agriculture stories in marathi grapes advice by Dr. Somkuwar | Agrowon

पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील उपाययोजना

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. रोशनी समर्थ, डॉ. सुजय साहा
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. हा पाऊस अजूनही सुरूच असून पुढील काळात काही दिवस तरी सुरू राहण्याची शक्यता आहे. याचा वेलीवर होणारा परिणाम आणि उद्भवणाऱ्या अडचणी या संदर्भात माहिती घेऊ.

सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. हा पाऊस अजूनही सुरूच असून पुढील काळात काही दिवस तरी सुरू राहण्याची शक्यता आहे. याचा वेलीवर होणारा परिणाम आणि उद्भवणाऱ्या अडचणी या संदर्भात माहिती घेऊ.

१) खुडा जास्त येणे ः

द्राक्ष विभागामध्ये झालेल्या पावसामुळे तापमानामध्ये बरीच घट झाली असून, आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा अधिक झाली आहे. जमिनीत मुळांच्या कक्षेत पाणी गोळा झाल्यामुळे मुळेही काळी पडण्याची लक्षणे दिसून येतील. अशी मुळे सायटोकायनीनचे उत्पादन कमी करतात. अशा वेळी वेलीमध्ये जिबरेलीन्सचे प्रमाण अचानक वाढते. यामुळे वाढ नियंत्रणात राहत नाही. पेऱ्यातील अंतर वाढते. बगलफुटी वाढतात. त्याच काडीच्या खालील डोळ्यापर्यंत बगलफुटी निघतात. परिणामी काडीच्या परिपक्वतेस अडचणी येतात. घडाच्या विकासात आवश्यक असलेल्या ८ ते १० मि.मी. काडीवर १६० ते १७० वर्ग सें.मी. क्षेत्रफळाची १६ ते १७ पाने पुरेशी होतात. या पानांची पूर्तता झाल्यानंतर आपण त्या काडीवर शेंडा पिंचिंग करतो. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. परिणामी बऱ्याचशा फुटी वेलीवर दिसून येतात. याकरिताच आपण शेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. याला खुडा काढणे असेही म्हणतात. शेंड्याकडून जास्त पानांची पिंचिंग केल्यास (४ ते ५ पाने) त्याला हार्ड पिचिंग म्हणतात. त्यानंतर खाली उपलब्ध असलेल्या डोळ्यामधून फुटी जलद गतीने निघण्यास सुरुवात होते. या फुटी अनावश्यक असल्यामुळे आपल्याला काढून टाकणे गरजेचे असते. फुटी सतत काढल्या गेल्यास त्यामध्ये त्या फुटींच्या वाढीसाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये त्या वेलीमधून घेतली जातात. फुटी काढल्यानंतर ही अन्नद्रव्ये वाया जातात.

डॉगरीज या खुंटावर वाढ जोमाने होताना दिसून येते. म्हणजेच खुडा जास्त दिसतो. ११० आर या खुंटावरील वाढ नियंत्रणात असल्याचे दिसून येते. म्हणजे या खुंटावर खुडा कमी निघतो. काही द्राक्ष जातीमध्येही खुडा जास्त प्रमाणात येत असल्याचे दिसते. उदा. लांब मण्याच्या हिरव्या द्राक्ष जाती. आवश्यक त्या उपाययोजना वेळीच केल्यास वाढ नियंत्रणात ठेवणे सोपे होते. वाढ जास्त झाल्यास हार्ड पिचिंग करण्याचे टाळून शेंड्यांकडील छोटे कोवळे एक पान काढून घ्यावे. यालाच टिकली मारणे असेही म्हटले जाते. यानंतर बागेमध्ये पोटॅशची उपलब्धता वाढवणे आवश्यक असते. त्यासाठी ०-४०-३७ या ग्रेडच्या खताची २.५ ते ३ ग्रॅम किंवा सल्फेट ऑफ पोटॅश ५ ग्रॅम प्रती लीटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. पाऊस असलेल्या परिस्थितीमध्ये पाण्यावर नियंत्रण शक्य होत नसल्यास जमिनीतून या खतांची उपलब्धता न करता फवारणीच्या माध्यमातून पूर्तता करावी.

आपल्याला आवश्यक असलेल्या पानांची गरज पूर्ण झाली असून, ती पाने जुनी व मजबूत झालेली असतील. या पानांवर एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी घेतल्यास पान हिरवेगार व कडक, मजबूत राहिल. मात्र, या तीव्रतेची फवारणी शेंड्याकडील कोवळ्या फुटीवर केल्यास पानांवर स्कॉर्चिंग येईल. अशा पानांची कार्यक्षमता कमी होईल. खुडा कमी प्रमाणात निघेल.

