फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य उपाययोजना 

फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य उपाययोजना 
फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य उपाययोजना 

एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही वनस्पतीमधील आंतरीक बदलांमुळे तर ८ ते १७ टक्के फळगळ ही कीटकांमुळे होते. ८ ते १० टक्के फळे ही विविध रोगकारकांमुळे गळून पडतात. मृग व आंबिया या दोन बहारापैकी अंबिया बहारात सर्वाधीक फळ गळ दिसून येते. फळगळचे नेमके कारण शोधून त्यानुसार उपाययोजना कराव्यात.  फळगळीची प्रामुख्याने वनस्पतीशास्त्रीय आंतरीक बदल, किडी आणि रोग ही तीन कारणे आहेत.  वनस्पतीशास्त्रीय आंतरीक बदलांमुळे होणारी फळगळ :  

  • फळधारणेनंतर होणारी बरीचशी फळगळ प्रामुख्याने या कारणामुळे होते. साधारणत: फळ ०.५ ते २.० सेंमी व्यासाची असण्याच्या म्हणजे वाढीच्या स्थितीत पाणी, कर्बोदके व संजीवके यासाठी स्पर्धा वाढते. त्यात पाणी किंवा उच्च तापमानाचा ताण असल्यास गळ वाढते. याउलट रोग किंवा यांत्रिक जखम, कार्बन-नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अति आर्द्रता किंवा जमिनीत असणारा जास्त ओलावा या कारणांमुळे फळगळ वाढते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी (एका फळांसाठी साधारण ४० पाने हे प्रमाण) असावी. 
  • वातावरणातील तापमान हा घटकसुद्धा फळगळीसाठी कारणीभूत असतो. कमी तापमानात फळगळ कमी असते तर उच्च तापमानात फळगळ अधिक दिसून येते. 
  • खोल काळ्या भारी जमिनीमध्ये लागवड केलेली असल्यास पाण्याचा निचरा न होण्यामुळे पाणी साचून राहते. जमिनीतील हवा व पाणी यांचे संतुलन बिघडते. श्वसन क्रियेकरिता जमिनीत १० टक्के प्राणवायू आवश्यक आहे. अन्नद्रव्ये जमिनीतून घेण्याची क्रिया थांबते व तंतुमय मुळे सडतात. फुलगळ, फळगळ व पाने पिवळी पडणे, पानगळ होणे, पानाचा आकार लहान राहणे, शेंड्याकडून फांद्या वाळणे, सल येणे अशा लक्षणांसह फळगळ आढळते. पावसाळ्यात कधी कधी पाण्याची पातळी १ मीटरपर्यंत येते, परिणामी झाडांची मुळे कुजतात. 
  • जमिनीतील चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पाणी झिरपण्याची क्रिया मंदावते. परिणामी प्राणवायूचे प्रमाण कमी होते. स्फुरद, झिंक, मग्नेशियम, फेरस, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. मुळे सडतात. अनेक वेळा झाड आपोआप दगावते. 
  • फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना ः 

