उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे अवलोकन

ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या उद्योगाचे विश्लेषण करून अधिक माहिती मिळवण्याची गरज असते. चिवडा निर्मितीच्या उद्योगातील निर्णय कसे घ्यावेत, याची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे अवलोकन
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे अवलोकन

ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या उद्योगाचे विश्लेषण करून अधिक माहिती मिळवण्याची गरज असते. चिवडा निर्मितीच्या उद्योगातील निर्णय कसे घ्यावेत, याची माहिती आजच्या लेखात घेत आहोत. उद्योगांची ढोबळमानाने उत्पादन आणि सेवा अशा दोन क्षेत्रात विभागणी केली जाते. सामान्यतः वस्तू तयार करणारे उद्योग हे उत्पादन क्षेत्र, तर सेवा देणारे उद्योग हे सेवा क्षेत्र. त्यानंतर उद्योगाच्या आकारानुसार विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालयाच्या नवीन अधिपत्रानुसार उत्पादन व सेवा क्षेत्रातील उद्योगांचे सूक्ष्म, लघु व मध्यम वर्गीकरण हे त्यांच्या यंत्रसामुग्रीतील गुंतवणुकीनुसार किंवा त्यांच्या उलाढाली (टर्न ओव्हर) नुसार ठरवतात.

  •  एक करोड पेक्षा कमी गुंतवणूक व ५ करोड पेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योगाला सूक्ष्म उद्योग.
  • १० करोड पेक्षा कमी गुंतवणूक व ५० करोड पेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योगाला लघु उद्योग.
  • ५० करोड पेक्षा कमी गुंतवणूक व २५० करोड पेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योगाला मध्यम उद्योग.
  • उत्पादन करणारे उद्योग हे कच्च्या मालापासून ग्राहकांसाठी नवीन उत्पादनाची निर्मिती करतात. नवीन उत्पादनाची निर्मिती करताना पाच एम आवश्यक असतात. १) कच्चा माल (Material) २) मनुष्यबळ (Man) , ३) यंत्रसामुग्री (Machine), ४) कार्यपद्धती (Method) व ५० आर्थिक पाठबळ (Money). उत्पादन करणाऱ्या उद्योगांचे अ) निर्मिती करणारे उद्योग आणि ब) प्रक्रिया करणारे उद्योग अशा दोन विभागात वर्गीकरण होते. अ) निर्मिती करणारे उद्योग ः

  • हे मुख्य करून एकत्रीकरण किंवा विलीनीकरण या तत्त्वावर काम करून नवीन उत्पादन तयार करतात. उदा. सायकल तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, लोणचे तयार करणे इ.
  • निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये वापरलेल्या कच्चा मालामध्ये आमूलाग्र बदल केला जातो. नवीन उत्पादन बनवले जाते.
  • अशा प्रकारचे एकत्रीकरण करणारे उद्योग हे ग्राहकांच्या जवळ असणे जास्त संयुक्तिक असते. यामुळे ग्राहकांपर्यंत लवकर व कमी खर्चात पोहोचता येते.
  • ब) प्रक्रिया करणारे उद्योग ः हे विघटन किंवा वेगळे करणे यावर भर देतात. हे उद्योग कच्चा मालावर थोडाफार बदल किंवा प्रक्रिया करून ग्राहकांना उपयुक्त अशा स्वरूपात उपलब्ध करून देतात. यामध्ये कच्चा मालाचे बरेचसे गुणधर्म जपले जातात. उदा. दुधापासून प्रक्रिया केलेले दही, पनीर, चीज, खाद्य तेलापासून प्रक्रिया केलेले तेल व पेंड, फळापासून प्रक्रिया केलेले जाम, जेली, स्क्वॅश इ. -प्रक्रिया प्रकारातले उद्योग हे कच्च्या मालाच्या जवळ उभारणे जास्त संयुक्तिक असते. त्यामुळे कच्च्या मालाच्या वाहतुकीचा खर्च कमी होतो. नाशवंत कच्चा माल कमीत कमी वेळेमध्ये प्रक्रियेकरिता वापरता येतो. लघू उद्योजकाचे उदाहरण ः ॲग्रोवनमध्ये या सदरातील पहिला लेख प्रकाशित झाल्यानंतर एका चिवडा बनवणाऱ्या लघु उद्योजकाचा फोन आला. त्याच्याशी झालेल्या चर्चेतून एकूण उत्पादन क्षेत्रातील विविध घटकांची माहिती सर्वांना उपयुक्त ठरू शकते. चिवडा बनवणे हा निर्मिती उद्योग ः ज्यामध्ये अनेक गोष्टींचे एकत्रीकरण करण्यात येते. त्या उद्योजकाचा हा उद्योग एका तालुक्याच्या ठिकाणी चालतो. या उद्योगाची रोज २०० किलो चिवडा बनवण्याची क्षमता आहे. एक चिवड्याची बॅच ही १०० किलोची असते. हा चिवडा छोटे किराणा दुकानदार, प्रोव्हिजन स्टोअर्स, हात गाडे, छोट्या टपऱ्या यांना पुरवला जातो. उद्योजक हा १ किंवा २ किलोच्या पॅकमध्ये हा चिवडा १०५ ते ११० रुपये किलो या घाऊक किमतीला (होलसेल भावात) दुकानांमध्ये पोच देतो. या उद्योगांमध्ये आपण काय करावे म्हणजे आपल्याला उत्पन्नात वाढ मिळवता येईल, असा त्याचा प्रश्न होता. उद्योगाचे अवलोकन ः

  • उत्पादन खर्च नेमका किती आहे, याचे गणित करावे.
  • १०० किलो चिवडा बनवण्यासाठी लागणाऱ्या जिनसांचा तक्ता त्याच्या किमती व वजनासह सोबत दिला आहे. त्यावरून १०० किलो ची एक बॅच तयार करण्यासाठी साधारणपणे ७५०० रुपये एवढा खर्च येतो.
  • चिवड्याची निर्मिती ही चुलीवर करण्यात येते. त्यासाठी साधारणपणे ८०-१०० किलो इतके लाकूड लागते. लाकडाचा दर ४ रुपये प्रति किलो या प्रमाणे ४०० रुपयांचे लाकूड लागते.
  • चिवड्याच्या दिवसभरात दोन बॅच बनवण्यासाठी दोन कारागीर (कुशल कामगार) व एक मदतनीस (अकुशल कामगार) यांची गरज असते. एक बॅच बनवण्यासाठी ६५० रुपये इतका खर्च कामगारांवर होतो.
  • हा चिवडा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी २५० रुपये प्रति बॅच एवढा खर्च होतो.
  • साधारणपणे १०० किलोची बॅच बनवण्यासाठी ८८०० रुपये इतका खर्च येतो.
  • एक बॅच चिवडा विकून आपल्याला १०,५०० ते ११,००० रुपये इतके उत्पन्न मिळते.
  • यामध्ये साधारणपणे २००० रुपये इतका नफा होतो. यामध्ये आपण फक्त बदलणारा खर्च घेतला आहे. स्वतःची जागा व इतर स्थिर खर्च ग्राह्य धरलेले नाहीत.
  • खर्च कमी करणे :

  • खर्च कमी करायला मुख्य मार्ग म्हणजे कच्चामाल कमी किमतीला विकत आणणे, इंधनाचा खर्च कमी करणे व कामगारांचा खर्च कमी करणे.
  • कच्च्या मालाचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन कमी करता येईल. मात्र, त्यासाठी जास्त खेळते भांडवल लागेल.
  • कच्चामाल साठवण्यासाठी जागा व तो योग्य रीतीने साठवला न गेल्यास तो खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे हे दोन खर्च वाढवणारे भाग समोर येतात. उद्योजकाला योग्य ती आकडेमोड करून जास्त प्रमाणात माल घ्यावा का नाही, याबद्दल निर्णय घेता येतो.
  • इंधन कमी करण्यासाठी कार्यक्षम चुलीचा वापर करणे शक्य आहे. यामध्ये ३०-५० टक्यांपर्यंत खर्चामध्ये बचत होऊ शकते.
  • कामगारांची उत्पादनक्षमता यांत्रिकीकरण करून आपण वाढवू शकतो.
  • थोडक्यात काय तर खर्च कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करायला आपल्याला खर्च करण्याची गरज असते.
  • खर्च करणे किती योग्य हे प्राप्त परिस्थिती नुसार व खर्चावर येणाऱ्या परताव्यानुसार ठरवता येते.
  • किंमत वाढवणे :

