मुळे काळी पडणे, पानगळ या समस्यांकडे लक्ष द्या

सर्व द्राक्ष विभागामध्ये सततचा पाऊस सुरू आहे. या स्थितीमुळे द्राक्ष बागायतदारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांपैकी मुळे काळी पडणे आणि पानगळ या महत्त्वाच्या अडचणीवरील उपाययोजनांची माहिती घेऊ.
मुळे काळी पडणे, पानगळ या समस्यांकडे लक्ष द्या
मुळे काळी पडणे, पानगळ या समस्यांकडे लक्ष द्या

सर्व द्राक्ष विभागामध्ये सततचा पाऊस सुरू आहे. या स्थितीमुळे द्राक्ष बागायतदारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांपैकी मुळे काळी पडणे आणि पानगळ या महत्त्वाच्या अडचणीवरील उपाययोजनांची माहिती घेऊ. मुळे काळी पडणे ः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भारी किंवा हलक्या जमिनीसह वेगवेगळ्या माती प्रकारामध्ये द्राक्षबागांची लागवड असते. या दोन्ही प्रकारच्या मातीमध्ये सतत होत असलेल्या व जास्त पावसामुळे वेलांच्या मुळांच्या कक्षेत पाणी बऱ्यापैकी साचलेले असेल. यामुळे मातीच्या प्रत्येक कणात पाणी साचल्याने वेलीला श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये अडचणी येतात. कार्य करणाऱ्या मुळांचा सशक्तपणा टिकून राहत नाही. परिणामी मुळांच्या कक्षेत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य व पाणी उचलून घेणे शक्य होत नाही. बऱ्याच प्रमाणात वेलीची मुळे ही संजीवकांची निर्मिती करून वाढत असलेल्या वेलीमध्ये पोचवण्याचे कार्य करते. यानंतर वेलीमध्ये संजीवके व अन्नद्रव्यांचा समतोल नैसर्गिकरीत्या साधले जाते. त्याकरिता ही मुळे कार्यक्षम असणे गरजेचे असते. मात्र, पावसाळी वातावरणामध्ये मुळे काळी पडून कुजतात. बऱ्याचदा पावसाळी वातावरणात फुटीची वाढ जोमात होत आहे, याचा अर्थ वेलीची मुळे कार्यक्षम आहे, असे आपण समजतो. मात्र, ही परिस्थिती वेलीच्या कार्यक्षमतेमुळे नसून वेलीमध्ये अचानक वाढलेल्या जिबरेलीन्सच्या प्रमाणामुळे असू शकते. मुळे जर काळी पडली असल्यास वेलीवर ताण येईल. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग मंदावेल. काही परिस्थितीत पानांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे पानगळ होण्याची शक्यताही जास्त असेल. सततच्या पावसामुळे ओलांडा, काडी किंवा खोडावर मुळे आलेली दिसून येतील. उपाययोजना ः