२) अन्नद्रव्यांची कमतरता दिसणे ः

बऱ्याचशा बागेमध्ये जास्त प्रमाणात झालेल्या पावसानंतर पानांच्या वाट्या होणे, पान पिवळे पडणे, पानांच्या शिरा पिवळ्या पडणे व पानांवर तपकिरी डाग दिसणे तसेच पानांच्या खालील बाजूला तांबूस रंगाची भुकटीचे आवरण तयार झाल्याची स्थिती दिसून येईल. ज्या बागेत वेलीस बोद तयार केले होते व पाऊस बऱ्यापैकी झाला असल्यास त्या बोदामधील उपलब्ध अन्नद्रव्यांचा निचरा झाला असेल. वेलीस यावेळी वाढलेल्या जिबरेलिन्सच्या मात्रेमुळे शाकीय वाढ जोरात होताना दिसून येते. ही वाढ जितकी जोमात असेल, तितक्याच प्रमाणात अन्नद्रव्यांची गरजही वाढलेली असेल. हे संतुलन जर बिघडलेले असेल, तर वेलीवर अशाच प्रकारची लक्षणे दिसून येतील. कोवळी फूट जेव्हा वाढायला सुरू होते. त्यावेळी आवश्यक असलेले अन्नद्रव्ये हे आधी जुन्या पानांतून ओढले जाते. यामध्ये उपलब्ध अन्नद्रव्यसुद्धा नवीन फुटीस पूर्ण होत नसल्यामुळे व मुळाच्या कक्षेत सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे हा असमतोल दिसून येतो. परिणामी या समस्या दिसून येतात. काही द्राक्षजातीसुद्धा उदा. लांब मण्याच्या हिरव्या द्राक्ष जातींवर ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतील.

शक्यतोवर जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा करणे टाळावे. फवारणीच्या माध्यमातून सल्फेट स्वरुपात उपलब्ध अन्नद्रव्य असल्यास ३ ते ४ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे फवारणी करावी. उदा. ०-४०-३७ हे खत ३ ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट ४ ग्रॅम, फेरस सल्फेट ३.५ ते ४ ग्रॅम, झिंक सल्फेट ३ ग्रॅम इ. जर हीच अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात उपलब्ध अर्धा ते एक ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे फवारणी करणे फायद्याचे ठरेल. पाऊस उघडल्यानंतर जेव्हा जमीन वापसा स्थितीत येईल, तेव्हा त्वरित जमिनीतून ठिबकद्वारे उपलब्धता करावी. उदा. ०-४०-३७ हे खत ५ किलो प्रती एकर, मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो, फेरस सल्फेट १० किलो, एसओपी २५ किलो प्रती एकर प्रमाणे.

३) बोट्री डिप्लोडियाचा प्रादुर्भाव ः

बऱ्याचशा बागेमध्ये काडी परीपक्वतेच्या अवस्थेत काडी मागेपुढे परिपक्व झालेली दिसेल. तर काही काडीवर रिंग तयार झालेली दिसून येईल. पूर्ण काडी परिपक्व होत नसल्यामुळे पुढील हंगामात अडचणी येतात. कारण आपण फळछाटणीच्या वेळी हिरवी असलेली काडी काढून टाकतो. बोट्री डिप्लोडिया हा अशक्त असा मृत पेशींवर वाढणारी बुरशी आहे. बागेमध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याची प्रमुख कारणे म्हणजे ओलांड्यावर निघालेल्या अशक्त काड्या किंवा उशिरा निघालेल्या फुटी किंवा सुरुवातीच्या काळात कलम झालेले नसल्याची स्थिती, खरड छाटणीनंतर तयार झालेली दाट कॅनोपी आणि जमिनीत वाढलेले नत्राचे प्रमाण ही आहेत. जर खरडछाटणी १० एप्रिलपर्यंत झालेली असल्यास, या बुरशीचा प्रादुर्भाव काडी परिपक्वतेच्या कालावधीत साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जास्त प्रमाणात दिसून येतो. जेव्हा काडीची परिपक्वता सुरू होते (साधारणपणे खरडछाटणीपासून ७० दिवसानंतर) व यावेळी पाऊस सुरू होतो, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव अचानक वाढलेला दिसून येईल. परिणामी काडी मागेपुढे पिकत असताना दिसून येईल. या पावसाळी वातावरणात बुरशीचे बिजाणू जास्त जोमात वाढतात.

यावर प्रभावी उपाययोजना म्हणून वेलीस ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. याकरिता पाणी संतुलित प्रमाणात द्यावे. अन्नद्रव्यांची कमतरता नसेल, याकडे लक्ष द्यावे. कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅंकोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १.५ ते २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या फवाऱणी करावी. त्यानंतर तीन दिवसाने हेक्साकोनॅझोल १ मि.ली प्रती लीटर किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.ली. प्रती लीटर फवारणी करावी.
रोग नियंत्रण व्यवस्थित होण्यासाठी काड्यांवर बुरशीनाशकांच्या फवारणीचे कव्हरेज योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे. ही फवारणी तीन दिवसानंतर पुन्हा एकदा करावी.
काडीचा ओलांड्यावर असलेला कोन आणि सबकेननंतर निघालेल्या बगलफुटीनंतर तयार झालेला कोन या दोन्ही भागात रसायन पोचून पूर्णपणे कव्हरेज झाल्यास नियंत्रण सोपे होईल. यानंतर जमिनीतून ठिबकद्वारे ट्रायकोडर्मा २.५ ते ३ लीटर प्रमाणे आळवणी करावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...