द्राक्ष बागेमध्ये कलम करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी

द्राक्ष बागेमध्ये कलम करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी
द्राक्ष बागेमध्ये कलम करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी

द्राक्ष विभागामध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यानंतर वेलीमध्ये शारीरिक पातळीवर विविध घडामोडी सुरू झाल्या आहेत. बागेमध्ये विविध उपाययोजना व कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे. यामध्येच जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांमध्ये लागवड केलेल्या खुंटरोपांची आता पुरेशी वाढ झाली असून, आता नवीन लागवड केलेल्या बागेमध्ये कलम करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी आहे. द्राक्षबागेत कलम यशस्वी होण्याकरिता खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १) खुंटरोपांची परिस्थिती - खुंटरोपांची लागवड झाल्यानंतर रोपांची वाढ यशस्वी होणे गरजे असते. अशावेळी आपण खते व पाणी या दोन्ही गोष्टांची पुरेपूर वापर करतो. परंतू, एप्रिल- मे महिन्यात वाढलेले तापमान व कामी झालेली आर्द्रताबागेत नवीन रोपांची वाढ समाधानकारक होत नाही. त्याकरिता बागेमध्ये पाऊस नुकताच सुरू झाल्यानंतर खुंटरोपांचा पुन्हा जमिनीपासून ३-४ डोळ राखून रिकट घेतला जातो. यानंतर नवीन फुटी निघतात. या फुटी जोमदार असतात. खुंटकाडीच्या निघालेल्या नवीन फुटी सशक्त, जोमदार वाढणाऱ्या व शक्यतो रोग व कीडमुक्त असाव्यात. या काडीमध्ये रस असावा. त्या ठिकाणी बागेत जोमदार फूट निघाली असेल. पाऊस झालेल्या परिस्थितीमध्ये काडीमध्ये रस चांगल्या प्रकारे असतो. कलम करण्याकरीता पुन्हा महत्त्वाची आवश्यक परिस्थिती म्हणजे खुंटकाडीवर आपण ज्या ठिकाणी कलम करणार अशा काडीची जाडी ही जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरापर्यंत किमान ७ ते ८ मि.मी. असावी. ज्या बागेत काडी अजूनही बारीक आहे व खुंटरोपांची वाढ गरजेप्रमाणे झालेली नाही, अशा बागेमध्ये पुन्हा २० ते २५ दिवस थांबावे. यानंतर खुंटकाडीची विरळणी करून घ्यावी. यावेळी दोन सरळ जाणाऱ्या कोवळ्या फुटी राखून इतर फुटी काढून टाकाव्यात. सोबतच बागेत नत्र व स्फुरद असलेल्या खतांचा पुरवठा करावा. अशा बागेमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत कलम केले तरी चालेल. म्हणजेच तोपर्यंत आज कलम करण्यायोग्य स्थितीमध्ये नसलेली काडी त्यायोग्य होईल. मात्र, ज्या बागांमध्ये आज काडीची जाडी एक ते सव्वा फूटापर्यंत ७ ते ८ मि.मी. आहे, अशा बागेमध्ये कलम कुरून घ्यावे. अन्यथा खुंटकाडी परिपक्व होऊन अधिक जाड होईल आणि काडीमध्ये कलम यशस्वी होण्याइतका रस उरणार नाही. कलम यशस्वी होण्यासाठी बागेमध्ये तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८० ते ९० टक्के असणे आवश्यक आहे. सध्या ही परिस्थिती बागेमध्ये उपलब्ध दिसते. तेव्हा बागेमध्ये करण्यासाठी हा महत्त्वाचा कालावधी असून, बागेमध्ये कलम करण्याची कार्यवाही त्वरीत करावी. सायन काडीची परिस्थिती ः द्राक्षबागेमध्ये कलम करण्याकरिता कोणती द्राक्षजात निवडावी व सायन काडी कशी असावी, हा शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. नवीन द्राक्षबाग उभारतेवेळी आपला नेमका उद्देश काय आहे, यानुसार द्राक्षजातीची निवड करणे फायद्याचे राहील. अ) निर्यातक्षम बागेसाठी - हिरव्या द्राक्षजाती - थॉमसन सीडलेस, तास ए गणेश, क्लोन २ ए, मांजरी नवीन इ. रंगीत द्राक्षजाती - शरद सिडलेस, नानासाहेब पर्पल इ. रंगीत बियांची द्राक्षजात - रेड ग्लोब. ब) स्थानिक बाजारपेठेकरिता - लांब मण्याच्या हिरव्या द्राक्षजाती - सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, एसएसएन. लांब मण्याचा काळ्या द्राक्षजाती - क्रिश्ना सिडलेस, ज्योती सिडलेस, सवीता सिडलेस इ. क) बेदाणा निर्मितीकरिता - थॉमसन सिडलेस, क्लोन २ ए, तास ए गणेश, मांजरी, किशमीश इ. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये लांब मण्याची मागणी वाढत असल्याचे दिसून येते. त्यावरून या द्राक्षजातीची निवड करायला हरकत नाही. कलम करतेवळी सायन काडी पूर्णपणे परिपक्व असणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा ही काडी बाहेरून खाकी रंगाची दिसत असली तरी आतून परिपक्व असेलच असे नाही. काही परिस्थितीमध्ये काडी आतून कच्ची असू शकते. अशा काडीवर कलम केल्यानंतर डोळा फुटतो व २-३ पानांची वाढ झाल्यानंतर सुकायला लागतो. कलम यशस्वी होत नाही. कारण आपण वापरलेली सायन काडी ही फक्त दोन डोळ्यांची असते. अशा कच्च्या काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा मुळीच नसतो. निवडलेली सायनकाडी ही कीड व रोगमुक्त असून, जास्त उत्पादन देणाऱ्या वेलीवरील असावी. खरे तर सायन काडी ही मदर ब्लॉकमधूनच असावी. परंतू सध्या तरी आपल्याकडे अशी स्वतंत्र व्यवस्था केलेली दिसत नाही. त्यामुळे ज्या बागेत फळछाटणी घेणार आहोत. अशा बागेतून वाढनियंत्रक/ संजीवकाची फवारणी झाल्यानंतर सबकेनच्या पुढील काडी घेतली जाते. या वेळी काही महत्त्वाच्या गोष्टी सांभाळणे आवश्यक आहे.

  • ज्या बागेमध्ये वाढनियंत्रक/संजीवकाची फवारणी झाली अशा बागेमध्ये फवारणीच्या २-३ दिवसाच्या आतच काडी घ्यावी.
  • त्यानंतर काडी निवडतेवेळी सबकेनच्या १-२ डोळे राखून पुढील फक्त ४-५ डोळे कलम करण्याकरीता वापरावेत.
  • बऱ्याच वेळा सायनकाडी ज्या बागेतून घेतली जाते, अशा बागेत काडीवर तसेच पानांवर डाऊनी व पावडरी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी झालेला दिसतो. अशा बागेतील काडी निवडल्यानंतर कलम करण्यापूर्वी २-३ तास ती काडी कार्बेन्डाझीम ३ ते ४ ग्रॅम प्रति पाणी या द्रावणामध्ये बुडवून ठेवावी.
  • संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com