द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार उपाययोजना

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या अवस्था आहेत. काही ठिकाणी बागेत घड काढणी झालेली असून, खरड छाटणीची तयारी सुरू होती. तर काही ठिकाणी बागेत घड तसेच आहेत.काढणी करतेवेळी मात्र पाऊस झाला आहे. अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बागेमध्ये कशा प्रकारे उपाययोजना करता येतील, याविषयी माहिती घेऊयात.
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार उपाययोजना
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार उपाययोजना

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या अवस्था आहेत. काही ठिकाणी बागेत घड काढणी झालेली असून, खरड छाटणीची तयारी सुरू होती. तर काही ठिकाणी बागेत घड तसेच आहेत.काढणी करतेवेळी मात्र पाऊस झाला आहे. अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बागेमध्ये कशा प्रकारे उपाययोजना करता येतील, याविषयी माहिती घेऊयात. वेलीवर घड असलेली बाग ः १) या परिस्थितीतील बागेत उपलब्ध घडांची काढणी करणे गरजेचे आहे. परंतू, सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची उपलब्धता नाही. अशा वेळी वेलीवरील फळांबाबत इथाईल ओलिएट (डिपिंग ऑईल) १५ मि.लि. अधिक पोटॅशिअम कार्बोनेट २५ ग्रॅम प्रति लिटर पाणी (टँक मिक्स) या द्रावणाची द्राक्ष घड व्यवस्थित भिजतील अशा प्रकारे फवारणी करावी. २) बऱ्याच बागेमध्ये स्थानिक बाजारपेठेकरिता किंवा निर्यातीकरिता द्राक्ष व्यवस्थापन केले असेल, याचा अर्थ या बागेमध्ये बेदाणा निर्मितीसाठीच्या व्यवस्थापनाच्या तुलनेत थोड्याफार जास्त प्रमाणात संजीवकांचा वापर केला गेला असावा. या बागेत वेलीवर बेदाणा तयार होण्याकरिता थोडा उशीर लागेल. तेव्हा बागेत तीन दिवसानंतर एक या प्रमाणे तीन (किंवा काही परिस्थितीत ४ सुद्धा) फवारण्या कराव्या लागतील. चांगले परिणाम मिळण्यासाठी द्रावणाचा सामू १० ते ११ पर्यंत असणे आवश्यक आहे. या पूर्वीच्या दोन्ही सल्ल्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. बेदाणा तयार होतेवेळी पाऊस आला असल्यास ः १) सांगली विभागामध्ये जुनोनी परिसराला बेदाणा निर्मितीचे हब मानले जाते. या ठिकाणी जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि वारे वेगाने वाहत असल्यामुळे बेदाणा लवकर व चांगल्या प्रतीचा तयार होतो. यासोबत इतर काही ठिकाणीसुद्धा बेदाणा तयार करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसात बऱ्याच भागात एकतर पाऊस किंवा ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढून तयार होत असलेल्या बेदाण्यामध्ये ओलसरपणा वाढला. २) ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तयार होत असलेला चांगला हिरवा बेदाणा लालसर बेदाण्यामध्ये परावर्तित होतो. काही अंशी हा बेदाणा एकमेकांना चिकटतो. त्यावर बुरशींचा प्रादुर्भावसुद्धा होताना दिसतो. यावर मात करण्याकरिता सल्फर धुरळणी करणे गरजेचे असेल.( प्रमाण १ ते १.५ ग्रॅम सल्फर प्रति किलो बेदाणा) यामुळे तपकिरी किंवा लालसर रंगाचा झालेला बेदाणा एकसारखा पिवळा होईल. यामुळे बेदाण्याची प्रत खराब होणार नाही. या सोबत पाऊस संपताच उपलब्ध रॅकमधून हवा निघून जाण्यासाठी पंखे किंवा ब्लोअरचा वापर करावा. यामुळे आर्द्रताही कमी होईल. रिकटची बाग ः नुकत्याच झालेल्या पावसामुळे बागेतील वातावरणात बऱ्यापैकी आर्द्रता वाढल्याचे दिसून येते. पाऊस संपल्यानंतर आर्द्रतेसोबत तापमानसुद्धा वाढताना दिसून येईल. अशा परिस्थितीत दोन गोष्टींवर लक्ष ठेवणे व उपाययोजना करणे गरजेचे आहे. अ) नवीन फुटी जोरात वाढताना दिसतील. यावेळी नवीन फुटींची वाढ काही कालावधीकरिता जोमाने होताना दिसेल. चार ते पाच दिवसानंतर वाढीचा वेग कमी होईल.