शेळीपालनातून जपली शेतीची आवड

शेळीपालनात रमलेले अमोल पाटील आणि अमोल चव्हाण
शेळीपालनात रमलेले अमोल पाटील आणि अमोल चव्हाण

मुंबई शहरातील स्वतःचा व्यवसाय सांभाळत अमोल चव्हाण यांनी नारायणवाडी (जि. सातारा) येथे मित्राच्या सहकार्याने शेळीपालनास सुरवात केली. स्वतः शेळीपालन आणि बाजारपेठेचा अभ्यास करत व्यवस्थापनात बदलही केले. येत्या काळात शेळीपालनाच्या बरोबरीने शेतीमध्येही बदलाचे त्यांनी नियोजन केले आहे.

सातारा जिल्ह्यातील सवादे (ता. कराड) हे अमोल शामराव चव्हाण यांचे मूळ गाव. या ठिकाणी अमोल यांच्या वडिलांसह पाच भावाचे एकत्र कुटुंब. सध्या अमोल आणि त्यांचे काका हे मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे वडिलांकडे पाच एकर शेतीचे नियोजन आहे. साडेतीन एकरात ऊस तर उर्वरित दीड एकरामध्ये हंगामी पिकाचे नियोजन केले जाते. अमोल यांना लहानपणापासून शेती आवड, परंतु शेती कमी असल्याने त्यांनी बी.कॉम शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई येथे दवाखान्यांना औषधे पुरवठा हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. व्यवसायाच्या बरोबरीने घरच्या शेतीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गावाकडील शेतीमध्ये नवीन काही करता येईल का? याचा शोध त्यांनी सुरू केला. लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पीक लागवडीएेवजी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पूरक व्यवसायाची माहिती घेतल्यानंतर शेळीपालन हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येईल याचा अंदाज आला. त्यादृष्टीने त्यांनी राज्यभरातील ३५ शेळीपालकांना भेट देऊन व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र समजावून घेतले.

शेळीपालनास प्रारंभ 

सवादे हे महामार्गापासून वीस किलोमीटर आतमध्ये असल्याने शेळी व्यवस्थापन आणि  विक्रीसाठी अडचण येण्याची शक्‍यता वाटल्याने अमोल चव्हाण यांनी महामार्गालगतच्या गावात शेळ्यांसाठी शेड बांधण्याचा निर्णय घेतला. नव्या जागेचा शोध घेत असताना कराडपासून सात किलोमीटर अंतरावर महामार्गावरील नारायणवाडी (जि. सातारा) येथे ओळखीतून जमीन मिळाली. जमीन खरेदीमध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा त्यांनी सात वर्ष कराराने ६८ गुंठे जमीन वार्षिक सव्वा लाख रुपये दराने भाडेतत्त्वावर घेतली. सन २०१५ मध्ये शेळीपालनासाठी शेड उभारण्यास सुरवात केली. अमोल चव्हाण यांनी या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली. परंतु मुंबईत राहून प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मित्र अमोल पाटील यांना मदतीला घेतल्याने दैनंदिन नियोजन सोपे झाले. 

  • सध्या २० गुंठे क्षेत्रावर १६० फूट लांब आणि १५० फूट रुंद पत्र्याची शेड लोखंडी बारच्या साहाय्याने उभी केली. शेडचा चारही बाजूंनी पत्रा लावला.
  • शेडमध्ये २० फूट बाय २० फुटाचे कप्पे तयार केले. प्रत्येक कप्प्याच्या बाहेरील बाजूस शेळ्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी विना छताचे शेड बांधले.
  • शेळ्यांना भटक्या जनावरांपासून त्रास होऊ नये यासाठी मुख्य शेडच्या चारही बाजूंनी पत्र्याने कुंपण केले. 
  •  शेड उभी केल्यानंतर चव्हाण यांनी राजस्थानमधून सिरोही, जमनापुरी, सोजत, बोअर या जातीची चार महिन्याची नर आणि मादी अशी एकूण ७० करडे आणली. आपल्या भागातील वातावरणात करडे योग्य पद्धतीने रुळण्यासाठी सोलापुरातील ओळखीच्या शेळीफार्मवर एक महिन्यासाठी ठेवली. पशुतज्ज्ञांकडून लसीकरण केले. त्यानंतर ही करडे नारायणवाडी येथील स्वतःच्या शेडमध्ये आणली.                   
  • शेडमध्ये शेळीच्या जातीनुसार विभाग केले. त्यामुळे व्यवस्थापन सोपे जात आहे.  
  • शेळ्यांना पुरेशा प्रमाणात चारा खाता यावा यासाठी प्रत्येक विभागाच्या दोन्ही बाजूस गव्हाण तसेच मध्यभागी पाणी ठेवले.
  • वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी ४८ गुंठ्यांत नेपियर, लसूण घास, मारवेल, मका या चारा पिकांची लागवड आहे. चारा पिकांना वर्षभर पुरेसे पाणी देण्याची सोय आहे.
  •  वाढीच्या टप्प्यानुसार शेळ्यांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळी चाराकुट्टी आणि खाद्य भरडा दिला जातो. मका भरडा करण्यासाठी भरडा यंत्र खरेदी केले. हिरवा आणि सुका चाऱ्याचा योग्य वापर होण्यासाठी कडबा कुट्टी शेळ्यांना दिली जाते. 
  •  आठवड्यातून तीन वेळा पशुवैद्यक शेळ्यांची आरोग्य आणि आहार तपासणी करून सल्ला देतात. त्यानुसार व्यवस्थापनात बदल केला जातो.
  • असे आहे नियोजन  

