agriculture stories in Marathi, Dr. Vargis Kurien is important for agricultural economics | Page 2 ||| Agrowon

कृषी अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक वर्गीस कुरियन

विलास शिंदे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत होते, अशा थोड्या भाग्यवान महापुरुषांपैकी वर्गीस कुरियन हे एक होते. अशा विशाल व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवनाकडे निव्वळ एखाद्या वस्तूसंग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेल्या वस्तूप्रमाणे पाहण्याऐवजी आपले आजचे आणि उद्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनच पाहिले पाहिजे. त्यांनी दूध व्यवसायामध्ये राबविलेली तत्त्वे कृषी क्षेत्रासाठीही तितकीच महत्त्वाची आहेत. ९ सप्टेंबर हा डॉ. वर्गीस कुरियन यांचा स्मृतिदिन...

ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत होते, अशा थोड्या भाग्यवान महापुरुषांपैकी वर्गीस कुरियन हे एक होते. अशा विशाल व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवनाकडे निव्वळ एखाद्या वस्तूसंग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेल्या वस्तूप्रमाणे पाहण्याऐवजी आपले आजचे आणि उद्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनच पाहिले पाहिजे. त्यांनी दूध व्यवसायामध्ये राबविलेली तत्त्वे कृषी क्षेत्रासाठीही तितकीच महत्त्वाची आहेत. ९ सप्टेंबर हा डॉ. वर्गीस कुरियन यांचा स्मृतिदिन...

युगप्रवर्तक माणसांचे वर्णन करताना रेनर मारिया रिल्के या जगप्रसिद्ध कवीने म्हटले आहे की, “इतिहासात अशी माणसं होऊन गेली आहेत की विशाल गर्दीतही ती वेगळी आणि उठून दिसतात. खरे तर त्या गर्दीत त्यांना कोणतेही स्थान नसते! एक व्यापक नियम त्यांना लागू असतो. विचित्र रीतिरिवाज त्यांच्यात अंगभूत असतो आणि जगरहाटीपेक्षा हटके विचार करण्याची आणि ते कृतीत उतरवण्याची त्यांच्यात धमक असते. भविष्य त्यांच्या माध्यमातून निर्दयपणे व्यक्त होते. अशी माणसं जगरक्षण करतात!”
भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांना हे वर्णन अक्षरशः चपखल बसते. कृषिक्षेत्राची समज येत गेल्यानंतर डॉ. कुरियन माझ्या आंतरिक जिव्हाळ्याचा आणि प्रेरणेचा विषय आहेत.

भारतातील श्‍वेत अर्थात दुग्ध क्रांतीचे सर्वेसर्वा असलेले स्व. कुरियन यांनी सहकाराच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंग या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केली. सहकारातील अर्थकारणाला व्यावसायिक अधिष्ठान देता येते, हे कुरियन यांनी एन.डी.डी.बी. आणि अमूल डेअरीच्या माध्यमातून सिद्ध केले. लाखो गरीब दूध उत्पादक शेतकरी जेव्हा नाना तऱ्हेच्या आर्थिक समस्यांनी त्रस्त होते त्या काळी डॉ. कुरियन यांनी दुग्ध उत्पादनातील सहकाराचे मॉडेल भारतात उभे केले आणि जगन्मान्य बनवले. त्यांच्या श्‍वेतक्रांतीने लाखो शेतकऱ्यांच्या जगण्याला नवा आशय दिला. प्रगतीच्या वाटा दाखविल्या आणि केवळ देशाच्याच नव्हे, तर जागतिक सहकार क्षेत्रापुढे आदर्श घालून दिला.
वर्गीस कुरियन यांचा भारताच्या सहकारावरील लाखो दूध उत्पादक आणि त्यांच्या परिवारातील काही कोटी माणसांच्या मनावरील नुसता प्रभाव जरी मोजला तरी माणूस अथांग थरथरून जाईल. वैयक्तिक आणि जातीय संघर्षात तसेच आर्थिक विवंचनेमुळे भरकटलेल्या देशात सहकाराचे नीतिनियम जोपासत कुरियन यांनी दुधाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. आयातीवरील अवलंबन कमी केले. कोट्यवधी भारतीयांचे पोषण वाढवले.

