मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यातील शेतीचे नियोजन

एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा आहे. आता पुढील काळात पडणाऱ्या पावसाचा अंदाज जाणून घेऊन, त्यानुसार ऑगस्ट महिन्यात शेतीचे नियोजन करण्याविषयी माहिती घेऊ.
पावसाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन
पावसाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन

एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा आहे. आता पुढील काळात पडणाऱ्या पावसाचा अंदाज जाणून घेऊन, त्यानुसार ऑगस्ट महिन्यात शेतीचे नियोजन करण्याविषयी माहिती घेऊ. या वर्षी नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) राज्यात ११ जून रोजी दाखल झाले (आकृती १). भारतीय हवामान विभागानुसार मराठवाड्यात दिनांक १ जून ते ३१ जुलै दरम्यान औरंगाबाद व बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात (६० टक्क्यांपेक्षा जास्त) पाऊस झाला तर परभणी, जालना, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त (२० ते ५९ टक्के जास्त) पाऊस झाला, तर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात सरासरी एवढा (उणे १९ ते १९ टक्के जास्त) पाऊस झाला. (आकृती २) मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसानही झाले. एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा आहे. मागील दोन महिन्यात ढगाळ वातावरण व झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागले. यामध्ये जमिनीत वापसा नसल्यामुळे हळद, सोयाबीन या सारखी पिके पिवळे पडण्याची समस्या दिसून आली. सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी व खोडकीड यांचा प्रादुर्भाव, कपाशीवर आकस्मिक मर तसेच रस शोषण करणाऱ्या किडी (मावा, तुडतुडे) व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला, तूर पिकात खोड माशी, मका तसेच खरीप ज्वारी पिकात लष्करी अळी, हळदीमध्ये करपा, टोमॅटो पिकावर जिवाणूजन्य करपा, कांदा रोपवाटिकेतील रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव, जुन्या केळी बागेत करपा, संत्रा मोसंबी फळबागेत फळगळ व सिट्रस सायला तसेच पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव, डाळिंबावर तेलकट डाग रोगाची लक्षणे दिसून आली. त्यावरील उपाययोजनांची माहिती विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाद्वारे नियमितपणे देण्यात आली. येत्या काळात म्हणजेच ऑगस्टच्या १३ तारखेपर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (आकृती ३). तसेच भारतीय हवामान विभागाने ३१ जुलै रोजी दिलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील (ऑगस्ट ते सप्टेंबर) अंदाजानुसार देशात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात ९ टक्के तफावत होण्याची शक्यता गृहीत धरली आहे. या अंदाजानुसार जास्तीचा पाऊस, ढगाळ वातावरण व आर्द्रतेत वाढ यामुळे पिकांवर होणारे परिणाम आणि त्याचे व्यवस्थापन याची माहिती घेऊ. १. पिकात, फळबागेत तणांचा प्रादुर्भाव वाढतो. २. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी मुळांच्या अन्नद्रव्य शोषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य वाहन थांबते. पिकांच्या पोषण क्रियेत बाधा निर्माण होऊन पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसतात. कापूस पिकाची वाढ खुंटते, पानावरील ठिपके, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची, लालसर डाग (लाल्या) विकृती होण्याची शक्यता असते. ३. कापूस व तूर पिकात आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ४. सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, शेंगांवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ५. कापूस पिकात पाते लागल्यानंतर अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. ६. सोयाबीन व हळद पीक पिवळे पडण्याची शक्यता असते. पीक पिवळे पडल्यास पानांद्वारे होणाऱ्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ७. हळदीच्या शेतात पाणी साचून राहिल्यास कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. ८. संत्रा, मोसंबी बागेत फळगळ होण्याची शक्यता असते. ९. डाळिंब बागेत बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगाचा व तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. १०. केळी पिकावर करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ११. टोमॅटो पिकात जिवाणूजन्य करपा रोगाचा व इतर भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. १२. पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. उपाययोजना : १. पावसाने उघडीप दिल्यास पिकात निंदणी व कोळपणी करून पिकातील तणांचे नियंत्रण करावे. २. पुढे पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेता हंगामी पिकात किंवा फळबागेत पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक पाऊस झाल्यास पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी. ३. शेतात वापसा स्थिती राहील, याची काळजी घ्यावी. या दोन्हीसाठी पिकांमध्ये ठरावीक अंतरावर नांगराच्या साहाय्याने उताराच्या दिशेने चर काढावेत. पाऊस जास्त पडल्यास जास्तीचे पाणी या चराद्वारे शेता बाहेर पडते. पिकांचे नुकसान होत नाही. ४. बागेत रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त पाने, फळे इ. काढून नष्ट करावे. ५. फळबागेत आवश्यकतेनुसार बुरशीनाशकाची व कीड नाशकाची फवारणी पावसाने उघडीप दिल्यानंतर करावी. ६. पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास संबंधित विद्राव्य खतांची फवारणी करावी. ७. पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. त्यात सापळे, परोपजीवी मित्र किडींचा वापर करावा. ८. पिकांवरील रोग व कीड नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने रासायनिक कीडनाशकांची फवारणी करावी. प्रमोद बाळासाहेब शिंदे, ७५८८५६६६१५ (संशोधन सहयोगी, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com