जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
फळबाग
तापमानात घट होण्याच्या स्थितीत द्राक्षबागेत करावयाच्या उपाययोजना
वातावरणातील कमाल व किमान तापमान कमी होईल. याचा परिणाम द्राक्ष बागेत सध्या उपलब्ध असलेल्या वाढीच्या विविध अवस्थेत कसा होईल व संभाव्य उपाययोजना कशा असाव्यात, या विषयी जाणून घेऊ.
सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व केरळ भागामध्ये सक्रिय होत असल्याची बातमी आहे. याचा परिणाम आपल्या राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता असेल. म्हणजेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा थोड्या फार प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्या सरी येण्याच्या स्थितीमध्ये जर वातावरणातील कमाल व किमान तापमान कमी होईल. या परिणाम द्राक्ष बागेत सध्या उपलब्ध असलेल्या वाढीच्या विविध अवस्थेत कसा होईल व संभाव्य उपाययोजना कशा असाव्यात, या विषयी जाणून घेऊ.
कमी तापमानाचे परिणाम
वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली ठराविक तापमानामध्ये होत असतात. वेलीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू असते. ही प्रक्रिया साधारणतः ३० ते ३५ अंश सेल्सिअस (दिवसाचे तापमान) तर १५ अंश सेल्सिअसच्या पुढे किमान तापमान सुरू असताना सुरळीत होते. जर या तापमानात समतोल बिघडल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींमध्ये विरुद्ध घडामोडी होतात. ज्या बागेत लवकर छाटणी झाली व सध्या ८ ते १० मि.मी. आकाराचे मणी आहेत, अशा बागेत तापमानात ही घट झाली असल्यास मण्याचा आकार पाहिजे तितका वाढणार नाही. यावेळी आपण आकार मिळण्यासाठी पुन्हा संजीवकांच्या फवारण्या करतो. (उदा. जीए, सीपीपीयू इ.) यावेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावला असल्याने मण्याच्या फुगवणीवर या संजीवकांचा परिणाम होत नाही. उलट मण्याची साल जाड होते. काही परिस्थितीत मण्यामध्ये गोडी उतरण्यास विलंब होतो. ही परिस्थिती टाळण्याकरिता बागेत मुळे कार्यक्षम राहील व बागेतील तापमान कसे वाढवता येईल, याचे नियोजन करणे गरजेचे असेल.
- बागेत पाण्याचा जास्त वापर झाल्यास तापमान वाढण्यास मदत होईल.
- बोदावर मल्चिंग किंवा आच्छादन केले असल्यास मुळांच्या कक्षेतील तापमान वाढण्यास मदत होते.
- किमान तापमान फारच कमी झाल्याच्या स्थितीत बागेत शेकोटी करूनही तापमान वाढवता येईल.
- कॅनोपिवर शेडनेटचा वापर केलेला असल्यास बागेतील तापमान वाढवणे शक्य होईल.
घडाच्या विकासात पानांचे महत्त्व ः
प्रत्येक द्राक्ष वेलीवर उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा विचार करता घडांची संख्या निर्धारित असणे तितकेच महत्त्वाचे असेल. यालाच सोर्स ः सिंक संबंध असेही म्हटले जाते. वेलीच्या ज्या भागातून अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. (उदा. पान, देठ, काडी, ओलांडा, खोड व मुळे) त्या भागास सोर्स असे म्हटले जाते. तर सोर्सचा वापर करून स्वतःचा विकास करून घेणाऱ्या भाग म्हणजे द्राक्षघड होय. त्यालाच सिंक असे म्हणतात. सिंक दोन प्रकारचे असतात. १) उपयोगी सिंक २) आवश्यकतेपेक्षा अधिकचा भाग (अनावश्यक सिंक).
अनावश्यक सिंक असलेल्या परिस्थितीत (घडाच्या पुढे आवश्यकतेपेक्षा जास्त पाने किंवा वेलीवर जास्त प्रमाणात वाढत असलेल्या व घड नसलेल्या फुटी) घडाचा विकास न होता घडातून अन्नद्रव्ये या अनावश्यक फुटींच्या वाढीसाठी वापरले जाते. सोर्स व सिंक मजबुती म्हणजे घडाच्या विकासात जितक्या आवश्यक आहेत, तितकेच ठेवणे होय. उदा. पाचशे ग्रॅम वजनाच्या घडाच्या विकासाकरिता घडाच्या पुढे १० ते १२ पाने (१६० ते १७० वर्ग सेंमी क्षेत्रफळाची पाने) पुरेशी होतात. या आकाराच्या पानांची संख्या जास्त वाढली असल्यास सोर्स सिंक समतोल बिघडेल. किंवा कमी आकाराच्या पानांची संख्या जरी इतकीच असल्यास सुद्धा समतोल बिघडू शकतो. अशा स्थितीत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
- आवश्यक त्या पानांची पूर्तता झाली असल्यास शेंडा पिचिंग करून घ्यावे.
