सामूहिक शेतीतून महिला गटाने वाढविली आर्थिक उलाढाल 

सामूहिक शेतीतून महिला गटाने वाढविली आर्थिक उलाढाल 
सामूहिक शेतीतून महिला गटाने वाढविली आर्थिक उलाढाल 

वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावामधील राजवीरवाडीतील वीस महिला एकत्र आल्या. त्यांनी प्रगती आणि भाग्यश्री शेतकरी स्वयंसहाय्यता गटाची सुरवात केली. या महिला गटांनी सामूहिक शेतीचा प्रकल्प राबविला. यासाठी दिशान्तर स्वयंसेवी संस्थेने सहकार्य केले. गेल्या तीन वर्षांत या गटांनी सामूहिक शेतीमधून सात लाखांहून अधिक उलाढाल केली आहे. आर्थिक प्रगतीचा राजमार्ग शेतीतून गवसल्याचे गटातील महिलांनी दाखवून दिले आहे. 

नियोजनपूर्वक शेती केल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते हे दाखवून देण्यासाठी चिपळूण येथील दिशान्तर स्वयंसेवी संस्थेने वेहेळे (जि. रत्नागिरी) सामूहिक शेती प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले. यासाठी त्यांनी वेहळेमधील राजवीरवाडीतील प्रगती आणि भाग्यश्री शेतकरी स्वयंसहाय्यता गटांसोबत काम करण्याचे ठरवले. या वाडीत पंधरा वर्षांपूर्वी महिला बचत गट स्थापन करण्यात आले होते. बचत गटांतील महिलांनी राष्ट्रीय बॅंकांकडे शेती पूरक व्यवसायासाठी कर्ज मागितले. परंतु त्या वेळी म्हणावा तसा प्रतिसाद बॅंकेकडून मिळाला नाही. गावात सुपीक जमीन असून देखील शेती परवडत नाही, म्हणून अनेकांनी शेती सोडून मुंबईचा मार्ग धरला होता. अशा परिस्थितीत दिशान्तर संस्थेने २०१४ साली महिला बचत गटांना बरोबर घेवून शेती विकासाचे काम सुरू केले. यासाठी अन्नपूर्णा शेती प्रकल्पाला सुरवात केली. 

बचत गटातून सामूहिक शेतीला सुरवात ः  संस्थेने बचत गटातील महिलांशी चर्चा करत शेती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी यशाची पंचसूत्री तयार केली. यामध्ये सहकारातून शेती, सामुदायिक शेती, महिलांनी केलेली शेती, सेंद्रिय शेती, दलालमुक्त विक्री व्यवस्था असे पंचसूत्री धोरण ठरवले. महिला बचत गटांनी शहरात गेलेल्या शेतकरी कुटुंबांची गावातील पडीक जागा भूईभाड्याने घेतली. पहिल्याच वर्षी (१४-१५) १२.५ एकर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन सुरू झाले. दिशान्तर संस्था आणि डोमिनियन डायमंड (इं) प्रा. कंपनीने शेतीसाठी लागणारे आर्थिक साह्य केले. परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन चार एकर क्षेत्रावर मेथी, पालक, माठ, कोबी, वांगी, भेंडी, फ्लॉवर, मटार, घेवडा लागवड करण्यात आली. साडेतीन एकर क्षेत्रावर पडवळ, कारले, दोडके, तोंडली, दुधी भोपळा, पावटा आणि चवळी आणि पाच एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करण्यात आली. खरिपात भातशेती केली जाते आणि रब्बी हंगामात सामूहिक भाजीपाला शेती केली जाते. 

प्रशिक्षण आणि नियोजनातून प्रगती ः  हंगामानुसार गटातील महिलांनी विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीला सुरवात केली. या दरम्यान पॉवर टिलरने मशागत तसेच पिकाची राखण, पाणी नियोजनासाठी पुरुषांनी महिला गटांना सहकार्य केले. दोन्ही गटातील वीस महिलांनी पहिल्यापासून पिकांचे योग्य व्यवस्थापन ठेवले. गटातील महिलांना शेती कामाच्या नोंदी, पीकनिहाय मनुष्यबळाचा वापर, सेंद्रिय खत निर्मितीची जबाबदारी यासह विक्री व्यवस्थापन अशा कामांची आखणी संस्थेने करून दिली. दलालमुक्‍त भाजीपाला विक्री व्यवस्थेसाठी चिपळूण पालिकेच्या सहकार्याने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ भाजी व कलिंगड विक्री स्टॉल सुरू करण्यात आला. त्यापूर्वी ग्राहकांशी कसे बोलावे, हिशेब कसा ठेवावा याचेही प्रशिक्षण संस्थेने महिलांना दिले. चिपळूण शहरात गटाने टेबल, खुर्ची मांडून भाजी विक्रीला सुरवात केली. शेती काम करणाऱ्या आणि भाजी विक्रेत्या महिलांना खास गणवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गटाची वेगळी ओळख तयार झाली. 

ग्राहकांची शेतीवर शिवारफेरी ः  चिपळूण शहरात भाजीपाला विक्री सुरू करण्यापूर्वी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सव्वाशेहून अधिक नागरिकांना दिशान्तर संस्थेने वेहळे गावात नेले. गावात महिला बचत गटाने केलेल्या भाजीपाल्याचे क्षेत्र ग्राहकांना दाखविण्यात आले. ग्राहकांनी काही प्रमाणात गावामध्ये भाजी खरेदी केली. या शिवारफेरीमुळे भाजीपाला उत्पादक गटाची चिपळूण शहरात ग्राहकांच्याकडून प्रसिद्धी झाली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ग्राहकांच्याकडून चांगल्या प्रमाणात भाजीपाल्याची मागणी वाढू लागली. 

