Agriculture Stories in Marathi, grapes plant grafting | Agrowon

द्राक्षबागेत काळजीपूर्वक कलम करा...

रविवार, 27 ऑगस्ट 2017

सध्याचे वातावरण हे द्राक्षबागेत कलम करण्याकरिता पोषक आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली खुंटरोपे आता कलम करण्याजोगी झालेली असतात. तेव्हा कलम करताना योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

खुंटरोपांची परिस्थिती 

सध्याचे वातावरण हे द्राक्षबागेत कलम करण्याकरिता पोषक आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली खुंटरोपे आता कलम करण्याजोगी झालेली असतात. तेव्हा कलम करताना योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

खुंटरोपांची परिस्थिती 

 • जानेवारी महिन्यात लागवड केलेली रोपे आता कलम करण्यायोग्य झाली आहेत. लागवडीपासून जवळपास ६ ते ७ महिन्यांचा कालावधी झाला. या काळात रोपांची मुळे जमिनीत चांगली पसरलेली आहेत. वेलीचाही चांगला विस्तार झालेला आहे. या वेळी खुंटरोप सशक्त व कलम यशस्वी होण्याकरिता खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.
 • कलम करण्याकरिता बागेत जमिनीच्या वर एक ते सव्वा फूट ८ ते१० मि. मी. जाड सरळ व सशक्त अशा २ ते ३ खुंटकाडीच्या फुटी आवश्‍यक आहेत.
 • फुटी रसरशीत असाव्यात. यालाच ‘सॅप फ्लो’ म्हणतात. ज्या भागात बऱ्याच दिवसांपासून पाऊस नाही किंवा बागेत पाणी कमी दिले जाते, अशा बागेत ही परिस्थिती मिळणार नाही. कलम यशस्वी होण्याकरिता ही परिस्थिती फारच महत्त्वाची आहे. याकरिता बागेत कलम करण्याच्या ३ ते४ दिवसांपूर्वी पाणी द्यावे.
 • बऱ्याचवेळा जुन्या काड्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात. जुन्या काडीमध्ये आवश्‍यक असलेला (कलम करण्याकरिता) रस कमी असतो. यामुळे कलम केल्यानंतर कलम जोड लवकर भरण्याच्या प्रक्रियेत (कॅलस तयार होणे) अडचणी येतात. परिणामी कलम यशस्वी होत नाही. यावर  उपाय म्हणजे अर्धपरिपक्व झालेली खुंटकाडी घ्यावी.
 • बऱ्याचवेळा आपण खुंट काडीस वर काप घेतो. जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर कलम करायचे असते, त्यामुळेच दोन फूट किंवा खुंटकाडी राखून बागायतदार वरच्या फुटी कापून घेतात. बागेत जर तापमान वाढले असल्यास पानाद्वारे पाणीसुद्धा तितक्‍याच वेगाने निघून जाते. त्याचाच परिणाम म्हणजे जमिनीतून पाणी उचलले जाते. ज्या ठिकाणी काप घेतला, त्या ठिकाणी वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे सुद्धा वेलीवर दाब निर्माण होईल. परिणामी काडीमधून (काप घेतलेल्या ठिकाणातून) जास्त प्रमाणात पाणी निघून जाईल. असे झाल्यास कलम यशस्वी होण्यास अडचणी येतील.
 • कलम करण्यापूर्वी काडीवरील बगलफुटी पूर्णतः काढून शेंडा मात्र तसाच वाढू द्यावा. त्यामुळे काडीत रस टिकून राहील.

कलम यशस्वी होण्याकरिता आवश्‍यक बाबी 

 • कलम काडी (खुंटकाडी) रसरशीत असावी.
 • कलम करण्याकरिता वापरण्यात येणारी सायन काडी मात्र परिपक्व असावी.
 • खुंटकाडी व सायन काडीची जाडी एकसारखी असावी.
 • बागेतील वातावरणातील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० टक्‍क्‍यांच्या पुढे असावी.
 • कलम करणाऱ्या व्यक्ती अनुभवी असाव्यात.
 • कलम जोडावर प्लॅस्टिकची पट्टी घट्ट बांधली आहे याची खात्री करावी.

सायन काडीची निवड व प्रक्रिया 

 • सायन काडीची खात्रीशीर बागेतून निवड करावी. या बागेत सतत चांगले उत्पादन देणारी वेल असल्याची खात्री करावी.
 • सायनकाडी रोगमुक्त बागेतून घ्यावी.
 • सायनकाडी परिपक्व काडीवरून घ्यावी.
 • निवडलेली सायन काडी कार्बेंन्डाझीम ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळलेल्या द्रावणात दोन ते तीन तास बुडवून ठेवावी.
 • काडी बागेतून घेतेवेळी पाने व देठासहीत तुकडे करेपर्यंत तशीच ठेवावी. यामुळे काडीतील पाणी वाया जाणार नाही.
 • सायन काडी शक्‍यतो त्याच दिवशी वापरावी. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन काडी घ्यावी.

कलम करणे 
 कलम करतेवेळी खुंटकाडीवर आवश्‍यक त्या ठिकाणी आडवा काप घ्यावा. सायन काडीस पाचर तयार करून खुंटकाडीमध्ये आडवा काप घेतलेल्या काडीवर मध्यभागी उभा काप घेऊन त्यामध्ये सायन काडी घट्ट दाबावी. यालाच पाचर कलम असे म्हणतात. कलम करतेवेळी सायन काडीचा खालचा भाग (पाचर केलेला फक्त) १० पीपीएम ६- बीए च्या द्रावणात एक मिनीट बुडवावा. यामुळे कलम यशस्वी होण्यास चांगली मदत होते.

कलमीकरणानंतर व्यवस्थापन

 • कलम केल्यानंतर बागेत कलम काडी बांबूस सुतळीने बांधून घ्यावी. यामुळे पुढील काळात तयार होणारे खोड सरळ राहील.
 • कलम केल्याच्या ५ ते ६ दिवसांपासून खुंटकाडीवरील फुटी त्वरित काढाव्यात. यामुळे कलम यशस्वी होण्यास बाधा येणार नाही.
 • कलम केल्याच्या १० ते १२ व्या दिवशी डोळा फुगण्याच्या अवस्थेत उडद्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी.
 • कलम डोळा फुटण्याकरिता १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. या वेळी डोळा स्वबळावर फुटणे जास्त महत्त्वाचे असते. अशा फुटलेल्या डोळ्यांची फूट चांगल्या प्रकारे वाढते. त्यामुळे हायड्रोजन सायनामाइडची फवारणी किंवा पेस्टिंग करण्याचे टाळावे.
 • बागेत या वेळी आर्द्रता कमी असल्यास कलमकाडीवर पंपाने पाणी फवारणी करावी.

संपर्क  ः ०२०-२६९५६०६०, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
 

टॅग्स