agriculture stories in Marathi Entrepreneurship development - IMPORTANCE OF FAMILY & SOCIETY | Agrowon

उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्सा

डॉ. विशाल सरदेशपांडे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

उद्योजकतेमध्ये स्व विचारांसोबतच त्याच्या कुटुंबाचा व समाजाचा महत्त्वाचा हिस्सा असतो. उद्योजकतेला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शेवटी त्याचे कुटुंब आणि समाज यांचीच असते.

उद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन बाजू. एखाद्या माणसांची उद्योग करण्याची, त्यात यश मिळवण्याची मानसिकता निर्माण करण्यामध्ये त्याच्या स्वतःच्या विचारांसोबतच त्याच्या कुटुंबाचा व समाजाचा महत्त्वाचा हिस्सा असतो. उद्योजकतेला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शेवटी त्याचे कुटुंब आणि समाज यांचीच असते.

समाजामध्ये आपल्या अवतीभवती अनेक यशस्वी व अयशस्वी उद्योजक दिसत असतात. वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्यांची उदाहरणे पालक, शिक्षक, मित्र, सल्लागार देत असतात. विशेषतः यशस्वी उद्योजकांच्या प्रेरक कथांपेक्षा उद्योजकांच्या अडचणी व अपयशाची उदाहरणे दिली जातात. अपयशामुळे समाजात आपली व आपल्या कुटुंबाची नाचक्की होईल, ही भीती संभाव्य उद्योजकांच्या मनामध्ये घर करून राहते. थोडक्यात ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग’ ही बाबच संभाव्य उद्योजकांचे पाय खेचणारी ठरते.
अनेक वर्षापूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना माझी तेथील एका नव उद्योजकाच्या वडिलांची भेट झाली. हा नवउद्योजक साधारणपणे तीन-चार स्टार्टअपमध्ये अयशस्वी झाला होता. तरिही त्याच्या वडिलांच्या बोलण्यांमध्ये अपयशापेक्षा तो करत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान होते. मी स्वतःहून विचारणा केल्यावर ते म्हणाले, ‘‘अहो माझ्या मुलाचे अनुभवाचे गाठोडे मोठे आहे. या जगामध्ये तुम्ही पैसा, वेळ, श्रम असे काहीतरी पणाला लावल्याशिवाय शिकत नाही. या अनुभवाच्या जोरावर तो नक्कीच पुढील उद्योगात यशस्वी होईल.’’

उद्योजक : 

उद्योग विश्वामध्ये उद्योजक हा नायक असतो. उद्योजकतेची सुरवात एखाद्या व्यक्तीच्या उद्योग करण्याच्या विचाराने होते आणि त्याच्याभोवती फिरत असते. उद्योग करताना उद्योजकाला एखाद्या संयमी नायकाप्रमाणे सकारात्मक वृत्ती व पारदर्शक वागणूक ठेवावी लागते.

कोणत्याही नव्या उद्योगामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्यांमध्ये तोडगा शोधण्यासाठी व त्यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक वृत्ती जरुरी असते. कुटुंबात व समाजात उद्योजकाला अनेक नकारात्मक विचारांना सामोरे जावे लागते. कित्येकदा आप्त स्वकीय तुम्हाला अयशस्वी उद्योजकांचे व उद्योगांचे दाखले देत धोक्याचा इशारा देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी हे लोक तुमचे दोष दाखवत आहेत किंवा तुम्हीही असेच अयशस्वी व्हाल या भावनेने बोलत आहेत असा विचार उद्योजकाने मनात आणू नये. हे लोक आपल्यावरील प्रेमापोटी सल्ला देत असल्याचे समजून घ्यावे. त्यांच्याशी संवाद साधावा. अपयशामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. या गोष्टी मी कशाप्रकारे टाळू शकतो, याबद्दल विचार करावा. यासाठी आपण नेमके काय करत आहोत, आपल्या मनात काय चालू आहे, याची समर्पक मांडणी कुटुंबासमोर करता यायला हवी. यामुळे कुटुंबाला तुमच्या मनाची स्थिती समजण्यास मदत होते. ही पारदर्शकता आपण न दाखविल्यास आपण राबवत असलेला उपक्रमाविषयी कुटुंबाचा विश्वास राहत नाही. पारदर्शक वागणूक ही विश्वासार्हतेचे प्रतीक असते. असा विश्वास हा नात्यांना घट्ट करतो. कठीण काळामध्ये हेच कुटुंबीय, नातेवाईक तुम्हाला पाठबळ देतात.
 
