कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय पिकावर विपरीत परिणाम

लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी सध्या बंदी प्रस्तावित असलेल्या कीडनाशकांचा वापर होतो. ही कीडनाशके स्वस्त असून, त्याला पर्याय शोधावे लागतील. यासाठी महागडी कीडनाशके वापरावी लागतील. पर्यायाने उत्पादन खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Effects of ban on insecticides on Citrus crop
Effects of ban on insecticides on Citrus crop

लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी सध्या बंदी प्रस्तावित असलेल्या कीडनाशकांचा वापर होतो. ही कीडनाशके स्वस्त असून, त्याला पर्याय शोधावे लागतील. यासाठी महागडी कीडनाशके वापरावी लागतील. पर्यायाने उत्पादन खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

सुमारे १०० वर्षांपासून विदर्भामध्ये संत्र्यांची लागवड होत आहे. नागपूर विभागातील नागपूर, अमरावती, बुलढाणा, वर्धा, अकोला वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे १.५ लाख हेक्टर क्षेत्र संत्रा पिकाखाली आहे. या पिकातील कीड नियंत्रणासाठी बागायतदार अनेक किफायती कीटकनाशकांचा वापर मानवी आरोग्य, पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाशी आणि अन्य सजीवांना होणारा धोका लक्षात घेऊन योग्य प्रकारे करत होते. केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती (सी. आय. बी. आर. सी) तर्फे २७ कीटकनाशकांवर बंदी संदर्भात मसुदा आदेश प्रसिद्ध झाला आहे. या आदेशामध्ये नमुद कीटकनाशकांमध्ये काही कीटकनाशके ही संत्रा, लिंबू व मोसंबी बागायतदारांसाठी बहुव्यापक, स्वस्त व परिणामकारक ठरलेली आहेत. पाने खाणारी अळी  पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दरवर्षीच आंबिया व मृग बहारावर आढळतो. सन १९४० व १९६८ मध्ये या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. पाने खाणाऱ्या अळ्या नवीन येणारी पाने खातात. झाडांवरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. परिणामी एकूण उत्पादनावर परिणाम होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा ॲसिफेट १.५ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस २ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस २ मि.लि. यांची शिफारस आहे. आता आलेल्या मसुदा आदेशामुळे लिंबूवर्गीय बागायतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सिट्रस सायला   आंबिया बहार किंवा मृग बहाराच्या वेळी नवीन पालवीला सुरूवात होताना सिट्रस सायला व त्याची पिल्ले पानांतून रस शोषतात. नवतीच्या पानांची गळ होऊन फांद्या सुकतात. वेळीच नियंत्रण न केल्यास झाडावर फुले व नंतर फळ गळून पडतात. कधी कधी झाडांवर एकही फळ राहत नाही. सायलाच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट २ मि.लि. किंवा ॲसिफेट २ ग्रॅमची शिफारस केलेली आहे. पण बंदी आल्यास या  किडीचे नियंत्रण कठीण होईल. 

रस शोषक पतंग  फळांतील रस शोषणारे पतंग यांचा प्रादुर्भाव ऑगष्ट महिन्यात दिसून येतो. प्रौढ पतंग सायंकाळी जंगलातून बाहेर पडतात. पिकणाऱ्या व आंबिया फळांच्या सालीला छिद्र पाडून रस शोषतात. पतंगांमुळे सरासरी ६० ते ७० टक्के पिकलेले फळ गळून पडतात. पतंगांना आकर्षित करून नियंत्रणाकरिता जो सापळा वापरला जातो, त्यामध्ये मॅलॅथिऑन (५० ई.सी.) १० मि. ली. गुळ व संत्रा रसासोबत प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवतात. असे सापळे झाडाला लटकवितात. याच ॲसिफेट वापरतात. आता मॅलॅथिऑन बंदीमुळे रस शोषणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठीचे मार्ग मर्यादीत होतील.  कोळी  कोळी कीडीचा प्रादुर्भाव व फळांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव सर्व लिंबूवर्गीय फळबागेमध्ये त्रासदायक ठरतो. कोळी फळांतून रस शोषण करतात. फळांवर लाल्या रोगाचे प्रादुर्भाव दिसून पडतात. नियंत्रणासाठी डायकोफॉल (१८.५ ई.सी) ची शिफारस केली जाते. हे कीटकनाशक बहूव्यापक, स्वस्त व परिणामकारक आहे. यावर बंदी प्रस्तावित असल्याने कोळी किंवा लाल्या नियंत्रणासाठी महाग कीटकनाशकांची पर्याय निवडावा  लागेल. डिंक्या  डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव कलम युतीच्या आसपासच्या भागात होतो. त्याठिकाणी सालीतून डिंक ओघळताना दिसून येतो. रोगग्रस्त सालीचा रंग क्रमाक्रमाने बदलून तो काळपट, भूरकट होतो व साल वाळते. डिंक्या नियंत्रणाकरिता मँकोझेब (६४ टक्के) आणि मेटॅलॅक्झिल एम (०४ टक्के) या संयुक्त बुरशीनाशकांची शिफारस आहे. मँकोझेब हे बुरशीनाशक डिंक्यासाठी अत्यंत महत्त्वाचे बुरशीनाशक असून, या रोगांवर प्रभावी ठरते. आत मँकोझेबवरील बंदी आल्यास अन्य प्रभावी व स्वस्त कीटकनाशकाचा शोध घ्यावा लागेल.  लिंबू वर्गीय फळझाडांवर पावसाळ्यामध्ये ब्राऊन रॉटसह अनेक बुरशींचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी कार्बेन्डाझीमची फवारणी आजवर उपयुक्त ठरत होती. फळगळसाठी कार्बेनडाझीम सोबत जिबरेलीक ॲसिड या संजीवकांची फवारणी अत्यंत प्रभावी ठरते. शिवाय कलम करण्यापूर्वी मुळे या बुरशीनाशकांमध्ये बुडवून लावण्याची शिफारस आहे.  वरील बहुतांश किडी व रोग हे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या नियंत्रणासाठी सध्या बंदी प्रस्तावित असलेल्या कीडनाशकांचा वापर होतो. ही कीडनाशके स्वस्त असून, त्याला पर्याय शोधावे लागतील. किंवा महागडी कीडनाशके वापरावी लागल्याने उत्पादन खर्चामध्ये वाढ होईल. 

  : दिनकरनाथ ओंकारनाथ गर्ग, ९८२२३६९०३०                            (माजी कीटकशास्त्रज्ञ व विशेषज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)                                                                                                                         

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com