द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापन

रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापन
रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापन

सध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान तापमानामध्ये वाढ होताना दिसेल. मागील हंगामात कलम केलेल्या काडीवर पुन्हा रिकट घेऊन वेलीचा सांगाडा तयार करून मालकाडी तयार करणे फायद्याचे ठरेल. रिकटसाठी सध्याचे वातावरण पोषक असल्याचे दिसून येईल. रिकट घेण्यापूर्वी योग्य पूर्वतयारी म्हणून संजीवकांचा वापर, पानगळ आणि खतांचे व्यवस्थापन योग्य रितीने करून घेणे आवश्यक आहे. रिकट घेतल्यानंतर त्या काडीवर नवीन डोळे फुटण्याकरिता त्या बागेतील किमान तापमान अत्यंत महत्त्वाचे असते. ज्या वेळी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्यास सुरुवात होईल, अशा परिस्थितीत वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. त्याचे परिणाम एक सारख्या व लवकर निघणाऱ्या फुटीच्या रूपात दिसून येतात. बऱ्याच बागांमध्ये कलम काडीची जाडी एकसारखी नसल्यामुळे त्या सोबत काडीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्या कलमाची वाढ थांबलेली असेल. काही बागेत कलमजोडाच्या वर फक्त चार पाच पेरे परिपक्व झालेले दिसून येतील. काही बागेत ८ मि.मी. ते १२ मि.मी. जाड अशा वेगवेगळ्या जाडीच्या काड्या दिसून येतील. अशी स्थिती असलेल्या बागेत कलम काडीवर रिकट हा नेमका कोणत्या डोळ्यावर घ्यावा, हा संभ्रम बागायतदारांच्या मनात तयार होतो. या व्यतिरिक्त लवकर कलम केलेल्या बागेत कलमकाडीची वाढ जोमात झाली व ओलांडेही तयार झाल्याची आणखी एक परिस्थिती काही बागांमध्ये दिसून येते. याचाच अर्थ या बागेत ओलांड्यापर्यंत परिपक्वता आली आहे असा होईल. अशा बागेमध्ये ज्या ठिकाणी काडी १२ ते १४ मि.मी. जाड आहे व परिपक्व आहे, अशा ठिकाणी रिकट घ्यावा. इतर परिस्थितीमध्ये कलम जोडाच्या वर चार ते पाच डोळे राखून सरसकट रिकट घ्यावा. खत व्यवस्थापन मागील हंगामात कलम केलेल्या बागेत आता रिकट घेतल्यानंतर व्यवस्थितरीत्या फुटी निघून खोड, ओलांडे व मालकाडी तयार होण्याच्या उद्देशाने वेलीचा मुळे कार्यक्षम असणे गरजेचे असेल. याकरिता रिकट घेण्याच्या १५ दिवस आधी दोन वेलीच्या मध्यभागी साधारणपणे ७ ते ८ इंच कलमकाडीपासून दोन फूट रुंद, तीन ते चार इंच खोल अशी चारी घ्यावी. या चारीमध्ये दीड ते दोन घमेले शेणखत (९ फूट बाय ५ फूट अंतर असल्यास), २०० ते २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घ्यावे. डॉगरीज खुंटावर कलम केलेल्या बागेत पहिल्या वर्षी फेरसची कमतरता प्रामुख्याने जाणवत असल्याचे दिसून येते. यावर नियंत्रणाकरिता १२ ते १५ किलो फेरस सल्फेट प्रतिएकरप्रमाणे जमिनीतून दिल्यास फायद्याचे होईल. त्यानंतरच्या काळात ४ ते ५ पाने अवस्थेत एक ग्रॅम फेरस सल्फेट प्रतिलिटर पाणी या प्रमाणात दोन ते तीन फवारण्या फायद्याच्या ठरतील. चारी घेऊन त्यात शेणखत व माती टाकल्यानंतर बोद तयार होईल. या बोदामध्ये मोकळे वातावरण तयार झाल्यामुळे कार्यक्षम पांढरी मुळे तयार होतील. हायड्रोजन सायनामाईडचा वापर