कुटुंबीयांची संवाद आणि मानसिक पाठबळ : 

 उद्योगात येणारे चढ-उतार समर्थपणे पेलण्यासाठी कुटुंबाचा आधार महत्त्वाचा असतो. हा आधार घेताना कौटुंबिक संवाद हा गरजेचा असतो. या संवादांमध्ये कुटुंबाची भूमिका ही उद्योजकाला सकारात्मक भावनेतून ऐकण्याची असावी. नुसते ऐकणे व सकारात्मक भावनेने ऐकणे यात फरक आहे. यामध्ये कुटुंबाला तो विषय समजून घेऊन, त्याबद्दल उद्बोधक व दिशा दाखवणारे प्रश्न विचारावे लागतात.
 उद्योजक रोज नवीन अनुभवातून जात असतो. हे अनुभव त्याला अनेक गोष्टी शिकवत असतात. साधारणपणे कौटुंबिक संवादामध्ये या चांगल्या वाईट अनुभवाविषयी बोलायचे असते. विशेषतः अनुभवातून लगेच कोणतेही निष्कर्ष काढण्यापेक्षा त्यावेळी मनाची स्थिती सांगावी. कुटुंबीयांनीही अनुभव कोणत्याही पूर्वग्रहदूषित विचार न ठेवता स्वच्छ मनाने ऐकावेत. उद्योजकाला अनुभवातून आत्मपरिक्षण करण्यास मदत करावी. योग्य ते उपाय सुचविणे आवश्यक आहे. यातून नात्यातील सुसंवाद वाढतो. कोल्हापूर भागातील एका मित्राच्या आजोबांचा तंबाखूचा मोठा व्यापार होता. व्यापार चांगला चालू असतानाच, अचानक हृदय विकाराने आजोबांचे निधन झाले. तंबाखूचा व्यापार हा मुख्यत्वे खेळत्या भांडवलाचा आहे. परिणामी आजोबांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच पैस मागणाऱ्यांची रांग लागली. यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. काही वर्षांनी आजोबांची एक डायरी सापडली. त्यामध्ये देणेकऱ्यांच्या नावांबरोबरच ज्यांच्याकडून पैसे येणे आहेत, त्यांचीही नावे होती. मात्र, त्यातील अनेकांचा कुटुंबाला अजिबात परिचय नव्हता. यात खूप सारा वेळ निघून गेल्याने हे पैसे मिळवणे अवघडच बनले. यासाठी कुटुंबातील लोकांना आपल्या आर्थिक नियोजनाची माहिती द्यावी. असे आर्थिक व्यवहार लिहून ठेवावे. त्याची माहिती कुटुंबीयांना असावी.
मानसिक पाठबळ हा संवादाचा पुढचा भाग आहे. मानसिक पाठबळ हे उद्योजकाला उद्योगात लढण्यासाठी बळ देते. मानसिक पाठबळ देताना कुटुंबाने उद्योजकांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग नोंदवावा.  

कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ घेताना...

