सकस चाऱ्यासाठी बायफ बाजरी-१
सकस चाऱ्यासाठी बायफ बाजरी-१

सकस चाऱ्यासाठी बायफ बाजरी-१

अपुऱ्या हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन उन्हाळी हंगामात बाजरीच्या बाएफ बाजरी-१ या सुधारित जातीची लागवड केल्यास चांगल्या प्रकारे चारा उत्पादन घेता येते.

अपुऱ्या हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन उन्हाळी हंगामात बाजरीच्या बाएफ बाजरी-१ या सुधारित जातीची लागवड केल्यास चांगल्या प्रकारे चारा उत्पादन घेता येते. बाजरी हे एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे उत्तम पीक आहे. कमी दिवसांत व कमी पाण्यात येणारे पीक आहे. खास हिरव्या चाऱ्यासाठी बाजरीच्या बाएफ बाजरी - १ या जातीची लागवड करावी. या जातीची उन्हाळी व खरीप हंगामात लागवड शक्य आहे. १) हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत चांगली येते. मध्यम ते भारी व निचरा होणाऱ्या जमिनीत फारच फोफावते. पेरणीपूर्वी एक नांगरट करून कुळवाच्या एक जरुरी वाटल्यास दोन पाळ्या देऊन जमीन तयार करावी. २) उन्हाळी हंगामामध्ये पेरणी केल्यास पावसाळा सुरू होईपर्यंत चाऱ्याच्या तीन कापण्या मिळतात. उन्हाळ्यासाठी या जातीची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. मे महिन्यापर्यंत उशिरा पेरणी करता येते, परंतु चाऱ्याच्या कापण्या कमी मिळतात. हेक्‍टरी १० किलो बियाणे लागते. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवून पाभारीने पेरणी करावी. ३) ही जात तीन कापण्यांसाठी पाच ते सहा महिने राहणार असल्याने त्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी ४० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश (२६० किलो १५ः१५ः१५ किंवा २१० किलो १९ः१९ः१९) जमिनीमध्ये मिसळून द्यावे. ४) पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी हेक्‍टरी ४० किलो नत्राचा दुसरा (८५ किलो युरिया) हप्ता द्यावा. पुढे प्रत्येक कापणीनंतर हेक्‍टरी ८० किलो नत्र (१७० किलो युरिया) दोन समान मात्रांमध्ये विभागून द्यावे. पहिली मात्रा पिकाची कापणी केल्यानंतर लगेच पाण्याच्या अगोदर व दुसरी मात्रा २५ ते ३० दिवसांनी द्यावी. ५) पेरणी केल्यानंतर व बाजरी उगवून आल्यानंतर पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात. त्यापुढील पाण्याच्या पाळ्या भारी जमिनीत बारा ते पंधरा दिवसांनी आणि हलक्‍या जमिनीत आठ ते दहा दिवसांनी द्याव्यात. ६) पेरणीनंतर व प्रत्येक कापणीनंतर पंधरा ते वीस दिवसांच्या आत एक खुरपणी आणि शक्‍य असल्यास एक कोळपणी करावी. तण माजू देऊ नये. नंतर पिकाची वाढ जोमाने होत असल्याने फारसे तण होत नाही. कापणी ः १) बाएफ बाजरी-१ या जातीची चाऱ्यासाठी पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. रोज जरुरीप्रमाणे वाफे कापावेत. ५० दिवसांनी कापणी सुरू करावी. ६५ ते ७० दिवसांपर्यंत पहिली कापणी संपवावी. खोडव्याची वाढ जोमदार होण्यासाठी पिकाची कापणी जमिनीच्या वर चार ते सहा इंच ठेवून करावी. दुसरी व तिसरी कापणी, पहिल्या व दुसऱ्या कापणीनंतर अनुक्रमे ४५ ते ५० दिवसांनी करता येते. २) या जातीची फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केली, तर चाऱ्यासाठी पहिली कापणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात, दुसरी कापणी जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि तिसरी कापणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात करता येते. दुसऱ्या कापणीनंतर चारा नको असल्यास तेच पीक धान्य उत्पादनासाठी ठेवता येते. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ः १) पहिल्या कापणीतून हेक्‍टरी ५० ते ५५ टनांपर्यंत हिरवा चारा मिळतो. नंतरच्या दुसऱ्या व तिसऱ्या कापणीपासून हेक्‍टरी ३५ ते ४० टन हिरवा चारा मिळतो. अशाप्रकारे १५० ते १६० दिवसांत (५ ते ६ महिने) या जातीच्या तीन कापण्यांपासून एकूण हेक्‍टरी १२० ते १३० टन हिरवा चारा मिळतो. बाएफ बाजरी-१ जातीची वैशिष्ट्ये ः १) पालेदार, रसाळ, गोड, मऊ, उंच वाढणारी, भरपूर फुटवे असणारी जात. २) चाऱ्याचे जास्त उत्पादन, जोमाने वाढणारी, तीन कापण्या मिळतात. ३) ५ ते ६ महिन्यांच्या कालावधीत तीन कापण्या मिळून भरपूर व चांगल्या प्रतीचा चारा मिळतो. ४) उन्हाळ्यात (फेब्रुवारी पेरणी) ज्वारी व मक्‍यापेक्षा कमी पाण्यावर येते. जास्त उत्पादन मिळते. हिरवा चारा तसेच वाळलेला चाराही पौष्टिक असतो. मुरघासही (सायलेज) चांगला तयार होतो. ५) दोन कापण्यांपासून हिरवा चारा आणि तिसऱ्या कापणीपासून धान्य आणि वाळलेला चाराही मिळतो. धान्य देखील खाण्यास उत्तम आहे. चाऱ्यातील पोषणमूल्ये ः पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना कापल्यास यामध्ये ८.० ते ८.५ टक्के प्रथिने मिळतात. धान्य उत्पादन दुसऱ्या कापणीनंतर पीक धान्य उत्पादनासाठी सोडल्यास साधारणपणे ९० दिवसांत हेक्‍टरी १० ते १२ क्विंटल इतके धान्याचे उत्पादन मिळते. संपर्क ः डॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१ (बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com