भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
टेक्नोवन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल शाश्वत
अत्याधुनिक तंत्राने शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक करणे शक्य आहे. जगभरामध्ये शेतीमध्ये प्रचंड बदल होत असून, त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे.
पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. अत्याधुनिक तंत्राने शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक करणे शक्य आहे. जगभरामध्ये शेतीमध्ये प्रचंड बदल होत असून, त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे.
उच्च तंत्रज्ञानयुक्त शेती म्हणजे शेतीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे होय. पारंपरिक शेतीमध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध प्रकारे वापर करता येतो. अर्थात, नव्या तंत्रज्ञानासाठी विविध नव्या बाबी आणि विशेष उपकरणांची आवश्यकता असते. यासाठी नवे काही शिकण्याची तयारी आणि भांडवलही गरजेचे असते. मात्र, यातून कृषी उत्पादन आणि दर्जा दोन्ही सुधारणे शक्य होते. यातून हा भांडवली खर्च लवकरात लवकर वसूल होऊ शकतो. नव्या तंत्रज्ञानामुळे हंगामी आणि बिगरहंगामी पिके घेता येऊ शकतात.
उच्च तंत्रज्ञानाचे फायदे :
१. प्रति एकर क्षेत्रामध्ये उच्च उत्पादनक्षमता मिळू शकते. विविध अचूक घटकांमुळे उत्पादनात २ ते ४ पट वाढ शक्य होते.
२. सिंचनाच्या पाण्यामध्ये (५० टक्केपर्यंत), तर खतामध्ये (२५ टक्के पर्यंत) बचत शक्य होऊ शकते.
३. गुणवत्तेत चांगली वाढ आणि एकरूपता दिसते
४. समपातळीत नसलेली, क्षारयुक्त, पाण्याचा साठा, वालुकामय आणि डोंगराळ जमिनीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. कारण यामध्ये उदासीन माध्यमांचा वापर केला जातो.
उच्च तंत्रज्ञान शेतीसाठी संभाव्य क्षेत्रे :
१. शहरी आणि निम-शहरी भागात वर्षभर भाज्या, फळे आणि फुले यासारख्या ताज्या उत्पादनांची आवश्यकता पूर्ण करता येते.
२. विविध कारणाने घटलेला जमिनीचा दर्जा, वातावरणातील विविध तीव्र घटक (उदा. बर्फवृष्टी होणे इ.) यामुळे पिकाची लागवड शक्य नसलेल्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
३. दुष्काळग्रस्त भाग, वाळवंटी प्रदेश, किंवा अन्य कारणाने मर्यादित असलेले जल स्रोत व साधने यावर पाण्याचा कार्यक्षम वापर किंवा पुनर्वापर हे उत्तर ठरू शकते.
५. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात तरुणांसाठी कृषी व्यवसायात विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
माती विरहित शेती:
मातीविरहित अन्य माध्यमांमध्ये पिकाची लागवड केली जाते. या तंत्रामध्ये पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये ७० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊ शकते. भाजीपाल्याची लागवड प्राधान्याने पोषक द्रव्ये असलेल्या पाण्यामध्ये केली जाते. या पाण्याचा पुनर्वापर शक्य असतो.
फायदे :
१. वेगवान वाढ, बिगरहंगामी उत्पादन शक्य
२. वातावरण नियंत्रित शेती
३. पाणी आणि पोषक घटकांच्या वापरामध्ये कमालीची घट
४. कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन शक्य.
ॲक्वापोनिक्स सोलर ग्रीन हाऊस (मत्स्योत्पादनासह सौर ऊर्जाचलित संरक्षित शेती)
संरक्षित शेतीसाठी सामान्यतः पॉलिहाऊस किंवा शेडनेटचा वापर केला जातो. मात्र, या छतावर काही प्रमाणात सौर आणि फोटोव्होल्टाईक प्रणाली बसविल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा त्यातून उपलब्ध होऊ शकते. या सोबतच पाण्याच्या टाक्यांमध्ये माशांची वाढ करता येते. माशांची विष्ठा ही पिकांसाठी खत म्हणून उपयोगी ठरते. पाण्याचा पुनर्वापर होत असल्याने पाण्यामध्येही मोठी बचत होते.
फायदे :
१. उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते.
२. लक्षणीय पाणी बचत होते.
