agriculture stories in Marathi Entrepreneurship development - Rural service sector | Page 2 ||| Agrowon

ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा विकास

डॉ. विशाल सरदेशपांडे
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला मोठा वाव आहे. आजवर बहुतांश सेवा उद्योग हे शहरी भागामध्ये विकसित होत गेले आहेत.

ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला मोठा वाव आहे. आजवर बहुतांश सेवा उद्योग हे शहरी भागामध्ये विकसित होत गेले आहेत.

गेल्या काही दशकामध्ये जगभरात सेवा क्षेत्रातील उद्योगामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भारताच्या सकल उत्पन्न निर्देशांक (GDP) मध्ये ६१% भाग हा सेवा क्षेत्राचा आहे. भारताच्या एकूण रोजगार निर्मिती पैकी २५% इतकी रोजगार निर्मिती सेवा क्षेत्रातून होते.
छोट्या सेवा उद्योगामध्ये प्रामुख्याने मूल्यवर्धन करणारे, दुरुस्ती करणारे, बौद्धिक किंवा शारीरिक सेवा देणारे उद्योग असे तीन प्रकार पाहण्यात येतात.

१) मूल्यवर्धन करणाऱ्या सेवा उद्योगांतर्गत तुमच्या मालाचे किंवा वस्तूचे स्वरूप बदलून तिला वापरण्याजोगे किंवा वापरायला सुलभ बनवता येते. याचे साधे उदाहरण म्हणजे पिठाची गिरणी. यात धान्याचे रूपांतर पिठामध्ये केले जाते.

२) दुरुस्ती ः या सेवा क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या किंवा वापरकर्त्याच्या उपकरणे, वस्तू, यंत्रे यातील बिघाड दूर करून तिला पुन्हा उपयोगी स्वरूप दिले जाते. उदा. चप्पल दुरुस्त करणारा चर्मकार.

३) बौद्धिक किंवा शारीरिक सेवा ः या उद्योगामध्ये तुम्हाला विचार, ज्ञान, कौशल्य व शरीराची दुरुस्ती इ. गोष्टींबद्दल सेवा दिली जाते. उदा. बौद्धिक सेवा प्रकारात शिकवणी घेणे किंवा रुग्णांची शुश्रूषा करणे.
 
पायऱ्या ः
१- सेवा क्षेत्रामध्ये ग्राहकाला असणारी सेवेची गरज ही सेवा सुरू होण्याच्या प्रक्रियेतील असते.
२ - सेवेबद्दल विचारणा व त्याचबरोबर ती घेण्यासाठी तारीख व वेळ याचे नियोजन करणे.
३ - ठरलेल्या दिवशी व वेळेला सेवा घेणे. सेवेच्या गुणवत्तेनुसार सेवेचे निश्चित मूल्य देणे.
 
सेवा कधी घ्यायची हे साधारणपणे दोन प्रकारात विभागले जाते.
मापकावर आधारित ठरवलेली सेवा उदा. वाहनांची दुरुस्ती ही किलोमीटर किंवा पूर्वी घेतलेल्या सेवेपासूनच्या कालावधी या मापकावर ठरते.
अचानक घ्यावी लागलेली सेवा उदा. अचानक चप्पल तुटली तर तिची त्वरित दुरुस्ती करावी लागते.

४ - काही  सेवा जागेवर किंवा घरपोच पुरवली जाते. तर काही सेवा घेण्यासाठी विशिष्ट अशा सेवा केंद्रावर जावे लागते.

वरील चारही गोष्टींवरून सेवा घेण्यासाठी मूल्य ठरवण्याचा एका साधारण ठोकताळा मिळतो.

सेवेचे मूल्य ठरवण्याचा ठोकताळा ः

सेवेचे मूल्य ठरवणे हे सेवा उद्योगाच्या प्रकारावर अवलंबून असते.
प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन करून देणाऱ्या सेवा उद्योगात आकारले जाणारे मूल्य हे बदलणारा खर्च व स्थिर खर्च यावर आधारभूत असतो. गिरणीमध्ये धान्य दळून घ्यायचा प्रति किलो दर हा छोट्या व मोठ्या गावात वेगवेगळा पाहायला मिळतो. गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी लागणारा बदलणारा खर्च म्हणजेच विजेचा वापर व दळणाच्या जात्याची देखभाल करणे हा असतो. शहरी किंवा ग्रामीण भागात हा खर्च साधारणपणे सारखाच असतो. मात्र, स्थिर खर्च (उदा. जागेचे भाडे, कामगारांचा पगार इ.) यामध्ये तफावत असू शकते. 
बऱ्याचदा सेवा क्षेत्रात प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन करणारे छोटे उद्योग हे जागेचा खर्च व स्वतः काम करण्याचा खर्च नफा काढताना ग्राह्य धरत नाहीत. हा खर्च धरून उद्योगात नफ्याची आकडेमोड केली तर आश्चर्यकारक खुलासे होतील.
अचानक घरपोच लागणारी सेवा ही साधारणपणे जास्त महागडी असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरचे कुलूप उघडण्यासाठी घेतलेली सेवा.
बौद्धिक किंवा शारीरिक सेवा देणाऱ्या उद्योगांमध्ये सेवेसाठी दिलेला वेळ हा पैशांमध्ये मोजता येतो. म्हणजेच तुमचे उत्पन्न हे तुम्ही सेवेसाठी दिलेल्या वेळेवर अवलंबून असते. अशा प्रकारच्या सेवा उद्योगात सेवेचा वेळ व मूल्य या दोन्ही गोष्टी जाहीर कराव्या लागतात किंवा ग्राहकाला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते.
उदा. आपण जर शिकवणीला जात असाल तर शिकवणीचा वेळ आधीच जाहीर केलेला असतो.
बौद्धिक सेवाक्षेत्रात उत्पन्न वाढवायचे असेल तर एकदाच जास्त लोकांना सेवा देणे किंवा सेवेचा दर वाढवणे हे दोन मुख्य पर्याय असतात. सध्या ऑनलाइन क्लासेसमुळे जास्त लोकांना कमी दरामध्ये सेवा देणे शक्य झाले आहे. 

नफा वाढवण्यासाठी काय करता येईल?

प्रातिनिधिक स्वरूपात आपण जर पिठाची गिरणी या सेवा उद्योगाकडे पाहिले तर आपण धान्य दळून देणे (प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन सेवा) या व्यतिरिक्त आपण नफा वाढवण्यासाठी काय करू शकतो, याचा विचार करू.
१) ग्राहकांना घरपोच धान्य दळण पुरवठा करणे.
२) पीठ दळून तयार झाले, याचा एसएमएस ग्राहकाला पाठवणे.
३) गिरणीतच उत्तम दर्जाचे धान्य (उदा. गहू , ज्वारी निवडून व स्वच्छ करून) उपलब्ध करणे.
४) स्वतःच तयार दळलेले पीठ विक्रीला ठेवणे.
५) गिरणीमध्ये अन्य पूरक उत्पादनांनी विक्री करणे. अर्थात, अशा विक्रीसाठी किंवा प्रदर्शन लावण्यासाठी गिरणीतील वातावरण स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. उडणारे पिठाचे कण नियंत्रण करणारी किंवा स्वच्छता करणारी यंत्रणा असली पाहिजे. या यंत्रणेमुळे गिरणी मध्ये प्रसन्न वातावरण राहते, कामगारांचे श्वसनाचे आजार टळतात व दिवसाच्या शेवटी यातून जमा झालेले पीठ मिळते. हे पीठ गुरांच्या चाऱ्यांमध्ये मिश्रणासाठी उत्तम दराने विकले जाते.
थोड्याफार फरकाने इतर सेवा प्रक्रिया उद्योगातही वरील काही धोरणे नफा वाढवण्यासाठी राबवता येऊ शकतात. 

सेवा उद्योगातील महत्त्वाचे घटक ः

१) सेवेमध्ये दरातील पारदर्शकता हा खूप महत्त्वाचा भाग आहे. उबर व ओला या टॅक्सी सेवा कंपन्यांना ग्राहकांकडून पसंती मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या भाड्यातील पारदर्शकता होय.
२) दिलेल्या वेळेवर सेवेची पूर्तता करणे. ग्राहकांची अपेक्षा आणि एकूण कामाची गती, कामगारांची संख्या, अन्य अडचणी यांचा विचार करून सेवेचा कालावधी ठरवला जातो. उदा. उत्तम कपडे शिवणारा अशी ख्याती असणारे अनेक शिंपी वेळेवर सेवेची पूर्तता करण्याबाबत बदनाम आहेत. केवळ याच कारणामुळे अनेक ग्राहकांना मुकावे लागते.
३) दुरुस्ती सेवा उद्योगात ग्राहकांना तत्पर सेवा व प्राप्त परिस्थितीत ग्राहकांना दिलेला प्रामाणिक सल्ला (ग्राहकाचे पैसे व वेळ वाचवण्यासाठी) खूप महत्त्वाचा असतो. यामुळे ग्राहकांचा दुरुस्ती करणाऱ्यावर विश्वास दृढ होतो. याचबरोबर दुरुस्ती केलेल्या वस्तूची दुरुस्ती पश्चात हमी हा सुद्धा ग्राहकाचा तुमच्यावरील विश्वास संपादन करण्यासाठी महत्त्वाचा असतो. वाहन दुरुस्ती क्षेत्रांमध्ये ग्राहकांच्या अभिप्रायाला महत्त्व आहे.

वाढणारी स्पर्धा व त्यावरील मार्ग ः

सेवा क्षेत्रातील उद्योग हे उत्पादन क्षेत्रातील उद्योगांपेक्षा कमी गुंतवणुकीत करता येतात. यामुळे या क्षेत्रामध्ये कोणालाही उद्योग सुरू करणे तसे सोपे असते. मात्र, याचाच दुसरा परिणाम म्हणजे स्पर्धा वाढू शकते. एखाद्या उद्योगात जास्त स्पर्धक निर्माण झाल्यावर ग्राहकांना पर्याय वाढतात. अशा वेळी उद्योजकांसमोर केवळ पुढील पर्याय उरतात.
अ) उद्योगांना सेवेचा दर कमी करावा लागतो.
ब) आपले वेगळेपण जपावे किंवा निर्माण करावे लागते. सेवा क्षेत्रामध्ये इंटरनेट व स्मार्टफोन यांचा वापर करून आपण प्रचलित उद्योगांची सेवा देण्याची प्रणाली कमालीची सुधारू शकतो. 
क) सेवा क्षेत्रामध्ये आपण सतत ग्राहकांचे मनोगत जाणून घेण्यासाठी योग्य ते मार्ग किंवा पर्याय खुले ठेवले पाहिजे.
ड) कोणत्याही उद्योगांमध्ये नवीन ग्राहक जोडण्यापेक्षा असलेल्या ग्राहकांना सांभाळण्याची किंमत व श्रम कमी असतात. 
सेवा क्षेत्रामध्ये पारदर्शक, तत्पर, ग्राहकाभिमुख व ग्राहकांच्या हिताला जपणाऱ्या उद्योगांना नक्कीच सक्षम व मोठे होण्याची संधी आहे


इतर कृषी प्रक्रिया
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...