देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण, गोमूत्रापासून उत्पादनांची निर्मिती 

देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण, गोमूत्रापासून उत्पादनांची निर्मिती 
देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण, गोमूत्रापासून उत्पादनांची निर्मिती 

नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवले. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून ते उत्पन्नाचा भक्‍कम पर्याय ठरू शकतात हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिध्द केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी तंत्रज्ञानाबाबत करार करून विविध उत्पादने तयार केली आहेत. काही उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळवण्यात संस्था यशस्वी झाली आहे.  नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्यात देवलापार येथे गोविज्ञान संशोधन केंद्र कार्यरत आहेत. ही एक स्वयंसेवी संस्था असून तिची १५ ऑक्‍टोंबर, १९९६ मध्ये स्थापना झाली. दारव्हा (यवतमाळ) येथील (कै.) शाम बल्लाळ यांनी संस्था स्थापनेसाठी पुढाकार घेतला. भारतीय देशी गोवंशाची उपयोगिता वाढवणे, त्यासाठी गोवंश संगोपन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत त्यामाध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, या माध्यमातून शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आणणे आदी विविध उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. सुनील मानसिंहका हे संस्थेचे समन्वयक आहेत. तसेच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाचेही ते सदस्य आहेत.  सुमारे सव्वासातशे गायींचे संगोपन  संस्थेची देवलापार येथे ६६ एकर तर तेथून जवळच निमटोला ग्रामपंचायतीत हद्दीत उर्वरित अशी एकूण ८० एकर जागा आहे. एकूण मिळून सुमारे सव्वासातशे गायींचे संगोपन येथे होत आहे.  पैकी निमटोला येथे २५० गायींचा सांभाळ होत आहे. संस्थेकडे प्रशिक्षण व निवासी शाळेचीही सुविधा आहे. वर्षभरात दहा हजारांहून अधिक व्यक्ती संस्थेला भेट देत असल्याचे मानसिंहका यनी सांगितले.  बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, उत्तराखंड आदी विविध राज्यांतील शेतकऱ्यांना शासकीय वा अन्य यंत्रणांकडून येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते.  तंत्रज्ञान विकासाला चालना  दुधाबरोबरच शेण व गोमूत्र या बाबी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचा वापर शेती व मानवी कारणांसाठीही होतो. त्यादृष्टीने विविध उत्पादने संस्थेने तयार केली आहेत. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या तंत्रज्ञान विकासासाठी देशपातळीवरील काही संस्थांची मदत घेतली आहे.  यात छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील कामधेनू विद्यापीठ, जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुविज्ञान विद्यापीठ, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲरोमॅटीक प्लॅंटस (सीमॅप), लखनौ, विभागीय सेंद्रिय शेती केंद्र नागपूर, नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ, सिंगापूर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यासह अन्य संशोधन संस्था, पशुविज्ञान विद्यापीठ तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. संशोधन व तंत्रज्ञानात्मक बाबींची देवाणघेवाण हा त्यामागील उद्देश त्यामागे असल्याचे मानसिंहका सांगतात.  प्रयोगशाळा सुविधा व उत्पादने  संस्थेने विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रयोगशाळाही उभारली आहे. गोवऱ्या, गोमूत्र अर्क, गोमूत्र आसव, पंचगव्य, दंतमंजन, धूपबत्ती, केशतेल, शांपू, फेस पावडर अशी सुमारे ४५ ते ४७ उत्पादने तयार करण्याची सुविधा येथे आहे. गरज व मागणीनुसार ही उत्पादने बनविली जातात. अन्न व औषधी प्रशासनाकडून ४७ उत्पादनांसाठी परवाना घेतला आहे. दररोज सुमारे पाच टनांपर्यंत शेण उपलब्ध होण्याची क्षमता आहे. मात्र, काही गायी जंगलात चरण्यासाठी गेल्यानंतर काही शेण उपलब्ध होत नाही. शेणापासून गांडूळ खत तयार केले जाते. एक व ४० किलो पॅकिंगमधून त्याची प्रतिकिलो ११ रुपये दराने विक्री होते. गायीचे तूप १२०० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विकण्यात येते. नागपूर शहरात संस्थेची तीन ठिकाणी विक्री केंद्रे आहेत. देशभरातही काही संस्थांनाही उत्पादनांचा पुरवठा होतो.  तंत्रज्ञानाला मिळविली पेटंटस  संस्थेने देशपातळीवरील संस्थांच्या साह्याने संशोधन व तंत्रज्ञान या अनुषंगाने आपल्या उत्पादनांना पेटंटस मिळवली आहेत. यात गोमूत्र अर्काचा वापर मानवी कारणासाठी ‘बायोइनहॅंसर’ म्हणून करण्याला पेटंट मिळाले आहे. सुमारे पाच देशांत ही पेटंटस नोंदण्यात आल्याचे मानसिंहका यांनी सांगितले.  गोमूत्र, शेण तसेच अन्य घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कीड नियंत्रकाचेही संस्थेने  पेटंट मिळवले आहे. त्याचा वापर शेतीत पीक संरक्षण म्हणून होऊ शकतो. सुमारे ३० देशांत या पेटंटचे नोंदणीकरण झाले आहे.  साहिवाल गायीच्या दुधावर संशोधन  साहिवाल या देशी गायीच्या दुधाच्या उपयोगीतेसंदर्भात संस्थेने उत्तराखंड येथील डेहराडून विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. चंद्रशेखर नोटीयाल यांच्यासोबत काम केले आहे. आईच्या दुधानंतर गाईचे दूध असे म्हटले जाते. संस्थेने साहिवाल गाय, होलस्टीन फ्रिजीयन गाय व म्हैस यांचे दूध, मानवी दूध त्यातील गुणधर्म असा तौलनिक अभ्यास केला. आईच्या दुधात सॉल्युबेल फॉस्फेटची मात्रा कमी राहते. त्यामुळे हे दूध बाळाला पचण्यासाठी सोपे जाते. पोटाचे विकार होत नाहीत. अभ्यासाअंती साहिवाल गायीच्या दुधात देखील सॉल्युबल फॉस्फेटचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे समोर आले. अशाप्रकारे गायीचे दूध बाळाकरिता उपयोगी असल्याचा निष्कर्ष मांडून त्याविषयावर आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर सादर करण्यात आला असे डॉ. नोटीयाल सांगतात.  तंत्रज्ञानाचा उपयोग होणार शेतीला 

