देशी गोपालन थेट विक्री व्यवस्थेद्वारे केले सक्षम

देशी गोपालन थेट विक्री व्यवस्थेद्वारे केले सक्षम
देशी गोपालन थेट विक्री व्यवस्थेद्वारे केले सक्षम

नाशिक जिल्ह्यातील तळवाडे (ता. मालेगाव) येथील योगेश पवार यांनी कृषी पदवीनंतर शेती व पूरक व्यवसायामध्ये जिद्दीने जम बसविला आहे. देशी गीर गोपालनाला दूध विक्री आणि प्रक्रियेनंतर तूप विक्री, यातून थेट ग्राहकांचे जाळे निर्माण केले. शेतीतही शेडनेटमध्ये पिकांच्या लागवडीसह संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जात आहे. शेतीला गोपालनाची जोड देत कुटुंबांचे अर्थकारण उंचावले आहे.

नाशिक जिल्ह्यातील तळवाडे (ता. मालेगाव) येथील योगेश साहेबराव पवार यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी. एस्सी. (ॲग्री) पदवी मिळवली. भुसावळ येथील कृषी विभागात ‘विषय विशेषज्ञ’ म्हणून नोकरी केली. सुमारे तीन महिन्यांतच आपली शेती करण्याच्या विचारातून राजीनामा दिला. या निर्णयामुळे वडील सुरुवातीला नाराज होते. शेतीमध्ये उत्पादन चांगले मिळाले, तरी अनेक दरांतील चढउतारामुळे उत्पन्न माफकच मिळे. अनिश्चित बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती अशा अडचणी समोर असताना पारंपरिक शेतीऐवजी प्रयोग केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे त्यांच्या लक्षात आले. डाळिंब, ढोबळी मिरची असे प्रयोग यशस्वी केले. त्यातून त्यांचा उत्साह वाढला.  अभ्यासाअंती गीर गोपालनाकडे...  शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. देशी गायीच्या दुधाला असलेली वाढती मागणी व बदलती बाजारपेठ यांचा योगेश यांनी अभ्यास केला. त्यातील जोखीम, नफा, तोटा, गुंतवणूक आदी बाबी पुन्हा पुन्हा पारखून गीर गोपालनाचा निर्णय घेतला. सुरुवातीला एप्रिल २०१७ मध्ये ‘कृषिरत्न गीर गोशाळा’ उभारणीसाठी १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. ६ लाख रुपये मुक्त गोठा उभारणी आणि ६ लाख रुपयांतून ५० गीर गायीच्या कालवडी खरेदी केल्या. पुढे कालवडींची संख्या कमी करून २० गीर गायी विकत घेतल्या. त्यातून ‘सुदृढ गाय अन् गुणवत्तापूर्ण दूध’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.  व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  •   मुक्तसंचार पद्धतीचा गोठ्यामुळे जनावरांवर ताणतणाव राहत नाही. 
  •  दुभत्या गायी, गाभण गायी व वासरांना स्वतंत्र व्यवस्था
  •   पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा हौद   गोठ्यात स्वच्छतेला प्राधान्य   
  • चारा कापण्यासाठी यांत्रिकीकरण उपलब्ध   
  • दर तीन महिन्यांनी जंतनिर्मूलनाचे डोस. लाळ्या व फऱ्या रोगासाठी वर्षातून दोनदा लसीकरण केले जाते.   
  • गायी निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.    
  • वेळोवेळी पशुवैद्यकीय तपासण्या
  • कामाचे व्यवस्थापन

  • दैनंदिन कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी चार जणांची नेमणूक केली आहे. प्रत्येकावर स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्या आहेत. एकावर चारा कापणी, दुसऱ्यावर चारा, पाणी व स्वच्छता, तिसऱ्यावर दूध काढणी व चौथ्या कर्मचाऱ्यावर दूध वितरणाची जबाबदारी आहे.
  •   दररोज पहाटे ३ वाजता चारा दिल्यानंतर पहाटे ५ वाजता दूध काढणी व दुपारी ३ वाजता चारा टाकल्यानंतर सायंकाळी ५ वाजता दूध काढले जाते.
  •   सायंकाळी ७ वाजता थेट घरपोच पद्धतीने विक्री होते.
  • चाऱ्याची उपलब्धता
  • गायीसाठी घरच्या २ एकर क्षेत्रावर घास, मका व संकरित नेपिअर गवत या चारा पिकांची लागवड केली आहे. चारा व अन्य खुराक हा घरीच तयार केला जातो. जनावरांच्या वजनानुसार दिल्या जाणाऱ्या खुराकामध्ये मुरघास, हरभऱ्याचा भरडा, भुईमूग पेंड, खनिज मिश्रण व सैंधव मीठ यांचा समावेश असतो.
  • शेणापासून विविध वस्तुनिर्मिती, विक्री  गीर गायीच्या शेण्या किंवा गोवऱ्यास विविध धार्मिक कारणांसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे गोवऱ्यांची निर्मिती केली जाते. अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी गोवऱ्या वापरल्या जाव्यात, यासाठी ते सातत्याने समाजामध्ये जागृती करत असतात. अलीकडे अशी मागणी येऊ लागली आहे. साध्या शेण्या किंवा गोमूत्राच्या विक्री केली जाते. सोबतच धूपकांडी व गोमूत्र अर्क यांची निर्मितीही ते करतात.   