  • बोदामध्ये पाणी साचणार नाही, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे.
  • काही परिस्थितीत बोद असूनही ते घट्ट झाल्यामुळे जमिनीत मुळे काळी पडलेली असतील. तेव्हा दोन ओळीच्या मध्यभागातून नांगराने चारी घेतल्यास बोदामधून किंवा ज्या ठिकाणी बोद तयार झालेले नाहीत, अशा वेलीच्या मुळांच्या कक्षेबाहेर पाणी निघून जाईल. त्याठिकाणी हवा खेळती राहून मुळे खराब होणार नाही. पांढरी मुळे तयार होण्याची शक्यता वाढेल.
  • पाऊस संपताच कुदळीने किंवा खुरप्याने बोद व त्या सभोवतीची जागा थोड्याफार प्रमाणात खोदून घ्यावी. यामुळे हवा खेळती राहील. मुळे काळी पडण्याचे थांबेल.
  • बाजारात उपलब्ध असलेल्या ह्युमिक अॅसीडचा वापर यावेळी करता येईल.
  • त्याच सोबत ताग, धैंचा अशा हिरवळीच्या खतांचा वापर केलेला असल्यास बोदाच्या शेजारी किंवा मुळांच्या कक्षेच्या बाजूस नांगराचे तास टाकून हे हिरवळीचे खत त्यामध्ये गाडून घ्यावे. यामुळे मुळांची वाढ चांगली होईल. यासोबत जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होईल.
  • पानगळीची समस्या ः बऱ्याचशा बागेत गेल्या आठवड्यातील सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला. काही काळासाठी पाऊस नसलेल्या ठिकाणी बागेत काडीच्या परिपक्वतेचा कालावधी असल्यास, कॅनोपीची गर्दी असलेल्या स्थितीत भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येईल. भुरी रोगाचे बिजाणू पानातून रस शोषून घेतात, तेव्हा पान अशक्त होते. पानातून अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत असल्यामुळे ते पान आपल्याच वजनाने देठाशी असलेली मजबुती कमी झाल्यामुळे गळून पडते. काही परिस्थितीत निघालेल्या कोवळ्या फुटी डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावामुळे रोगग्रस्त झालेल्या असल्यास पानगळीची समस्या उद्भवते. ज्या काडीची परिपक्वतेस नुकतीच सुरुवात झाली ( खरडछाटणीच्या ८० दिवसानंतर) अशा बागेत जर रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानगळ झाली असल्यास काडी परिपक्वता होण्याची शक्यता कमी असेल. पाने जर सशक्त असतील, तर पाऊस संपल्यानंतर उपलब्ध सूर्यप्रकाशाचा वापर व पानांद्वारे प्रकाश संश्लेषण सुरळीत होईल. काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा करून घेता येईल. मात्र, रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील हरितद्रव्ये कमी झाली असल्यास काडीच्या वाढीकरिता अन्नद्रव्याचा साठा तयार करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कॅनोपी व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. १) ज्या बागेत काडी परिपक्वता नुकतीच सुरू झालेल्या ( तळातून तीन ते चार डोळे परिपक्व झाले असलेल्या) बागेतील फुटी तारेवरती मोकळ्या करून बांधून घ्याव्यात. असे केल्यास हवा खेळती राहून काडीच्या प्रत्येक डोळ्यांवर किंवा पेरांवर सूर्यप्रकाश मिळेल. यामुळे काडीची परिपक्वता शक्य होईल. रोग नियंत्रणसुद्धा चांगले होईल. २) ज्या बागेत काडीची परिपक्वता अर्ध्यापर्यंत झाली आहे, ( सबकेनच्या डोळ्यापर्यंत) अशा बागेत रोगामुळे पानगळ झालेली असल्यास काडी परिपक्वता होणार नाही. खराब झालेली पाने गळून पडतील आणि त्यानंतर डोळे फुटायला लागतील. अशा परिस्थितीतील बागेत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

  • या वेलीवर शेंड्याकडील हिरव्या फुटी काढू नयेत. या हिरव्या फुटी सहा ते सात पानांपर्यंत वाढवून शेंडा पिंचिंग करून घ्यावे. या पानांमध्ये बऱ्यापैकी लोह व मॅग्नेशिअमची कमतरता दिसून येईल. या फुटी वाढण्याकरिता आवश्यक ते अन्नद्रव्य जुन्या पानांतून घेतले जाईल. एकतर रोगग्रस्त पाने व त्यासोबत जमिनीत काळी पडलेली मुळे या वेल पूर्णपणे अशक्त झाली असावी. तेव्हा जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा टाळून फेरस व मॅग्नेशिअमची फवारणी वेलीवर करणे गरजेचे असेल. फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट प्रत्येकी २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर आणि चिलेटेड स्वरूपात उपलब्ध असल्यास अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
  • पानगळीच्या समस्या ही प्रामुख्याने डाऊनी व भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे होते.
  • भुरी रोगाच्या नियंत्रणाकरिता उपलब्ध बुरशीनाशकांपैकी स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर फायद्याचा ठरेल.
  • सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी ची फवारणी किंवा कॅनोपी दाट असलेल्या ठिकाणी २ ते २.५ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करून घ्यावी.
  • डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणाकरिता, पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (टॅंक मिक्स) या प्रमाणे फवारणी करून घेता येईल.
  • सबकेनच्या पुढे तीन ते चार डोळे परिपक्व झालेल्या परिस्थितीत एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी फायद्याची ठरेल.
  • सध्या वातावरणात आर्द्रता भरपूर (८० टक्क्यापेक्षा अधिक) असल्याने जैविक नियंत्रण उपयुक्त ठरेल. ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनास या जैविक घटकांचा फवारणीद्वारे ( ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) चार ते पाच दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात.
  • डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com