बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या... : डॉ. एस. डी. सावंत

बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...
बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...

पुढील ६ ते ७ दिवस सर्वच द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पावसाळी राहणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण अधून मधून सर्वसाधारणपणे ढगाळ राहील. तसेच काही भागांत रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी नाशिकच्या दक्षिण भागात म्हणजेच सिन्नर, संगमनेर, निफाड, येवला या भागांत मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ओझर, मोहाडी, पिंपळगाव, चांदवड, त्र्यंबकेश्‍वर या भागांतही मध्यम स्वरूचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अपवाद वगळल्यास बाकी सर्व ठिकाणी रिमझिम किंवा हलका पाऊस अधून मधून २७ ते २९ तारखेदरम्यान होण्याची शक्यता आहे. वरील गोष्टी पाहता काही दिवस पाऊस थांबेपर्यंतच्या काळापर्यंत आणि रात्रीचे तापमान कमी झालेले असल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत धुके किंवा दव पडण्याची शक्यता आहे. अशा वातावरणामध्ये पावसाच्या दिवसामध्ये पान व घडावर झालेला डाऊनीचा प्रादुर्भाव हा चांगल्या पद्धतीने दिसू लागेल. तसेच मुळाच्या परिसरात जास्त पाणी साचल्याने त्याचबरोबरीने मातीतील नत्र जास्त शोषून घेतले गेल्यामुळे घडांची कूज व गळ वाढण्याची शक्यता दिसते. त्याचबरोबरीने ज्या बागा फुलोरा किंवा त्याच्या पुढे आहेत अशा बागांच्यामध्ये कॅनॉपी जास्त झालेली असल्यास व सर्वसाधारणपणे आत्तापर्यंतच्या सर्व फवारण्या डाऊनी व करप्याच्या नियंत्रणासाठी केलेल्या असल्यामुळे पुढे ढगाळ वातावरणामध्ये कळत न कळत भुरी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन रोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना देत आहोत. १) सर्वांत प्रथम पावसाळी वातावरणामध्ये म्हणजेच गुरुवारी, शुक्रवारी डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मॅॅन्कोझेब (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) संरक्षणात्मक फवारणी करावी. २) शुक्रवारनंतर पाऊस थांबल्यावर वातावरणाची पाहणी करून फवारणीचा निर्णय घ्यावा. ज्या बागांमध्ये कॅनॉपी अजून संपूर्णपणे वाढलेली नाही, कॅनॉपीमध्ये खेळती हवा आहे आणि वातावरणात चांगला सूर्यप्रकाश आहे, अशा वेळी डाऊनीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मॅन्कोझेब बरोबर आंतरप्रवाही बुरशीनाशकांची एखादी फवारणी घेतल्यास फायदा होईल. ३) वातावरणामध्ये सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यास सीएए गटातील बुरशीनाशके (डायमिथोमार्फ १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम टॅंक मिक्स करून किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपिनेब २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा मॅंडीप्रोपामिड ०.८ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम टॅंक मिक्स करून) फवारणी करावी. ४) ज्या भागात अजूनही पाने बराच वेळ ओली राहत आहेत, तसेच तुलनेने कॅनॉपी जास्त आहे अशा बागेत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड किंवा फोसेटाईल ए एल ३ ते ३.५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम टॅंक मिक्स करून फवारावे. ओल्या पानांवर व जास्त आर्द्रता असलेल्या भागामध्ये फॉस्फरस ॲसिड आंतरप्रवाही होऊ शकते. पानांच्या आतील भागात जाऊन रोगनियंत्रण करणे शक्य होते. म्हणूनच या रसायनांचा वापर पाने ओली असताना किंवा आद्रता असताना करण्याची सूचना केली आहे. फॉस्फरस ॲसिडची भरपूर मात्रा पानाच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर ते संपूर्णपणे रोगाचे नियंत्रण करते. परंतु त्याचबरोबरीने वेलीच्या पेशींना फेनॉलिक रसायने तयार करण्यासाठी उद्युक्त करते. त्यामुळे वेलीची प्रतिकारशक्ती वाढते. रोग चांगल्यारीतीने नियंत्रित होतो. सध्या वेलीची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे. ५) यापूर्वी आम्ही मातीमध्ये ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस १ लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये ठिबकद्वारे देण्याचा सल्ला दिला होता. यामुळे सुद्धा वेलीची रोग प्रतिकारशक्ती वाढते. या दृष्टिकोनातून विशेष सल्ला म्हणून नमूद केले होते. ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर शक्यतो टाळावा किंवा कमी करावा. ताम्रयुक्त बुरशीनाशके (सीओसी, कॉपर हायड्रॉक्साइड, बोर्डो मिश्रण) रोगनियंत्रण चांगले करू शकतात यात वाद नाही, परंतु या बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर यातील ताम्र अंश वेलीची पाने ज्या वेळी शोषून घेतात, त्या वेळी पानातील चयापचय क्रिया हळू होते. त्याचप्रमाणात पानामध्ये फेनॉलिक रसायने तयार होण्याची क्रिया हळू होते. त्यामुळे वेलीमध्ये फेनॉलिक रसायने वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढण्याची शक्यतासुद्धा कमी होते. म्हणूनच ज्या बागायतदारांनी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड फवारण्याचे व जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस वापरण्याचा निर्णय घेतला असेल, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या काळात ताम्रयुक्त बुरशीनाशके न वापरण्याचा सल्ला देत आहोत. ६) सध्याच्या पावसाळी परिस्थितीत वेलीच्या वाढण्याचा वेग वाढलेला असतो. जितका वाढीचा वेग वाढतो, तेवढेच पानामध्ये तयार झालेले फेनोलिक रसायन व चयापचयाचा वेग कमी होतो. त्यामुळे अपेक्षित रोगनियंत्रण किंवा काडीवर असलेल्या घडांची वाढ मिळत नाही. अशा वेळी वाढणाऱ्या काडीचा वेग कमी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड फवारणीमध्ये वापरलेले असल्यास त्यामध्ये असलेल्या पोटॅश आणि फॉस्फरसमुळे काडीच्या वाढीचा वेग मंदावतो. अशाप्रकारे पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड वापरलेले नसल्यास बागेमध्ये मोनो पोटॅशिअम फॉस्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात वाढीचा वेग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबरीने ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके (हेक्झाकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर, टेब्युकोनॅझोल अर्धा मिलि प्रति लिटर, प्रॉपिकोनॅझोल १० ते १५ मिलि १०० लिटर पाणी) फवारणीसाठी वापरल्यास भुरीचे बऱ्यापैकी नियंत्रण मिळेलच, त्याचबरोबरीने ही सर्व बुरशीनाशके वेलीतील जीएच्या प्रतिकारात काम करत असल्यामुळे काडीच्या वाढीचा वेग काही काळ मंदावेल. त्यामुळे घडांची चांगली वाढ तसेच रोगांचे चांगले नियंत्रण मिळण्याची शक्यता वाढेल. ७) वरील सर्व उपाययोजनांचा काळजीपूर्वक विचार करून योग्य वेळी, योग्य निर्यण घेऊ शकला तर येणाऱ्या पावसाळी वातावरणामध्ये रोगनियंत्रण व घडकूज दोन्ही चांगल्यारीतीने होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com