नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात करण्यासाठी रणनीती 

नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात करण्यासाठी रणनीती 
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात करण्यासाठी रणनीती 

जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी खतांची उपलब्धता अशा दोन्ही पद्धतीने नत्र किंवा नायट्रोजन या विषयाकडे पाहावे लागेल. कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांनी या दुहेरी आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पाच रणनीती ठरवल्या आहेत. त्यातून वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाची उपलब्धता करण्याबरोबरच प्रदूषणाच्या म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जनाच्या समस्येवर मात करता येईल.  कृषी आणि अर्थव्यवस्थेमध्ये नत्राची साखळी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही पिकाच्या उत्पादनामध्ये नायट्रोजनयुक्त खतांचा मोठा वाटा असतो. मात्र, विकसनशील देशामध्ये नत्राची कमतरता भासते, तर काही देशांमध्ये नत्राचा अतिरिक्त वापर व त्यातून उद्भवणारी प्रदूषणाच्या समस्या पुढे येत आहेत. कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने या समस्येवर मात करण्यासाठी पाच रणनीती आखल्या आहे. त्यात  १. नत्रयुक्त खतांचा अत्यंत काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेमध्ये त्यांचा योग्य प्रमाणात वापर करणे. त्यासाठी आवश्यक त्या खास शिफारशी तयार कराव्या लागतील.  २. आवश्यक तिथेच नत्राचा वापर करणे.  ३. पर्यावरणातील नायट्रोजन प्रदूषण कमी करणे.  ४. अन्नपदार्थ वाया जाण्याचे प्रमाण कमी करणे.  ५. शाश्वत अन्न उत्पादनांचा विचार करण्यासाठी ग्राहकांना उद्युक्त करणे.  या विषयी अधिक माहिती देताना संशोधक बेंजामिन हौल्टन यांनी सांगितले, की नत्र हे मानवापुढे असलेले दुहेरी आव्हान आहे. त्यातील कोणत्याही एका बाजूवर लक्ष केंद्रित करून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जगातील काही लोकांकडे अन्नधान्य पिकांच्या उत्पादनासाठी आवश्यक इतकीही नत्रखते उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वापरामुळे व पाण्यासोबत होणाऱ्या निचऱ्यामुळे प्रदूषणाची समस्या उद्भवत आहे.  अर्थशास्त्र ः  सबसहारण आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेतील अनेक शेतकऱ्यांसाठी खतांच्या किमती हा वापरातील सर्वांत मोठा अडसर ठरत आहे. बाजारपेठेच्या अर्थगणितांप्रमाणे खतेनिर्मितीचा खर्च, वाहतूक आणि फायदा यांचा विचार करता त्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. यावर काही देशांतर्फे अनुदान देण्याचा पर्याय वापरला जात असला तरी तो अल्पकालीन फायदेशीर ठरू शकतो. प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत खते पोचवण्यासाठी देशादेशांमधील धोरणांमध्ये समन्वयांची आवश्यकता आहे. शेतकरी पातळीवरही खतांचा शाश्वत व अत्याधुनिक पद्धतीने काटेकोर वापर वाढवला पाहिजे.  यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरण त्वरित तयार करण्याची आवश्यकता आहे. काही गट उदा. आंतरराष्ट्रीय नायट्रोजन पुढाकार या सारखे काही गट यासाठी प्रयत्न करत असू, त्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी संस्थांतर्फे संशोधनात्मक पाठबळ मिळत आहे.  उपाय ः 

  • २०५० पर्यंत १० अब्ज लोकांच्या अन्नधान्यांची सोय करण्यासाठी खतांचा वापर ४० टक्क्यांनी वाढवला पाहिजे. 
  • खतांच्या वापराच्या पद्धतीमध्ये योग्य बदल करावे लागतील. 
  • सावकाश उपलब्ध होणाऱ्या खतांचा वापर वाढवावा लागेल. 
  • विद्राव्य खतांचा वापर, नवी सेन्सर प्रणाली, ड्रोन यातून नत्राची कार्यक्षमता वाढवणे. 
  • सध्या यातील काही तंत्रे ही महागडी असून, त्यांचा वापर करण्याचे आव्हान उचलावे लागेल. यामुळे नत्राचे प्रदूषण रोखता येईल.
  • वाया जाणारे अन्न आणि आहार  एकूण उत्पादित केलेल्या अन्नापैकी एक चतुर्थांश भाग हा वाया जातो. अन्नाच्या कुजण्यातून तयार होणारे मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडसारखे हरितगृह वायू तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरतात. प्रथम वाया जाणारे अन्न कमी करणे हे ध्येय असले पाहिजे. वाया जाणाऱ्या पण चांगल्या अन्नापासून पशुखाद्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे लागेल. त्यातूनही उष्टे, खरकटे किंवा बुरशी लागलेल्या अन्नापासून कंपोस्टिंगचा विचार करावा लागेल.  हे निष्कर्ष ‘अर्थस् फ्युचर’ या संशोधनपत्रिकेमध्ये मांडण्यात आले आहेत.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com