कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला जातोय शोध

कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला जातोय शोध
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला जातोय शोध

आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात जातींतील जनुकांचा एकत्रित अभ्यास करत आहे. या जनुकांचे नेमके गुणधर्म जाणून घेतल्यामुळे वातावरण बदलाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. सहा जंगली जातींतील जनुकांच्या विविधतेचा फायदा पिकांमध्ये विविध प्रतिकारकता विकसित करण्यासाठी होणार आहे. कलिंगड म्हटले आपल्या डोळ्यासमोर प्राधान्याने मोठ्या आकाराचे, लाल व गोड गराचे फळ येते. हे फळ सामान्य वाळवंटी प्रदेशामध्ये येणारे असले तरी जागतिक पातळीवरील टोमॅटोनंतरचे दुसरे सर्वात लोकप्रिय फळ ठरते. वास्तविक टोमॅटोची गणना भाजीमध्ये केली जात असल्यामुळे कलिंगडाची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचेही म्हटले जाते. मात्र, भविष्यातील तीव्र वातावरणाच्या स्थितीमध्ये योग्य रीतीने वाढून, उत्पादकता टिकवणाऱ्या कलिंगडाच्या लागवडीखालील एक आणि सहा जंगली जातींवर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. सध्या जरी या जाती फिकट, कठीण आणि कडसर चवीच्या असल्या तरी त्यांचे जनुकीय गुणधर्म नव्या जातींच्या पैदाशीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या जातींमध्ये कीड रोगांसाठी प्रतिकारकता असून, दुष्काळाच्या स्थितीमध्ये तग धरण्याची क्षमता आहे. भविष्यामध्ये फळांचा दर्जा सुधारणे शक्य आहे. सध्या या महत्त्वाच्या अशा जनुकीय गुणधर्मांचा वापर अधिक उत्पादनक्षम अशा गोड कलिंगडामध्ये करण्याचा विचार आहे. त्याविषयी माहिती देताना बॉयसे थॉम्पसन संस्थेतील संशोधक झांगजून फेई यांनी सांगितले, की माणसांनी सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी कलिंगडाच्या स्थानिकीकरण करून, ते लागवडीखाली आणले. हळूहळू निवडपद्धतीने लाल, गोड अशा फळांची पैदास करत गेले. मात्र, या प्रक्रियेमध्ये त्यांची रोग आणि अन्य प्रकारच्या ताणांना प्रतिकार करण्याची क्षमता कमी होत गेली. कलिंगडाच्या जनुकांच्या अभ्यासासाठी संशोधकांनी दोन टप्प्यांची प्रक्रिया राबवली असून, नेचर जेनेटिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सुधारित संदर्भ जनुके (रेफरन्स जिनोम) मिळवली असून, त्याचा वापर वनस्पती शास्त्रज्ञ किंवा पैदासकारांना नव्या जातींच्या विकासासाठी सहजतेने करता येणार आहे. २०१३ मध्ये प्रथम फुई यांच्या नेतृत्वामध्ये पूर्व आशियाई देशांमध्ये लागवडीखाली असलेल्या ९७१०३ या जातींची संदर्भ जनुक रचना तयार करण्यात आली. पूर्वी जुन्या शॉर्ट रिड सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर केला जात असे. त्या तुलनेमध्ये आता लाँग रिड सिक्वेन्सिंग तंत्र विकसित झालेले असल्यामुळे अधिक दर्जेदार जिनोम मिळवणे शक्य झाले आहे. त्यांच्या गटाने सात जातींच्या सुमारे ४१४ प्रजातींच्या कलिंगडांच्या सुसंगतवार जनुकीय रचना मिळवल्या आहेत. त्यांची तुलना नव्या तयार केलेल्या संदर्भ जनुकांची करून, उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील विविध टप्पे मिळवण्यात येत आहेत.  

आमच्या विश्लेषणातून पुढे आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या पैदास प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी एक जंगली प्रजाती, C. amarus ही आजवर समजाप्रमाणे सध्याच्या जातींची पूर्वज नसून, वेगळ्या परंपरेतील आहे. आधुनिक जाती या गेल्या काहीशे वर्षांमध्ये सुधारित झाल्या आहेत. त्यातून फळांच्या दर्जाविषयी-विशेषत मोठा आकार, गोडी आणि कुरकुरीतपणा यासाठी जनुकांचे प्रदेश मिळवण्यात आले आहेत. - झांगजून फेई, संशोधक, बॉयसे थॉम्पसन संस्था.

जनुकीय संशोधनाचे असे आहेत फायदे ः

  • गेल्या २०-३० वर्षांमध्ये पैदासकारांनी कलिंगडाच्या दोन जवळच्या प्रजाती C. amarus आणि अन्य दोन जंगली प्रजाती C. mucusospermus आणि C. colocynthis यांच्या संकरातून सूत्रकृमी, दुष्काळ आणि फ्युजारीयम विल्ट, भुरी अशा रोगांसाठी अधिक प्रतिकारक जाती विकसित केल्या आहेत.
  • अॅमनोन लेवी हे अमेरिकन कृषी संशोधन सेवेतील चार्ल्सटन (दक्षिण कॅरोलिना) येथील भाजीपाला प्रयोगशाळेमध्ये कलिंगड पैदासकार आणि जनुकशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणाले, की गोड कलिंगडामध्ये अत्यंत अरुंद जनुकीय पाय असून, जंगली प्रजातींमध्ये जनुकीय विविधता मोठ्या प्रमाणात आहे. या विविधतेचा फायदा नव्या पर्यावरणीय ताणांसाठी व रोगकिडींसाठी सहनशील जाती विकसित करणे शक्य आहे.
  • या आंतरराष्ट्रीय संशोधक गटामध्ये बिजिंग अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड फॉरेस्ट्री सायन्सेस येथील संशोधकांचाही समावेश होता. या फेई व सहकाऱ्यांच्या गटाने नेचर जेनेटिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित संशोधनामध्ये ११७५ कलिंगडे व अन्य जातींचे विश्लेषण मांडले आहे. त्यातून फळांचे वजन, दर्जा व अन्य गुणधर्मांशी जोडलेले २०८ जनुकीय प्रदेश ओळखले आहेत. त्याचा फायदा जगभरातील पैदासकारांना होऊ शकतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com