गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची निर्मिती

गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची निर्मिती
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची निर्मिती

जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले कुटुंबाने शेतकऱ्यांची गरज ओळखून शेती व पूरक व्यवसायातील विविध यंत्रांची निर्मिती केली आहे. गरजेनुसार यंत्रांची जोडणीही ते करतात. यंत्रांचा दर्जा व विक्रीपश्‍चात सेवा या दोन बाबींवर अधिक भर दिल्याने शेतकऱ्यांचा विश्‍वास जिंकण्यात हे कुटुंब यशस्वी झाले आहे. आजोबांनी काही वर्षांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मुलगा व आता नातू समर्थपणे सांभाळत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या पश्चिमेकडील भाग कमी पावसाचा असल्याने कोरडवाहू शेती पाहण्यास मिळते. पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी कमी कालावधीतील मूग, उडीद, बाजरी अशी पिके येथील अनेक शेतकरी घेतात. अष्टविनायकांमधील मोरगावचा प्रसिद्ध गणपती याच तालुक्यात आहे. या मोरगावपासून साधारणपणे आठ ते दहा किलोमीटरवर खडकाळ माळरानावर सुमारे दोन ते तीन हजार लोकसंख्येचे जोगवडी गाव वसले आहे. गावचा परिसर अजूनही माळरान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रयोगशीलता जपलेले राजेभोसले जोगवडीचे शशिकांत राजेभोसले यांची दहा एकर शेती आहे. मूग, उडीद, बाजरी अशी पिके घेताना ते पूर्वी पाणी देण्यासाठी बैलाच्या मोटेचा वापर करायचे. शेतातील कामांसाठीही बैलांचाच उपयोग व्हायचा. शेतातील कामासाठी सुमारे दहा ते पंधरा मजूर वेळोवेळी कामासाठी उपलब्ध असायचे. नांगरणी, वखरणी, पेरणी, माल वाहतूक अशी कामे पारंपरिक पद्धतीनेच व्हायची. हळूहळू तंत्रज्ञान प्रगत होत चालले, तसे मोटेच्या जागी इंजिन आले. त्यामुळे श्रम व मजूरबळ, वेळेत बचत होऊ लागली. जुन्या काळात आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण घेत असताना शशिकांत यांनी व्यावसायिक शिक्षणाची अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. या अभ्यासाच्या आधारावर मोरगाव आणि जेजुरी येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू ‘रिपेरिंग’ व्यवसाय सुरू केला. अनेक चढ-उतार आले; परंतु मागे न हटता जिद्द कायम मनात ठेवून सुमारे पंचवीस वर्षे नेटाने व्यवसाय केला. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातून कसेबसे सावरत हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेऊन घरची शेतीच सांभाळण्याचा विचार केला. शेतीतही अनेक अडचणी होत्या, तरीही खचून न जाता जोमाने शेती करण्यास सुरुवात केली. पत्नी उषा यांची मोलाची साथ मिळाली. शेतीतील यंत्रनिर्मितीला चालना शेतीत नैसर्गिक आपत्तींचा सामना हा पाचवीला पूजलेलाच होता. दुष्काळाचे सावट होते. मग शशिकांत यांनी काळाची गरज लक्षात घेऊन आधुनिकीकरणाचा अवलंब केला. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. भाडेतत्त्वावर त्याचा अवलंब करण्यास सुरुवात केली. पुढे ट्रॅक्टरसह काही अवजारे घेतली. शशिकांत यांनाही नवे प्रयोग करण्याची आवड होती. यंत्रनिर्मितीत रस होता. कुशलता होती. आपल्या शेतीच्या गरजेनुसार ते अवजारे तयार करू लागले, त्यासाठी ‘फॅब्रिकेशन वर्कशॉप’शेतातच थाटले. बाजारातून सुटे भाग आणून त्यांची जोडणी करण्याचेही काम सुरू केले. शेतीकामांची बदलती गरज व नवे तंत्रज्ञान याप्रमाणे यंत्रांची निर्मिती सुरू ठेवली. शेतीत यांत्रिकीकरण शेतात यांत्रिकीकरण सुरू केल्याने मजुरांची गरज कमी भासू