३. वर्षभर उत्पादन शक्य.
४. विविध हंगामात व बिगर हंगामी उत्पादनामुळे चांगला दर मिळण्यास मदत.
हायड्रोपोनिक्स
वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी मुळे, पाणी, पोषक आणि ऑक्सिजन दरम्यान अस्तित्वात असलेले अडथळे दूर केले जातात. पाण्यात विरघळणारी पोषक खनिजे द्रावण स्वरूपात वापरून मातीशिवाय वनस्पती वाढवण्याची ही एक पद्धत आहे.
-हायड्रोपोनिक प्रणालीमध्ये विद्राव्य खतांचा वापर केला जातो. मात्र, त्यासोबत मत्स्यपालन, बदल पालन इ. ही शक्य होते. हायड्रोपोनिक्स तंत्राने सध्या विविध भाज्यांचे उत्पादन जगभरामध्ये घेतले जात आहे. उदा. टोमॅटो, काकडी आणि पालक (लेट्यूस).
फायदे :
१. पाण्याचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक कार्यक्षम वापर.
२. समान क्षेत्रामध्ये उत्पादनामध्ये ३ ते १० पट वाढ.
३. शहरी भागात कमी जागेतही उत्पादन शक्य असल्याने कापणी आणि विक्री यातील कालावधी कमीत कमी ठेवता येतो. अंतिम उत्पादनाचे पौष्टिक मूल्य टिकून राहते.
४. हवामान नियंत्रित वातावरणामुळे हवामान आणि मातीची परिस्थिती अनुकूल नसलेल्या ठिकाणीही शेती करता येते.
५. यामध्ये तणे व कीडींचा समस्या फारशी उद्भवत नाही.
हवेतील शेती (एअरोपोनिक्स) ः
हवेमध्ये मुळांच्या वाढीसाठी योग्य वातावरण आर्द्रता, ओलावा पुरवले जाते. यामध्येही पिकांच्या वाढीसाठी पोषक घटकांची उपलब्धता मुळांवर फवारणीद्वारे केली जाते.
फायदे :
१. यात पारंपरिक शेतीपेक्षा कमी ऊर्जा आणि पाण्याचा वापर करते.
२. आर्द्रतायुक्त हवा हीच रोपांच्या वाढीसाठी एक माध्यम म्हणून वापरली जाते. परिणामी मृदाजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
३. या प्रणालीमध्ये, वनस्पती मुळांना वाढीसाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत राहतो. परिणामी झाडाच्या रोगमुक्त व वेगवान वाढीस प्रोत्साहन मिळते. हवेतील धुके व आर्द्रतेचा उपयोग वनस्पतीच्या मुळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी होतो.
४. पिकांचे प्रत्येक मुळ आपण तपासू शकतो. पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवणे, योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होते.
मजल्यांची शेती ः
मजल्यांमध्ये किंवा उभ्या रचलेल्या थरांमध्ये पिके घेण्यास मजल्यांची शेती किंवा व्हर्टिकल फार्मिंग असे म्हणतात. यात वरील हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स आणि एअरोपोनिक्स यापैकी योग्य त्या मातीविरहित माध्यमांचा वापर केला जाते. कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी तापमान, आर्द्रता आणि पोषण नियंत्रित वातावरण बंदिस्त ठिकाणी तयार केले जाते. प्रत्येक मजल्यावर सूर्यप्रकाश पोचेल अशा पद्धतीने रचना केली जाते. अथवा कृत्रिम पद्धतीने प्रकाश व्यवस्था केली जाते.
फायदे :
१. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये शेतीचे क्षेत्र मर्यादित राहणार आहे. अशा वेळी भविष्यातील अन्नधान्याची मागणी पुरवण्यासाठी या सुधारित तंत्रज्ञानाशिवाय पर्याय राहणार नाही.
२. यात वर्षभर पिकांची वाढ शक्य आहे.
३. पाण्यामध्ये लक्षणीय बचत शक्य.
४. बाह्य विपरीत हवामानाचा पिकांवरील परिणाम तंत्रज्ञानाद्वारे टाळला जातो.
डॉ. रश्मी बंगाळे, ९८८१७७५०९५
(वरिष्ठ संशोधन सहाय्यक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
फोटो गॅलरी
- 1 of 22
- ››