कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची निवड

आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहेत. अशा वेळी आपल्या स्वतःच्या शेतीसाठी नेमका कोणता ट्रॅक्टर निवडावा, याबाबत शेतकऱ्यांना अडचण येते. ट्रॅक्टरची निवड करताना कोणत्या बाबी व निकष लावले पाहिजेत, याची माहिती घेऊ.
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची निवड
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची निवड

आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहेत. अशा वेळी आपल्या स्वतःच्या शेतीसाठी नेमका कोणता ट्रॅक्टर निवडावा, याबाबत शेतकऱ्यांना अडचण येते. ट्रॅक्टरची निवड करताना कोणत्या बाबी व निकष लावले पाहिजेत, याची माहिती घेऊ. अलीकडे ट्रॅक्टरचा वापर विविध कामांसाठी वाढला आहे. आज बाजारात बरेच स्वदेशी आणि विदेशी ब्रॅण्डचे ट्रॅक्टर आहेत. सर्व प्रकारच्या शेतीशी संबंधित कामे पार पाडण्यासाठी सक्षम बनवलेले असतात. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या गरजा पाहून कंपन्या आपल्या ट्रॅक्टरमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडत असतात. आपण ट्रॅक्टर खरेदी करत असताना आपल्याला त्याविषयी काही माहिती असणे आवश्यक आहे.

  • ट्रॅक्टरची निवड करताना आपल्याकडील लागवडीचे क्षेत्र, दरवर्षी घेतली जाणारी पिके, फळबागांचे प्रकार यांचा अंदाज घ्यावा. आपल्याला कोणकोणत्या कामांसाठी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे, उपकरणे वापरायची आहेत. याचा विचार करावा. या घटकांसाठी आवश्यक तांत्रिक बाबी समजून घ्याव्यात. त्यानुसार योग्य पीटीओ पॉवर असलेल्या ट्रॅक्टरची निवड करावी. त्यामुळे इंधनाचा वापर व देखभाल खर्च कमी होतो.
  • ट्रॅक्टरची नेमकी ताकद, इंधनाचा वापर या बाबत चाचण्या घेण्यासाठी ट्रॅक्टर निर्मात्यांकडे अनेक सुविधा असतात. त्या जाणून घ्याव्यात. मुख्यतः पीटीओ हॉर्सपॉवर, हायड्रॉलिक हॉर्सपॉवर व ड्रॉबार हॉर्सपॉवर (खेचण्याची क्षमता) या चाचण्या महत्त्वाच्या असतात. त्या करण्याची सुविधा ट्रॅक्टर निर्मात्या कंपनीकडे असली पाहिजे.
  • आपल्या शेतीमध्ये जी कामे ट्रॅक्टरद्वारे करावयाची आहेत, ती करण्याची क्षमता ट्रॅक्टरमध्ये आहे का, याची चाचपणी करावी.
  • ट्रॅक्टरच्या ताकदीसोबतच इंधनाचा होणारा वापरही पाहणे गरजेचे असते.
  • निर्मात्या कंपनीचे सेवा केंद्र (सर्विस सेंटर) आसपास आहे का, त्याचे सुट्टे भाग (स्पेअर पार्ट) बाजारात सहज व स्वस्त उपलब्ध आहेत, याची खातरजमा करून घ्यावी.
  • चाचणी अहवालाचे महत्त्व ः भारतामध्ये ट्रॅक्टरच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या या बुधनी (मध्य प्रदेश) येथील मशीनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये केल्या जातात. तिथे विक्रीयोग्य किंवा व्यावसायिक उत्पादनासाठी तयार करण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या प्रयोगशाळेमध्ये व प्रत्यक्ष शेतामध्ये चाचण्या घेतल्या जातात. मुख्यतः पीटीओ हॉर्सपॉवर , हायड्रॉलिक हॉर्सपॉवर व ड्रॉबार हॉर्सपॉवर (खेचण्याची क्षमता) अशा प्रयोगशाळा व शेतातील चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या ट्रॅक्टरला चाचणी अहवाल प्रमाणपत्र दिले जाते. असे चाचणी अहवाल उत्तीर्ण असलेले ट्रॅक्टर पुढे शासकीय अनुदानासाठी पात्र ठरू शकतात. शासकीय अनुदानासाठी पात्र ट्रॅक्टरची माहिती बुधनीच्या संकेत स्थळावर (http://fmttibudni.gov.in) उपलब्ध आहे. ती खरेदीपूर्वी नक्की पाहावी. आपण निवडलेला ट्रॅक्टर त्या यादीमध्ये आहे का, हे पाहावे. ट्रॅक्टर चाचणी अहवालाची माहिती घ्यावी. ट्रॅक्टरमध्ये उपयुक्त शक्ती काय आहे?

  • ट्रॅक्टरमध्ये मुख्यतः पीटीओ हॉर्सपॉवर, हायड्रॉलिक हॉर्सपॉवर व ड्रॉबार हॉर्सपॉवर (खेचण्याची क्षमता) च्या रूपात ही शक्ती (पॉवर) मिळते.
  • पीटीओ हॉर्सपॉवरचा उपयोग रोटाव्हेटर, मळणी यंत्र, सिंचन पंप इ. चालवण्यासाठी केला जातो.
  • हायड्रॉलिक हॉर्सपॉवर हे शक्ती शेती अवजारे उचलण्यासाठी व त्यांचा शेतीत वापर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • शेतीमालाची ओढून म्हणजेच ट्रेलरद्वारे वाहतूक करण्यासाठी ड्रॉबार हॉर्सपॉवर उपयुक्त ठरते.
  • भविष्यातील समस्या कमी करण्यासाठी... शासकीय नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरवर ही माहिती देणे अत्यावश्यक आहे. ती तपासून घ्यावी. आपल्या ट्रॅक्टरला सर्वाधिक कामे कोणत्या प्रकारची असणार आहेत, याचा अंदाज घ्यावा. त्या क्षमतेचा ट्रॅक्टर निवडावा. ज्या ट्रॅक्टरची ताकद अधिक, तो ट्रॅक्टर अधिक सक्षम असतो. हे खरे असले तरी तुमच्याकडे लहान क्षमतेचे काम सातत्याने असल्यास त्यासाठी अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर चालवल्यास इंधनाचा वापर अधिक होईल. कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे अधिक क्षमतेचे काम करण्याचा प्रयत्नही ट्रॅक्टरच्या एकंदरीत आयुष्यासाठी फायद्याचा राहत नाही. या दोन्ही पर्यायाने ट्रॅक्टरचा खर्च (इंधन आणि देखभाल खर्च दोन्ही) वाढेल. ट्रॅक्टरवर पीटीओ पॉवर कोठे असते? सर्व ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या ट्रॅक्टरवर उजव्या बाजूला चालकास दिसेल अशा जागेवर कायमस्वरूपी प्लेट देतात. त्यावर इंजीन क्रमांक, चॅसिस क्रमांक, ट्रॅक्टर बनविण्याची तारीख आणि इतर संबंधित तपशील दिले जातात. त्याच प्लेटवर पीटीओ पॉवर (कि. वॉट किंवा एचपी) याची माहिती दिलेली असते. संपर्क : अतुल भाऊसाहेब घुले, atul४१२५०@gmail.com (सिनियर इंजिनिअर, महिंद्रा संशोधन केंद्र, चेन्नई.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com