agriculture stories in marathi grapes advice by Dr. Somkuwar | Agrowon

मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावे

डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

बागेत उपलब्ध वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती या लेखात घेऊ.

सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा विचार करता वेगवेगळ्या स्थिती दिसून येत आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून, तापमान वाढलेले आहे. काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे तापमानात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसते. बागेत उपलब्ध वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती या लेखात घेऊ.

मणी विरळणीची अवस्था
बऱ्याचशा बागांमध्ये घडामध्ये मणी सेटिंग झालेले दिसून येईल. मणी सेटिंगनंतर पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत मण्याचा विकास झपाट्याने होतो. यावेळी मात्र सोर्स सिंक संतुलित असल्यास आवश्यक त्या आकाराचे व वजनाचे मणी मिळवणे  सहजशक्य होते. आपण घडांच्या विकासाकरिता फुटीवरील पानांची संख्या निर्धारित करून सुरुवातीस वेलीवरील गरजेपेक्षा जास्त घड व पाने कमी केली. आता या वेळी काडीमधील उपलब्ध अन्नद्रव्याचा साठा व घडाच्या विकासात आवश्यक ती गरज या गोष्टींचा विचार करता पुन्हा सोर्स सिंकचे संतुलन महत्त्वाचे असेल. तेव्हा प्रत्येक घडामध्ये मण्याची संख्या निर्धारित करणे गरजेचे समजावे. 
    प्रत्येक घडामध्ये पाचशे पेक्षा जास्त मणी आढळून येतील. चांगल्या प्रतीच्या द्राक्ष घडाच्या अनुषंगाने द्राक्ष जातींनुसार, तसेच आपल्या उद्देशानुसार (निर्यातक्षम, स्थानिक बाजारपेठेकरिता) घडातील मण्याची संख्या निर्धारित करावी.
    जाड मण्याच्या द्राक्ष जातींमध्ये (उदा. नानासाहेब पर्पल) मण्याचा आकार २४ ते २५ मि.मि. पर्यंत वाढत असल्यास प्रत्येक घडामध्ये ७० ते ७५ मणी पुरेसे होतील. 
    थॉमसन सीडलेस, तास-ए-गणेश, क्लोन टू ए, सुधाकर सीडलेस या सारख्या द्राक्षजातींमध्ये निर्यातीकरिता १०० ते १२० मणी पुरेसे होतील. तर स्थानिक बाजारपेठेकरिता १२० ते १३० मणी पुरेसे होतील. 

प्री ब्लूम अवस्थेमध्ये आपण संजीवकांचा वापर कसा केला, यावर घड किती मोकळा झाला हे अवलंबून राहील. आधीच सुटसुटीत झालेल्या द्राक्षघडामध्ये १५ ते २० पाकळ्या दिसून येतील. मण्याची विरळणी करतेवेळी घडाच्या वरच्या भागात असलेल्या पहिल्या तीन पाकळ्या तशाच राखाव्यात. या पाकळ्यामध्ये अंतर वाढलेले असल्यामुळे सुटसुटीत घड मिळणे शक्य होते. त्यानंतर खालील  
पाकळ्या एकाआड एक कमी कराव्यात. घड जर जास्त प्रमाणात वाढलेला नसल्यास एक पाकळी ठेवून दोन पाकळ्या कमी करता येतील. अशा एका घडावर ८ ते १० पाकळ्या पुरेशा होतील. घडाचा खालील भाग खुडून घेतल्यास (२० ते २५ टक्क्यांपर्यंत) वरील पाकळ्यांची लांबी वाढवणे सोपे होते. पाकळ्यांची विरळणी केल्यानंतर प्रत्येक पाकळीवर उपलब्ध मकळ्यासुद्धा कमी करणे फायद्याचे असते. प्रत्येक पाकळीवरील एकाआड एक मकळी (सेटिंगनंतरचा लहान मणी) कमी केल्यास सुटसुटीत घड मिळणे सोपे होईल.  अशा तऱ्हेने सोर्स आणि सिंकचे संतुलन निर्माण करावे. त्यातून घडाचा व मण्याचा विकास करून घेता येईल. 

