‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल
‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची मध्यवर्ती शिखर संस्था असलेल्या ‘अफार्म’च्या सदस्य स्वयंसेवी संस्थांची संख्या २९१ आहे. १९७२ मधील भीषण दुष्काळामध्ये ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यापासून सुरू झालेला ‘अफार्म’चा मागील ५० वर्षांचा प्रवास आता ‘शाश्वत’ कृषिविकासातून शाश्वत उपजीविकानिर्मितीपर्यंत येऊन ठेपला आहे. ‘अफार्म’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या आजवरच्या बहुविध कार्याचा आढावा. महाराष्ट्रामध्ये १९७२ मध्ये दुष्काळाने थैमान घातले होते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात जनतेला आणि जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. साधे प्यायला पाणी पुरवणे अवघड होते. परिणामी, पशुधन मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. राज्य शासनाने प्रथम ‘रोजगार हमी योजना’ सुरू करीत खेडोपाड्यातील लोकांच्या हाताला काम पुरवले. कामाच्या मोबदल्यात मजुरी आणि खायला अन्नधान्य उपलब्ध करीत जगवण्याचे काम केले. अर्थात, या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातून हजारो कुटुंबांनी स्वतःचे घरदार व शेती सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी शहरांमधून स्थलांतर केले होते. तसे पाहिले तर १९६७ पासूनच राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची चाहूल लागली होती. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर टॅंकरने पाणीपुरवठ्याद्वारे कमीअधिक मार्ग काढला जात होता. राज्यातील वॉर ऑन वाँट’-चर्चेस ऑफ स्कॉटलॅंड मिशन, जालना; सेंट जॉन चर्च, अहमदनगर; इलेक्ट्रॉ टेक्निकल इन्स्टिट्यूट, श्रीरामपूर; वडाला मिशन, अहमदनगर; रीटा कॉटेज, मनमाड; महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ, नाशिक आणि रोज कॉटेज, अहमदनगर अशा सात ‘मिशनरी’ संस्थांनी पुढाकार घेतला. पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी कूपनलिका खोदण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे हाती घेतला. त्यासाठी ‘वॉर ऑन वाँट’ संस्थेने परदेशातून आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री आयात केली. ड्रिलिंग रीगमुळे कूपनलिका खोदकामास गती आली. अन्य संस्थांनीही त्यांचे अनुसरण केले. मात्र, यासाठी विविध संस्थांमध्ये चांगला ‘समन्वय’ असण्याची गरज भासू लागली. त्यादृष्टीने प्रथम ‘महाराष्ट्र रिजनल वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट ग्रुप’ची निर्मिती केली गेली. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून नोव्हेंबर १९६९ मध्ये ‘ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र’ (अफार्म) या नावाने शिखर संस्थेची रीतसर नोंदणी केली. यातून या क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांना सहकार्य व मार्गदर्शन करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. तहानलेल्या ग्रामीण महाराष्ट्राला पिण्याचे पाणी पुरवणारी संस्था अशी ‘अफार्म’ची पहिलीवहिली ओळख असली, तरी सुरुवातीच्या पाच वर्षांनंतर ‘अफार्म’चे कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारत गेले. एखाद्या तातडीच्या समस्येच्या निराकरणार्थ उपक्रमापासून सुरुवात झाली असली, तरी पुढे शाश्वत विकासाकडे वळावे लागते. उदा. कृषी व पशुधन विकास, ‘शेतीसाठी पाणी’, पाणलोटक्षेत्र प्रकल्पांद्वारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता, शेती व शेतीपूरक उद्योगधंद्यांच्या निर्मितीतून शाश्वत उपजीविका मिळवून देणे इ. ‘अफार्म’ने पुढील टप्प्यात, भूजलाचा शोध, लहान शेतकऱ्यांना सेंद्रिय खते व बी-बियाणांचा पुरवठा, पाझरतलाव व विहिरींची खोदाई, शेतीसाठी पतपुरवठा असे कार्यक्रम हाती घेतले. संस्थेने ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून गावपातळीवरील विकासाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले. सर्वांच्या सहकार्याने मार्गक्रमणा ‘अफार्म’ व सदस्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचे वेळोवेळी कठोर आत्मपरीक्षण केल्यानेच ‘अफार्म’ जमिनीवर पाय घट्ट रोवू शकली. शेतकऱ्यांसाठी कृषिविज्ञान संस्था, महिलांचे बचत गट, शेतकऱ्यांचे पीकवार गट, शेती उत्पादक