वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांची निवड महत्त्वाची आहे. पीक फेरपालटीमध्ये शेंगवर्गीय पिकांचा समावेश करावा. दरवर्षी सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या स्त्रोताद्वारे जमिनीत मिसळावेत.
 वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांची निवड महत्त्वाची आहे. पीक फेरपालटीमध्ये शेंगवर्गीय पिकांचा समावेश करावा. दरवर्षी सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या स्त्रोताद्वारे जमिनीत मिसळावेत. जमिनीत असलेली सच्छिद्रता ही पाणी आणि हवेने व्यापलेली असते. त्यांचे एकमेकांशी प्रमाण विरोधाचे असते. जमिनीमध्ये हवेचे प्रमाण वाढले तर पाण्याचे प्रमाण कमी होते आणि पाण्याचे प्रमाण वाढले तर हवेचे प्रमाण कमी होते.त्यांचे योग्य प्रमाण असणे पीक आणि जिवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक असते.जमिनीचा दुसरा प्रमुख घटक जमिनीतील घनपदार्थ. यांचे अंदाजे प्रमाण ४५ टक्के हे असेंद्रिय (खनिज) पदार्थाने व्यापलेले असते आणि ५ टक्के सेंद्रिय पदार्थाने व्यापलेले असते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ०.३ टक्के ते १.५ टक्के एवढे आहे. याचा अर्थ ४८.५ टक्के ते ४९.७ टक्के असेंद्रिय पदार्थ असतात. जमिनीमध्ये सूक्ष्म वनस्पतीचे अवशेष, सूक्ष्म जिवाणू आणि कुजत जाणारे आणि कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात. सेंद्रिय पदार्थ मृदेची जडण घडण, ओलावा धरून ठेवणे,पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा हळुवारपणे करणे , जमिनीचा कठीणपणा कमी करणे, पाण्याचा योग्य निचरा आणि जमिनीच्या सामुचे नियमन करण्यास मदत करतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर परिणाम करणारे घटक १) विभागातील पाऊस, तापमान,जमिनीतील ओलावा आणि जमिनीची सच्छिद्रता यांचा परिणाम सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यावर होत असतो. २) दमट आणि उष्ण हवामानामध्ये सेंद्रिय पदार्थ जलद गतीने कुजतात. थंड आणि कोरड्या हवामानामध्ये सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होते. ३) थंड प्रदेशामध्ये सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया मंद गतीने होत असल्याने तेथे सेंद्रिय पदार्थ जमिनीत साठवले जातात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. या जमिनी सेंद्रिय शेतीसाठी पूरक ठरतात. ४) महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद गतीने होऊन त्याचा ऱ्हास होत असतो. कारण आपला भूप्रदेश समशीतोष्ण कटिबंधात येतो.त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी दिसून येते. सेंद्रिय शेतीची ही प्रमुख अडचण आहे. सेंद्रिय कर्ब कमी म्हणजेच पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा कमी. तसेच कमी सेंद्रिय कर्बामुळे मातीच्या इतर पूरक गुणधर्मावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. त्याचा सेंद्रिय शेती उत्पादनावर परिणाम होतो. ५) जमिनीमध्ये जर सच्छिद्रता जास्त असेल आणि ओलावा कमी असेल तर सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास जास्त होतो. त्या उलट पाणथळ जमिनी ज्यामध्ये पाणी साचलेले राहते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तेथे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजत नाहीत, सेंद्रिय पदार्थांचा साठा दिवसेंदिवस वाढत जातो. ६) जमिनी गवताळ असतील तर त्या जमिनीचे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. कारण तंतुमुळे आणि गवताचा जीवनक्रम कमी कालावधीचा असल्याने सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण होत जाते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण गवताळ जंगलामध्ये सेंद्रिय कर्ब तुलनात्मक दृष्ट्या मोठे वृक्ष असलेल्या जमिनीपेक्षा जास्त आढळतो. मोठे वृक्ष असलेल्या जमिनीवर कमी पालापाचोळा पडत असतो. मुळे खोलवर गेलेली असतात, जारवा कमी असतो. त्यामुळे जमिनीच्या १५ ते २० सेंमी थरामध्ये सेंद्रिय पदार्थ तुलनेने कमी प्रमाणात असतात. सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन १) पिकांचे जास्त अवशेष जमिनीवर पडतात तेथे आणि ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात जमिनीला दिले जातात अशा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात आढळतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असते. २) जमिनीत गाडले जाणाऱ्या पिकांच्या अवशेषांचे कर्ब : नत्र प्रमाण जर कमी असेल (३०:१ पेक्षा कमी) तर असे पदार्थ जास्तीचे कर्ब : नत्र प्रमाण ( ३०:१ पेक्षा जास्त) पदार्थापेक्षा लवकर कुजतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जलद गतीने वाढत नाही. ३) जास्त प्रमाणात जमिनीची मशागत केल्याने मातीचे कण फुटतात. त्यातील सेंद्रिय पदार्थ कर्ब वायूच्या स्वरूपात उडून जाऊन पदार्थाचा ऱ्हास होतो. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन करण्यासाठी मशागत योग्य प्रमाणात आणि कमीत कमी असावी. ४) जमिनीतील असणारा ओलावा, जमिनीचे वाढते तापमान आणि योग्य हवेचे प्रमाण असेल तर सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीमध्ये कमी होऊ लागते. जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढवण्याचे उपाय ः योग्य पीक पद्धतीचा अवलंब ः जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांची निवड महत्त्वाची आहे. पीक फेरपालटीमध्ये शेंगवर्गीय पिकांचा समावेश करावा. उदा. मूग,उडीद , सोयाबीन,भुईमूग, तूर इ. या पिकांना मशागत कमी लागते. त्यांचे जमिनीवर आच्छादन चांगल्या प्रकारे होत असल्याने जास्तीचा पालापाचोळा पडतो. पिकांचे अवशेष शेताबाहेर जाणार नाहीत अशी पिके निवडावीत. मशागतीवर नियंत्रण ः मशागत कमी केल्याने जिवाणूंची संख्या नियंत्रणात राहते. त्यांची झपाट्याने वाढ होत नाही. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास कमी होतो. अन्यथा मशागतीमुळे योग्य हवा व पाणी मिळाल्याने त्वरेने जिवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजून त्यातील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास होतो. याकरिता कमीत कमी मशागत करावी. माती आडवा आणि सेंद्रिय कर्ब साठवा मातीच्या वरच्या १५ सेंमीच्या थरात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. तेव्हा मातीच्या वरच्या थराची धूप होणार नाही याची काळजी घ्यावी.त्यासाठी मृदा संधारणाची कामे करून घ्यावीत. योग्य खतांची मात्रा पिकांना शिफारस केलेली खत मात्रा योग्य प्रमाणात दिल्याने पिकांची वाढ चांगली होते. त्या सोबतच मुळांची वाढ जास्त झाल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. रोदमस्टेड (इंग्लंड) येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये मागील १७७ वर्षांपासून प्रयोग सुरू आहे. त्यामध्ये योग्य खत मात्रा दिल्याने सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारतातही मागील १०० वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष अशाच प्रकारचे आहेत. याकरिता जमीन रिकामी राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हिरवळीच्या खतांचा वापर ः

बांधावरील काही वृक्ष जसे करंज, ग्लिरिसिडीया आणि हिरवळीचे खत धैंचा , बोरु यांच्या वापराने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये वाढ होते. जमिनीचे आरोग्य सुधारते. शेणखत, कंपोस्ट खताच्या वापराने जमिनीच्या गुणधर्मामध्ये सकारात्मक बदल होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण नियमित केले जाते. मातीचे गुणधर्म आणि सेंद्रिय पदार्थांचे संबंध ः थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे १.५ टक्के जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते. उष्ण कटिबंधात याचे प्रमाण पटीने वाढते. अशा वेळी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आहे तेवढे ठेवायचे असेल तर त्यासाठी २ ते २.५ टक्के सेंद्रिय पदार्थ जमिनीत असावेत. त्यासाठी दरवर्षी सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या स्त्रोताद्वारे जमिनीत मिसळावेत. मातीच्या गुणधर्माशी सेंद्रिय पदार्थांचा संबंध ः अन्नद्रव्यांची उपलब्धता ः सेंद्रिय पदार्थातील घटकांचे जसे की, प्रोटीन,फॅट,स्निग्ध पदार्थ, सेल्युलोज, लीग्निन यांचे विघटन होऊन पिकांना आवश्यक असणाऱ्या मुलद्रव्यांची उपलब्धता जमिनीतून पिकांना होत असते. जमिनीमध्ये १ टक्का सेंद्रिय पदार्थ असतील तर त्या पदार्थांमधून १०० किलो सेंद्रिय पदार्थ, ५० ते १०० किलो नत्र , ५ ते १० किलो स्फुरद आणि पालाश २.५ ते ५ किलो गंधक प्रति एकरी प्रति वर्ष उपलब्ध करून देते. जलधारण शक्ती ः सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थ त्यांच्या वजनाच्या ९० टक्के पाणी शोषण करून धरून ठेवतात. हे सर्व पाणी पिकांना उपलब्ध होते .मातीचे कण सुद्धा खूप पाणी शोषून घेतात आणि धरून ठेवतात. परंतु खूप कमी प्रमाणात हे पाणी उपलब्ध होते. मृदा कणाने शोषण केलेले बरेचसे पाणी पिके घेऊ शकत नाहीत, परंतु सेंद्रिय पदार्थाने धरून ठेवलेले सर्व पाणी पिके घेऊ शकतात. मातीची जडण घडण ः १) मातीच्या कणांना जोडण्याचे कार्य सेंद्रिय पदार्थ करत असल्यामुळे मातीची जडण घडण चांगली होते. त्यामध्ये मोठ्या आणि त्याचबरोबर केशवर्गीय रंध्राची संख्या वाढते. जलधारणा शक्ती वाढते. जमिनीमध्ये पाणी झिरपण्याची क्रिया चांगल्याप्रकारे होते. २) मातीच्या कणांना बंदिस्त करण्याचे कार्य सेंद्रिय पदार्थ करत असल्यामुळे त्याचे वजन वाढून धूप होत नाही.त्यामुळे पृष्ठभागावरील माती आणि सेंद्रिय पदार्थ वाहून जात नाहीत. ३) सेंद्रिय पदार्थांचा जमिनीतून होणाऱ्या ऱ्हासापेक्षा सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळण्याचे प्रमाण जास्त ठेवणे फायद्याचे आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते. ४) जवळपास १० किलो सेंद्रिय पदार्थातून १ किलो सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते, असे गृहीत धरले, तर १०० टन सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले तर १ टक्का स्थिर सेंद्रिय पदार्थ जमिनीला मिळतील.दरवर्षी प्रति एकरी १०० टन सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले, तरच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यांपर्यंत ठेवता येईल. त्यामुळे मातीचे आरोग्य चांगले राहून उत्पादनामध्ये वाढ होते. संपर्क ः डॉ.विलास पाटील,९४२२८७७७९० (लेखक मृदा शास्त्रज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com