    १. फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये. खोल मशागतीमुळे- झाडांची मुळे तुटतात, जमिनीची जलधारणशक्ती वाढते, निचरा होत नाही. परिणामी फळगळ होते.  २. वाढणाऱ्या फळांचे पुरेसे पोषण होण्यासाठी झाडावर भरपूर पालवी असावी. यासाठी शिफारसीनुसार खतांचा वापर करावा. झाडावर  पुरेसे पाने असल्यावरच फवारणीचा अपेक्षित परिणाम होतो.  ३. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ उदा. ४० ते ५० किलो शेणखत, ७.५ किलो निंबोळी ढेप वापरावी. शेणखतासोबत ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम, पीएसबी १०० ग्रॅम, सुडोमोनास १०० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर १०० ग्रॅम प्रति झाड यांचे मिश्रण झाडाच्या परिघामध्ये टाकावे.  ४. रासायनिक खतासोबत झिंक सल्फेट २०० ग्रॅम, बोरॅक्स २५० ग्रॅम मातीत मिसळून द्यावे.  ५. ही खते फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास झिंक सल्फेट ०.५ टक्के व बोरॉन ०.१ टक्के फवारणी आंबिया फळाकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि मृग बहाराच्या फळाकरिता ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये करावी.  ६. अंबिया बहारात झाडाला पाण्याचा ताण बसू देऊ नये. फळांच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा पुरेसा पुरवठा करावा.  ७. पावसाळ्यात बागेत शक्यतो पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्यासाठी उताराच्या दिशेने चर खोदावेत.  ८. वेळोवेळी गळून पडलेली फळे ताबडतोब उचलून बागेबाहेर बाहेर कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.  ९. एनएए १० पीपीएम (१ ग्रॅम) किंवा जिब्रेलिक ॲसिड १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) किंवा २-४-डी १५ पीपीएम (१.५  ग्रॅम) यापैकी एका संजिवकासह युरिया १ टक्का (१ किलो) अधिक कार्बेन्डाझिम ०.०१ टक्के (१०० ग्रॅम) प्रति १०० लिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी.  १०. फळे काढणी केल्यावर झाडावरील सल काढावी. सल काढताना फांदीचा हिरवा भाग ५ सेंमी पर्यंत घेऊन सल काढावी. प्रत्येक वेळी सल काढणाऱ्या अवजाराचे निर्जंकिरण करावे. सल काढलेल्या झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी.  ११. अन्नद्रव्यांचा समतोल वापर करावा. अनेकवेळा बोरॉन कमतरतेमुळे मोठी फळे गळतात. या करिता एकात्मिक  अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता दहा वर्षांवरील झाडाकरिता शिफारसीत मात्रा ५० किलो शेणखत, ७.५  किलो निंबोळी ढेप ८०० ग्रॅम, नत्र ३०० ग्रॅम, स्फुरद ६०० ग्रॅम पालाश प्रति झाड यासह ५०० ग्रॅम व्हॅम, १०० ग्रॅम  स्फुरद विरघळवणारे जिवाणू, १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलम, १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. नत्र हा अमोनियम सल्फेटद्वारे द्यावा.  १२. आंतरपीक घेतांना हिरवळीचे, मूग व उडीद तत्सम पिके घ्यावीत. कपाशी सारखे पीक घेऊ नये.  १३. सतत पावसाचे पाणी साचून राहल्यास व अतिशय आर्द्रतायुक्त परिस्थितीत फळगळ होत असतांना बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.  १४. वाफ्याद्वारे पाणी देताना उखरी करताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. उखरीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा द्रावण वाफ्यात ओतावे. ठिबकद्वारे सिंचन करणाऱ्या बागेत उखरीची आवश्यकता भासत नाही.  १५. वर्षभरात किमान दोन वेळा बोर्डो पेस्ट (१:१:१० या प्रमाणात चुना, मोरचूद व पाणी घेऊन) पावसाळ्याच्या अगोदर व  पावसाळ्यानंतर लावणे अत्यंत आवश्यक आहे.  १६. अन्य सर्व फळ पिकांमध्ये फळगळ रोखण्याकरिता पीक उत्तेजकांची शिफारस केली जाते. शिफारशीनुसार त्यांचा वापर करावा.  १७. फळगळ होऊ नये याकरिता बाग सशक्त तसेच रोगमुक्त ठेवणे. रोग आल्यास रोगाचे त्वरित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

    किडींमुळे होणारी फळगळ रोखण्याकरिता उपाययोजना - 

  • लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये प्रामुख्याने रसशोषक पतंग, फळमाशी, सिट्रस सिल्ला व कोळी या किडींमुळे फळगळ दिसून येते. त्यातही फळमाशी व रसशोषक पतंगामुळे सर्वाधिक फळगळ आढळून येते. ही फळगळ सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. 
  • फुले येते वेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी डायमेथोएट २ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 
  • रसशोषक पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करुन बागेत ठेवावीत. या करीता मॅलॅथिऑन २० ग्रॅम अधिक गुळ २०० ग्रॅम किंवा खाली पडलेल्या फळांचा रस २ लिटर पाण्यात मिसळून आमिष तयार करावे. रुंद तोंडाच्या दोन बाटल्यात वरील मिश्रण टाकून 
  • प्रत्येक २५ ते ३० झाडांमध्ये १ या प्रमाणात ठेवावे. 
  • फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्यासाठी फळमाशी सापळे प्रती हेक्टरी २५ या प्रमाणात तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत. 
  • बागेत १ दिवसाआड सायंकाळी ७ ते रात्री १० च्या दरम्यान ओलसर गवत पेटवून व त्यावर कडूलिंबाच्या ओल्या फांद्या/पाने 
  • ठेवून धूर करावा.  रोगांमुळे होणारी फळगळ रोखण्याकरिता 

  • प्रामुख्याने कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरिऑईडस, बोट्रीओडिप्लोडिआ थिओब्रोमी व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशीमुळे फळगळ होते. 
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे १ महिन्याच्या अंतराने 
  • जुलैपासून ३ फवारण्या कराव्यात. 
  • काढलेली सल बागेत न ठेवता तिचा नायनाट करावा. 
  • डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२  (अखिल भारतीय समन्वयीत लिंबूवर्गीय फळे संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com