फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथ

कवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर मुजावर यांनी फूलशेती, सजावटीची कामे यातून आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालवला आहे. गरजेनुसार कराराने शेती घेत फूल शेतीमध्ये वाढ केली आहे. वार्षिक ठोक उत्पन्नाकरिता गेल्या वर्षीपासून ऊस शेतीही केली आहे. कुटुंबीयांच्या साथीने शेती, फुलांचे दुकान आणि सजावटीची कामे अशा जबाबदाऱ्या ते लीलया सांभाळतात.
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथ
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथ

कवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर मुजावर यांनी फूलशेती, सजावटीची कामे यातून आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालवला आहे. गरजेनुसार कराराने शेती घेत फूल शेतीमध्ये वाढ केली आहे. वार्षिक ठोक उत्पन्नाकरिता गेल्या वर्षीपासून ऊस शेतीही केली आहे. कुटुंबीयांच्या साथीने शेती, फुलांचे दुकान आणि सजावटीची कामे अशा जबाबदाऱ्या ते लीलया सांभाळतात. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्‍यातील वारणा नदीकाठावर वसलेले कवठेपिरान गाव. गावात प्रामुख्याने ऊस, ढोबळी मिरची, वांगी यासह अनेक पिके घेतली जातात. येथील अकबर बादशहा मुजावर यांची कवठेपिरान-दुधगाव रस्त्यावरील मुजावर मळ्यामध्ये वडिलोपार्जित ३६ गुंठे शेती आहे. गरिबीमुळे चौथीतच शाळा सोडावी लागलेल्या अकबर यांनी वडिलांना शेतीमध्ये मदत करण्यासोबत अन्य कामे करू लागले. मामाकडे टेलरिंग व्यवसायातील बारकावे शिकून गावात व्यवसाय सुरू केला. मात्र, आर्थिक प्राप्ती पुरेशी होत नव्हती. शेतीमध्येच अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. कमी क्षेत्र असल्याने निशिगंधाची लागवड केली. त्यात सलग ११ वर्षे सातत्य ठेवले आहे. त्यानिमित्ताने फूलबाजारामध्ये सातत्याने जाणे व्हायचे. अन्य फुले, हार, गुच्छ, बुके, उत्सव व लग्नकार्याची सजावट यात बऱ्यापैकी पैसे सुटू शकतात, हे त्यांच्या लक्षात आले. मग या लोकांच्या ओळखीतून बुके तयार करणे, हार, सजावट यांची कला शिकून घेतली. सन २०१७ पासून ते लग्नमंडपाची सजावट, जयंती, पुण्यतिथी, डोहाळजेवण, एकसष्टी, पंचाहत्तरी अशा कार्यक्रमांतून फुलांची सजावट करून देतात. लोकांच्या ओळखीतून कामे मिळू लागली. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची गरज भासू लागली. त्याची मागणी वाढली. बहुतांश स्वतःच्या शेतातून, कधी फुले विकत घेऊन सजावट करत होते. कुटुंब खर्च भागवून शिल्लक रक्कम बॅंकेत साठवण्यास सुरुवात केली. कराराने घेतली शेती वाढती फुलांची मागणी पुरवण्यासाठी वडिलोपार्जित शेती कमी पडू लागली. मग अन्य गरजू शेतकऱ्यांकडून शेती करारावर घेण्यास सुरुवात केली. स्थानिक पद्धतीनुसार ऊस दरानुसार काही ठरावीक वार्षिक रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. साधारण पाच ते सात वर्षाचा करार केला जातो. २०१८ पासून सुमारे दीड ते दोन एकर शेती कराराने घेत आहे. सध्या त्यांच्याकडे ६१ गुंठे शेती कराराने घेतलेली आहे. रोजचा खर्च भागवण्यासाठी फुलशेती अत्यंत उपयुक्त ठरते. वार्षिक ठरावीक ठोक उत्पन्न मिळण्यासाठी कराराच्या २४ गुंठ्यामध्ये ऊस शेती केली आहे. त्यातून गेल्या वर्षी ३५ टन ऊस गाळपाला गेला. त्याला २८५० रुपये प्रति टन या प्रमाणे दर मिळाला. खर्च वजा जाता ७५ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. असे असते शेतीचे नियोजन ः