आर्थिक पाठबळ  देणे हे त्या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असते. कित्येकदा उद्योजकाच्या कुटुंबाकडून आर्थिक अपेक्षा असतात. कौटुंबिक आर्थिक पाठबळ घेताना उद्योजकाने व कुटुंबीयांनी काही नियम पाळले पाहिजेत. त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजेच कुटुंबाकडून आलेला पैसा कर्जाप्रमाणे समजावा. सुरवातीला जरी शक्य नसले तरी पुढे उद्योग सुरळीत होऊ लागल्यानंतर त्यावर योग्य तितके व्याज द्यावे. मुख्यत्वे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राथमिक भांडवल म्हणून कुटुंबाकडून पैसे घेणे योग्य मानले जाते. मात्र, खेळते भांडवल किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी कुटुंबाकडून पैसे घेणे सयुक्तिक नाही. यासाठी बँक किंवा अन्य पर्याय निवडावेत. कुटुंबाकडून येणारे आर्थिक पाठबळ हे तुमच्याबद्दलच्या आत्मियतेमुळे येते. ते बहुधा विनाशर्त दिलेले असते. त्याचा व ते देणाऱ्यांचा आदर राखावा.  
कुटुंबाकडून घेतलेल्या पैशाचा शक्यतो करार करावा. ते बँकेच्या माध्यमातून उद्योगाकडे वळते करावेत. करारामध्ये कधी परत देणार, याचा तपशील असावा. यामुळे उद्योजकाला आर्थिक शिस्त लागते. ही शिस्त उद्योग वाढवताना उपयोगी ठरते.
बरेचदा कुटुंबीय केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर उद्योगातील बारकाव्यात शिरतात. प्रत्येक बाबींमध्ये उद्योजकाला सल्ला देणे सुरू करतात. असे करणे कुटुंबीयांनी टाळावे. कुटुंबीयांना उद्योगातील प्रत्येक बाबींची माहिती असतेच असे नाही. परिणामी हा सल्ला हा एकांगी असू शकतो. दिलेला सल्ला मानलाच गेला पाहिजे, असा एक भाव निर्माण होतो, तो टाळावा. कुटुंबाने उद्योजकाला बोलते करावे. त्याच्या विचारांना योग्य दिशा द्यावी. विचारला तरच सल्ला द्यावा.

उद्योजकाभोवतीचा समाज :

बालकाला वाढवणे ही गावाची जबाबदारी आहे ('It takes a village to raise a child' ), अशा आशयाची एक आफ्रिकन म्हण आहे. पुढील पिढी उत्तम निर्माण करण्याची जबाबदारी ही संपूर्ण समाजाची असते. हे उद्योजक म्हणून व्यक्तीच्या उभारणीतही कामी पडते.
उद्योजक हा समाजाचा एक भाग असतो. उद्योग करतेवेळी समाजातील विविध व्यक्तींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येत असतो. समाजाची उद्योजकांबद्दल विशेषतः नवउद्योजकांबद्दल आस्थेची भावना असावी. उद्योजक हा एका बाजूला स्वतःच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी लढत असतो तर दुसऱ्या बाजूला समाजालाही त्यातून काही नवीन मूल्यवर्धित वस्तू किंवा सेवा मिळत असते. उद्योजकाचे यश हे समाजाला व देशाला सुबत्तेकडे नेण्यासाठी महत्त्वाचे असते.
समाज हा उद्योजकाला वेगवेगळ्या मार्गाने प्रोत्साहन देऊ शकतो. हे प्रोत्साहन त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेण्यापासून असू शकते.  वस्तू किंवा सेवा घेणाऱ्या ग्राहकांकडून उद्योजकाला योग्य असा ग्राहक अभिप्राय द्यावा. हा अभिप्राय विधायक व तत्परतेने दिलेला असावा. तो अचूक आणि नेमका दोष दर्शविणारा असावा. त्यातून उद्योजकाला काय सुधारणा कराव्या लागतील, याची दिशा मिळते. दुसरे प्रोत्साहनाचे मार्ग म्हणजे उद्योजकाच्या कार्याची आस्थेने चौकशी करणे व उद्योजकांच्या कार्यक्रमांना प्रतिसाद देणे.
उद्योजकाला अनेक गोष्टी साधताना वेगवेगळ्या लोकांची गरज असते. समाज हा उद्योजकाला योग्य व्यावसायिक ओळखी करून देऊ शकतो. यामुळे उद्योजकाचा वेळ वाचतो. त्याला खात्रीचा माणूस मिळण्यासोबत अनेकांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते.
 


इतर कृषी प्रक्रिया
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...
अळिंबीची मूल्यवर्धित उत्पादनेपारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी...
शास्त्रोक्त पद्धतीने हळद बियाण्याची...निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी...
चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थचिंच चवीला आंबट, तुरट व थोडीशी गोडसर असते. विविध...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
बेलफळाच्या प्रक्रिया उद्योगाला संधीबेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या...
अळिंबीपासून केचअप, कॅण्डी, मुरंबाअळिंबीमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे अळिंबीचा...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...