    असे आहे स्वरूप   एकूण गीर गायी : ३५  वासरे : २५  गोठ्याचे स्वरूप : मुक्त स्वरूपाचा गोठा  आकार : १५० बाय १०० फूट दूध विक्रीचे अर्थकारण  सध्या ३५ पैकी १५ गाई दुधात असून,       प्रति गाय सरासरी ८ लिटर दूध मिळते.   प्रति दिन दूध उत्पादन : १२० लिटर.       ताज्या दुधाची विक्री सरासरी : ८० ते १०० लिटर.  तुपाची विक्री ः २० ते २५ किलो प्रति महिना. प्रमुख उत्पादनांचे दर  गीर गायीचे A२ दूध : ७० रुपये प्रति लिटर  वैदिक पद्धतीने तूप : २५०० रुपये प्रतिकिलो  गोमूत्र : ५० रुपये प्रति लिटर  धूपकांडी (१२ नग): ५० रुपये   गोवरी (५ नग ) : १५ रुपये

    ‘कृषिरत्न गोल्ड ए-२ मिल्क’ ब्रॅंड  ताजे दूध विक्री ः ग्राहकांच्या मागणीनुसार ‘फार्म टू होम’ विक्री पद्धत योगेश यांनी सुरू केली. यासाठी एक लिटर काचेच्या बाटलीचा वापर होतो. दूध काढल्यानंतर चार तासांच्या आत १०० टक्के शुद्ध व ताजे दूध ग्राहकांना पोचवले जाते. सध्या ९० घरपोच ग्राहक आहेत. सरासरी ८० ते १०० लिटर दुधाची विक्री होते.   उर्वरित दुधावर प्रक्रिया ः  दररोज थेट विक्री झाल्यानंतर उरलेल्या दुधावर प्रक्रिया केली जाते. दूध तापवले जाते. ते थंड झाल्यावर दही लावले जाते. त्यातून दह्याचे मंथन करून शुद्ध वैदिक पद्धतीने लोणी काढतात. लोणी कढवल्यानंतर तयार झालेले तूप वजनानुसार काचेच्या बरणीत पॅक केले जाते. तुपाच्या निर्मिती प्रक्रियेत मातीचे भांडे, लाकडी रवी व गरम करण्यासाठी गायीच्या गोवऱ्यांचा वापर करण्यात येतो. योगेश यांच्या आई शोभाबाई हे कामकाज पाहतात. तूप तयार झाल्यानंतर मालेगाव, नाशिक, पुणे व मुंबई येथे ऑर्डरनुसार पाठविले जाते. तयार होणाऱ्या दही, ताक यांचीही विक्री केली जाते.  गोपालनाचा झाला शेतीला आधार

  • योगेश यांनी आपली संपूर्ण १९ एकर शेती रासायनिक पद्धतीऐवजी सेंद्रिय पद्धतीने सुरू केली. यासाठी गीर गोपालनाचा विशेष फायदा होतो. शेतीसाठी आवश्यक शेणखत, जीवामृतनिर्मितीसाठी लागणारे गोमूत्र यांची उपलब्धता होते. २०१८ पासून संपूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत. जमिनीची सुपीकता वाढत असून उत्पादन खर्चात ६० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे योगेश सांगतात. 
  •   त्यांच्याकडे ४ एकर क्षेत्रावर शेडनेट असून, त्यात ढोबळी मिरची, कोबी, काकडी, टोमॅटो व फुलांमध्ये झेंडू लागवड करतात. तर उर्वरित क्षेत्रावर कांदा व मका पीक असते. 
  •   आगामी काळात रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन व त्याची हाताळणी, प्रतवारी, पॅंकिंग करण्याचा विचार आहे. 
  •   देशी गोवंश संवर्धनासाठी पुढाकार त्यांचा आग्रह असतो. देशी गाईच्या दुधाचे महत्त्व ओळखून त्यांनी या विषयावर जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या देशी गाईंच्या नंदींचे ते दान करतात. उपलब्ध जातिवंत कालवडी माफक दरात शेतकऱ्यांना विकल्या जातात. 
  • कुटुंबाची अनमोल साथ  आई वडिलांनी शेतीत कष्ट करून आपले शिक्षण केल्याची जाणीव योगेश व त्यांचे बंधू राजेंद्र यांना आहे. शेतीच्या कामात वडील साहेबराव व राजेंद्र यांचा सहभाग असतो. गोशाळेच्या देखरेखीसह तूपनिर्मिती प्रक्रिया आई शोभाबाई पाहतात कुटुंबाची भक्कम साथ असल्याने त्यांच्या कामाला गती मिळाली आहे.  कामाचा झाला गौरव  शेती व गोपालनाच्या पूरक व्यवसायासोबतच योगेश ''कृषिरत्न फाउंडेशन''च्या माध्यमातून शेतीक्षेत्रासाठी विविध उपक्रम कसमादे पट्ट्यात राबवीत असतात. शेती व सामाजिक कार्याबद्दल कृषी पदवीधर संघटनेचा ‘कृषी उद्योजक पुरस्कार’ (२०१७) व स्थानिक पातळीवर दोन पुरस्कार मिळाले आहेत.    योगेश पवार, ९६५७७४५२५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com