  • रिकट घेतल्यानंतर लवकर व एकसारखी फूट निघावी, याकरिता हायड्रोजन सायनामाईडचा वापर महत्त्वाचा असेल. वातावरणातील तापमानानुसार व तसेच काडीच्या जाडीनुसार मात्रा ठरवावी. साधारणपणे ८ ते १० मि.मी, जाड काडीकरिता ३३ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या वातावरणात ४० मि.लि. हायड्रोजन सायनामाईड प्रतिलिटर पाणी पुरेसे होईल. आपल्या बागेत परिस्थिती पाहून हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण कमी अधिक करता येईल.
  • लवकर फुटी निघण्याकरिता कलम जोडाच्या वरील भागात पानगळ केल्यास चांगले परिणाम मिळतील. याकरिता इथेफॉन ३ मि.लि. अधिक ०-५२-३४ हे खत पाच ग्रॅम प्रतिलिटर या मिश्रणाची फवारणी केल्यास पानगळीवर चांगले परिणाम दिसून येतात.
  • रिकट घेतल्यानंतर हायड्रोजन सायनामाईड शक्यतो दुसऱ्या दिवशी करावे. दुपारी तीन वाजल्यानंतर पेस्टिंग केल्यास काडीवरील डोळ्यांना रसायन शोषून घेण्यास चांगला वेळ मिळतो. पेस्टिंग केल्यानंतर डोळे साधारणपणे ८ ते १० दिवसांमध्ये फुटायला सुरुवात होते. परंतु त्या पूर्वी ६ ते ७ दिवसाच्या कालावधीत डोळे फुगलेल्या अवस्थेत उडद्या या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. कलम काडीच्या भोवती आजूबाजूला गवत जास्त असल्यास हा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसतो. तेव्हा बागेत गवत काढून
  • स्वच्छता राहील, याची काळजी घ्यावी. याच कालावधीत शिफारशीत प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी.
  • या वेळी डोळे फुटत असलेल्या परिस्थितीत तापमान वाढत असून, आर्द्रता कमी राहते, अशा वेळी कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. बुरशीनाशकांची फवारणी टाळावी. या व्यतिरिक्त सुरुवातीच्या काळात वाढ चांगली होण्याकरिता जमिनीतून नत्राची पूर्तता करणे महत्त्वाचे समजावे.
  • सुरुवातीच्या काळात वाढीचा जोम चांगला असेल, तर वेलीचे तयार होत असलेले खोड सशक्त राहील. याकरिता सुरुवातीच्या एक महिन्याच्या कालावधीत फक्त नत्र आणि स्फुरदयुक्त खतांची पूर्तता करावी.
  • ओलांडा तयार करण्यासाठी... फुटलेल्या डोळ्यांपैकी शक्यतो वरची फूट तीन ते चार पानावर खुडून खालील दुसऱ्या क्रमांकाची फूट निवडावी. असे केल्यास रिकट घेतेवेळी जे काही रोगकारक घटकांचे बिजाणू होते, ते कमी होण्यास मदत होईल. खोड तयार करतेवेळी थांबा व पुढे चला या पद्धतीचा अवलंब केल्यास सुरुवातीच्या काळातच खोड जाड करून घेता येईल. याकरिता ९ ते १० पानांची फूट झाल्यास ६ ते ७ पानांवर खुडून घ्यावे. यानंतर निघालेल्या सर्व बगलफुटी तीन ते चार पानांवर खुडून घ्याव्यात. वरील शेवटची फूट न खुडता तिला बांबूस सुतळीच्या साह्याने बांधून घ्यावे. या काडीवर राखलेली तीन ते चार पाने प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून वर वाढत असलेल्या काडीस पुरवठा करतील. यालाच आपण काडीमधील साठवण असे म्हणतो. त्यामुळे काडीचे खोड जाड होईल. वर काडी वाढत असलेल्या परिस्थितीत मांडव असलेल्या बागेत तारेच्या वर तीन इंच वाढ झाल्यास तारेच्या दोन ते तीन इंच खाली काप घ्यावा. असे केल्यास या फुटीस ओलांडा तयार करण्यासाठी वळण सहज मिळेल.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com