सुधारित पद्धतीने करा हळद काढणी

सुधारित पद्धतीने करा हळद काढणी
सुधारित पद्धतीने करा हळद काढणी

सर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९ महिने लागतात. यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातींना (उदा. आंबे हळद) तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. तर निमगरव्या जाती (उदा. फुले स्वरूपा) या ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात. गरव्या जाती (उदा. सेलम, कृष्णा) ८ ते ९ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये.

जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९०% पाने ही पिकाचा कालावधी पूर्ण होते वेळी वाळलेली असतात. मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७०% पाने वाळलेली असतात. हे हळद पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते. 

  • हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पाणी बंद करावे. यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. जर शेवटपर्यंत पाणी चालू ठेवले तर हळकुंडाना नवीन फुटवे फुटू लागतात. परिणामी उत्पादनात घट येते. 
  • पाला वाळल्यानंतर १ इंच जमिनीच्यावर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने हळदीचा पाला कापावा. पाला बांधावर गोळा करावा. शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे, त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. हळदीची काढणी करणे सुलभ होते.
  • हळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंबावी. वरंबा सरी पद्धतीत टिकाव अथवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी. गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलीत हळद काढणी यंत्राचा वापर करावा.
  • हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळलेली असल्यास हलके पाणी द्यावे. हळद काढणी सोपी होते.
  • खांदणी करून काढलेले कंद २-३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.
  • २-३ दिवसांनंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकापासून वेगळे होतात. त्या वेळी मात्र जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी सडलेली हळकुंडे अशा कच्च्या मालाची प्रतवारी करावी. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.  
  • अ) जेठे गड्डे      मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. हे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत. ब) सोरा गड्डा लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६०% कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० % कंदाना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्याविरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.  क) बगल गड्डे जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.  ड) हळकुंडे बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यांस लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणात होतो. 

  • हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर साधारणत: १५ दिवसांच्या आत हळदीची प्रक्रिया करावी. म्हणजे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो.
  • जातीपरत्वे सर्व साधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते. प्रक्रिया केल्यानंतर  ३० ते ४० क्विंटल उत्पादन होते.
  • पारंपरिक पद्धतीने हळद खांदणी

  • कंद पूर्णपणे जमिनीतून निघत नाहीत. १० ते १५% कंद जमिनीत राहतात.
  • वंरबा सरी अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या ठिकाणी या पद्धतीने हळदीची काढणी करता येते.
  • एकरी १८ ते २० मजूर लागतात.
  • कंदास इजा होण्याची शक्यता असते.
  • काढणी यंत्राद्वारे हळद खांदणी

  • हे यंत्र कंदाच्या खालून कंद वरती उचलत असल्याने केवळ १ ते २% कंदच जमिनीमध्ये राहतात.
  • केवळ गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची काढणी करता येते.
  • साधारणपणे ८ ते १० लिटर डिझेलमध्ये एक एकर हळदीची काढणी शक्य होते. परिणामी मजूर बचत होते.
  • कंदास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.
  •  ः डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४  : ०२३३-२४३७२७४ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com