द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे परिणाम

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत बऱ्यापैकी चढउतार दिसून येत आहेत. काही ठिकाणी तापमानात घट होऊन किमान तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर कमाल तापमान ३० अंशावर गेलेले दिसते. दुसऱ्या परिस्थितीमध्ये किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान दिसून येते. आपल्याकडे सध्या १० ते १२ मि.मी. आकाराच्या मण्यांपासून ते मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत द्राक्ष घड दिसून येतात. वाढीच्या या अवस्थेत मण्यांचा विकास होण्याकरिता सूर्यप्रकाश व तापमान महत्त्वाची भूमिका निभावते. साधारण किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास वेलीची शरीरशास्त्रीय हालचाल सुरळीत होऊन मण्याचा विकास होण्यास मदत होते. याचाच अर्थ या वेळी मण्याचा जलद गतीने विकास होत असताना दिसून येतो. निर्यातक्षम प्रतीच्या उत्पादनाकरिता मण्यांचा आकार १८ मि.मी. असावा. याच तुलनेमध्ये स्थानिक बाजारपेठेकरिता १ ते २ मि.मी. कमी असला तरी चालतो. जर वातावरणातील किमान तापमान यापेक्षा कमी असल्यास मण्याचा आकार वाढवून घेण्यास अडचणी येतील. या वेळी बागेतील तापमान कमी असल्यास बागायतदार संजीवकांची फवारणी करण्याचा प्रयत्न करतात. ही फवारणी घडाच्या विकासात आवश्यक असलेल्या नियोजनापेक्षा जास्त होईल. म्हणजेच यामुळे मण्यांची जाडी न वाढता मण्याची साल जाड होईल. या परिस्थितीमध्ये मण्यात आवश्यक असलेली गोडीही मिळणार नाही. त्याच सोबत फळ काढणीलासुद्धा उशीर होईल. अशा अवस्थेतील द्राक्षवेलीला ताण बसेल व पुढील हंगामात अडचण येण्याची शक्यता असेल. बऱ्याचशा बागेत संजीवकांचा अतिरेक केल्यामुळे व तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे उकड्या ही समस्या द्राक्षबागेत दिसून येते. मणी विरळणी करतेवेळी वापरात आलेली कात्री शेजारच्या नाजूक मण्यालाही घासून जाते. परिणामी कालांतराने संजीवकासोबतच ही गोष्टही उकड्यासाठी कारणीभूत ठरते. बागायतदारांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन बागेत ही विकृती टाळण्याकरिता पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील. १. मण्याच्या विकासात आवश्यक असलेल्या बागेतील तापमानात वाढ करण्याकरिता बोदावर मल्चिंग करणे आवश्यक आहे. यामुळे मुळाच्या कक्षेतील तापमान वाढून मुळे जास्त काळ कार्यक्षम राहतील. यामुळे जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचा पूर्णपणे वापर होऊन मण्याचा आकार बऱ्यापैकी वाढण्यास मदत होईल. २. ज्या बागेत पाणी जास्त प्रमाणात आहे, तिथे मोकळे पाणी दिल्यास किंवा कमी पाणी असलेल्या परिस्थितीमध्ये बोद पूर्णपणे भिजेल अशा प्रकारे पाणी दिल्यास बागेतील तापमानात वाढ होईल. परिणामी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढेल. ३. शिफारशीनुसार संजीवकांची उपलब्धता करावी. शक्यतोवर संजीवकांचा अतिरेक टाळावा. ४. मणी सेटिंगनंतर मण्याचा आकार लवकरात लवकर वाढेल, याकरिता स्फुरदाची उपलब्धता करावी. स्फुरदाची उपलब्धता सहजरीत्या होण्याकरिता स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू (पीएसबी)चा वापर फायद्याचा ठरेल. चुनखडी असलेल्या बागेमध्ये गंधकाची उपलब्धता मुळांच्या कक्षेत करावी. ५. कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची उपलब्धता १४ मि.मी. आकाराच्या मण्यांपर्यंत करून घ्यावी. असे केल्यास पुढील काळात घडांचा सुकवा टाळता येईल. पिंक बेरी समस्या ः तापमानातील चढउतारामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये अडथळे निर्माण होतात. हिरव्या द्राक्षजाती असलेल्या बागेत मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत असलेल्या बागेत कमी तापमानामुळे मण्यांत असलेल्या हिरव्या द्रव्याचे रूपांतर गुलाबी रंगात होताना दिसून येते. यालाच पिंक बेरी म्हटले जाते. बागेतील जास्त कमाल तापमान व कमी किमान तापमान यातील फरकामुळे ही विकृती दिसून येते. सध्यातरी यावर उपाययोजना कार्य करत नसल्या तरी पेपरने द्राक्षघड झाकून घेणे हाच एक उपाय दिसतो. याच सोबत बागेतील तापमान वाढवण्याकरिता ठिकठिकाणी शेकोटी पेटवूनसुद्धा तापमान वाढवता येईल. यावर काही अंशी मात करता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com