उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...

ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.ग्रामीण भागातील विविध कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास शेतीमालाला उत्तम दर मिळण्यास मदत होईल.
ग्रामीण उद्योग व उद्योजकतेची गरज
ग्रामीण उद्योग व उद्योजकतेची गरज

ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. यातून ग्रामीण तरूणांमध्ये उद्योजकतेचे वातावरण तयार झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण परीसराला मिळू शकतो. ग्रामीण भागातील विविध कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास शेतीमालाला उत्तम दर मिळण्यास मदत होईल. एखादा देश प्रगत होण्यामागे त्याची उद्योगी वृत्ती आणि उद्योजक विचारसरणी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कारण एखाद्या मोठ्या उद्योगानेही परिसरातील विविध छोट्या उद्योगांना चालना मिळते. रोजगाराची निर्मिती होते. बाजारपेठेमध्ये पैसा खेळता राहतो. स्थानिक प्रशासनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर मिळाल्याने अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीला चालना मिळते. एकूणच देशाच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणास मदत होते. याचे एक उदाहरण म्हणजे फिनलॅंड येथील नोकिया कंपनी. एकेकाळी या कंपनीमुळे त्या संपूर्ण देशच्या विकासाला मोठी चालना मिळाली होती. ही एक कंपनी बाजारपेठेमध्ये मागे पडल्याने देशाच्या विकासाची गती अडखळल्याचे त्या देशातील आर्थिक तज्ज्ञ सांगतात. आपल्याकडेही लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद राहिल्याने एकूणच अर्थव्यवस्थेवर पडलेल्या परिणामाची जाणिव आपल्या सर्वांना विविध मार्गाने नक्कीच झाली असेल. उद्योग म्हणजे काय? कोणत्याही उद्योगाचा उद्देश कच्च्या मालापासून ग्राहकाला पक्का माल किंवा उत्पादन तयार करून देणे किंवा सेवा पुरवणे हा असतो. उद्योगामार्फेत तयार केल्या जाणाऱ्या पक्का मालाला किंवा उत्पादनाला किंवा सेवेला ग्राहकांची मागणी असली पाहिजे. त्याला त्या उत्पादनाची गरज वाटली पाहिजे. या उत्पादनाच्या निर्मितीसाठी होणाऱ्या खर्चापेक्षा ग्राहकाकडून अधिक मोबदला मिळणे आवश्यक असते. असा अधिक मोबदला म्हणजेच त्या उद्योगाचा नफा होय. या उद्योगातून सामायिक दायित्व पूर्ण होण्यासाठी...

  • उद्योगामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे.
  • या उद्योगाने उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यावर शासनाला देय असलेला कर भरला पाहिजे.
  • उद्योगाच्या उभारणीसाठी केलेली गुंतवणूक किंवा बँकांसह अन्य वित्तिय संस्थांकडून घेतलेल्या भांडवलावर व्याजासहित हप्ते नियमित भरले पाहिजे.
  • यातुनच उद्योगाने आपले सामाजिक योगदान पूर्ण केले पाहिजे.
  • हे उद्योग होऊ शकत नाहीत... १) जर तुम्हाला ग्राहक नसताना किंवा त्याला गरज नसताना करत असलेले कार्य उद्योग ठरत नाही. २) केवळ छंद किंवा विरंगुळा म्हणून केल्या जाणाऱ्या कार्याला उद्योग म्हणता येत नाही. ३) तुमच्या उद्योगात तुम्ही नफा होतोय की नाही, याकडे लक्ष देत नसाल तर तो उद्योग नसून केवळ सामाजिक सेवा आहे, हे लक्षात घ्यावे. थोडक्यात, उद्योगात ग्राहकांच्या गरजा, नफा व सामाजिक योगदान हे महत्त्वाचे घटक असतात. उद्योजक कोणाला म्हणावे? सामान्यतः स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा अधिक पैसे किंवा नफा मिळवण्यासाठी कार्य किंवा उद्योग करणाऱ्या व्यक्तीला उद्योजक असे म्हटले जाते. हे मुख्य उद्देश असला तरी अनेक वेळा उदरनिर्वाहाव्यतिरीक्तही व्यक्तीला आपली प्रतिभा दाखवणे, समाजात आपला ठसा उमटवणे किंवा स्थान निर्माण करणे असे अनेक हेतूही उद्योगासाठी प्रेरीत करत असतात. या व्यक्ती सामान्यतः वेगळा विचार करणाऱ्या, लोकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणाऱ्या, एकूण स्वतंत्र मानसिकतेच्या असतात. हे लोक हे नोकरीच्या नियमित परिपाठाला किंवा तेच तेच पणाला कंटाळून जातात. स्वतःच्या आवडीच्या काम करण्यासाठी उद्योग सुरू करतात. उद्योगाच्या आकारानुसार सुक्ष्म (Micro), लघू (Small) व मध्यम उद्योग (Medium) किंवा मोठे उद्योग अशी वर्गवारी केली जाते. आपल्या देशासाठी वरील तीनही प्रकारचे उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यासाठी स्वतंत्र मंत्री व मंत्रालय आहे. लघुउद्योग हे प्रस्थापित मोठ्या उद्योगांपेक्षा कमी भांडवल व संसाधनात जास्त रोजगाराची निर्मिती करतात. मोठ्या उद्योगामध्ये भांडवल अधिक, यंत्रांचा वापर अधिक असतो. पर्यायाने स्थानिक रोजगारामध्ये फारशी वाढ होत नाही. स्टार्टअप आणि लघूउद्योग यातील फरक ः

