agriculture stories in Marathi FISH FARMING IN TANKS | Agrowon

मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळा

डॉ. विजय जोशी
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

शेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार घडताना दिसतात. हे फसवणुकीचे प्रकार जाणून घेऊन, शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळावे.

शेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार घडताना दिसतात. हे फसवणुकीचे प्रकार जाणून घेऊन, शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळावे.

गेल्या १० वर्षांमध्ये राज्यामध्ये मत्स्यशेतीचे प्रमाण वाढले असले, तरी त्या तुलनेमध्ये माशांचे उत्पादन वाढलेले नाही. मत्स्यशेती पूर्वी प्रामुख्याने पारंपरिक तलावामध्ये (उदा. गावतळी, ग्रामपंचायतीचे तलाव, मालगुजार तलाव, पाझर तलाव) होत असे. अलीकडे शेततळ्यांचे प्रमाण वाढले असून, महाराष्ट्रातील शेततळ्यांचे अंदाजे संख्या २ लाख इतकी भरते. प्रामुख्याने पिकांसाठी संरक्षित सिंचनाच्या उद्देशाने तयार केलेल्या या शेततळ्यांना प्लॅस्टिकचे लायनिंग केलेले असते. अलीकडे त्यात मत्स्यशेतीही केली जाते. आपल्या देशात एकूणच मत्स्यशेती ६० ते ७० वर्षांत सुरू झाली. त्यातही शेततळ्यातील मत्स्यशेती ही ७ ते ८ वर्षांपासून सुरू झाली आहे. शेततळ्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होत असताना माशांचे अतिरिक्त उत्पादन व उत्पन्न मिळणे ही चांगली बाब आहे. मात्र शेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार घडताना दिसतात. ही फसवणूक विविध प्रकारांनी होत असल्याचे गेल्या ५ ते ६ वर्षांत माझ्या संपर्कात आलेल्या शेतकऱ्यांकडून समजत गेले. हे फसवणुकीचे प्रकार शेतकऱ्यांसमोर आणून, नुकसान टाळण्याइतपत माहिती देण्याचा हा प्रयत्न. या लेखात मत्स्यबीजामध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार पाहू.

१) मत्स्यबीज संख्येमध्ये फसवणूक :
महाराष्ट्रामध्ये साधारणपणे शेततळी ही १० ते २० गुंठ्यांची (अपवाद वगळता) असतात. त्यातही १० गुंठ्यांची म्हणजे ३० मीटर लांब व ३० मीटर रुंद अशा तळ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेततळ्यामध्ये शेतकरी कितीही मत्स्यबीज सोडताना दिसतो. कुणी १५ हजार, कुणी २२ हजार मत्स्यबीज टाकले आहेत. एकाने तर हद्दच केली, त्याने २० गुंठ्यांच्या तळ्यात ५८ हजार मत्स्यबीज सोडल्याचे सांगितले. ही संख्या केवळ जास्तच नाही, तर प्रचंड आहे. अशा प्रकारातून शेतकऱ्याचा दोन प्रकारे तोटा होतो. कारण नसताना जास्त बीज खरेदी करत असल्याने खर्चात वाढ होते. इतके जास्त बीज छोट्या क्षेत्रामध्ये सामावत नाही, माशांची गर्दी होऊन त्यांना खाद्य व ऑक्सिजन यांची प्रचंड कमतरता भासते. एखाद्या रेल्वेच्या अनारक्षित डब्यामध्ये प्रचंड दाटीवाटीने माणसे बसली आहेत, उभी आहेत आणि त्यात रेल्वे सुरू झालेली नाही. मग प्रवाशांना जसे गुदमरल्याप्रमाणे होईल, तसेच गर्दी असलेल्या तलावात माशांना गुदमरायला होते. यामुळे बीज नीट वाढत नाही किंवा त्या माशांमधील रोगांचे प्रमाण वाढ मरतुक वाढते.

२) मत्स्यबीज आकारामध्ये फसवणूक :
बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला अतिशय लहान आकाराचे बीज दिले जाते. हे बीज फोडणीतील जिऱ्याच्या आकाराचे (म्हणजेच जेमतेम अर्धा सेंमी लांबीचे) असल्याने त्यांना मत्स्यजिरे म्हणतात. एवढ्या लहान आकाराच्या बीजाला शत्रूही अनेक असतात. उदा. कीटक, बेडूक, रानटी मासे किंवा पक्षी. ते त्यांचा फडशा पाडतात. उदा. एका शेतकऱ्याने २० गुंठ्यांच्या शेततळ्यात ५० हजार मत्स्यजिरे सोडल्यास त्यातून त्या प्रमाणात माशांचे उत्पन्न मिळण्याची त्याची अपेक्षा असते. पण मत्स्यजिरे कमी झाल्याने अपेक्षेइतके उत्पादन निघत नाही.
काही वेळेला मत्स्यजिऱ्यापेक्षा थोड्या मोठ्या (साधारण २ ते ४ सेंमी) आकाराचे बीज पुरवले जाते. हेही वरील माशांच्या शत्रूकडून खाल्ले जाते. परिणामी, शेतकऱ्याचा उत्पन्नांचा अंदाज चुकतो.
आता शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभारला असेल, की तळ्यामध्ये किती व कोणत्या आकाराचे मासे सोडावेत?
     साधारण १० गुंठ्यांमध्ये एकतर मत्स्यजिरे सोडू नयेत. त्यांची वाढ तिथे व्यवस्थित न झाल्याने तोटा होतो. दुसरे मत्स्यबीजच उपलब्ध नसेल आणि मत्स्यजिरे सोडण्याची वेळ आल्यास साधारण २ ते ४ गुंठे आकाराच्या व खोली कमी असलेल्या तळ्यामध्ये मत्स्यजिऱ्यांची वाढ करून घ्यावी. साधारण २ महिने तिथे वाढवून बोटुकली (म्हणजेच आपल्या बोटाच्या) आकाराची झाल्यानंतरच शेततळ्यामध्ये सोडावेत.
     १० गुंठ्यांच्या तळ्यामध्ये साधारण १००० ते १२०० माशांची बोटुकली सोडावीत. त्यापेक्षा जास्त सोडू नयेत. जर शेततळ्यामध्ये हवेचा पुरवठा असेल तर दुप्पट म्हणजे २००० ते २५०० एवढी बोटुकली सोडता येतील. याच प्रमाणात २० गुंठे किंवा १ एकर शेततळ्यामध्ये बीज सोडावेत. यामुळे बीजावरील अनाठायी होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकेल.

