agriculture stories in Marathi, drafting bullocks are in danger | Page 2 ||| Agrowon

ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा 

सतीश कुलकर्णी
बुधवार, 17 जुलै 2019

ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या बैलांना काम उरलेले नाही, हे खरेच. पण चाऱ्यासाठी गायरान नसणे, पाण्याची उपलब्धता कमी असणे, शेतीचे बिघडलेले अर्थकारण अशा अन्य कारणांकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न. 

सध्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर प्रचंड वाढला आहे. साहजिकच ओढकामासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी जनावरांच्या संख्येवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. जे काम यंत्राच्या साह्याने एक ते दोन तासामध्ये होऊ शकते, त्यासाठी बैलजोडीसह माणसाला दिवसभर कष्टावे लागते. हे मुख्य कारण असले तरी त्याला अन्य कारणेही आहेत. 

ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या बैलांना काम उरलेले नाही, हे खरेच. पण चाऱ्यासाठी गायरान नसणे, पाण्याची उपलब्धता कमी असणे, शेतीचे बिघडलेले अर्थकारण अशा अन्य कारणांकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न. 

सध्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर प्रचंड वाढला आहे. साहजिकच ओढकामासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी जनावरांच्या संख्येवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. जे काम यंत्राच्या साह्याने एक ते दोन तासामध्ये होऊ शकते, त्यासाठी बैलजोडीसह माणसाला दिवसभर कष्टावे लागते. हे मुख्य कारण असले तरी त्याला अन्य कारणेही आहेत. 

शेतीच्या अर्थशास्त्रामध्ये बैलजोडी बसत नाही? 
कृषी अर्थशास्त्रज्ञांकडून कृषी उत्पादनाचा खर्च काढताना बैलजोडीचा खर्च केवळ त्या दोन-चार कामाच्या दिवसाइतकाच पकडला जातो. मात्र, शेतकऱ्यांना ही जनावरे, काम असो किंवा नसो, वर्षभर सांभाळावी लागतात. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जर वर्षातून तीन, दोन किंवा एकच हंगाम होत असतील, तर त्या पिकांच्या उत्पादन खर्चामध्ये एक बैलजोडी पोसण्याचा खर्च धरला गेला पाहिजे. कोरडवाहू भागामध्ये एकच हंगाम होत असल्याने कोरडवाहू पिकाच्या उत्पादन खर्चामध्ये किती वाढ होते, हे सहज लक्षात येईल. त्या तुलनेत ट्रॅक्टरचा भाड्यासह खर्च करणे परवडते. 

पाण्याचे गणित कसे सांभाळायचे? 
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे माणसांच्या पिण्याइतके पाणी कसेबसे पुरवले जाते. तिथे एका जनावरासाठी प्रति १०० किलो वजनासाठी हिवाळ्यात ९ लिटर, तर उन्हाळ्यात १८ लिटर पाणी आवश्यक असते. म्हणजे साधारणपणे ७० ते ९० लिटर पाणी आवश्यक असते. अन्य किरकोळ पाणी धरले तरी दोन जनावरांसाठी साधारण दोनशे लिटर पाणी आवश्यक आहे. यात दूध देणाऱ्या गायींचा हिशेब वेगळाच आहे. प्रति लिटर दुधामागे चार ते पाच लिटर पाणी लागते. म्हशीला शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक पाणी लागते. त्यासोबत जनावरे व गोठा स्वच्छता वगैरे अन्य बाबींचा समावेश केला तरी प्रति जनावर १२७ ते १५३ लिटर पाणी आवश्यक असते. आता दुष्काळग्रस्त ग्रामीण भागामध्ये एका कुटुंबाला कसेबसे दोनशे लिटर पाणी मिळत असताना या जनावरांची उठाठेव कशी करणार? 

चाऱ्याचे आर्थिक गणित मांडायचे कोणी? 
दुधाचे दर परवडत नाहीत, असे शेतकरी म्हणतात. घरचा चारा असला तरी थोडाबहुत आधार होतो. मात्र, चारा विकत घ्यावा लागला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपत्तीची स्थिती निर्माण होते. जनावराच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के कोरडा खाद्यांश/चारा आवश्यक असतो. ४०० किलो बैलासाठी ८ किलो वाळलेला व १५ किलो हिरवा चारा आवश्यक असतो. १ किलो पशुखाद्य आवश्यक असते. तसेच पूर्वी ग्रामीण भागातील गायराने, डोंगर, पडजागा यांचा आधार होता. अलीकडे अतिक्रमणासह अनेक कारणांमुळे अशा जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. चांगला पाऊस, नद्या, कालवे यावर आधारीत सिंचन असलेल्या ठिकाणी थोडाबहुत तरी चारा जनावरांना उपलब्ध होतो. अर्थात, या भागामध्ये हा सर्व चारा कमी अधिक टक्क्याने संकरीत (उदा. जर्सी, होलस्टिन फ्रिजियन) दुधाळ गायींसाठी वापरला जातो. येथे या गायींचे व सोबतच ट्रॅक्टरचे प्रमाण मोठे आहे. म्हणजे पुन्हा ओढकामाच्या जनावरांची संख्या कमी आहेच. वर्षभर सोडा, पण उन्हाळ्याचे दोन चार महिने जरी प्रत्येक गोष्ट विकत घेऊन जनावरांना द्यायची म्हटले तर सामान्य शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरते. दुधाळ जनावरांकडून दुधातून काही प्रमाणात उत्पन्न सुरू तरी राहते. मात्र, ओढकामाच्या जनावरांचे गणित तर शेतकऱ्यांना आणखी गोत्यात आणणारे ठरते. 

