द्राक्ष सल्ला

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणाचा विचार करता किमान तापमानात चढ-उतार होत असला तरी दुपारच्या तापमानात वाढ होताना दिसून येते. म्हणजेच दिवसाचे जास्त तापमान व रात्रीचे कमी तापमान अशी परिस्थिती बागेत दिसून येते. या स्थितीत काही ठिकाणी तापमानाचा बागेसाठी फायदा होईल, तर काही ठिकाणी समस्या उद्भवताना दिसून येतील. वाढत्या तापमानात फळ काढणी जवळ आलेल्या बागेत घडावर मिलीबगचा प्रादुर्भाव दिसून येईल. ही कीड आजपर्यंत घडामध्ये किंवा वेलीवर दिसत नव्हती. वाढत्या तापमानात अचानक घडावर दिसून येईल. या किडीच्या प्रादुर्भाव जास्त असल्याच्या परिस्थितीत हे द्राक्ष घड खाण्यायोग्य राहत नाहीत. तत्पूर्वी ही कीड जमिनीमध्ये, वेलीच्या खोडाच्या सालीमध्ये आत दडून बसलेली असेल किंवा बागेतील गवतावरही आढळून येते. उदा. लव्हाळा, हराळी, कॉंग्रेस गवत. या वेळी फळकाढणी जवळ आल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करणे जोखमीचे असते. अशा वेळी सरफॅक्टंट (ट्रायसायलोक्झेन पॉलीइथर) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे वापर करून खोड, वेली प्रादुर्भाव ठिकाणी धुवून काढाव्यात. ज्या वेलीवर मिलीबगचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आहे, अशा वेळीवर मिलीबग आणि चिकटद्रव्यांसह उपलब्ध असलेला मिलीबग वेलीच्या बाहेर काढण्यासाठी १० ते १२ लीटर पाणी प्रति वेल लागेल.  द्राक्षघड लूज पडत असल्याची तक्रार असलेल्या बागेत वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज आणि पुरवठा या गोष्टीचा ताळमेळ बसत नसेल. ही परिस्थिती टाळण्याकरिता बागेत होत असलेल्या बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन पाण्याचा पुरवठा करावा. याकरिता बाष्पीभवन पात्राचा (पॅन इव्हॅपोरीमीटर) वापर महत्त्वाचा ठरेल. जिथे ही सुविधा उपलब्ध नाही, तिथे बोद पूर्णपणे भिजेल अशा प्रकारे पाणी द्यावे. मणी कडक राहून द्राक्षघडाची प्रत टिकवून ठेवता येईल. तापमानात वाढ होत असलेल्या परिस्थितीत फळकाढणी शक्यतोवर सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत करून घ्यावी. जास्त तापमानात फळकाढणी करू नये. रिकट झालेल्या बागेसाठी...  या फुटीची वाढ जोमात असेल, किंवा ओलांडा तयार होण्याच्या परिस्थितीत असेल, अशा वेळी नवीन कोवळ्या फुटीवर थ्रिप्सचा प्रादुर्भाव आढळून येईल. ही कीड पानातून रस शोषून घेते, त्यामुळे पानाच्या वाट्या झाल्याचे दिसून येतात. ही कीड वेळीस नियंत्रणात न आल्यास फुटीच्या पेऱ्यातील अंतर कमी झालेले दिसेल. तसेच वाढ खुंटलेली दिसेल. या किडीच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रती लिटर पाणी  फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१० ओडी) ०.७ मि.लि. किंवा इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम.   ः ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com