  • आपला चिवडा कोण विकत घेतो आणि त्यांच्यासाठी आणखी काय पर्याय आहेत, याचा प्रथम आपण अभ्यास केला पाहिजे. सध्या हा चिवडा दुकानाच्या काचेच्या बरणीतुन ग्राहकाला कागदावर ८-१० रुपये ५० ग्रॅम या दराने मोजून दिला जातो. या दुकानांमध्ये चिवडा घेणारा ग्राहक वर्ग मुलांना खाऊ किंवा चवीसाठी म्हणून चिवडा विकत घेतो.
  • बाजारामध्ये प्रस्थापित कंपन्यांचा चिवडा साधारणपणे ३००-४०० रुपयांना प्रति किलो या किरकोळ किमतीला विकला जातो.
  • जादा दर देऊन चिवडा घेणाऱ्या ग्राहकांच्या काय अपेक्षा आहेत? त्या अपेक्षा आपला चिवडा पूर्ण करू शकेल का? याचा अभ्यास केला पाहिजे.
  • -जादा दर देणारा ग्राहक कुठे, कसा, किती चिवडा घेतो, हे समजून घेतले पाहिजे.
  • जास्त दर देताना ग्राहकाला काही अपेक्षा असू शकतील. उदा. चिवडा कुठे बनला आहे? त्यासाठी चांगल्या प्रतीचे तेल व इतर पदार्थ वापरले आहेत का? चिवडा ताजा आहे का? चिवड्याची चव त्याच्या अपेक्षेप्रमाणे आहे का? तो किती दिवस टिकतो? इत्यादी
  • या सर्व गोष्टी आपण उद्योजक म्हणून पाळतो का, हा एक प्रश्न किंवा त्यासाठी आणखी काही खर्च करावे लागतील.
  • आपला उत्तम दर्जा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. एकदा आपले उत्पादन ग्राहकांच्या अपेक्षांना उतरले की ग्राहक त्याला रास्त किंमत मोजायला तयार होतो.
  • आपण आत्तापर्यंत केलेली चर्चा ही बऱ्याचशा प्रमाणात अनेक उत्पादनांना लागू पडते. छोट्या उद्योगाकडे मर्यादित भांडवल असते. आपण गुंतवणूक ही खर्च कमी करण्याकडे करावी का ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी करावी, याचा विचार करून उद्योगाचे नफा वाढवण्याचे धोरण ठरवावे. तक्ता ः

    जिन्नस वजन (किलो ग्रॅम) किंमत (रुपये प्रति किलो) एकूण खर्च (रुपये)
    मका पोहे ७.५ ३३ २४८
    बेसन ४० ५० २०००
    डाळ १.५ ६५ ९८
    शेंगदाणा २.५ ९५ २३८
    पाम तेल ३० ९५ २८५०
    मिरची पावडर २०० २००
    हळद पावडर ०.२५ २०० ५०
    मीठ २४
    वाटाणा २० ७० १४००
    मसूर २.५ ७० १७५
    चिवडा मसाला ०.३ २०० ६०
    लसूण १२० १२०
    गोळाबेरीज* -- ११० ७४६२

    *चिवडा तळत असल्यामुळे वापरलेल्या जिनसांचे १० टक्के वजन घटते (जिनसांमधील पाणी निघून जाते.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com