agriculture stories in marathi, health of soil maintained with crop alteration | Agrowon

पीक फेरपालटाद्वारे जपा जमिनीची सुपीकता 
डॉ. लिना शिंदे 
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून, अनिश्चित आणि अनियमित पावसामुळे पिकाची उत्पादकता कमी राहते. त्यात अस्थिरता आढळून येते. पिकांचे नियोजन हे मुख्यतः उपलब्ध पाणीसाठा, पिकांना भविष्यात मिळणारा दर यावर अवलंबून असते. कोरडवाहू शेतकऱ्यांचा विचार केल्यास सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हरभरा अशा पिकांचे नियोजन केल्यास चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. 

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून, अनिश्चित आणि अनियमित पावसामुळे पिकाची उत्पादकता कमी राहते. त्यात अस्थिरता आढळून येते. पिकांचे नियोजन हे मुख्यतः उपलब्ध पाणीसाठा, पिकांना भविष्यात मिळणारा दर यावर अवलंबून असते. कोरडवाहू शेतकऱ्यांचा विचार केल्यास सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हरभरा अशा पिकांचे नियोजन केल्यास चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. 

जमिनीचे आरोग्य उत्तम असल्यास त्यातील जिवाणू आणि पिकांचे आरोग्य उत्तम राहते. अशा पोषणतत्त्वांनी युक्त अशा उत्पादनामुळे माणूस आणि पशुधनाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कोरडवाहू जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी दोन ते तीन वर्षांतून किमान एकदा सेंद्रिय आणि -रासायनिक खतांचा पुरवठा केला जातो. मात्र, पिकांच्या वाढीनुसार आणि उत्पादनक्षमतेनुसार सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे आवश्यक असते. या सोबत पिकांचे योग्य प्रकारे नियोजन म्हणजेच फेरपालटाद्वारे जमिनीचे आरोग्य टिकवणे आवश्यक आहे. 

पीक नियोजनातील फेरबदल 

 • एकपीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा. एका हंगामात उपलब्ध क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करण्याऐवजी विविध पिकांचे नियोजन करावे, त्यामुळे जोखीम कमी होते. उदा. पूर्ण क्षेत्रावर कापूस किंवा सोयाबीन घेण्याऐवजी काही क्षेत्रात कडधान्य, ज्वारी, चारापिके तसेच फळपिकांचाही समावेश करावा. 
 • सध्या भविष्यातील पिकांच्या किमतींचा अंदाज बऱ्यापैकी घेता येतो. त्याचप्रमाणे विविध धोरणे उदा. आयात/निर्यात धोरण, साठवणुकीची धोरणे, क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासंदर्भातच्या विविध योजना यानुसार स्वतःच्या शेताचे म्हणजेच त्यातील पिकांच्या लागवडीचे धोरण आखता येते. 
 • गेल्या काही वर्षांपासून पाऊस वेळेवर येत नाही, खंडित पाऊस यामुळे मूग, उडीद व तूर यांसारख्या कडधान्य पिकांच्या लागवडीवर परिणाम होतो. उत्पादनात घट होते. जागतिक हवामान बदलांच्या समस्येत भर पडत चालली असल्याने हा प्रश्न  पुढे गंभीर होत जाणार आहे. वातावरण व हवामान यातील बदलानुसार पीक आराखडा विकसित करावा. त्यातून भविष्यात शेतकऱ्यांना होणारा तोटा कमी करता येईल. 

पद्धत आणि उपाययोजना ः 
१) वर्षातून किमान एकदा जमिनीची मशागत करून एक महिना जमीन उन्हात तापू द्यावी. त्यातून जमिनीचा कस वाढतो, त्यातील किडींचे अवशेष आणि तणांचे नियंत्रण होते. जमिनीची शक्यतो हिवाळ्यात मशागत करून म्हणजेच खोल नांगरट करून मातीचा खालचा थर पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरील माती खोलीवरील थरात करून घ्यावी. 

२) वर्षातून किमान एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेणे. 
खरीप हंगामाच्या सुरवातीला आणि रब्बी हंगामाच्या सुरवातीस किंवा हंगामाच्या शेवटी आणि उन्हाळी हंगामाच्या सुरवातीस किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार ताग, धैंचा, चवळी यांसारखी जलद वाढणारी आणि ६० दिवसांच्या कालावधीत भरपूर वाढ होऊन हिरवा पाला देणारी हिरवळीच्या खतांची पिके जमिनीमध्ये घ्यावीत. दोन हंगामामध्ये पहिल्या पिकांची काढणी झाल्यानंतर आणि पुढील पिकांची पेरणी होण्यादरम्यानच्या कालावधीत हिरवळीच्या पिकांची पेरणी करावी. अशी हिरवळीची पिके फुलांवर येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात. जमिनीचा पोत आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंना खाद्य मिळून त्यांची संख्या वाढते. पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जमिनीमध्ये हिरवळीच्या खत पिकांची लागवड शक्य नसल्यास शेताच्या बांधावर अन्य झाडांसोबतच ग्लिरीसीडिया (गिरीपुष्प) वनस्पतीची लागवड करावी. दोन हंगामादरम्यान त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने जमिनीची मशागत करून गाडावीत. 