  • रासायनिक शेती दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि कमी उत्पादकता 
  • यामुळे खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नाही. देशभरात तीन लाखांवर शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दप्तरी आहे असे मानसिंहका सांगतात. रासायनिक शेतीचे प्रतिकूल परिणामही मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यादृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाला चालना देण्याचे काम गोविज्ञान संशोधन केंद्राद्वारे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 
  • संस्थेने सेंद्रिय भाताची शेतीही सुरू केली आहे. प्रक्रिया करून तांदळाची विक्री ६० रुपये प्रतिकिलो दराने होते. 
  • सुमारे १४० जणांना रोजगार  नागपूर, देवलापार आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील राजूरा येथेही संस्थेचे कार्य चालते. राजूरा येथे गोशाळा आणि वसतिगृह आहे. सर्व ठिकाणी मिळून संस्थेने सुमारे १४० जणांना रोजगार दिला आहे.  उत्पादनांच्या विक्रीतून आर्थिक गरजा भागविल्या जातात. सेवाभावी व्यक्‍तींकडून संस्थेला देणगी मिळते. त्यातून विकास आणि विस्तारकामे होतात.  तीन बायोगॅस प्रकल्प  संस्थेत प्रशिक्षण व भेटीच्या निमित्ताने असंख्य व्यक्ती येत असतात. त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यासाठी तीन बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. संस्थेने या इंधनावर आधारित वीजनिर्मिती देखील केली आहे.  संपर्क-  महेश चोले- ९८२२३८७९४४  (संस्थेच्या देवलापार प्रकल्पाचे प्रमुख)  सुशील ठाकरे- ९७३०१००१३१  (प्रयोगशाळा अभियंते) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com