कुरियन यांनी सर्वप्रथम दूध उत्पादन, प्रक्रिया, दर, आणि शेवटच्या ग्राहकापर्यंत पोचवणाऱ्या प्रभावी मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केले. कृषी आधारित ग्रामीण सहकारी संस्थांना व्यावसायिक बनविण्यासाठी कुरियन यांनी त्रिभुवनदास पटेल यांच्या साथीने गंभीर प्रयत्न केले. छोट्या छोट्या दूध उत्पादकांना त्यांनी जगातील सर्वांत मोठ्या दूध उत्पादक उद्योगात रूपांतरित केले. सन २०१२ मध्ये कुरियन यांचे निधन झाले, तोपर्यंत भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश बनलेला होता. या क्षेत्राचा राष्ट्रीय ‘जीडीपी’मध्ये सहा टक्के आणि कृषी जीडीपीमध्ये २६ टक्के वाटा होता.

डॉ. कुरियन यांच्या प्रयत्नांतून ‘ऑपरेशन फ्लड’ अर्थात दुधाचा महापूर योजना साकारली. या योजनेविषयी ते म्हणत, “या धोरणामुळे भारत दुधाच्या उत्पादनाबाबत स्वावलंबी झाला. देशातील दुग्धोत्पादन २० दशलक्ष टनांवरून ६० दशलक्ष टन म्हणजे तिप्पट झाले. एक टन दुधाचे मूल्य काय आहे? तर प्रतिलिटर ६ रुपये! दुधाच्या वाढीव उत्पादनाचे मूल्य आहे रु. २४०० कोटी. ‘ऑपरेशन फ्लड’मुळे हे अतिरिक्त पैसे खेड्यांमधील शेतकऱ्यांच्या हाती गेले. या प्रयत्नांसाठी झालेली गुंतवणूक सरकारी तिजोरीतून झालेली नव्हती. छोटा, फाटका-तुटका शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, एक किंवा दोन म्हशींचे मालक असलेल्यांनी ही गुंतवणूक केली. दुग्ध व्यवसाय ही या देशातील सर्वांत मोठी ग्रामीण योजना बनू शकली.’’
दुग्ध व्यवसायासह ग्रामीण उपक्रम हाताळण्यासाठी देशाला सुशिक्षित व सक्षम व्यवस्थापक मिळावेत या उद्देशाने कुरियन यांच्या व्हिजनरी विचारांतून आणंद येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट (इरमा)’ या संस्थेची स्थापना झाली. आज ही संस्था जगातील नावाजलेले बिझनेस स्कूल म्हणून प्रसिद्ध आहे.

उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे भारताला कुठलीही राष्ट्रीय व्यापार सीमा अस्तित्वात राहिलेली नाही, हे डॉ. कुरियन सतत म्हणायचे. सह्याद्रीच्या माध्यमातून २० देशांमध्ये द्राक्षे निर्यात करताना तंतोतंत हेच विचार आम्ही सह्याद्रीच्या सभासदांवर बिंबवत असतो. स्पर्धेत टिकायचे असेल आणि वरच्या स्थानावर जायचे असेल तर तुमचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत दर्जा, दर आणि सातत्य या कसोट्यांवर टिकला पाहिजे, हे सूत्र आम्ही मान्य केले आहे. मी सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे स्व. वर्गीस कुरियन यांच्या विचारांचा आणि आचारांचा, त्यांच्या दृष्टिकोनाचा खोलवर आणि विस्तृत प्रभाव सह्याद्री फार्मर्स कंपनीवर आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या जडणघडणीत कुरियन यांच्या वैचारिक संस्कारांना अग्रक्रम होता व आहे! सह्याद्रीची स्थापना झाल्याच्या दिवसापासून डॉ. कुरियन यांचा व्यक्तिशः माझ्या मनाला केवढा आधार आहे, हे सांगणं शब्दांच्या पलीकडे आहे. विशिष्ट मोजपट्टी लावून त्याची गणतीही शक्य नाही. खरे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रत्येक नव्या पावलागणिक डॉ. कुरियन सोबत करीत आहेत!

