भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक महत्त्वाचे...

भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यामध्ये बेडकांचे अत्यंत महत्त्व आहे. त्याविषयी विविध ठिकाणी प्रयोगही झाले आहेत. बेडकांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.
 भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक महत्त्वाचे...
भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक महत्त्वाचे...

भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यामध्ये बेडकांचे अत्यंत महत्त्व आहे. त्याविषयी विविध ठिकाणी प्रयोगही झाले आहेत. बेडकांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. बेडूक भात शेतीत किडींचे नियंत्रण करून शेतकऱ्यांना मदतच करतात. तज्ज्ञांचे मत आहे की बेडकांची संख्या घटल्याने मलेरिया रोगाचा जोराने फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरवातीस बेडूक दिसू लागतात. पावसाळा संपताच पुढील पावसाळा येईपर्यंत ते जमिनीत गाडून घेतात. याला सुप्तावस्था म्हणतात. संवर्धन करण्यासाठी शेताच्या बाजूच्या खोलगट भागात छोटे तळे तयार करावे. त्यात सुप्तावस्थेसाठी जागा मिळेल. बेडकांची संख्या कमी होऊ नये यासाठी रासायनिक कीडनाशके आणि रासायनिक खतांचा होणारा अनियंत्रित वापर थांबवला पाहिजे. बेडकांचे शेतीतील महत्त्व आपल्या देशात ‘राना टायग्रीना’ आणि ‘फेजरवरया लीमनोचारिस’ या दोन प्रजातींचे बेडूक मोठ्या प्रमाणात भात शेतीत आढळतात. अळ्या, तुडतुडे, नाकतोडे, गोगलगाईंना ते खातात. बेडकांची शेतीत होणारी मदत लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने जून ते सप्टेंबर या कालावधीत शेताच्या आजूबाजूच्या क्षेत्रात बेडूक पकडण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी विनंती सरकारला केली आहे. भक्ष पकडण्याची पद्धती, वैशिष्ट्ये बेडकाच्या जबड्याची रचना पाहिली तर जिभेचे अग्रटोक खालील जबड्याच्या टोकाला चिकटलेले असते. मागील टोक मोकळे व दोन भागांत विभागलेले असते. कीटक दृष्टीस पडताच बेडूक आपली जीभ द्रुतगतीने त्याकडे फेकतो. जिभेत स्लेष्मा ग्रंथी असते. त्यामुळे ती चिकट असते. कीटक जिभेला चिकटताच बेडूक आपली जीभ आत ओढून घेतो व भक्षाला गिळून टाकतो. ही क्रिया अतिशय वेगाने होते. प्रति बेडूक रोज आपल्या वजनाइतके किंवा प्रति आठवड्यात सरासरी तीन हजार कीटक खातो. भातशेतीतील प्रयोग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (दापोली) कर्जत येथील भात संशोधन केंद्रात डॉ. एस. बी. खरात व सहकारी यांनी संशोधन केले. बेडकांमुळे खेकडा, लष्करी अळी, खोड किडी तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग आदी भात पिकावरील किडींचे बऱ्याच प्रमाणात नियंत्रण झाल्याचे त्यात आढळले. याच प्रकारचे प्रयोग प्रसिद्ध प्राणी- पक्षी तज्ज्ञ हुमायू अब्दुल अली यांनी केले. त्यांनी भात शेताचे तीन समान भाग केले. पहिल्या दोन भागात चहूबाजूंनी बांधावर नायलॉनची जाळी लावली. त्यातील पहिल्या भागात ४० बेडूक सोडले. दुसऱ्या शेतातील सर्व बेडूक बाहेर काढले. तिसरे शेत मूळ अवस्थेतच राहू दिले. प्रयोगाचे निष्कर्ष चाळीस बेडूक सोडलेल्या ठिकाणी भात उत्पादन सर्वात जास्त म्हणजे चारपट आले. त्या शेतात किडींचे नियंत्रण बेडकांनी चांगल्या प्रकारे केले होते. दुसऱ्या शेतात जेथे बेडूक बाहेर काढले होते त्या भागात किडींचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळला व उत्पादन खूप कमी मिळाले. तिसऱ्या शेतात जिथे काहीच केले नव्हते त्या ठिकाणी मध्यम उत्पादन मिळाले.

  • असेच संशोधन शांघाई येथील कृषी संशोधकांनी दोन वर्षे केले. सन २०१३- १४ च्या या प्रयोगातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे
  • पाने गुंडाळणारी, सुरळीतील अळी, खोडकिडा, तुडतुडे यांचे प्रमाण कमी झाले.
  • त्यासोबत पर्णकोष करपा रोगाचे प्रमाण (वाहक कमी झाल्याने) कमी झाले.
  • जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढले. जमीन सुपीक होऊन भाताची वाढ चांगली झाली.
  • भाताच्या पानांमध्ये काही प्रमाणात हरितद्रव्य, विद्राव्य प्रथिने व साखरेचे प्रमाण वाढले.
  • जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले.
  • सर्वांचा परिणाम होऊन भात उत्पादनात वाढ मिळाली.
  • भात शेतीमध्ये असे करावे बेडकांचे संवर्धन

  • रासायनिक खतांचा वापरावर संतुलित करावा.
  • तणनाशकांचा वापर थांबवावा. मातीत वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीडनाशकांचा वापर बंद करावा.
  • बेडकांची कत्तल थांबवावी.
  • अशी थांबली बेडकांची कत्तल हुमायु अब्दुल अली यांनी १९६० मध्ये भारतातून व्यावसायिक रित्या बेडकांचे पाय परदेशात निर्यात होतात हे पाहिले होते. त्यांनी १९६९ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना बेडकाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याबाबतचे विनंती पत्रही लिहिले. पुढे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे साहायक सरव्यवस्थापक डॉ. डी. एन. श्रीवास्तव यांनी बेडकांची भात शेतीमधील उपयोगिता या विषयावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला तीन वर्षासाठी संशोधन करण्यास सुचविले. त्यानुसार १९७९ मध्ये कर्जत येथील भात संशोधन केंद्रातील डॉ. एस. बी. खरात व सहकारी यांनी संशोधन केले. त्यानुसार बेडकाच्या पोटाच्या शवविच्छेदनात आढळले की त्याने खाल्लेल्या अन्नामध्ये ९० टक्के भाग भात पिकावर आढळणाऱ्या वेगवेगळ्या किड्यांचा होता. हा अहवाल केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्यावर संसदेत एकमताने ठराव पास झाला. त्यानंतर बेडकांचे पाय परदेशात निर्यात करण्‍यावर भारत सरकारने बंदी आणली. अशा प्रकारे बेडकांची कत्तल थांबली. संपर्क- उत्तम सहाणे-७०२८९००२८९ (पीक संरक्षण शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com