३) मत्स्यबीज प्रकारामधील फसवणूक :
शेततळ्यामध्ये साधारणपणे कटला, रोहू, सायप्रिनस या माशांचे संवर्धन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. मात्र, बऱ्याच वेळेला कटला, रोहू म्हणून शेतकऱ्याला तिलापिया माशांचे बीज दिले जाते. (बरेच शेतकरी याला ‘चिलापी’ म्हणून ओळखतात.). यांचे वैशिष्ट्य म्हणजे हा मासा थोडासा मोठा झाला की लगेच तळ्यात पिले द्यायला लागतो. परिणामी, तळ्यात पिलांची संख्या भयंकर वाढते. कुठल्याच माशाला खाद्य मिळत नाही. मग माशांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपल्याला दिलेले बीज योग्य जातींचे (कटला, रोहू किंवा सायप्रिनस यांचेच) असल्याची खात्री करावी. संपूर्णपणे तिलापिया देण्याऐवजी कटला, रोहू यांच्याबरोबर तिलापिया माशाची भेसळही केली जाते. उदा. ३० हजार माशांमध्ये १० हजार तिलापिया मिसळला जातो. शेतकऱ्याला फरक कळत नाही. मासे मोठे झाल्यानंतर तिलापिया तळ्यात असल्याचे लक्षात येते. तिलापिया पिले जास्त देत असला तरी वाढ जास्त होत नाही. परिणामी माशांचे उत्पादन व उत्पन्न कमी मिळते.
काही वेळेस तिलापिया मासा कसा झपाट्याने वाढतो आणि त्याचे शेततळ्यात संवर्धन करणे कसे फायद्याचे आहे, हे शेतकऱ्याच्या गळी उतरवले जाते. शेतकरी केवळ तिलापिया माशाचे बीज तळ्यात सोडतो. परिणामी मासे वाढत नाहीत, उत्पादन मिळत नाही. कारण तिलापियामध्ये मोनोसेक्स तिलापिया (सर्व नर) किंवा गिफ्टेड तिलापिया यांचीच वाढ झपाट्याने होते, अन्य माशांची नाही. एकूणच हा व्यवसाय आत-बट्ट्याचा ठरतो.

मत्स्यबीजामधील फसवणूक टाळण्यासाठी...
१. तज्ज्ञाचा सल्ला, मार्गदर्शन घेऊन मत्स्यबीजाची पारख करायला शिकावे.
२. आपल्या तलाव, शेततळ्यामध्ये किती बीज सोडायचे, हे शास्त्रीय माहितीच्या आधारे किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे.
३. मत्स्यशेतीबाबतच्या शास्त्रीय माहिती वाचून आपले ज्ञान अद्ययावत करावे. पुस्तकांची खरेदी करावी.
४. मत्स्यजिरे किंवा मत्स्यबीज खरेदी न करता मत्स्य बोटुकलीच खरेदी करावी.
५. मत्स्य बोटुकली उपलब्ध नसल्यास मत्स्य बीज (फिश फ्राय) खरेदी करून ४५ ते ५० दिवस ते २ ते ४ गुंठे छोट्या तळ्यामध्ये वाढवावे. बोटुकली आकाराचे झाल्यानंतर मोठ्या तळ्यामध्ये सोडावे.
६. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या बीजोत्पादन केंद्रातूनच मत्स्यबीज खरेदी करावे म्हणजे फसवणुकीचा प्रकार टाळता येईल.
७. अनेक व्यापारी आंध्र प्रदेशातून मत्स्यबीज आणतात. ते मोठे करून किंवा आहे त्या अवस्थेतच शेतकऱ्यांना विकतात. यातील काही व्यापारी दर्जेदार बीज पुरवणारे असले तरी अनेक जण त्यांच्या फायद्यासाठी दर्जेदार बीजाऐवजी उपलब्ध बीज विकतात. शेतकऱ्यांना सावध राहून योग्य आकार, जात यांचेच बीज असल्याची खात्री करावी. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागानेही परराज्यांतून येणाऱ्या मत्स्यबीजांच्या दर्जाविषयी वेळोवेळी खात्री करणे गरजेचे आहे.

डॉ. विजय जोशी, ९४२३२९१४३४
(माजी प्राचार्य, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.)


इतर कृषिपूरक
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आसडीवर वनस्पतिजन्य तेल फायदेशीर...जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले...
वेळेवर उपचार करा, कासदाह टाळाकासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने...
त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्तसंक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे...
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...
मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडेसुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या...
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रेमत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून...
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपायआवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल...
जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप...पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते....
मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळाशेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध...