लघु उद्योग आजारी का पडतात?

लघू उद्योग आजारी पडण्यामागील घटकांचा या लेखामध्ये विचार करू.
लघु उद्योग आजारी का पडतात?
लघु उद्योग आजारी का पडतात?

लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. जर उद्योगांनी बँकेचे हप्ते वेळेत भरले नाही किंवा त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली तर त्या उद्योगाला आजारी उद्योग असे म्हणतात. लघू उद्योग आजारी पडण्यामागील घटकांचा या लेखामध्ये विचार करू. अनेक दिवस कमी नफा किंवा नफा नसताना उद्योग चालविल्यास आजारी उद्योगांमध्ये त्याचे रूपांतर होते. मानवी शरीराला सुदृढ राहण्यासाठी जशी रक्त निर्मितीची गरज असते, तशीच उद्योगाला सुदृढ राहण्यासाठी नफा निर्मितीची गरज असते. रक्ताअभावी शरीर आणि नफ्याअभावी उद्योग हा अशक्त होतो. अशक्त उद्योग किंवा शरीर हे अनेक आजारास आमंत्रित करते. लघुउद्योगांच्या मंत्रालयाच्या अहवालानुसार, ८०% उद्योग आजारी पडण्यामागील मुख्य कारणे पुढील प्रमाणे - १) बाजारात मागणी नसणे. २) पुरेसे खेळते भांडवल नसणे. ३) मार्केटिंग अडचणी असणे. ४) कच्च्या मालाचा पुरवठा नसणे. बाजारात मागणी नसणे: बरेचदा लघुउद्योजक धडाडीने उद्योग सुरू करतात. आपण उत्पादन करू शकतो किंवा आपल्याकडे कच्चा माल आहे, म्हणून सुरू केलेल्या या उद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला बाजारात नेमक्या मागणीचा अंदाज नसतो. मागणी किती, कुठे, कधी, व कोणत्या किमतीसाठी आहे, याचा अभ्यास केलेला नसतो. केला असल्यास तो अत्यंत मोघम जातो. मी स्वतः गूळ उद्योगाशी संबंधित संशोधनामध्ये कार्यरत आहे. या उद्योगात बरेच उद्योजक आपल्याकडे कच्चा माल आहे किंवा आपण मोठे मनुष्यबळ सांभाळू शकतो, म्हणून मोठा उद्योग सुरू करतात. अशी मोठ्या प्रमाणात गूळ निर्मितीनंतर बाजारात योग्य किंमत व ग्राहक मिळवण्यासाठी त्यांना झगडावे लागते. बाजारात मागणी नसण्याची काही मुख्य कारणे ः १) ग्राहकाला (आपल्या उत्पादनापेक्षा) चांगला पर्याय असणे. २) दुसरी उत्पादने कमी किमतीला मिळणे. ३) ग्राहकाचे बदलते निकष. ४) बाजारात उत्पादन यायची योग्य वेळ नसणे. ग्राहक एखादे उत्पादन का निवडतात, यामागे अनेक कारणे असतात. १) सोपेपणा आणि सुलभता ः प्रामुख्याने सुलभता सोयीनुसार अवलंबून असते. पूर्वी माहिती साठवण्यासाठी सीडींचा वापर होत असे. मात्र, आता त्या जागी वापरायला व सांभाळायला सोपा असा पेन ड्राईव्ह हा पर्याय उपलब्ध झाला आहे. परिणामी सीडी बनवण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. २) कमी श्रम, कमी किंमत ः उत्पादनाची कमी किंमत बहुतेकांना आकर्षित करते. तसेच ते मिळवण्यासाठी लागणारे कमी श्रम हेही ग्राहकांच्या पसंतीला उतरते. उदा. गेल्या काही दशकांत कपडे शिवून घेण्यापेक्षा तयार (रेडीमेड) कपड्यांना खूप अधिक मागणी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शिवलेले कपडे कमी किमतीला मिळतात. ते मिळवण्यासाठी इतर अनेक सोपस्कार टळतात. कपडा विकत घेणे, शिंप्याला माप देणे व ते वेळेवर मिळण्यासाठी पाठपुरावा करणे इ. अनेक गोष्टी टळतात. ३) चोखंदळपणा ः अनेक लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने ग्राहक म्हणून जास्त चोखंदळ व अधिक पर्यायाची मागणी करणारा झाला आहे. आपल्या उत्पादनासंदर्भात ग्राहकाच्या बदलत्या निकषांची जाण उद्योजकाला असली पाहिजे. त्या कसोटीवर उत्पादन उतरले पाहिजे. ४) योग्य वेळी उपलब्धता ः बाजारात उत्पादन हे ग्राहकाला योग्य वेळी मिळाले तर त्या उत्पादनाला बाजारात मागणी असते. वेळेआधी किंवा वेळेनंतर उपलब्ध झालेल्या उत्पादनाला बाजारात मागणी मिळेलच असे नाही. खेळत्या भांडवलाची कमतरता : सक्षम उद्योगासाठी खेळते भांडवल व गुंतवणूक भांडवल या दोन्हींची गरज असते. अनेक उद्योग सुरू करताना गुंतवणुकीचा जास्त विचार केला जातो. कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त क्षमता मिळावी यासाठी उद्योजकाचा भर असतो. खेळत्या भांडवलाचा सहसा अधिक विचार केला जात नाही. कोणत्याही उद्योगात संसाधन खर्चासाठी (कच्चा माल, कामगार, ऊर्जा) खेळते भांडवल गुंतवावे लागते. हे खेळते भांडवल आपल्याला पक्का माल / तयार उत्पादन विकल्यानंतर परताव्यासहित माघारी मिळते. प्रत्येक उद्योगातील चलन देवाण-घेवाणीच्या प्रक्रियेचे चार भागात वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणाप्रमाणे उधार विकत घेऊन नगदी विकण्यामध्ये आपल्याकडे खेळते भांडवल जमा होते. नगदी विकत घेऊन उधार विकल्यामुळे आपल्याकडे खेळते भांडवल कमी पडू शकते. जर आपण असे करत असू तर आपल्याला उधार दिलेल्या पैशावर (गुंतवणुकीवर) व्याज मिळाले पाहिजे. म्हणजे आपण जर १० हजार रुपये गुंतवले आणि आपण दोन महिन्यानंतर पैसे परत मिळविणार असलो तर आपल्या रुपयाची किंमत दोन महिन्यानंतर (१५% व्याजाप्रमाणे) १०,२५० रुपये होते. थोडक्यात या विक्रीवर २० टक्के नफा मिळणार असेल तर तो कमी होऊन १७.५% इतका होतो. त्यात पैसे माघारी मिळण्यासाठी जास्त वेळ लागत गेल्यास अडचणीत भर पडते. पैसे माघारी मिळवण्याची जोखीम वाढत जाते. आपण कच्चा माल उधार घेऊन पक्का माल उधार विकत असल्यास त्यात पैसे परत यायचा कालावधी (कॅश कन्व्हर्जन सायकल) याला खूप महत्त्व असते. पैसे परत यायचा कालावधी जर जास्त असेल तर उद्योगामध्ये जास्त खेळते भांडवल लागते. खेळते भांडवल कसे काढायचे याची आकडेमोड आकृती २ मध्ये दाखवली आहे. ज्या उद्योगांमध्ये खेळते भांडवल जमा होत असते. म्हणजे या उद्योगात कच्चा माल उधारीमध्ये विकत घेऊन रोखीमध्ये विकला जातो. असे उद्योग भविष्यात येणाऱ्या नफ्याच्या जोरावर खेळते भांडवल बरेचदा स्थावर मालमत्तेत किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतविण्याची गडबड करतात. मात्र, उद्योगात थोडा चढ-उतार झाला व भविष्यातील नफा पुढे ढकलला गेला तरी उद्योग खेळत्या भांडवलाअभावी अडचणीत ये शकतात. बरेचदा असे पाहण्यात आले आहे की छोटा उद्योजक हा यश संपादन करत असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढतो व अति आनंदाच्या भरात तो लहान तोंडी मोठा घास घ्यावयाचा प्रयत्न करतो. अशा वेळी बरेच उद्योजक चौफेर विचार न करता काही निर्णय घेतात व खेळत्या भांडवलाच्या दुष्टचक्रात सापडतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com