उंदीर खाणाऱ्या माकडांमुळे तेलताड बागा राहतात जिवंत

उंदीर खाणाऱ्या माकडांमुळे तेलताड बागा राहतात जिवंत
उंदीर खाणाऱ्या माकडांमुळे तेलताड बागा राहतात जिवंत

वराह शेपटीच्या माकडे ही तेलताड बागेतील उंदरांचा फडशा पाडतात. यामुळे तेलताड जिवंत राहण्यासाठी मदत होत असल्याचे निष्कर्ष लेइप्झिंग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये काढण्यात आले आहेत. हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. पालतेल हे विविध प्रक्रिया पदार्थामध्ये किंवा पॅकेजिंग उत्पादनामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे वनस्पतिजन्य तेल आहे. तेलताड जिवंत राहण्यासाठी माकडे एका पद्धतीने मदत करत असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्यपणे माकडे ही झाडांच्या किंवा फळझाडाच्या नुकसानीसाठी कारणीभूत मानली जाते. मात्र, त्यांच्यामुळे तेलताडाच्या होणाऱ्या नुकसानीच्या बदल्यात ते करत असलेले काम अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. ही माकडे तेलताडाच्या बागेमध्ये अत्यंत नुकसानकारक ठरणाऱ्या उंदरांचाही फडशा पाडतात. त्याविषयी माहिती देताना लेइप्झिंग विद्यापीठातील संशोधक अॅना होल्झनर यांनी सांगितले, की तेलताडाच्या खोडामध्ये असलेल्या पोकळीत दिवसा उंदीर लपून राहतात. हे उंदीर रात्रीच्या वेळी बाहेर पडून तेलताडाच्या फळांचे मोठे नुकसान करतात. एक माकडांचा गट प्रति वर्ष सुमारे ३ हजारांपेक्षा अधिक उंदराचा फडशा पाडतो. परिणामी ज्या बागेमध्ये या माकडांची वर्दळ असते, तिथे उंदरांची संख्या अन्य बागांच्या तुलनेमध्ये ७५ टक्क्याने कमी राहते. परिणामी उंदीर मारण्यासाठी जहाल कीटकनाशकांचा वापर करण्याची आवश्यकता अत्यंत कमी होते. युनिव्हर्सिटी सैन्स मलेशिया येथील संशोधिका नॅडिन रुप्पेर्ट आणि त्यांचा गट हा २०१३ पासून दक्षिणेतील वराह शेपटीच्या माकडांच्या वर्तन आणि परिस्थितीचा अभ्यास करत आहे. या अभ्यासामध्ये जंगली माकडे ही अनेक वेळा तेलताडाच्या बागेमधे आपला वेळ घालवत असल्याचे दिसून आले. अनेक वेळा तेलताडाच्या परिसरामध्ये या माकडांनी वसाहत केल्याचेही दिसून आले. मग ही माकडे बागेमध्ये नेमकी काय करतात, याविषयी कुतूहल निर्माण झाले. प्रथम ही माकडे तेलताडाची फळे खात असल्याचे दिसून आले. जरी ही माकडे प्रति वर्ष सुमारे १२ टनापेक्षा अधिक फळे खात असली तरी ती एकूण उत्पादनाच्या केवळ ५.६ टक्के असतात. मात्र, याची भरपाई ते झाडांच्या १० टक्क्यापेक्षा नुकसानीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांचा फडशा पाडतात. या विषयी माहिती देताना रुप्पेर्ट यांनी सांगितले, की वराह शेपटीची माकडे तेलताडावरील उंदीर खात असल्याचे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा खरेतर धक्काच बसला. ही मोठ्या आकाराच्या उंदराची शिकार आम्हांला अपेक्षित नव्हती. त्याही पुढे जाऊन ही फळे खाणारी माकडे असूनही उंदराचे मांस ते खात असल्याचे पाहिल्यानंतर धक्का बसला. कारण ही माकडे क्वचित प्रसंगी लहान पक्षी किंवा पाली खात असले तरी नियमित मांस खाणारे नाहीत. हे लक्षात येताच रुप्पेर्ट यांनी त्वरित उंदराच्या नियंत्रणातील माकडांच्या भूमिकेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी मलेशियातील तेलताडाच्या बागांना नियमित भेटी दिल्या. त्यातून त्यांना माकडांमुळे उंदराचे नियंत्रण झाल्यामुळे पिकाचे नुकसान कमाल १० टक्क्यांपासून तीन टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. म्हणजेच पिकाच्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ होत असल्याचे दिसून आले. हे पीक ४.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जात असल्यामुळे प्रति वर्ष ६.५ लाख डॉलर प्रति वर्ष इतके उत्पन्न वाढते.  

सध्या तेलताड बाग धारक खासगी आणि सार्वजनिक शेतकरी हे माकडाच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे उपाय राबवत असतात. विशेषतः माकडांचे रहिवास असलेली झाडे काढून तेलताडाची लागवड केली जाते. या नव्या संशोधनामुळे माकडे थोडे नुकसान करत असले तरी अंतिमतः झाडे उंदरापासून वाचवण्याचे मोठे कार्य करत असल्याचे दिसून आले. त्याचा झाडे आणि जंगली माकडे या दोघांनाही फायदा होणार आहे. त्याच्या येण्याजाण्यासाठी खास मार्ग तयार करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि तेल उत्पादक कंपन्यांसह काम करण्यात येणार आहे. - अंजा विड्डिग, वरिष्ठ संशोधक, लेईप्झिंग विद्यापीठ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com