छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न नासाडी

सर्वसामान्यांच्या किंवा ग्राहकांच्या पातळीवर होणाऱ्याअन्नाची नासाडी टाळण्याविषयी काय करता येईल, हे पाहू.
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न नासाडी
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न नासाडी

मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या पातळीवर होणाऱ्या अन्नाच्या नासाडीविषयी माहिती घेतली. या भागामध्ये सर्वसामान्यांच्या किंवा ग्राहकांच्या पातळीवर होणाऱ्या अन्न नासाडीची माहिती घेणार आहोत. अन्नाची नासाडी टाळण्याविषयी काय करता येईल, हे पाहू. शेतीमध्ये एक सलग उत्पादन होत नाही. हंगामानुसार त्यात चढ उतार होत असतात. हंगामाअखेर सर्वांची काढणी साधारण एक दोन महिन्यामध्ये येत असते. अशा वेळी बाजारात येणारे उत्पादन हे नेहमीच बाजाराच्या गरजेपेक्षा अधिक असण्याची शक्यता असते. त्यातील साठवण्यायोग्य घटकांची साठवणूक बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत सारेजण करत असतात. प्रत्येकाची साठवण्याची क्षमताही वेगवेगळी असते. अशा वेळी साठवणीच्या पद्धतीमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सामान्यतः साठवण म्हटले की आपल्याला मोठी गोदामे आठवतात, पण घरातील सामान्य महिलाही वर्षासाठी धान्य व अन्य घटकांची साठवण करत असते. लवकर खराब होणाऱ्या फळे, भाज्यांची लोणची किंवा वाळवण करून ती साठवली जातात. छोट्या प्रक्रियांद्वारे मूल्यवर्धनासोबतच साठवण शक्य होते. संवेदनशील व लवकर खराब होणाऱ्या घटकांच्या साठवणीसाठीही खास पॅकेजिंग आवश्यक आहे. आर्थिक निधी ः १) अधिक साठवणीसाठी भारत सरकारमार्फत एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी उभा केला आहे. त्यातून कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी उद्योग, स्टार्ट अप यांना दहा वर्षाच्या मुदतीवर दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. त्यातून काढणीपश्चात पुरवठा साखळीतील विविध टप्प्यामध्ये होणारे नुकसान कमी करणे शक्य होऊ शकते. त्यासाठी इ मार्केटिंग प्लॅटफॉर्म, गोदाम, वखारी, सायलो, पॅक हाऊस, प्रतवारी केंद्रे, शीतगृहे, वाहतूक व्यवस्था, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, पिकवणगृहे उभारता येतील. २) कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत अशा प्रकल्पामध्ये गुंतवणुकीसाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. सर्वसामान्यांच्या किंवा ग्राहकांच्या पातळीवर... भारतातील अन्नाचे नुकसान ग्राहकांच्या पातळीवरही होत असते. शिजल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या अन्नाने वाहणाऱ्या कचराकुंड्या सर्वांना दिसत असतात. ज्या ठिकाणी अन्न अधिक प्रमाणात शिजते, अशा लग्न व कार्ये, भोजनालये, सामाजिक कार्यक्रम, हॉटेल ही अशा वाया जाणाऱ्या अन्नांचे प्रमुख स्रोत आहेत. शहरी भागामध्ये शिजवलेल्यापैकी १० ते १५ टक्के अन्न वाया जाते. त्याच वेळी शहरामध्ये भुकेले झोपणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे.

  • केवळ शासकीय पातळीवर धोरणांची आखणी करून काही होणार नाही, समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे.
  • २०१८ मध्ये जागतिक पर्यावरण दिवशी जागतिक पातळीवर लोकांमध्ये अन्नाची नासाडी टाळण्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘थिंक इट सेव्ह’ ही मोहीम राबवण्यात आली.
  • भूक आणि अन्नाची नासाडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कायम लक्षात ठेवा.
  • फळे, भाज्या व अन्य लवकर खराब होणाऱ्या घटकांची आवश्यक तितकीच खरेदी करा.
  • विकत घेताना प्रत्येक घटकांची साठवणक्षमता नक्की पाहा. त्यानुसार त्यांच्या वापराची वेळ ठरवा. हिरव्या भाज्या, फळे इ. लवकर खराब होणारे घटक आधीच वापरले गेले पाहिजेत, याकडे लक्ष ठेवा.
  • प्रति दिन आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न शिजवू नका.
  • थोडे जरी अन्न उरले तरी गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा.
  • कॅन किंवा बाटल्यातील पदार्थ त्यांच्या अंतिम तारखेपूर्वी संपवा. संपणे शक्य नसल्यास वेळीच गरजूंपर्यंत पोचवा.
  • खराब झालेले अन्नाचे कंपोस्ट बनवा. त्याचा शेतात, बागेमध्ये वापर करा.
  • भोजनालय, हॉटेल किंवा मंगल कार्यालये येथील शिल्लक राहणारे अन्न गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com