कृषी विकासासाठीही सहकाराचे हेच मॉडेल उपयुक्त

भारतात सहकाराचा उगम १९०४ मध्ये झाला. मात्र जवळपास १९५० पर्यंत देशातील सहकारी चळवळीसंदर्भात विशेष काही घडले नाही. या काळात स्वातंत्र्य चळवळ ऐन मोक्यावर आली होती. स्वातंत्र्योत्तर काळात सहकार चळवळ देशात झपाट्याने वाढली. देशात सहकारी तत्त्वावर प्रचंड संस्था निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि गुजरातमधील अमूल हे त्याचे मोठे उदाहरण आहे. सहकार यशस्वी ठरला तसे त्यातील अपयशाची उदाहरणेही कैक पटीने पुढे आली. ठायीठायी असलेला शासनाचा हस्तक्षेप, कमजोर व्यवस्थापन, गैरकारभार, तंत्रज्ञानाची वानवा, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव, निवडणुकीचे राजकारण, सभासदांची निष्क्रियता, भांडवल उभारणीतील कमतरता आणि भ्रष्टाचार आदी कारणांमुळे सहकारी चळवळीला हादरे बसू लागले. शुद्ध हेतूने चालणाऱ्या संस्था कमी होत गेल्या. आणीबाणीच्या या परिस्थितीत सहकाराला सक्षम पर्याय देणे आवश्यक होते. हा पर्याय निव्वळ भांडवलशाहीवर आधारित नको होता. कारण सहकारी तत्त्वावरील व्यवसायांना आर्थिकपेक्षा महत्त्वाची सामाजिक बाजूही असते. एकीकडे ही पार्श्‍वभूमी असताना कंपनी कायदा १९५६ मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सन २००२ मध्ये प्रो. वाय. के. अलघ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने समिती स्थापन केली. डॉ. वर्गीस कुरियन या समितीचे सदस्य होते. अमूल प्रयोगाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुधाची मूल्यसाखळी निर्माण झाली. त्रिस्तरीय पद्धतीने ही संस्था चालली. उत्पादन ते ग्राहक यादरम्यान सर्व घटक त्यात महत्त्वाचे मानले गेले. गुजरातमधील सर्व सहकारी दूध उत्पादक संस्थांची एक शिखर संस्था निर्माण होऊन संपूर्ण गुजरातचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ‘अमूल’ या एकाच ब्रँडखाली देशभर ग्राहकांना मिळत होते. महाराष्ट्रात साखर कारखानदारी जशी यशस्वी झाली तशा दूध उत्पादक संस्था झाल्या नाहीत. याचे कारण तुकड्यातुकड्यांमध्ये सगळे प्रयत्न झाले. आपल्या दुधाचा एक ब्रँड झाला नाही. ना त्याकडे संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले गेले!
वाय. के. अलघ समितीने सहकार आणि कंपनी कायदा यांच्या संकरातून शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) हे मॉडेल सुचविले. या समितीत असलेल्या डॉ. कुरियन यांचे आशीर्वाद या नव्या मॉडेलला आहेत. सहकारातील ‘ग्रामीण विकासाचे समान तत्त्व’ हाच या मॉडेलचा मूळ गाभा आहे. सह्याद्रीने हेच मॉडेल अंगीकारले व यशस्वी केले. सहकारातील अडचणीत आलेल्या संस्थांनी हेच मॉडेल आता स्वीकारले पाहिजे, असे माझे मत आहे.

(लेखक सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)


इतर अॅग्रोमनी
खातेदाराची ओळखआता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते...
फळपिकांच्या निर्यातीसाठी एक्‍सपोर्ट...नागपूरः देशात द्राक्ष वगळता इतर फळांच्या...
पाकिस्तानमध्ये कापूस लागवड १२ टक्‍...नागपूर ः वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेत होणारी...
कोरोना संकट : कृषी व पूरक उद्योगांसाठी...कोरोना संकटामुळे देशभरात शेतीमाल पुरवठा साखळी...
भारताचा विकासदर दीड टक्क्यांवर येणे...वॉशिंग्टन ः चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा...
साखर निर्यातीच्या प्रयत्नाला कोरोनाचा ‘...नवी दिल्ली : कोरोनाच्या भीतीपोटी आईसक्रीम,...
सहकारामुळे बॅंकिंग अन् शेतमाल विक्रीला...जर्मनीतील सहकारी बँकेमध्ये सीबीएस सिस्टिम उत्तम...
राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍...नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे....
जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे :...नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...