चाऱ्यासाठी गायरानांचा आधार संपला 
भारतामध्ये गोपालक समाज पूर्वीपासूनच विखुरलेल्या स्वरूपात आहे. एकेकाळी संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था गोपालनावर असल्याचे उल्लेख अगदी महाभारतातही आढळतात. पूर्वी ग्रामीण भागामध्ये गाव (पांढरी), शिवार (काळी), गायरान आणि जंगल किंवा देवराई अशी जमिनीची व्यवस्था असे. पूर्वी या गावाच्या जमिनीवर शेकडो जनावरे चरत असत. त्यातून शेतीसाठी बैल, दुधासाठी गायी सांभाळणे परवडत असे. घरटी किमान दोन बैल, एक- दोन गायी जपल्या जात. वनविभागाच्या ताब्यामध्ये असलेल्या जंगलांविषयी गावकऱ्यांना आपुलकी राहिलेली नाही. कारण त्यातून त्यांना काही फायदा दिसत नाही. जे काही आणायचे ते चोरून मारून किंवा तिथल्या रखवालदारांना चिरीमिरी देऊन अशी स्थिती आहे. गावातील जनावरे चरण्यासाठी एखादा डोंगर असे. त्यावर बऱ्यापैकी झाडे, झुडपे व गवत असे. अलीकडे गावामध्ये गायराने हा प्रकारच मुळात कमी राहिला आहे. यात एक तर गावकऱ्यांची अतिक्रमणे झाली आहेत, किंवा या जमिनी सरकारने विविध शासकीय कामांसाठी घेतल्या आहेत किंवा स्वयंसेवी संस्थांसाठी वाटून टाकल्या आहेत. परिणामी चारा पिके एकतर तुम्हाला तुमच्या शेतात घ्यावी लागतात किंवा खरेदी करावी लागतात. अल्पभूधारकांना हे दोन्हीही न परवडणारे ठरत आहे. परिणामी बहुतांशी तज्ज्ञ पूरक उद्योग म्हणून सुचवत असलेला पशुपालन हा व्यवसाय तो करू शकत नाही. आज मोठ्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये चारा पीक घेणे शक्य आहे. मात्र, भविष्यात माणसांसाठी अन्नधान्य उत्पादन की पशूसाठी चारा असा पेच उभा राहिल्यावर त्यांनाही पशुपालन सोडून द्यावे लागेल, यात शंका नाही. 

पशुपालनातल्या इतक्या साऱ्या अडचणी, कष्ट आणि आर्थिक भार सोसून आजवर शेतकऱ्यांनी आपल्या भागातील देशी जनावरे सांभाळली. विशेष म्हणजे प्रामुख्याने पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी हे प्रमाण अधिक आहे. 

१) प्रत्येक विभागात चांगली जात - 
आपण बारकाईने पाहिले तर सोलापूर, उस्मानाबाद भागामध्ये खिलार जात, लातूरमध्ये देवणी (दुधासाठी प्रसिद्ध), कंधार, अहमदपूर, परभणी येथे लाल कंधारी (प्रति दिन ७ ते ८ लिटर दूध), विदर्भामध्ये गवळावू (ओढकाम, दूध ५ ते ६ लिटर), यवतमाळ, वाशिम आणि मराठवाड्याच्या काही भागात बंजारा व लमाण लोकांनी सांभाळलेली उमराडा जात (हिची नोंदणी नाही), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा भागातील कठाणी (नोंद नाही), मेळघाट, खामगाव, अकोला, बुलढाणा येथील खामगावी, कोकणातील कपिला, नाशिक, अकोले, इगतपुरी, घोटी भागामध्ये डांगी जातीच्या जनावरांचे संगोपन, संवर्धनाची मोठी परंपरा होती. 

