाच्या ओघात आघाडीवर असलेली ही चहाची शेती खऱ्या अर्थाने वेळेआधी आहे. नाही समजलं ना? सांगतो! घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या कर्मचाऱ्यासारखा आसाममधला सूर्य संध्याकाळी पाचलाच मावळतो. भारतात इतरत्र तो साडेसहा सातपर्यंत ओव्हर टाइम करतो. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी ही वेळ अडचणीची होती. हा तासा-दोन तासांचा फरक भरून काढण्यासाठी ब्रिटिशांनी एक नामी उक्ती शोधून काढली. भारतीय प्रमाण वेळ बाजूला ठेवून त्यांनी ‘‘टी गार्डन टाइम’’ सुरू केला. त्यालाच ‘बागान टाइम’ असंही म्हणतात. संपूर्ण भारतात जेव्हा चार वाजलेले असतात, तेव्हा आसामच्या चहामळ्यात पाच वाजतात. भारतीय वेळेच्या तुलनेत तो एक तास पुढे आहे. आहे का नाही गंम्मत!         गोरा साहेब गेला, पण चहा इस्टेटीच्या मॅनेजरचा साहेबी रोब अजूनही कायम आहे. कडक साहेबी पोशाख, डोक्यावर गोल टोपी ठेवून मॅनेजरसाहेब आपल्या जीपने गोऱ्या साहेबासारखे फिरत असतात. या मॅनेजर लोकांसाठी भलामोठा क्लब असतो. सुट्टीच्या दिवशी क्लबमध्ये इंग्रजी पार्ट्या झोडणं, पोलो खेळणं अशी त्यांची साहेबी लाइफ स्टाइल असते.  २०१४ मध्ये ग्रीनपीस संस्थेनं चहाच्या पेल्यातलं वादळ उठवलं होतं. भारतातल्या ४९ चहा ब्रॅण्डच्या नमुन्यांची तपासणी केली असता ६७ टक्के नमुन्यांत डीडीटी आणि काहींमध्ये मोनोक्रोटोफॉस हे रासायनिक कीटकनाशक सापडले. १९८९ मध्ये बंदी घातलेलं डीडीटी चहा पावडरीत कसं आलं, याचं स्पष्टीकरण देताना ‘टी बोर्ड’ आणि चहा निर्मात्या कंपन्यांची त्रेधा तिरपीट उडाली. पण बंदी  आलेल्या कीटकनाशकांना जैविकचा मुलामा देऊन विकणाऱ्यांच्या कृपेनं ही किमया साधली होती, हे फारच कमी लोकांना ठाऊक होतं. ...टपरीतून आसामी चहाचा कप मिळाला. वाफाळलेला चहा ओठांजवळ नेला. यात ‘डीडीटी’ चे रेणू वळवळत तर नाही ना, या शंकेने एक नजर टाकली. मग गेलं उडत असं म्हणत, एका फुंकरीने साऱ्या शंका उडवून लावत कप ओठाला लावला.

  : contact@drsatilalpatil.com (लेखक ग्रीन व्हिजन लाइफ सायन्सेस  प्रा. लि. कंपनीचे डायरेक्‍टर  आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com