३) आंतर पीक पद्धतीचा किंवा मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करणे. 
अ) सर्व पिकांची वाढ व त्यांची अन्नद्रव्ये घेण्याची पद्धत एकसारखी नसते. काही पिकांची मुळे तंतुमय असतात. ती जमिनीच्या पृष्ठभागापासून जास्तीत जास्त ९० सें.मी. खोलीपर्यंत जाऊन तेवढ्याच खोलीपर्यंतची अन्नद्रव्ये शोषून घेतात. शेतामध्ये पिकांची पेरणी करताना एकाच प्रकारच्या पिकांची पेरणी टाळावी. दोन किंवा अधिक वेगवेगळया पद्धतीने मुळांची वाढ होणाऱ्या पिकांची म्हणजेच तृणधान्यांसोबत कडधान्य किंवा गळीत धान्य पिकांची आंतरपीक किंवा मिश्रपीक पद्धतीने शिफारशीनुसार पेरणी करावी. 
ब) एकाच क्षेत्रात दोन हंगामात एकाच वर्गातील पिके न घेता भिन्न वर्गातील पिकांची पेरणी करणे. तृणधान्य पिके हवेतील नत्र शोषून घेत नाहीत तर कडधान्ये पिके हवेतील नत्र शोषून घेतात. गळीत धान्यापैकी भुईमूग हे पीक हवेतील नत्र शोषून घेते. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पिकांची फेरपालट करताना हवेतील नत्र शोषून न घेणाऱ्या पिकांनंतर हवेतील नत्र शोषून घेणाऱ्या पिकांची लागवड करावी. यामुळे जमिनीतील प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी कायम राखली जाते. दोन्ही पिकांची वाढ चांगली होते. 
क) पिकांच्या नियोजनामध्ये हंगामानुसार तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य,भाजीपाला पिके, फुलपिके,फळपिके यांचा समावेश असावा. 

पिकांची फेरपालट करताना... 

 • जमीन हवामान आणि आर्थिक परिस्थितीशी ही पद्धत अनुकूल असावी. 
 • पिकाचे उत्पादन टिकवून व जमिनीची कमीत कमी झीज होईल, याचा विचार करून फेरपालट अवलंबावी. 
 • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकवणे, आणखी वाढविण्यासाठी फेरपालट करताना जमिनीत सुधारणा करणाऱ्या पिकासाठी पुरेसे क्षेत्र ठेवावे. 
 • शेंगवर्गीय पिकांसाठी पुरेसे क्षेत्र ठेवावे. 
 • शेतावरील जनावरांना वैरण व चारा भरपूर देता यावा म्हणून कडवळ व चारा पिकांची तरतूद असावी. 
 • तणे, कीटक आणि रोगांचे नियंत्रणाचाही विचार व्हावा. 
 • आपल्या विभागातील नगदी पिकांसाठी योग्य प्रमाणात क्षेत्र राखावे. 
 • मजुरांचा पूर्ण उपयोग करून घेण्याबरोबरच उत्पादन खर्चातील काटकसर करता येईल, असे नियोजन असावे. 

फेरपालटीचे फायदे : 

 • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकून राहतात, त्याममुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. 
 • जमिनीच्या निरनिराळ्या थरांतील अन्नद्रव्यावर वाढणाऱ्या व वेगळ्या प्रमाणात गरज असलेल्या पिकांच्या समावेश केल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्याचेही संतुलन साधले जाते. 
 • पिकाच्या विविधतेमुळे प्रतिकूल हवामान, कीड व रोग यांचे नियंत्रण सुलभ होऊन नुकसान जोखीम कमी होते. 
 • मजुरांचे नियोजन योग्य प्रकारे करता येते. 
 • वर्षभर काही ना काही नियमित उत्पन्न मिळत राहते. 
 • जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. 
 • कुटुंबाची व पशुधनांच्या पोषकतेच्या गरजांची पूर्ती करता येते. 

पिकांची फेरपालट उदाहरणे : 
बाजरी- रब्बी ज्वारी - कापूस 
बटाटा- गहू- भाजीपाला पिके 
ऊस - गहू- हरभरा- मका. 
कांदा- रब्बी ज्वारी- कापूस 
बाजरी- गहू- कडवळ 

डॉ. लिना शिंदे, ७३५०७८५४१९ 
(सहायक प्राध्यापक, पी.आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती) 

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...