जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर प्रगती

जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर प्रगती
जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर प्रगती

शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी धामणा (जि. नागपूर) येथील गोविंदा नागोरावजी टोंगे यांनी जमिनीच्या सुपीकतेवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे केवळ पारंपरिक पिकाऐवजी हंगामी भाजीपाला पिकांची लागवडीसह पिकांचे अवशेष गाडणे, शेणखतांचा भरपूर वापर, पिकांची फेरपालट या त्रिसूत्रीचा वापर केला आहे. शेती व्यवस्थापनाबरोबरच त्यांनी शेतीपूरक दूग्धव्यवसाय आणि शेळीपालनावरही लक्ष केंद्रित केले आहे. धामणा (जि. नागपूर) येथील गोविंदा नागोरावजी टोंगे यांच्याकडे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमारे २००२ साली वडिलांकडून शेतीची सूत्रे हाती आली. सुरवातीची चार पाच वर्षे शेती खऱ्या अर्थाने समजण्यात गेली. प्रारंभी आठ एकर क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पिकांसह शेती केली जात होती. त्यानंतर वडिलांनी दोन एकर, तर या भावंडांनी चार एकर शेतीची खरेदी केली. शेती वाढली, तसे त्यातील उत्पादन वाढीसाठीही या कुटुंबाचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच तरुण मंडळीकडे शेतीची धुरा आल्याने सुधारणांनाही गती आली. गावात प्रथमच वापरले ठिबक तंत्रज्ञान शेती हाती आलेली, त्यात नवीन काय करता येईल, यासाठी गोविंदा टोंगे यांच्या सातत्याने शोध सुरू झाला. नेमका याचवेळी म्हणजे २००७-०८ मध्ये कृषी विभागाच्या वतीने पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिवार भेटीसह अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यात गावातील अन्य शेतकऱ्यांसोबत गोविंदा यांनीही भाग घेतला. या दौऱ्यामध्ये परभणी, राहुरी येथील दोन्ही कृषी विद्यापीठांना व त्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी दिल्या. तेथील प्रत्यक्ष तंत्रज्ञान पाहता आले. त्यासोबतच काही भाजीपाला उत्पादकांच्या शेतालाही भेटीही देण्यात आल्या. परभणी भागातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना ते नागपूर बाजारपेठेत टोमॅटो पाठवित असल्याचे कळाले. इतक्‍या लांबून भाजीपाला पाठवून तो फायदेशीर ठरत असेल, तर मग आपले गाव तर नागपूरपासून काही अंतरावरच आहे. हा पर्याय आपल्यासाठी देखील फायद्याचा ठरू शकतो, असा त्यांच्या मनामध्ये रुजू लागला. २००८-०९ मध्ये पुढील हंगामामध्ये टोमॅटो पीक घेण्याचा निर्णय घेतला. सुमारे पाऊण एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो लागवड केली. पहिल्याच प्रयत्नामध्ये एक लाख दहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. या टोमॅटो लागवडीसाठी त्यांनी ठिबक सिंचनचाही वापर केला होता. गावातील अन्य लोक एकतर नवीन पीक घेण्यासंदर्भात साशंक होते, त्यात ठिबकचा वापर म्हटल्यावर काहीजणांनी चेष्टा, कुचेष्टाही केली. पण, त्याकडे काणाडोळा करत आपले काम चालू ठेवले. कमी पाण्यामध्ये पिकाचे नियोजन शक्य झालाच, पण फायदाही झाला. या नव्या प्रयत्नाला मिळालेल्या यशामुळे आत्मविश्‍वास वाढीला लागला. परंतु, ठिबकचे फायदे हळूहळू कळू लागल्यानंतर आज संपूर्ण गावचे शिवारच ठिबकखाली आल्याचे ते अभिमानाने सांगतात. भाजीपाला लागवड क्षेत्र पारंपरिक पिकाऐवजी हंगामी भाजीपाल्याकडे मोर्चा वळवला. त्यांच्याकडील बारा एकरापैकी पाच एकर वांगी, एक एकर टोमॅटो, एक एकर काकडीची काढणी केल्यानंतर आता पुन्हा नव्याने अडीच एकरावर काकडी लागवडीचे नियोजन केले जाते. सेंद्रिय खतांकडे प्राधान्याने लक्ष ः पिकांची फेरपालट आणि सुपीकतेकडे प्राधान्याने लक्ष देण्यास सुरवात केली. कारण, केवळ एकमागोमाग एक पिके घेतल्यामुळे जमिनीचा कस कमी होऊ शकतो. एकरी सात ट्रॉली शेणखत दिले जाते. २२ ट्रॉली शेणखताची उपलब्धता घरच्या जनावरांपासून होते. मात्र, उर्वरित २४ ते २५ ट्रॉली शेणखत वाहतकुीसह २७०० रुपये