  • अलीकडे कोणताही नवीन उद्योग सुरू केल्यास त्याला स्टार्ट-अप (start-up) संबोधण्याची पद्धत पडली आहे. मात्र, प्रत्येक नवीन उद्योग हा स्टार्टअप असेलच असे नाही. त्यामुळे लघुउद्योग आणि स्टार्ट अप यातील फरक जाणून घेऊ.
  • स्टार्टअप उद्योगामध्ये प्रामुख्याने नव्या संकल्पनाद्वारे प्रचलित सेवा किंवा उत्पादनामध्ये नावीन्य असले पाहिजे. किंवा नियमित उत्पादन किंवा सेवा बाजारात पुरवण्याच्या पद्धतीमध्ये मुळासकट बदल केलेले असले पाहिजेत. नव्या संकल्पनेने मोठ्या प्रमाणात आणि अधिक परिणाम पूर्वक सेवा (service) किंवा वस्तू (product) बाजारात आणणे हा उद्देश असलेल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणता येते.
  • लघु उद्योगाचा उद्देश हा प्रचलित बाजारात स्थान निर्माण करणे व स्वतःच्या मालकीचा व्यवसाय करणे इतकाच असतो.
  • उद्योग आणि नफा यांचा परस्पर संबंध ः कोणताही उद्योग दीर्घकालीन अबाधित राहण्याचे रहस्य म्हणजे उद्योगात नफा होत राहणे किंवा उद्योग नफ्यामध्ये चालवणे. कोणत्याही उद्योगातून योग्य प्रमाणात नफा मिळत राहणे आवश्यक असते. सर्व खर्च भागून भविष्यातील वाढ किंवा विस्तार यांची गरज भागवण्याइतका नफा घेणे अपेक्षित असते. मात्र, त्यापेक्षा अधिक नफ्याची अपेक्षा केल्यास असे व्यवसाय किंवा उद्योग धोक्यामध्ये येतात. लोक अन्य पर्यायी उत्पादनांकडे वळण्याचा धोका असतो. नफ्याचे योग्य प्रमाण हे प्रत्येक उत्पादन किंवा सेवेनुसार बदलते असू शकते. नफा प्रामुख्याने ग्राहकांची गरज व तयार करण्यासाठी लागणारा खर्च या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. ग्राहकांची गरजेमध्ये दोन बाबी महत्त्वाच्या असतात. १) बाजारातील मागणी २) ग्राहकाची किंमत मोजण्याची तयारी (ग्राहकासाठीचे मूल्य). बाजारातील मागणीची संख्या व वस्तूची किंमत याच्या गुणाकारातून उद्योजकाला प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नाची आकडेवारी मिळू शकते. उत्पादन निर्मितीचा खर्च दोन भागात विभागला जातो. १) स्थिर खर्च (व्यवसायातील गुंतवणूक) - स्थिर खर्च किंवा गुंतवणूक ही वस्तू किती बनवल्या त्याच्या प्रमाणात बदलत नाही. यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामुग्री, शेड, भाडे, कायमस्वरूपी कामगार यांचा समावेश होतो. २) बदलता खर्च - बदलणारा खर्च वस्तू किती संख्येने बनवल्या यानुसार बदलतो. यामध्ये प्रामुख्याने कच्च्या मालाचा खर्च, संसाधनाचा खर्च (ऊर्जा व तात्पुरते कामगार), पॅकेजिंगचा खर्च इत्यादींचा समावेश होतो. या दोन्ही खर्चांवरून आपल्याला एकूण लागणारा खर्च काढता येतो. एकूण उत्पन्नातून होणारा एकूण खर्च वजा केल्यावर व्यवसायातील नफा मिळतो. एकंदरीत मागणी, मूल्य, गुंतवणूक व बदलणारा खर्च या चार गोष्टींवर उद्योगातील नफ्याचे प्रमाण अवलंबून असते. मागणीचेही दोन प्रकार असतात. १) नैसर्गिक (साहजिक) ः नैसर्गिक मागणीमध्ये ग्राहकांच्या मूलभूत गरजांचा समावेश होतो. २) कृत्रिमरित्या तयार केलेली मागणी ः कृत्रिम मागणी ही ग्राहकाच्या मनात वेगवेगळ्या समज, गैरसमज, प्रतिमा उभारणीतून तयार केल्या जातात. उदा. विविध प्रसारमाध्यमातील जाहिराती. एखाद्या वस्तूचे मूल्य हे ग्राहकाला ती वस्तू किती उत्कटतेने हवी आहे, यावर अवलंबून असते. त्यातून ग्राहक वस्तूला किती किंमत द्यायची हे ठरवतो. एखादी वस्तू, उत्पादन किंवा सेवा ही ग्राहकांची एखादी समस्या, अडचण सोडवते किंवा वापर सोपा करते किंवा कष्ट कमी करते. अशा वस्तूसाठी ग्राहक हा जास्त किंमत मोजायला तयार होतो. त्याला ती त्वरित हवी असते. उद्योगाचा नफा हा उत्पन्न वाढवून किंवा खर्च कमी करून वाढवता येतो. उत्पन्न वाढवायचे असेल तर बाजारात मागणी वाढवणे व जादा किंमतीला विकणे हे दोन पर्याय असतात. खर्च कमी करण्यासाठी गुंतवणूक कमीत कमी ठेवणे व बदलणारा खर्च कमी करणे हे दोन पर्याय असतात. डॉ. विशाल सरदेशपांडे,  ८७८८४६०७६६ (लेखक आय. आय. टी. मुंबई येथे अनुबंध सह प्राध्यापक असून, ग्रामीण उद्योग धंदे व त्यांचे सबलीकरण यातील तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com