संस्था, सहकारी उपसा जलसिंचन संस्था, युवक-युवतींसाठी मंडळे आदी विविध हजारांहून अधिक लहान-मोठे संस्थागट गावपातळीवर उभे करणे, हेच माझ्या दृष्टीने ‘अफार्म’च्या यशस्वी कार्याचे गमक आहे. शाश्वत कृषिविकास आणि शाश्वत उपजीविकानिर्मितीसाठी जल व मृद्संधारणाचे शास्त्रशुद्ध नियोजन ही काळाची गरज असल्याचा ‘सर्वंकष’ विचार महाराष्ट्रात सर्वदूर रुजवला. या प्रकल्पातील सर्व भागीदार व लाभार्थींसाठी ग्रामीण विकास व्यवस्थापनविषयक पद्धतशीर प्रशिक्षण देण्यासाठी ‘अफार्म’ने रांजे व सेच लातूर येथे सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. प्रशिक्षणास पूरक उपयुक्त माहितीपुस्तिका, सीडी व अभ्यास साहित्यनिर्मिती केली जाते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘अफार्म’ने सर्वसमावेशक शेती व समाजविकासाचा एक पथदर्शी कृती कार्यक्रम विकसित केला आहे. विदर्भातील अनेक गावांमधून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. शासनाच्या खाती व विभागांबरोबर जोडून घेण्याचा दूरदर्शीपणाही ‘अफार्म’ संस्थेने प्रारंभापासूनच दाखवला आहे. ‘नाबार्ड’, कृषी विद्यापीठे व निमशासकीय संस्थांसोबत अफार्मने प्रकल्प आखणी, अंमलबजावणीचे काम केले जाते. देशातील अन्य स्वयंसेवी संस्थांच्या प्रकल्पांचे ‘मूल्यमापन’ करणारी एक तज्ज्ञ संस्था म्हणून ‘अफार्म’ला मान्यता मिळाली. तसेच, ‘शाश्वत शेतीविकास’ आणि ‘शाश्वत उपजीविका’ या दोन उद्दिष्टांसाठी ‘अफार्म’ची ‘संसाधन’ संस्था म्हणून निवड झाली, ही गौरवाची बाब आहे. ग्रामीण भारतात नवचैतन्य आणणारे कार्यक्रम सध्या हवामानबदल, ग्रामीण युवकांमधील बेरोजगारी, नैराश्य, डिजिटल गॅप अशा समस्या जाणवत आहेत. कंपन्यांच्या सहकार्याने कृषिसखी, डिजिटलसखी, प्रेरणासाथी, कृषिदूत, जलमित्र असे अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. अशा प्रकारचे उपक्रम राबवून नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. यामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण होऊन कृषी व ग्रामीण विकासाची नवी दिशा देण्याचे कार्य अफार्मकडून सुरू आहे. ग्रामीण भागात महिला शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक गट, पाणीवापर गट, ग्राम विकास समिती, कृषिविकास समिती अशा प्रकारच्या लहान-मोठ्या सामाजिक संस्थांची उभ्या केल्या आहेत. भविष्यात कृषी व ग्रामविकासाचे नवीन मॉडेल उभे करून ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारण्याचे कार्य अफार्मच्या माध्यमातून होत आहे. अफार्मचे बलस्थान हे त्यांच्या राज्यभर पसरलेल्या सलग्न संस्था असून, सातत्याने विचारमंथन, तज्ज्ञांचा सल्ला यातून भविष्याचा वेध घेत अफार्मच्या कामाची रूपरेषा ठरते. आखलेल्या कामाची उत्कृष्ट अंमलबजावणी त्यांच्या शेकडो एकनिष्ट कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होते. भविष्यात महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ‘अफार्म’ संस्था महत्त्वाची ठरू शकते. पायाभरणीपासून समृद्ध परंपरा सुवर्णमहोत्सवी वाटचालीत पायाभरणीसह अनेक अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात आपला ठसा उमटविला आणि ‘अफार्म’चे काम नावारूपास आणले. ‘अफार्म’चे पहिले अध्यक्ष डॉ. जॉन ख्रिस्तोफर विगल्सवर्थ आणि त्यानंतर अनुक्रमे फादर चार्ल्स डिलिमा, रेव्हरंड गिफॉर्ड हॉग टॉवले, श्री. जॉन मॅकलॉड, श्रीमती हेजल स्वयुस, फादर ए. एल. फोन्सेका, डॉ. एस. टी. तथा दादा गुजर, डॉ. मुकंद घारे, श्री. रामभाऊ चव्हाण, डॉ. द्वारकादास लोहिया, तसेच माजी कार्यकारी संचालक श्री. एम. एन. कोंढाळकर आदी मान्यवरांनी संस्थेचे ‘यशस्वी नेतृत्व केले. सध्या नांदेडच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे श्री. प्रमोद देशमुख हे ‘अफार्म’ संस्थेचे अध्यक्ष, तर श्री. सुभाष तांबोळी हे कार्यकारी संचालक म्हणून संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब आणि मातीच्या प्रत्येक कणाचे संवर्धन करण्यास बांधील असणाऱ्या ‘अफार्म’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संबंधित सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि संस्थेच्या भावी वाटचालीस भरपूर शुभेच्छा. डॉ. व्यंकट मायंदे, ७७२००४५४९० (माजी कुलगुरू, डॉ. पंजावराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com