  •  वडिलोपार्जित शेती ः ३६ गुंठे. त्यात प्रामुख्याने फुलांची लागवड. निशिगंधासह हंगामी फुले. मधूकामिनी, स्पिंगेरी या फिलर्सची लागवड आहे.
  •  कराराने घेतलेली शेती ः ६१ गुंठे.
  • त्याचे विश्लेषण -
  •  निशिगंध ः २० गुंठे
  •  ऊस ८६०३२ ः २४ गुंठे (खोडवा), उसाचे उत्पादन ः ३४ ते ३५ टन.
  •  डबल निशिगंध (दांडे) ः १२ गुंठे
  • ॲस्टर ः ५ गुंठे
  • कुटुंबीयांची मदत अकबर यांना निलोफर व निदा या दोन मुली आहेत. निलोफर हिने एम. कॉम तर निदा हिने बी. सी. ए. चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. दोघीही घर, शेतीतील कामे, बॅंकेचे व्यवहार, गाडी चालवणे अशा सर्व बाबींमध्ये पारंगत आहेत. या दोन्ही मुलींची आर्थिक व्यवहार, हिशोब यामध्ये मोठी मदत होते. पत्नी शेहनाज यांचीही शेतीसह दुकानामध्ये मदत होते. म्हणून सजावटीसह बाहेरील सर्व कामे करता येत असल्याचे अकबर यांनी अभिमानाने सांगितले. फुलांचे उत्पादन आणि मिळणारा दर

  •  निशिगंध ः फुलांचे प्रमाण कमी जास्त होत असले तरी प्रति दिन सरासरी ५ किलो फुले मिळतात. दरामध्ये चढउतार प्रचंड असून, सरासरी ५० रुपये प्रति किलो दर मिळतो.
  •  मधुकामिनी ः ऑर्डरीप्रमाणे विक्री होते ः १० काड्याची पेंडी १० रुपये प्रमाणे
  •  स्प्रिंगेरी ः ५० काड्यांची पेंडी साधारण ४० रुपये प्रमाणे जाते.
  •  झेंडू, गलांडा, निशिगंध, ॲस्टर स्वतःच्या दुकानामध्ये हार, सजावटीसाठी वापरला जातो.
  • असा आहे ताळेबंद

  •  वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपये फूल विक्रीतून मिळते.
  •  फूल विक्रीतून येणाऱ्या रकमेची बचत करण्याकडे कल. यातून दोन्ही मुलींची शिक्षणे पूर्ण होऊ शकली. आता त्यांच्या भवितव्यासाठी प्रति माह किमान १० हजार रुपये साठवण्याचा प्रयत्न असतो.
  •  मोठ्या रकमेची अडीअडचणीला गरज पडली तर व्यापाऱ्यांकडून उचल मिळू शकते. ती फुलामधून फेडली जाते.
  •  सजावटीसाठी हंगामी आणि दुकानातून हार, बुके विक्रीतून महिन्याकाठी १० हजार रुपये मिळतात.
  •  सजावट आणि हार बुके विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून बऱ्यापैकी घरखर्च चालतो.
  • कोरोना विषाणूमुळे दुकानासह सजावटीची कामेही बंद झाली. शिल्लक रकमेतून कमीत कमी खर्चामध्ये तग धरला. या काळातही फुलशेतीकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. कारण शेती जिवंत ठेवली तरच भविष्य आहे. वास्तविक गणेशोत्सवामध्ये फूलबाजाराला व सजावटीच्या कामाला तेजी असते. मात्र, यावर्षी गणेशोत्सवही मध्यम गेला. उसातून आलेल्या ठोक रक्कम आणि केलेल्या शिलकीमुळे तग धरता आला. मात्र, फुलशेतीनेच आजवर आम्हाला तारले आहे. पुढेही आमचे जीवन त्यातूनच सुगंधित होईल, असा विश्वास आहे. - अकबर मुजावर

    शेती खर्चामध्ये बचत

  •  तण नियंत्रणासाठी प्रामुख्याने रोटाव्हेटरचा वापर केला जातो. मजूर किंवा तणनाशकाच्या खर्चात प्रति वर्ष सुमारे ८ ते १० रुपये बचत होते.
  •  देखभाल, काढणी व अन्य कामांमध्ये मुली व पत्नी यांची मोठी मदत होते. सुमारे मजुरांच्या खर्चात ५ ते ६ हजारांची बचत होते.
  • अकबर मुजावर, ९४२११८४०९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com