लागली. मात्र, त्यांची टंचाई जाणवू लागल्याने त्यांनी मजुरीतही वाढ केली. पेरणी, खुरपणी, कापणी आदीसाठी मजुरांची गरज लागत असल्याने उत्पादन खर्चही वाढला. मग पुन्हा एकदा स्वतःमधील कौशल्य वापरून त्यासाठीची यंत्रे तयार करण्यास सुरुवात केली. अलीकडील वर्षांत पारंपरिक पिकांऐवजी फळबाग लागवडीवर अधिक भर दिला आहे. गेल्या वर्षी सुमारे एक एकरात सीताफळाची लागवड केली आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी त्यात आंतरपिके घेण्यास सुरुवात केली आहे. आजमितीस दीड एकरात आंबा व सीताफळ बाग उभी आहे.सिंचनासाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर होतो. दूधकाढणी यंत्राचीही निर्मिती पूर्वी घरी दुधाळ जनावरांची संख्याही भरपूर होती. पुढे दूध काढण्यासाठी मजुरांच्या अडचणी येऊ लागल्या. मग दूध काढणीचे यंत्र घेतले. मग अन्य शेतकऱ्यांसाठीही त्याची निर्मिती सुरू केली. अवजड वस्तू उचलणारे यंत्र पूर्वी दुग्धव्यवसाय असल्याने मुबलक प्रमाणात शेणखतही तयार व्हायते, ते ट्रॉलीत भरण्यासाठी मजुरांची गरज भासायची. यावर तोडगा काढण्यासाठी कमी खर्चात यंत्राचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी अनेक सुट्या भागांची खरेदी बाजारातून केली. ते घरी आणून जोडाजोड करून अनेक प्रयोग केले. त्यात बराच कालावधी गेला. मात्र जिद्द व चिकाटी कामाला आली व अखेर यश हाती आले. त्यातून ट्रॅक्टरचलित शेणखत भरण्यासाठी अवजार तयार केले आहे. एक ट्रॉली भरण्यासाठी मजुरांवर करावा लागणारा सुमारे ४०० ते ५०० रुपयांचा खर्च त्यातून वाचविला आहे. यंत्राद्वारे शेणखताची ट्रॉली अवघ्या ७५ ते १०० रुपयांमध्ये भरणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे सुमारे १५० किलो वजनाची वस्तू उचलणारेही यंत्र तयार केले आहे. छोटे कुट्टी यंत्र या पद्धतीतून उचलून लोड करता येते. ‘ॲग्रोवन’मधून मिळाली प्रेरणा ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध विविध अवजारांची माहिती राजेभोसले कुटुंब घेत असे. त्यातून शेतीआधारित अवजारे बनविण्यासाठी प्रेरणा मिळत गेली. सतत लोकांच्या संपर्कात राहूनही अद्ययावत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रगतीमध्ये ‘ॲग्रोवन’चा मोलाचा वाटा आहे. यामुळे पारंपरिकता आणि विज्ञानाची सांगड घालणे अधिक सोपे झाले. शेतीतील मजूरसमस्या व त्यावरील खर्च कमी झाला. आर्थिक प्रगती साध्य झाली, असे हे कुटुंब सांगते. नव्या पिढीच्या हाती सारी धुरा शशिकांत यांच्या प्रयोगशीलतेची परंपरा मुलगा सुनील यांनी जोपासली. ते व्यवसायातील मार्केटिंगची जबाबदारी पाहतात. अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका घेतलेल्या नातू अमितने आजोबांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. अवजारांच्या सुमारे १५ ते १६ प्रकारांचे उत्पादन व विक्रीची जबाबदारी अमित सांभाळतात. राजेभोसले यांचा यंत्रनिर्मिती उद्योग दृष्टिक्षेपात खालील यंत्रांची होते निर्मिती

  • कुट्टी यंत्र (चाफकटर)
  • दूध काढणी यंत्र (मिल्किंग मशिन). यामध्ये ऊर्जेनुसार मॅन्यूएल, वीज व इन्व्हर्टर आदी विविध प्रकार आहेत. ‘काँप्रेसर’चीही जोड त्यास दिली आहे.
  • पॉवर वीडर - यात मशागतीची कामे कमी वेळेत व कमी श्रमात होतात.
  • फळबागांसाठी खड्डे काढणारे यंत्र (एका मिनिटात दोन फूट खोल खड्डा घेते)
  • वर्षाला सुमारे २०० ते २५० यंत्रांची होते विक्री
  • केवळ उत्पादनच नव्हे, तर विक्रीपश्‍चात सेवेवर दिला जातो भर
  • सुनील राजेभोसले - ७५८८९४४३७४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com