भाजीपाला विक्रीत झाली वाढ ः  पहिल्याच वर्षी तीन महिन्यांत भाजीपाला विक्रीतून महिला गटाने पाच लाख रुपयांची उलाढाल केली. यातून महिलांचे मानधन, लाभांश देऊन राहिलेली रक्कम बचत गटाच्या खात्यावर जमा करण्यात आली. दुसऱ्या वर्षी शेती खर्चासाठी ही रक्कम वापरण्यात आली. पहिल्या वर्षाचा भाजीपाला विक्रीचा अनुभव लक्षात घेऊन गटाने दुसऱ्या वर्षी लागवड क्षेत्रात वाढ केली. दुसऱ्यावर्षी भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचन आणि आच्छादनाचा वापर करण्यात आला. त्याचा उत्पादनवाढीसाठी चांगला फायदा झाला. दुसऱ्या वर्षी गटाने भाजीपाला विक्रीतून सहा लाखांची उलाढाल केली. तिसऱ्या वर्षी सामुदायिक शेती क्षेत्राचा विस्तार २५ एकरांपर्यंत वाढला. कडधान्याचे क्षेत्र वाढले. यातून सात लाखांवर उलाढाल करण्यात गटाला यश आले. 

महिलांना मिळाला शाश्वत रोजगार ः  राजवीरवाडीतील महिला पूर्वी मोलमजुरी करत होत्या. मात्र अन्नपूर्णा शेती प्रकल्प सुरू झाल्यापासून त्यांना वर्षातील सहा महिने हक्काचे काम मिळते. कुटूंब सांभाळून महिला शेतीमध्ये राबतात. जेवढे दिवस काम करतात तेवढ्या दिवसांचे मानधन, वार्षिक लाभांश मिळतो. त्यामुळे आर्थिक प्रगती सुरू झाली आहे. शेतमालाची ने-आण करण्यासाठी गटाने चारचाकी वाहन घेतले आहे. 

दिशान्तर संस्थेची चांगली साथ ः  दिशान्तर संस्थेने डोमिनियन डायमंड (इ)प्रा. लि. या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून महिला बचत गटाला पॉवर टिलर, मोबाईल राईस मिल, भात मळणी यंत्र मिळवून दिले. याशिवाय पाईप, पंप, बि-बियांणांसाठी सहकार्य केले. सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत, दशपर्णी, गांडूळखत, शेणखत निर्मितीसाठी महिलांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतीतज्ज्ञांची साथ मिळाली. गटाला साडेसात लाख रुपयांची आधुनिक यंत्रसामुग्री तसेच तीन लाखांहून अधिक रक्‍कमेचे आर्थिक सहाय्य सेंद्रिय खते, बि-बियाणांच्या खरेदीसाठी करण्यात आले.  श्रमदानातून बंधारा ः  रब्बी हंगामात पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी गटातील महिलांनी श्रमदान करून नदीच्या एका ओहळावर बंधारा बांधला. यामुळे शेतीसाठी शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली. हे लक्षात घेऊन दुसऱ्या वर्षापासून अडरे, कान्हे, सती या गावातील शेतकऱ्यांनी नदीवर श्रमदानातून बंधारे बांधले. यामुळे चांगल्या प्रकारे बंधाऱ्यामध्ये पाणी साठले. त्याचा फायदा रब्बी हंगामातील क्षेत्र वाढीला झाला. 

सामूहिक शेतीतूनच प्रगती  महिला गटाने केलेल्या सामूहिक शेतीमुळे शेतकऱ्यांतील एकसंधपणा, श्रमाला प्रतिष्ठा, क्षमतावृद्धी, समूह गटाची सर्वदूर ओळख झाली. महिलांना तांत्रिक ज्ञानही मिळाले. पिकांचे दर्जेदार उत्पादन वाढले. महिला बचत गटाची सामाजिक पत वाढली. अन्नपूर्णा प्रकल्पातून गटातील महिलांनी आर्थिक प्रगती केली आहे.  संपर्क ः राजेश जोष्टे (अध्यक्ष, दिशान्तर संस्था) ः ९८२२९८७४१०  शेतीमध्ये रूजले नवे तंत्र  सद्यस्थितीत महिला मोठ्या संख्येने शेतीमध्ये राबत आहेत. हे लक्षात घेऊन अल्पभूधारक व भूमीहिन शेतकऱ्यांचा गट तयार करून नवी अर्थव्यवस्था उभी राहू शकते, हे दाखवून देणारा अन्नपूर्णा प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पातून आमच्या वाडीने तीन वर्षात चांगली उलाढाल केली आहे.  - शुभांगी राजवीर (सचिव, प्रगती शेतकरी महिला गट), ७५८८८९२७८८  सेंद्रिय शेतीकडे वाटचाल...  वेहळे गावात सेंद्रिय शेतीबाबत जागृती, मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष सेंद्रिय खताचा शेतीमध्ये वापर सुरू झाला आहे. शेतकरी जीवामृत, दशपर्णी अर्क, कंपोस्ट खत निर्मिती करत आहेत. त्याचा पीक उत्पादनासाठी चांगला फायदा होत आहे.  - आर. के. जाधव (कृषी सहाय्यक)   

राज्यपातळीवर गौरव ः  १) कृषी खात्यातर्फे २०१८ मध्ये जिल्ह्यातील सर्वोकृष्ट शेतीगट म्हणून निवड. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दहा हजारांचा धनादेश आणि चषक.  २) जानेवारी, २०१९ मध्ये मुंबई येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या उपस्थितीत सर्वोकृष्ट स्वयंसहाय्यता महिला गट म्हणून प्रमाणपत्र, धनादेश, ट्रॉफी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com