- पानांचा आकार कमी असल्यास आवश्यक ते क्षेत्रफळ मिळवण्यासाठी पुन्हा काही पाने वाढवून घ्यावीत.
- पाने वाढविण्याकरिता प्री ब्लुम अवस्थेत उपाययोजना करून घ्याव्यात. मणी सेटिंग झाल्यानंतर पानांची शेंडा वाढ थांबलेली असते.
- नत्र व स्फुरदाचा वापर यावेळी करता येतो.
- पालाशचा वापर केल्यास पुन्हा वाढ थांबण्याची शक्यता असेल. तेव्हा पालाशचा वापर कॅनोपी कमी असलेल्या परिस्थितीत टाळावा.
- प्रत्येक पान सूर्यप्रकाशामध्ये राहील, अशा प्रकारे कॅनोपी व्यवस्थापन करावे. त्यामुळे सोर्स सिंकचा संबंध चांगल्या तऱ्हेने प्रस्थापित करणे शक्य होईल.
फुलोरा अवस्थेतील अडचणी
बऱ्याचशा द्राक्ष बागेत दोडा अवस्था ते फुलोरा अवस्थेमध्ये मणीगळ होण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. बरेच बागायतदार घडामधील मण्याची विरळणी नैसर्गिकरित्या व्हावी, यासाठी या अवस्थेत बागेत पाण्याचा ताण देतात. यामुळे बऱ्यापैकी थिंनिग (विरळणी) मिळते. हे परिणाम मिळण्याकरिता बागेतील पाण्याची नेमकी गरज किती आहे आणि आपण पुरवठा किती केला आहे, याची अचूक माहिती असणे गरजेचे आहे. ही पूर्तता जमिनीच्या प्रकारानुसार करावी लागते. उदा. भारी जमिनीत कमी पाणी लागेल, तर हलक्या जमिनीत कमी प्रमाणात पण जास्त वेळा पाणी देण्याची गरज असेल. यामध्येच बिघाड झाल्यास वेलीवर ताण बसतो व फुलोरा अवस्थेत तापमानात वाढ होऊन मणी जास्त गळण्यास सुरुवात होते. यावर पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.
- पाण्याची पूर्तता कोणत्याही जमिनीत वापसा परिस्थितीपर्यंत करावी.
- वेलीचा शेंडा पिचिंग करून घ्यावा.बऱ्याच वेळा काही दिवसापूर्वी पिंचिंग केले असल्यास सुद्धा प्रत्येक वेलीवर पुन्हा ५० टक्के फुटींना फक्त टिकली मारून घ्यावी.
घडाच्या विकासात खत व्यवस्थापन
मणी सेटिंग झालेल्या बागेमध्ये घडाचा विकास जलद गतीने सुरू होतो. अशा वेळी एक तर कॅनोपी सुटसुटीत व सशक्त असावी. प्रत्येक पान सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत अन्नद्रव्य तयार होईल. त्याचा घडाच्या विकासात फायदा होईल. दुसऱ्या परिस्थितीत स्फुरदाची पूर्तता महत्त्वाची असेल. ज्या बागेत शेंडा पूर्ण थांबला होता अशा बागेत नत्र व स्फुरद उपलब्ध असलेल्या ग्रेडचा वापर जमिनीतून ठिबकद्वारे करावा.
ज्या बागेत शेंडा वाढलेला होता, किंवा पुन्हा वाढण्याची शक्यता दिसते, अशा बागेत सोर्स सिंक मजबूत करण्यासाठी स्फुरद व पालाश उपलब्ध असलेल्या ग्रेडचा वापर करावा. स्थानिक बाजारपेठेकरिता तयार होत असलेल्या व्यवस्थापनातील बागेत घडाचा सुकवा पाणी उतरल्याच्या नंतर दिसून येतो. त्यावेळी बागायतदार निरनिराळ्या प्रकारच्या खतांची फवारणी तसेच जमिनीत उपलब्धता करतात. त्यावेळी पेशींची वाढ पूर्णपणे थांबलेली असल्यामुळे या उपाययोजनेचा काही फायदा होत नाही. त्यामुळे आतापासून पुढील प्रकारे नियोजन करावे.
- देठ परिक्षण फुलोरा अवस्थेत करून घेतल्यास वेलीला नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे, याची कल्पना येईल.
- मणी विकासाच्या अवस्थेत स्फुरदाचा (सिंगल सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फोरिक अॅसिड, १२-६१-०, ०-५२-३४, ०-४०-३७ किंवा ०-६०-२० इ. पैकी एक ) वापर जमिनीतून करावा.
- या खताचा पुरेपूर वापर होण्यासाठी बोदातील मुळे कार्यक्षम असणे गरजेचे असेल. या करिता बोदाच्या बाजूने ट्रॅक्टरच्या साह्याने चारी घेतल्यास दोन, तीन टक्के मुळे तुटतील. मात्र, काही काळातच १५ ते २० टक्क्यापर्यंत नव्या मुळ्या तयार होतील. त्या घडाच्या विकासात उपयोगी ठरतील.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.
- 1 of 21
- ››