आपल्याला या वातावरणातील आर्द्रतेचा फायदा घेऊन ओलांडा व मालकाडी तयार करावी. त्या करिता बागेत थोडेफार पाणी वाढवून फक्त नत्र व स्फुरदयुक्त खतांचा (युरिया, १२-६१-०, १८-४६-०, इ) वापर फायद्याचा ठरेल. यावेळी पालाशयुक्त खते शक्यतोवर टाळावीत. काही परिस्थितीमध्ये पाऊस गेल्यानंतर काडीच्या तळातील दोन ते तीन जुनी होत असलेल्या पानांची वाटी होताना दिसून येईल. केवळ अशाच परिस्थितीत सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) एक ते दीड ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी शक्यतो सायंकाळी केल्यास परिणाम चांगले मिळतील. यावेळी वेलीचा वाढीचा जोम लक्षात घेता ओलांडा व त्यावरील मालकाडी लवकर तयार होईल, याची काळजी घ्यावी. ब) किडींचा प्रादुर्भाव ः वाढत्या तापमान व आर्द्रतेमध्ये निघालेल्या नवीन कोवळ्या फुटीवर थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. पोटॅशच्या कमतरतेमुळे जुन्या पानांची वाटी होताना दिसून येईल, तर थ्रिप्स प्रादुर्भावामुळे शेंड्याकडील नवीन कोवळ्या फुटीच्या पानांची वाटी होताना दिसून येईल. तेव्हा बागेमध्ये पालाश कमतरता की थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. थ्रिप्सच्या नियंत्रणाकरिता इमामेक्टिन बेंझोएट (५ एससी) ०.२२ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा सायअॅण्ट्रानिलीप्रोल (१० ओडी) ०.७ मि.लि. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणीसुद्धा सायंकाळी केल्यास चांगले परिणाम मिळतील. जुन्या बागेतील व्यवस्थापन ः १) ज्या बागेमध्ये फळकाढणी झाली असून, बागेला विश्रांती मिळाली आहे, अशा ठिकाणी खरड छाटणीची पूर्वतयारी करणे गरजेचे असेल. या करिता दोन वेलीमध्ये खोडापासून ८ ते ९ इंच जागा सोडून दोन फूट रुंद व तीन ते चार इंच खोल अशी चारी घ्यावी. या चारीमध्ये साधारणतः दीड घमेले शेणखत, (वेलीत ९ बाय ५ फूट अंतर असल्यास) ३०० ते ४०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट (तीन वर्षे पुढील बाग), १० किलो फेरस सल्फेट, १५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट,४ ते ५ किलो झिंक सल्फेट, डीएपी ५० किलो या प्रमाणे बेसल डोस म्हणून चारीमध्ये शेणखतासोबत मिसळून द्यावा. २) बागेमध्ये उपलब्ध चुनखडीच्या प्रमाणानुसार सल्फर शेणखतामध्ये मिसळून घ्यावे. जमिनीत ५ ते १५ टक्के चुनखडी असल्यास ५० ते १०० किलो सल्फर प्रति एकर मिसळावे लागेल. चारी घेतल्यानंतर लगेच शेणखत व अन्य खते टाकून त्यावर हलकासा मातीचा थर लावून चारी लगेच झाकून घ्यावी. चारी घेताना मुळे ३० टक्क्यांपेक्षा जास्त तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. जास्त काळ मुळे उघडी राहिल्यास मुळीच्या पेशी सुकतील व मरतील. परिणामी ओलांडा डागाळण्याचे किंवा मुका होण्याची शक्यता राहील. ३) बाग एकसारखी व लवकर फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईडचा वापर (२० ते २५ मि.लि. प्रति लीटर पाणी) करता येईल. काही ठिकाणी हाताने पेस्टिंग करणे शक्य नसल्यास तितक्याच मात्रेने पंपाने ओलांड्यावर फवारणी करावी. दुसऱ्या परिस्थितीमध्ये वाढत्या तापमानात ( ११ ते १२ आणि ३ ते ४ या काळात पाण्याची फवारणी करावी. ही फवारणी शक्यतो खरडछाटणीच्या पाच दिवसापासून ते पंधरा दिवसांपर्यंत करावी. यामुळे ओलांड्यावर आर्द्रता निर्माण होईल. व बाग लवकर फुटण्यास मदत होईल. ४) काही परिस्थितीत खरडछाटणीच्या वेळी ओलांडा वाढवण्याची गरज असल्यास मागील हंगामातील काडी तारेवर वाकवून सुतळीने बांधून घ्यावी. यावेळी मात्र नवीन वाढवलेल्या काडीवर हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग टाळावे. फक्त जुन्या ओलांड्यावर पेस्टिंग करावे. असे केल्याने नवीन ओलांडा सहजरित्या तयार करता येईल. संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com