पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजन

सध्या द्राक्षबागेमध्ये वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांपैकी काडीच्या परिपक्वतेची अवस्था दिसून येते. यांपैकी उशिरा खरड छाटणी झालेल्या बागेतील द्राक्षवेल ही सूक्ष्मघड निर्मितीच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात अशा दोन वेगळ्या परिस्थिती खालीलप्रमाणे अडचणी दिसून येतील.
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजन
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजन

गेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली आहे. जमिनीमध्ये पाणी मुरले असल्यामुळे वातावरणात आर्द्रता ८० टक्क्यांपुढे गेली असेल. तापमानही खाली आलेले दिसते. सध्या द्राक्षबागेमध्ये वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांपैकी काडीच्या परिपक्वतेची अवस्था दिसून येते. यांपैकी उशिरा खरड छाटणी झालेल्या बागेतील द्राक्षवेल ही सूक्ष्मघड निर्मितीच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात अशा दोन वेगळ्या परिस्थिती खालीलप्रमाणे अडचणी दिसून येतील. १) सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी -

  • या वेळी बागेत सूक्ष्म घड निर्मिती होत असताना वाढ नियंत्रणात असणे आवश्यक असते. मात्र बागेत उपलब्ध आर्द्रतेमध्ये वाढ नियंत्रणात ठेवणे शक्य होत नाही. अशा वेळी वेलीच्या पेऱ्यातील अंतर जास्त प्रमाणात वाढेल. परिणामी सायटोकायनीनचे प्रमाणही तितक्याच प्रमाणात कमी होईल. वाढ जास्त प्रमाणात होत असताना शेंडा पिंचिंग केल्यास बगलफुटींची वाढही जास्त प्रमाणात दिसून होईल. यामुळे कॅनोपीचे गर्दी व ढगाळ वातावरण काडी व डोळ्यावर सूर्यप्रकाशाचा अभाव होईल. सूक्ष्म घड निर्मितीस अडचणी येण्याची शक्यता असेल.
  • या अवस्थेतील बागेत बगलफुटी काढण्यावर जास्त जोर द्यावा. उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश काही वेळ तरी डोळ्यावर पडेल.
  • सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी, उदा. ६ बीए १० पीपीएम आणि युरासील २५ पीपीएम या प्रमाणात करावी. उघड्या डोळ्यावर ही फवारणी झाल्यास शोषण चांगले होऊन सूक्ष्मघड निर्मितीस मदत होईल.
  • सूक्ष्मघड निर्मितीस आवश्यक असलेल्या स्फुरदयुक्त खतांचा वापर जमिनीतून व फवारणीद्वारे करावा. उदा. ०-४०-३७ दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तीन ते चार फवारण्या कराव्यात व सव्वा ते दीड किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून उपलब्ध करावी. भारी जमिनीत एसओपी २५ किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून एकदा द्यावे.
  • २) काडीच्या परिपक्वतेची अवस्था - या बागेत वाढत्या आर्द्रतेमुळे शेंड्याकडील फुटींची वाढ जोमात होताना दिसेल. यामुळे परिपक्व होत असलेल्या काडी लांबणीवर जाईल. अशा परिस्थितीत काडीमध्ये तयार होणारा अन्नद्रव्याचा साठासुद्धा कमी होईल. तेव्हा शेंडा पिंचिंग, बगलफुटी काढणे, पाण्यावर नियंत्रण ठेवणे व पालाशयुक्त खतांची फवारणी (०-४०-३७ अडीच ते तीन ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे किंवा ०-०-५० चार ते पाच ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे) करावी.       काही परिस्थितीत बागेमध्ये शेंडा पिंचिंग करतेवेळी वरून पाच ते सहा डोळ्यावर फूट खुडली जाते. यालाच हार्ड पिंचिंग असे म्हणतात. या परिस्थितीत नवीन निघालेल्या प्रत्येक फुटीवर दोन ते तीन घड निघालेले दिसतील. यामुळे आपण घाबरून जातो. बऱ्याचदा असे वाटते की आताच तर घड निघाले तर पुढील हंगामात (फळ छाटणीनंतर) घड निघणार नाहीत. मात्र, आपण ही खुडणी १६ -१७ पानांनंतर काढतो. आणि सरळ काडी असल्यास सहा ते आठ डोळ्यामध्ये घड असतो. या तुलनेत सबकेनच्या काडीवर गाठीवर किंवा शेजारी घडांची जागा निर्धारीत झालेली असते. त्यामुळे या अवस्थेत घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, यावर उपाययोजना म्हणून हार्ड पिंचिंग टाळावे व फक्त शेंड्यावर टिकली मारावी. रोग नियंत्रण -

  • बऱ्याचशा बागेत पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये जिवाणूजन्य करपा व अॅन्थ्रक्नोज या दोन्ही रोगांचा संयुक्त प्रादुर्भाव दिसून येतो. जर बागेत जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल लीफ स्पॉट) व अॅन्थ्रक्नोज या रोगाची लक्षणे नेमकी कशी असतात हे समजून घेणे गरजेचे असेल. नवीन फुटीवर या रोगांचा प्रादुर्भाव मुख्यतः दिसून येईल.
  • ज्या बागेत फक्त अॅन्थ्रॅक्नोजचा प्रादुर्भाव आहे, असा बागेत कासूगामायसीन अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड (संयुक्त बुरशीनाशक) ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाच ते सात दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  • ज्या बागेत फक्त बॅक्टेरियल लीफ स्पॉट आहे, अशा ठिकाणी मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. या बागेत कोणत्याही स्वरूपातील अॅण्टि बॅक्टेरियल्सची फवारणी टाळावी. मॅन्कोझेबच्या फवारणीमुळे बॅक्टेरियल लीफ स्पॉटच्या सोबत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भावही रोखता येईल.
  • जर बागेत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आधीच झालेला आहे, त्या ठिकाणी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड ४ ग्रॅम प्रति लिटर अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर (टॅंक मिक्स) फवारणी करावी. पावसाळी वातावरण असलेल्या परिस्थितीत सिलिकॉनयुक्त अॅडज्युएंट यात मिसळता येईल. डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणाकरिता सध्याच्या परिस्थितीत सीएएयुक्त आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारणी टाळावी.
  • ट्रायकोडर्माचा वापर ठिबक (२ ते ३ एकर प्रती एकर) व फवारणीद्वारे (४ ते ५ मि. ली. प्रति लिटर) केल्यास फायदेशीर ठरू शकते.
  • तांबेरा (रस्ट) - ज्या भागात या पूर्वी व सध्याही तांबेरा प्रादुर्भाव दिसून आला आहे, अशा ठिकाणी क्लोरोथॅलोनील २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com