     शेळीपालन प्रकल्पाच्या नियोजनाबाबत अमोल चव्हाण म्हणाले की, मी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये असतो. परंतु दर पंधरा दिवसांनी मुंबईहून दोन दिवस नारायणवाडी येथे येतो. बाकीच्या दिवसात शेळी आणि चार मजुरांचे व्यवस्थापन माझे मित्र अमोल पाटील पाहतात. दररोज मित्र आणि पशुतज्ज्ञांच्या बरोबरीने आवश्‍यक माहिती घेऊन नियोजन केले जाते. संगणकावरील नोंदीमुळे कमी वेळात शेडमधील शेळ्यांची सर्व माहिती दररोज मिळते. शेळीपालनाच्या बरोबरीने घरच्या शेतीमध्येही सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे.

    स्वतः केली बोकडांची विक्री   प्रकल्प उभारणीबाबत अमोल चव्हाण म्हणाले की, बकरी ईद सणाची मागणी लक्षात घेऊन शेळीपालनास सुरवात केली. यंदाच्या बकरी ईदसाठी मी स्वतः आणि चार मजूर मिळून मुंबईतील देवनार मार्केटमध्ये ७० बोकड विकले. सरासरी ४०० ते ४५० रुपये प्रतिकिलो या दराने बोकडांची विक्री झाली. थेट ग्राहकांना विक्री केल्याने चांगला नफा मिळाला. दैनंदिन खर्च वजा जाता दर महिना पंचेचाळीस हजाराचा नफा मला मिळतो. मित्रालाही नफ्यातील काही वाटा मी देतो. दरवर्षी लेंडीखताच्या विक्रीतून एक लाख रुपये मिळतात. येत्या काळात गांडूळ खत व व्हर्मिवॉश प्रकल्प उभारणार आहे.       सध्या माझ्याकडे १२० शेळ्या आहेत. जागेवरूनसुद्धा परिसरातील व्यापारी, शेतकऱ्यांना शेळ्या, बोकडांची विक्री केली जाते. महामार्गाजवळ प्रकल्प असल्याने दररोज लोकांची गर्दी होते. त्यामुळे शेळ्या आणि मजुरांच्या दैनंदिन कामात अडथळे येऊ लागले. आगंतूक भेटणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मी प्रकल्प पहाण्यासाठी ५० रुपये फी ठेवली. शेडमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे दैनंदिन लक्ष राहाते.    व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी  

  •    शेडमध्ये दैनंदिन स्वच्छतेमुळे शेळ्यांचे चांगले आरोग्य.
  •     दिवसातून तीन वेळा चारा कुट्टी, भरडा दिला जातो.
  •     प्रत्येक महिन्यात शेळी, बोकड वजनाच्या नोंदी.
  •     सर्व नोंदी संगणकावर, त्यामुळे कोणत्याही वेळेस निर्णय घेणे             सोपे.
  •     प्रत्येक आठवड्यात शेळी, बोकड, करडांची तीन वेळा तपासणी.
  •     शेळी, बोकड, करडांना दिवसभर मुक्त संचार गोठ्यात सोडल्यामुळे चांगला व्यायाम.  संपर्क -  अमोल चव्हाण ः ९८३३४०१५०५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com