ट्रॉलीप्रमाणे विकत घेण्यात येते. खर्च होत असला तरी जमिनीच्या पोत, सुपीकतेसह पिकांच्या उत्तम वाढीसाठी शेणखत, पोल्ट्री खत न चुकता देतो, असे गोविंदा यांनी सांगितले. पिकांचे अवशेष गाडणे, पिकांची फेरपालट ः कापसाच्या काढणीनंतर पऱ्हाटी रोटाव्हेटरने बारीक केली जाते. त्यानंतर शेणखत पसरविल्यानंतर बेड तयार केले जातात. दोन बेडमध्ये पाच फुटाचे अंतर तर उंची एक ते सव्वा फूट राहते. ड्रिपच्या नळ्या अंथरल्यानंतर यावर वांग्याची लागवड केली जाते. वांग्याच्या काढणीनंतर साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये याच बेडवर टोमॅटो लागवड केली जाते. एप्रिलमध्ये टोमॅटोची काढणी झाल्यानंतर त्याच तारावर चवळी लावण्यावर त्यांचा भर असतो. ही चवळी ऑगस्ट महिन्यामध्ये काढण्यास येते. त्यानंतर ऑक्‍टोंबरमध्ये हरभरा लागवड करतात. त्यानंतर जूनमध्ये पुन्हा मशागत करून कपाशी पिकाची लागवड केली जाते. अशाप्रकारे वर्षभर पिकांचे नियोजन केले जाते. शेतीत पसरविली जलाशयाची माती ः या भागातील काही जमिनी पाणी धरून ठेवणाऱ्या आहेत. जमिनीची संरचना व पोत सुधारण्यासाठी वेणा जलाशयातील गाळमाती आणून शेतातील काही भागांमध्ये पसरवली आहे. दरवर्षी काही क्षेत्रांमध्ये ही जमिनीवर ही माती पसरविण्याचे काम केले जाते. दीड एकरावर तब्बल ८५ ट्रक माती टाकली आहे. टप्प्याटप्याने संपूर्ण शिवारामध्ये अशी गाळमाती टाकण्याचे टोंगे यांचे नियोजन आहे. कपाशीची अशी आहे उत्पादकता ः २००८-०९ मध्ये प्रथम कपाशीसाठी ठिबक सिंचनचा पर्याय अवलंबिण्यात आला. त्यावर्षी योग्य पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापनाची जोड मिळाल्यामुळे कापसाचे २० क्‍विंटल उत्पादन मिळाले. त्यापूर्वी त्यांची उत्पादकता एकरी केवळ तीन ते चार क्‍विंटल इतकी जेमतेम होती. सद्य:स्थितीत सरासरी १२ ते १३ क्‍विंटलपर्यंत कापसाची उत्पादकता कायम राखली असल्याचे त्यांनी सांगितले. कापसाच्या एकरी व्यवस्थापनावर २५ हजार रुपयांचा खर्च होतो. गेल्या तीन वर्षांमध्ये कपाशीला मिळालेला दर (प्रतिक्विंटल) २०१६-१७ ः ४२०० रुपये २०१७-१८ ः ५२०० रुपये २०१८-१९ ः ५८०० रुपये. वांगी पिकाचे उत्पादन ः एक एकर वांगीच्या व्यवस्थापनावर हंगामनिहाय कमी जास्त खर्च होतो. पावसाळ्यात कीडरोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. कीटकनाशकाच्या दोन फवारण्यांवर एकरी चार हजार रुपयांचा खर्च होतो. आठ दिवसांतून दोन ते तीन फवारण्या कराव्या लागतात. परिणामी खर्च वाढतो. उन्हाळ्यामध्ये कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. उन्हाळ्यात वांग्याच्या व्यवस्थापनावरील खर्च ३८ ते ४० हजार रुपयांपर्यंत असते. पावसाळ्यातील एकरी खर्चाचे प्रमाण एकंदरीत हवामान व कीड रोगाच्या प्रादुर्भावावर कमी अधिक राहते. वांगी हे पीक आमच्यासाठी शाश्‍वत ठरले आहे. या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत संपूर्ण गावामध्ये याची लागवड होत आहे. आता दरवर्षी वांगी पिकातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल गावात होते. थोडक्यात गावाच्या अर्थकारणाचा मुख्य आधार वांगी पीक ठरले असल्याचे गोविंदा टोंगे यांनी सांगितले. शेतीपूरक व्यवसायावर भर ः व्यावसायिक पीक पद्धतीचा आदर्श घालणाऱ्या गोविंदाने शेतीपूरक दूग्धव्यवसायावरही भर दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून होलेस्टीन फ्रिजियनसह काही जर्सी गायी ते सांभाळत आहेत. एका गाईपासून सरासरी १० ते ११ लिटर दुधाची उपलब्धता होते. दहापैकी सध्या चार ते पाच गाईं दुधामध्ये आहेत. एका खासगी डेअरीला दूध पुरवले जात असून, त्याला फॅटनुसार २६ ते २८ रुपये प्रतिलिटर असा सरासरी दर मिळतो. शेळ्यांचे संगोपनदेखील त्यांच्याद्वारे केले जाते. भविष्यामध्ये शेळीपालनामध्ये वाढ करण्याचा त्यांचा मनोदय आहे. जनावरांकरिता सव्वा एकर क्षेत्रामध्ये ‘डीएचएन-१०’ जातीच्या चाऱ्याची लागवड केली आहे. गोविंदा टोंगे, ९०९६५५८२५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com