२) फॅशनेबल गोसंवर्धनामध्ये उद्योजक उतरले 
देशी गोसंवर्धनाच्या नावाखाली पशुपालनामध्ये मोठमोठे उद्योजक उतरू लागले आहेत. ते प्रामुख्याने चांगले दूध देणारी काटक गाय म्हणून गीर गायीला प्राधान्य देताना दिसतात. देशी दूध (ए२ मिल्क) म्हणून ६० रुपये प्रति लिटर किंवा त्यापासून तूप बनवून २ ते ३ हजार रुपये प्रति किलो विकायचे, हे गणित मांडलेले आढळते. मात्र, गोसंवर्धनाचा आव आणत आहात, तर आपल्या महाराष्ट्रीय गायींचे का नाही, असा सवाल त्यांना विचारला पाहिजे. आपण गोसंवर्धन म्हणणार असू, तर आपल्या राज्यातील जाती (उदा. खिलार, गवळावू, कोकण कपिला इ.) जपण्याची आवश्यकता आहे. पण ज्यांच्या आर्थिक ताळेबंदाचे भान सतत जागे असते, असे उद्योजक हे कदापि करणार नाहीत. त्याची सारी धुरा आपल्या अशिक्षित मानल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरच राहणार आहे. 

३) नैसर्गिक शेतीसाठी महाराष्ट्रीय गाय का नको? 
मध्यंतरी नैसर्गिक शेतीसाठी एक देशी गाय आवश्यक आहे, या तत्त्वाचा मोठ्या हिरिरीने प्रसार होत होता. पण त्यातही आपल्या राज्यातील स्थानिक जाती पाळण्याऐवजी गीर गायीचे वर्चस्व निर्माण झाल्याचे दिसत आहे. या लोकांना शेण आणि गोमूत्रासाठी गाय सांभाळायची आहे, तर दूध कमी देणारी, काटक, स्थानिक गाय का चालत नाही? 

४) शर्यतींवरील बंदी ओढकामाच्या बैलांसाठी धोकादायक 
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव या पट्ट्यांसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती होत. दोन बैली आणि चार बैली अशा या शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक मिळवणे, हे अत्यंत मानाचे मानले जाई. लक्षावधी रुपयांची बक्षिसे असत. त्यामुळे उत्तम जातिवंत बैल निवडून, त्याच्या खुराकाची आणि प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाई. या भागामध्ये अनेकांच्या घरामध्ये खाण्यासाठी तेल नसले तरीही बैलांसाठी तिंबलेल्या कणकेमध्ये चांगले तेल घालण्याची अनेक उदाहरणे मी स्वतः मावळमध्ये पाहिली आहेत. शर्यतीमध्ये बैलांना होणाऱ्या अपघाती इजांसह अन्य अनुचित पद्धतींमुळे प्राणी मित्रांनी आक्षेप घेतले. त्यावर बंदी आली. या बंदीमुळे ओढकामांची जनावरांची जोपासना करण्याचे एक कारणही कमी झाले. म्हणजे त्यांची उपयुक्तता संपली. लाखो रुपये खर्चून आणलेले बैल रिकामे ठेवणे परवडत नाही. या शर्यतीसाठी खास सोलापूर, उस्मानाबाद, लातूर भागामध्ये उत्तम दर्जाचे जातिवंत खिलार बैल जोपासले जात. त्यांची मागणी कमी झाली. एखाद्या वरवर भल्या वाटणाऱ्या निर्णयामुळे या बैल सांभाळण्याच्या, जोपासण्याच्या प्रेरणाच मातीत मिसळल्या गेल्या. सर्व आर्थिक गणित कोलमडून पडले. परिणामी बैलांच्या या जाती नष्ट होण्याचीच शक्यता अधिक दिसते. 

५) गोवंश हत्या प्रतिबंध कायद्याचा फटका शेतकऱ्यांनाच 
गरजेच्या वेळी गाय, बैल यांची विक्री करण्याची, वाहतूक करण्यामध्ये या कायद्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. यातील बिनकामाचे, दूध आटलेले जनावर शेतकऱ्याने किती काळ सांभाळायचे, याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. हा पूर्णपणे आर्थिक मुद्दा असून, त्याचा संपूर्ण भार शेतकऱ्यांवर येऊन पडतो. 

६) जनुकीय गुणधर्म जपण्याची जोखीम स्वीकारणार कोण? 
जनुकशास्त्राचा लाभ खऱ्या अर्थाने घेण्यासाठी देशी, स्थानिक जनावरे जपण्याची आवश्यकता जगभरातील शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. तो खर्च, जोखीम कुणी उचलायची, हा यातला खरा कळीचा मुद्दा आहे. 

- सतीश कुलकर्णी, 9922421540
(या लेखातील तांत्रिक माहितीसाठी डॉ. नितीन मार्कंडेय, सजल कुलकर्णी आणि अमित गद्रे यांची मदत झाली आहे.) 


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...