संजीवकांचा होत असलेला अतिरेक टाळणे
या वर्षी बऱ्याचशा बागेमध्ये मुळे कार्यरत नसल्यामुळे, तसेच वातावरणातील चढ उतार यामुळे मण्याचा विकास काही अंशी कमी झालेला दिसून येतो. परिणामी बागायतदार वेगवेगळ्या प्रकारची संजीवके वापरण्याचा प्रयत्न करतात. संजीवकांचे चांगले परिणाम मिळण्याच्या हेतूने आपण त्या संजीवकांमध्ये स्टिकर वापरतो. खरेतर कोरड्या वातावरणात मण्याद्वारे संजीवकांचे शोषण काही सेकंदातच होऊन जाते. संजीवकाचे शोषण जर कमी तापमानात चांगले होते. परंतु, क्षेत्र जास्त असल्यामुळे ही प्रक्रिया दिवसभर सुरू असते. अशात उपलब्ध संजीवकांच्या द्रावणात पुन्हा स्टिकर टाकल्यास मण्यावर ते चिटकून राहील. त्याचे डाग दिसण्यास सुरुवात होईल. हे डाग शेवटपर्यंत जात नाहीत. मण्याचा आकार कितीही चांगला झाला तरीही हे मणी ग्राहकाच्या पसंतीस उतरत नाहीत. 
काही बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भावही तितक्याच प्रमाणात दिसून येतो. बुरशीनाशकांची फवारणी करतेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येते. मण्यावर स्कॉर्चिंग होते. कालांतराने मण्यावरील तो भाग काळा पडतो व सुकून जातो. हे टाळण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना उपयुक्त ठरतील.
    द्रावणामध्ये स्टिकरचा वापर करणे टाळावे.
    फवारणी शक्यतो कमी तापमानात घ्यावी. 
    संजीवके व बुरशीनाशकांची एकत्रित फवारणी टाळावी. 
    द्रावणाचा सामू आवश्यकतेप्रमाणे आहे की नाही, हे पडताळून पाहावे.

मणीगळ समस्या
फळछाटणी झालेल्या बागेत फुलोरा अवस्था ते मणी सेटिंग या दरम्यानच्या अवस्थेत मणीगळ करण्याच्या उद्देशाने दोन पद्धतींपैकी एकीचा वापर करतो. एकतर आपण बागेमध्ये पाण्याचा ताण देतो किंवा दुसऱ्या परिस्थितीत संजीवकांचा जास्त प्रमाणात (जीए ४० पीपीएम पर्यंत) वापर करतो. या अवस्थेत जमिनीच्या प्रकारानुसार (हलकी ते भारी जमीन) वेलीला दिलेल्या पाण्याच्या ताणाचे  वेलीवर परिणाम दिसून येतात.  पाण्याचा ताण किती बसला यावर वेलीच्या शरीरशास्त्रीय प्रक्रिया विशेषतः फुलोरा गळ किंवा मणीगळ अवलंबून असते. काही परिस्थितीत वेलीची मुळे चांगल्या प्रकारे कार्यरत असल्यास हा ताण कमी होतो. फुलोरा गळही नियंत्रणात राहते. मात्र, या वर्षी झालेल्या जास्त पावसामुळे मुळांची कार्य करण्याची क्षमता सुद्धा तितक्याच प्रमाणात कमी झालेली आहे. वेलीस जास्त ताण बसला असल्यास मुळांद्वारे आवश्यक असलेल्या सायटोकायनीनयुक्त संजीवकांची उत्पत्ती कमी प्रमाणात होते. अॅबसिसिक आम्लाचे सिंथेसिस काही प्रमाणात होते. अशा या परिस्थितीचा वेलीवर विपरीत परिणाम होऊन वेलीतील संतुलन बिघडते. परिणामी गळ दिसून येते. 
    ही परिस्थिती टाळण्याकरिता द्राक्ष बागेत पाण्याचा ताण टाळावा. 
    मणी सेटिंगनंतर हाताने मण्यांची विरळणी करून घेणे हिताचे ठरेल.   
    वेलीमध्ये संजीवकांचे संतुलन निर्माण करण्यासाठी शेंडा पिंचिंग करून घ्यावे.
    ज्या बागेत आठवड्यापूर्वी शेंडा मारला असला तरी आता गळ अनुभवास येत असल्यास पुन्हा (सुमारे ५० टक्क्यांपर्यंत) फुटींची टिकली मारून घ्यावी.  
    सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी (कमी प्रमाणात) फायद्याची ठरेल. 

रोगाचा प्रादुर्भाव
    सध्या चढ उतार होत असलेल्या वातावरणामध्ये ढगाळ परिस्थिती दिसून येईल. काही ठिकाणी दिवसाचे तापमान जास्त असून, सकाळी दव पडल्याचेही दिसत आहे. ज्या बागेत ढगाळ वातावरण आणि दाट कॅनोपी आहे, तसेच घड फुलोरा अवस्थेच्या पुढे आहे, अशा बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा हेक्साकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा डायफेनोकोनॅझोल ०.५ ते ०.७ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
    ज्या बागेत सकाळी धुके व दव बिंदू जास्त काळ टिकून राहतात, अशा बागेत या पूर्वीचे डाऊनी मिल्ड्यूचे उपलब्ध बिजाणू घडावर प्रादुर्भाव करू शकतील. एकदा द्राक्षघडात बीजाणूने प्रवेश केल्यास त्या घडासाठी कोणत्याही उपाययोजना फायदेशीर ठरत नाहीत. कमी प्रमाणात प्रादुर्भाव दिसल्यास घडाची  बुडवणी (डीपिंग) स्पर्शजन्य बुरशीनाशकांच्या द्रावणात करून घ्यावी. जास्त खराब झालेले घड मात्र बागेबाहेर काढून घ्यावेत. 

 : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, 
मांजरी, जि. पुणे.
 


इतर फळबाग
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...