शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
टेक्नोवन
निर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, भाज्यांची लागवड!
जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला प्रक्रिया व साठवणीसंदर्भात काम करणाऱ्या कंपनीने येत्या दोन वर्षामध्ये ३०० हेक्टर क्षेत्रामध्ये उष्णगृहाची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे.
जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला प्रक्रिया व साठवणीसंदर्भात काम करणाऱ्या कंपनीने येत्या दोन वर्षामध्ये ३०० हेक्टर क्षेत्रामध्ये उष्णगृहाची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ५२ दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. त्याविषयी माहिती देताना कंपनीचे संस्थापक राफाईल माघालशविली यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षामध्ये बाजारपेठेची नैसर्गिक आणि उच्च दर्जाच्या उत्पादनाची मागणी वाढत आहे. ती पुरवण्यासाठी कंपनी अन्य शेजारी देशांकडून कच्चा माल आयात करत होती.
सध्या ग्लेनबेरीज या कंपनीकडे केवळ ५ हेक्टर क्षेत्रामध्ये ब्रोकोली आणि कोबी लागवड आहे. सुमारे ११ हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीसाठी हॉटहाऊस आहे. त्याच प्रमाणे अन्य ७ हेक्टर क्षेत्रावर हॉटहाऊसची उभारणी केली जात आहे. मार्नेवेली येथे आणखी २५ हेक्टर क्षेत्र खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ग्लेनबेरीज या कंपनीकडे अमेरिका आणि इस्राईल येथून फळे आणि भाजीपाल्याची मागणी असते. प्रामुख्याने भाज्या, थंड केलेली स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी याला मोठी मागणी आहे. २०१८ मध्ये २.३४ दशलक्ष डॉलर गुंतवणुकीतून सुरू झालेल्या कंपनीने मोठी झेप घेतली आहे. ही कंपनी जॉर्जिया येथील शिदा कार्टिल प्रदेशातील कॅरेलीमध्ये कार्यरत आहेत.
काय आहे हॉटहाऊस?
थंड प्रदेशात वनस्पती किंवा पिकांच्या वाढीसाठी उभारण्यात आलेले काचगृह.
सातत्याने बर्फ पडणाऱ्या आणि वातावरणातील तापमान शुन्याखाली राहणाऱ्या भागांमध्ये वनस्पतींची वाढ होत नाही. अनेक वनस्पती किंवा झाडे या काळात सुप्तावस्थेमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्यापासून कोणतेही उत्पादन मिळवणे शक्य होत नाही. अशा वेळी मानवासह बहुतेक प्राण्यांना साठवणीतील अन्न किंवा चरबीवर अवलंबून राहावे लागते. ताज्या भाज्या व फळांची उपलब्धता होत नाही. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संपूर्णपणे नियंत्रित शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते वातावरण तयार करणे शक्य आहे. या विभागामध्ये आतील वातावरण उष्ण केले जाते. वातावरण उष्ण करण्यासाठी प्रामुख्याने उष्णता वाहक धातूंपासून तयार केलेल्या नळ्याद्वारे सर्वत्र गरम पाणी फिरवले जाते. यामुळे वातावरण उष्ण राहून बाह्य वातावरण अतिथंड असतानाही अंतर्गत पिकांची वाढ करता येते.
इंग्रजीमध्ये हॉटहाऊस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या यंत्रणेला आपण उष्णगृह असे म्हणू शकतो. या शेतीमध्ये वातावरण संपूर्णपणे नियंत्रित केले जाते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार खते आणि पाणी दिले जाते. यामध्ये पिकांच्या वाढीसाठी कृत्रिम माध्यमांचा वापर केला जातो. कारण बहुतांश वेळा येथील माती किंवा भूपृष्ठ हे बाह्य वातावरणामध्ये थंड होण्याचा संभव असतो.
अशा विभागामध्ये अनेक वेळा सूर्यदर्शनही काही दिवसांपासून महिन्यांपर्यंत होत नाही. अशा वेळी सूर्यप्रकाशाची कमतरताही वनस्पतींना जाणवते. त्यासाठी कृत्रिम प्रकाशाचीही सोय केली जाते. कृत्रिम प्रकाशासाठी पूर्वी सोडीयम व्हेपर किंवा अन्य अधिक उष्णता फेकणाऱ्या दिव्यांचा वापर केला जात असते. मात्र, त्यासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने अलीकडे एलईडी दिव्यांचा वापर वाढत आहे.
ज्या ठिकाणी तापमान कमी असले तरी शुन्याखाली जात नाही, अशा ठिकाणी केवळ बाह्य वातावरणापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी छोट्या आकाराचे टनेल उभारली जातात. त्यामध्येही काही प्रमाणात वरील सोयी केल्या जातात.
- 1 of 21
- ››