शेतकरी नियोजन : भात शेतीत सेंद्रिय कर्ब उपलब्धतेसाठी वापरतो तीनही पर्याय

भात पिकांसाठी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वरील तिन्ही पद्धतीचा वापर गेल्या सात वर्षांपासून करत आहे. यामुळे जमिनीच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. या तंत्राने पिकांना नत्र आणि सेंद्रिय कर्बाची उपलब्धता होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते.
भात शेतीत सेंद्रिय कर्ब उपलब्धतेसाठी वापरतो तीनही पर्याय
भात शेतीत सेंद्रिय कर्ब उपलब्धतेसाठी वापरतो तीनही पर्याय

शेतकरी नियोजन शेतकरी ः नितीन चंद्रकांत गायकवाड चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे एकूण शेती - १३.५ एकर भाताखालील क्षेत्र एकर ः ३.५ एकर सध्या माझी भातरोपे २० दिवसांची झाली आहेत. ती लागवड योग्य झाली आहेत. चारसूत्री पद्धतीने लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी भात खाचरामध्ये ग्लिरिसिडीयाचा पाला अंथरला होता. त्याचा पाला आता गळून पडला असून, त्यांचा शिल्लक राहिलेल्या फांद्या बांधावर काढून घेतल्या आहेत. काही भात खाचरामध्ये ताग आणि धैंचा या हिरवळीच्या खतपिकांची लागवड केली आहे. त्यांची वाढ जोमात आहे. दोन दिवसांमध्ये पॉवर टिलरने चिखलणी करतेवेळी तो गाडून घेणार आहे. एका खाचरामध्ये ३ आठवड्यापूर्वी गेल्या वर्षीच्या भाताचा शिल्लक पेंढा पसरून घेतला होता. तो आता कुजण्याच्या परिस्थितीत आहे. या सर्व खाचरांची चिखलणी येत्या दोन दिवसांत करण्याचे नियोजन केले आहे. भात पिकांसाठी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वरील तिन्ही पद्धतीचा वापर गेल्या सात वर्षांपासून करत आहे. यामुळे जमिनीच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. या तंत्राने पिकांना नत्र आणि सेंद्रिय कर्बाची उपलब्धता होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे नियोजन केले आहे. १५ बाय १५ सेंमी अंतरावर खुणा केलेल्या दोरीद्वारे एका जागी एकच रोप रोवणी करतो. या पद्धतीमध्ये १५ सेंमी आणि २५ सेंमी असे दोन पट्टे तयार होतात. त्यातील १५ सेंमीच्या पट्ट्यात मध्यावर लागवडीच्या दिवशीच युरिया-डिएपी (६० ः४०) ब्रिकेट्स रोवतो. म्हणजेच खतातील अन्नद्रव्यांचा चारही रोपांना समान व सावकाश पुरवठा होतो. २५ सेंमी च्या पट्ट्याचा उपयोग बेणणी करण्यासाठी चालताना होतो. या पद्धतीने सर्व रोपांना चांगला सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळत असल्याने रोपांची जोमदार वाढ होते. उत्पादनात वाढ होते. मॅट पद्धतीने रोपवाटिका, यंत्राने लागवड यावर्षी प्रथमच एक एकर क्षेत्रावर यंत्राने भात लागवडीचे नियोजन केले आहे. साधारण दोन एकर लागवडीसाठी पुरेल एवढी रोपवाटिका मॅट पद्धतीने तयार केली आहे. किंचित उंच गादीवाफे करून त्यावर प्लॅस्टिक मल्चिंग अंथरले आहे. त्यावर ४ फूट बाय ४ फूट लोखंडी साचे ठेवले. त्यात रोपांच्या १० लाद्या तयार होतात. किंचित मातीचा थर टाकून रोपे तयार केली आहेत. आता ही रोपे १८ दिवसांची झाली आहेत. ही रोपे लवकर लागवडयोग्य होतात. लागवडीसाठी मजुरांची कमतरता अलीकडे फारच भासत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबून बघणार आहे. यंत्राने लागवडीचा खर्च एकरी दोन ते अडीच हजार रुपये लागेल, असा अंदाज आहे. सध्या पावसाची वाट पाहत आहे. पाऊस झाल्यानंतर यंत्राने त्वरित लागवड करणार आहे. संपर्क ः ७५८८२४९७०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com